यथा काष्ठम् चं काष्ठम् चं...

प्रवाहात वाहतांना दोन माणसं जवळ येतात, काही काळ एकत्र वाहतात आणि एके दिवशी आपापल्या मार्गाने निघून जातात.

पुन्हा कधी भेटण्याची काही खात्री नसते; कधीकधी पुन्हा कधीच न भेटण्याची खात्री असते.

कित्येकदा फारकतीनंतर आयुष्य पुन्हा तसंच वहात राहतं, जणू भेट झालीच नव्हती, भेटीपूर्वीही आयुष्य होतंच, अजूनही आहे. कधीकधी ही फारकत मात्र कुठेतरी, कमीजास्त खोलवर आघात करून जाते.

दरवेळी रक्ताचं का मायेचं नातं असतंच असं नाही. घनिष्ट परिचय, जवळची मैत्री असतेच असं नाही. पण त्या सहप्रवाशांनी आपल्या आयुष्यातल्या कुठल्यातरी लहानशा कोपऱ्याला स्पर्श केलेला असतो. ते हक्काने आठवणीत आपला तो कोपरा राखून ठेवतात.

एखादी सोशल मीडियावर भेटलेली मैत्रीण. चार समान आवडीच्या गाण्यांची ओढ, तिचा गोड आवाज, गाण्याची हौस, मुलांचे फोटो; किंवा माझ्या पोस्टवरचे तिचे नेमाने येणारे लाईक्स आणि बदाम! बस्स, एवढीच ओळख. प्रत्यक्ष गाठीभेटीचा प्रश्नच नसतो. आणि एक दिवस, अगदी तरुण वयात, ती निघून जाते... कायमची!

एखादा मनस्वी मनुष्य! काही कॉमन मित्रांमुळे झालेली ओळख. आमच्या स्वभावातल्या तफावतीमुळे ओळख तशी दूरचीच. पण कुठेतरी तो मनमोकळा कलंदर स्वभाव भिडलेला असतो. सोडावॉटरच्या बाटलीप्रमाणे अखंड खळाळत असलेले, कुठल्याही पार्टीमधल्या नॉन व्हेज अपेटायझर्सशी स्पर्धा करणारे ते जोरदार जोक्स. कित्येक मोठ्या गायकांना केलेली तबल्यावरची अप्रतिम साथ. सगळं मनात येतं, आठवत राहतं; तो अचानक पन्नाशीतच गेल्याचं ऐकून.

एखादा नाटक विषयावर मनस्वी प्रेम करणारा दिग्दर्शक. हौशी नाटकं सुद्धा जास्तीत जास्त सफाईदार झाली पाहिजेत ह्याची कळकळ असलेला. सुरुवातीच्या तालमीच्याच वेळी हे सीन्स प्रत्यक्षात स्टेजवर कसे दिसणार आहेत ह्याची ठाम कल्पना डोक्यात बाळगणारा, अती थंड डोक्याने कोणालाही त्या पात्राचा रोल समजावून देणारा, आणि करून घेणारा दिग्दर्शक. अजून बऱ्याच अपेक्षा बाकी असतांना, अचानक स्टेजवरून एक्झिट घेतो.

त्याशिवाय नातेवाईक होते, जवळचे, लांबचे, प्रेमाचे... मित्र, परिचीत होते.

'करोनाने मला तसा काहीच त्रास झाला नाही' असं म्हणताम्हणता आता जाणवायला लागलं आहे; की एका अतिमर्यादित अर्थाने मला स्वतःला शारीरिक त्रास नाही झाला खरा, पण ह्या गेल्या दीडेक वर्षातले एकूण दीर्घ उसासे, चुकचुकाट, हळहळ आणि मानसिक धक्के आता हातापायाच्या बोटांवर मोजण्यापलीकडे जायला लागले आहेत. सगळ्यांच्याच जाण्याचा करोनाशी थेट संबंध नसेलही. पण हे सगळे सहप्रवासी कायमचे दुरावले, ते गेल्या दीडेक वर्षातच. माझ्यापुरता, हा करोनाचा प्रभाव. ही काष्ठ, हे ओंडके, ह्या नौका, काही म्हणा, जेव्हा जवळ आले तेव्हा फार खळबळ नव्हती झाली.

पण कित्येकदा अनपेक्षितरित्या कुठेतरी धागे जुळले, गुंतले. एका लाटेने अकस्मात तोडल्यावर मात्र दीर्घकाळ भिरभिरणारी वलयं उमटवून गेली ही सगळी.

दुःख असतं ते आपल्या आयुष्यातल्या त्या क्षणांचे साक्षीदार आता नसल्याचं.

'सबको अपनीही किसी बात पे रोना आया’?

Comments