अमेरिकन हळदीकुंकू

सालाबादप्रमाणे यंदाही आमचे येथे आश्विन-कार्तिकातील हळदीकुंकवाचा सोहळा मोठ्या थाटात साजरा होत आहे. कळविण्यास आनंद होतो, की ह्याही वर्षी असंख्य वृक्ष-तरुलता-वल्लरी ठेवणीतील रंगीबेरंगी नित्यनूतन नयनरंजक वस्त्रे प्रावरणे पारिधान करून दिमाखाने ह्या नवनवल नयनोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. वस्त्रांमध्ये पोपटी, हळदी, शेंदरी, केशरी, तांबूस, लाल, किरमिजी ह्या रंगांचा प्रामुख्याने भर दिसतो आहे. त्यांना भरजरी जरतारी किनार लावण्याचे काम साक्षात सूर्यदेवांनी जातीने अंगावर घेतलेले दिसत आहे. तशातही, 'अजूनी यौवनात मी' चा हिरवट दिमाख बाळगणा-या काही अल्लड वल्लरी आहेतच... परंतु त्यांचे हे भातुकलीचे खेळ केवळ चार दिवसांचे, याची त्यांनाही कल्पना आहे. लवकरच त्याही हळद लावून, पिवळ्या साडीत वधूवेषात बोहल्यावर उभ्या राहतील खचितच! ह्या नेत्रसुखद मैफिलीमध्ये उजवे-डावे ठरवतांना दर्दी रसिकांची तारांबळ उडत आहे. विधात्याने दोनच डोळे देण्याचा कंजूषपणा करावा याची तक्रार उपस्थितांमध्ये वारंवार केली जात आहे.

आणि ह्या आनंदोत्सवातच, दोन-चार आठवड्यांचा हा जल्लोष संपला, की सगळ्या  रम्य वस्त्र-प्रावरणांचा परित्याग करून पुनश्च काटक्या-वल्कलांचा वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा ह्या कल्पनेनेच कित्येकांच्या अंगावर शिरशिरी येत आहे.

Comments