पहले अंडा, या पहले मुर्गी:


माझ्या बाबतीत उत्तर अगदी स्पष्ट आहे - पहले अंडा! शाकाहारी घरात लहानाचा मोठा होत असतांना, घरात अंडे आणणे हीच एक क्रांतिकारी गोष्ट होती. अंड्याच्या चिमुकल्या पावलांनीच घरात 'नॉनव्हेज' जिनसा येण्याला सुरुवात झाली होती - म्हणून पहले अंडा! अब आप यकीन नही मानोगे, पण त्या काळी आय लूक्ड व्हेरी व्हेरी लुकडा! त्यामुळे, वजन वाढवण्याच्या स्ट्रिक्टली मेडिसिनल पर्पज साठी म्हणून व्यायामाच्या जोडीने रोज अंडे खाण्याची सवलत मिळाली. हळूहळू महिन्याभरातून एखाददा घरी ऑम्लेट-पाव खाण्याइतपत प्रगती झाली. पण तरीही मला अंड्याचं, किंवा ऑम्लेटचंही, फार प्रेम नव्हतं.

ते प्रेम जुळवून दिलं ते इराण्याच्या हॉटेलांनी! (रेस्टोरंटला मराठीमध्ये हॉटेल म्हणतात.) तिथे मिळणारं, अगदी अचूक खरपूस भाजलेलं, प्रचंड कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिरीची लयलूट असलेलं ऑम्लेट, आणि ब्रून मस्का पाव, माझ्या आठवणीप्रमाणे पहिल्या भेटीतच कलिजा खलास करून गेले. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या गुडलकमध्ये जाण्याचा योग आला होता (तिथल्या स्वच्छतेच्या कहाण्या मला माहिती आहेत. मुंबई-पुण्यातल्या बऱ्याच आवडत्या ठिकाणी खायला जातांना मी अमेरिकनाइज्ड सेन्सरी ऑर्गन्स म्यूट करूनच जातो.) मझा आया! अर्थातच कॉलेजच्या, एकट्याने संपूर्ण ऑम्लेट आणि वरती पाव हे पूर्णान्न न परवडण्याच्या दिवसातली, कोणाला तरी कापून ते खाल्ल्याची मजा आणखीच और होती.

ह्यानंतर, ऑम्लेट माझ्या आवडत्या पदार्थांपैकी एक झालं. बाहेरच्या जगाची थोडीफार ओळख व्हायला लागल्यावर, इतरांच्या आहारात अंडे ही किती सामान्य, आणि तरीही मूलभूत गोष्ट समजली जाते ह्याची जाणीव झाली. फ्रेंचांना तर मला वाटतं, अंड्याशिवाय जेवण करण्याची कल्पनाच इम्पसिबले वाटत असावी. त्यांच्या पाककलेच्या शिक्षणक्रमामध्ये 'अंडे फेसणे' हाच एका पूर्ण सेमिस्टरचा कोर्स असतो, असं ऐकलंय. डायरेक्ट अंड्याचे; म्हणजे अंडी वापरून केलेले इतर पदार्थ नव्हे; अनेक वेगवेगळ्या स्वरूपातले पदार्थ मी खाल्लेले आहेत. अगदी कच्चं अंडं दुधात फेसून - हे केवळ 'मेडिसिनल पर्पज' म्हणूनच - एके काळी! बॉईल्ड कधीच आवडलं नाही, विशेषतः त्यातला पिठूळ पिवळा भाग! म्हणूनच एग करी हा दोघांच्याही मनाविरुद्ध लावून दिलेला, धुसफुसत टिकलेला, विजातीय विवाह सुद्धा आवडत नाही. त्यातलं ते तुळतुळीत निर्विकार एग, शेजारच्या चमचमीत करीकडे नजर वर करून बघत नसतं. आणि ती मसालेदार कजरारी करी 'हुं:! साथीदार म्हणून मी तर बटाटाच निवडला होता; इतके छान मिसळून गेलो असतो आम्ही एकमेकात. पण बाबांनी कानाला धरून बोहल्यावर उभं केलं ते ह्या टकलूबरोबर!' असे जळजळीत डायलॉग मारत असते. अगदीच विजोड जोडा! सॅलड मध्ये मात्र बॉइल्ड एग्जचे काप चालून जातात. सनी-साईड-अप ठीssक आहे. विशेषतः किंचित मीठ आणि ताजी मिरपूड घालून. त्यातला तो कुरकुरीत होऊ न देता, न करपवता, अचूक गोल्डन ब्राऊन केलेला पांढरा भाग आवडतो; पण न जमलेल्या जेलो सारखा तो थलथलीत लिक्विडी पिवळा भाग नाही आवडत! वेवस रांचेरोज (Huevos Rancheros) ह्या लोकप्रिय मेक्सिकन ब्रेकफास्टमध्ये सनी साईड एगच, कांदा, टॉमेटो, लसूण, हालापिनो मिरच्या, कोथिंबीर वगैरे 'नेहमीचे यशस्वी' मेक्सिकन कलाकार घेऊन, मक्याच्या टॉर्टियाबरोबर, चीज आणि धुरकट मसालेदार चोरिझो सॉसेज घालून देतात. त्यातला अंड्याचा रनी पिवळा भाग सोडून उरलेल्या गोष्टींची चव आवडते, म्हणून मी तो कधीतरी खातो. पोच्ड एगचं रूपच एवढं अप्रिय, की ते कधी खाऊन पाहिलंच नाही. पण त्याच पोच्ड एग्स पासून बनवलेलं 'एग्ज बेनेडिक्ट' मात्र आवडतं; अगदी खरं सांगायचं तर, त्यातल्या हॉलंडेज सॉसमुळे! ह्या हॉलंडेज सॉसमधली फेटलेली मोहरी माझी फार लाडकी. एवढी, की तिच्यावर एक वेगळी पोस्ट लिहिली होती. एग्ज बेनेडिक्ट, इंग्लीश मफिन आणि कनेडिअन बेकन हा खास न्यू यॉर्क ब्रेकफास्ट - बऱ्याच ठिकाणी मिळत असला, तरी फारच क्वचित तो नीट करणं जमतं लोकांना. स्क्रॅम्बल्ड एग्ज चा शोध ऑम्लेट नीट उलटता न आल्यामुळे फाटल्यावर, रागाच्या भरात सूडबुद्धीने त्याचे तुकडेतुकडे करतांना लागला, ह्यात काहीच शंका नाही. ह्यालाच मसाल्यांचे दागिने चढवून नटवलेलं भारतीय रुपडं 'अंडा भूर्जी' सुद्धा खाल्लेलं आहे; तेही फारसं नाहीच आवडलं. पण स्क्रॅम्बल्ड एग सुद्धा ताजं - हा कळीचा मुद्दा आहे! - असतांना, कधीकधी छान लागू शकतं, बरं का!

तर, ऑम्लेट बद्दल बोलत होतो नाही का! कितीही आवडत असलं, तरी त्यातही चांगलं आणि नॉट सो चांगलं असे दोन प्रकार आहेत. काही ठिकाणी खाल्लेली ऑम्लेटं अगदी मनात घर करून राहिली आहेत. भारतात बऱ्याच ठिकाणी ऑम्लेटमध्ये कांदा, मिरची आणि इतर काहीतरी घालणं अंड्याएवढंच आवश्यक समजतात. त्यामुळे सुरुवातीला कित्येक वर्ष तसंच ऑम्लेट खायची सवय होती.

पण, अंडं सोडून इतर काहीही न घालता केलेलं ऑम्लेट किती उत्कृष्ट होऊ शकतं, हे दिल्लीला अशोक हॉटेल (रेस्टोरंट नव्हे) मध्ये सर्वप्रथम समजलं. ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो; सकाळी निवांत आरामशीर ब्रेकफास्ट करायला वेळ होता. काहीतरी वेगळं म्हणून प्लेन ऑम्लेट मागवलं. आणि प्लेटभरून पसरलेला जो पदार्थ होता, तो केवळ डिव्हाईन होता. त्यात अंड्याशिवाय काही म्हणता काही नव्हतं, मीठसुद्धा! कदाचित दूध असावं, ज्याअर्थी एवढं उत्तम शिजलेलं होतं त्यावरून. किंचित मीठ, आणि ताजी काळी मिरी दळून त्यावर घातल्यावर सुख म्हणजे नक्की काय असतं त्याचं उत्तर पानात तयार होतं! तेव्हापासून बहुतेक वेळा मी ऑम्लेट प्लेनच करतो, किंवा मागवतो.

इंग्लंडमध्ये विंडसर कासल च्या बाहेर (राणी म्हणत होती आता दुपार झालीच आहे, तर अंगतपंगत जेवूनच जा. पण तिच्या घरची ती ब्रिटिश पाककला गळ्याखाली उतरवणं कठीण, म्हणून दादापुता करून कसेबसे सटकलो तिथून!) एक छोटीशी मार्केट टाईप स्ट्रीट, कम खाऊगल्ली आहे. तिथे एक फ्रेंच रेस्टोरंन्ट दिसलं होतं; अर्थातच ते पाहिल्याबरोबर माझी नजर इतरत्र कुठे फिरकू शकत नाही. त्यांच्या प्री फिक्सं लंच मेनूमध्ये, दुपारचं जेवण म्हणून चक्क ऑम्लेट बघितलं. फ्रेंचांच्या अंडं फेसण्याच्या कौशल्याची महती ऐकलेली असल्यामुळे मुद्दाम ते मागवलं. ती महती आणि पैसा - संपूर्ण सार्थ! अतिशय हलकंफुलकं, मऊसूत शिजलेलं, किंचित मीठ असलेलं ऑम्लेट आणि त्यात विखुरलेले गार्लिक सॉसेजचे तुकडे - अविस्मरणीय!

ऑम्लेट चांगलं असण्यासाठी ते महागडंच असायला हवं असं मुळीच नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कमधल्या लहानलहान डेलीज (हा जर्मन डेलीकटासन - बहुतांश कोल्ड कट्स आणि कोल्ड सॅलड सँडविचेस विकणाऱ्या दुकानांच्या नांवाचा शॉर्टफॉर्म). इथे एके काळी अर्ली बर्ड स्पेशल म्हणून १० वाजेपर्यंत, दोन अंड्याचं ऑम्लेट, बेगल आणि अस्सल न्यू यॉर्कची (स्टारबक्स वगैरेंचा जन्म अजून व्हायचा होता) धुरकट, थोडी स्ट्रॉंग कॉफी केवळ दीडदोन डॉलर्समध्ये मिळत असे. बाकी सगळं जाऊ दे, त्या ऑम्लेटवरच माझी जान कुर्बान होती! त्यांच्याकडे लांबलचक मोठाथोरला फ्लॅट तवा असतो. सकाळच्या ऑफिसच्या गर्दीत, त्यांना दोन अंडी फेसायला एखाद्या मिनिटापेक्षा जास्त वेळ देणं परवडत नाही. आणि तरीही त्यांना, अतिशय पातळ थर घातलेलं ते ऑम्लेट जराही पसरू न देता, करपू न देता, अचूक वेळी उलथणं, आतमध्ये थोडंसं मॉईस्ट असतांनाच त्याची छान लांबट आयताकृती घडी घालणं आणि मधल्या काळात बेगल व्यवस्थित टोस्ट करणं कसं काय जमतं ह्याचं मला कायमच कुतूहल असे! ग्रेट चव - हे सँडविच मात्र केचप बरोबरच छान लागतं.

ह्या सगळ्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन, मीही महिन्या-दोन-महिन्यातून एखाददा अगदी मन लावून ऑम्लेट करतो. घरात असतांना ब्रेकफास्ट वगैरे लाड कधीच नसतात - डायरेक ब्रन्च! कधीतरी अगदी मनासारखं, आठवणीतल्यासारखं परफेक्ट ऑम्लेट जमूनही जातं, टोस्टही अचूक भाजलेले असतात... (ट्रॉपिकाना चा) ताजा ऑरेंज ज्यूस रूम टेम्परेचरला आणून तयार असतो. त्या दिवशी मी ब्रन्चचा नूर ओळखून कॉफीचं पॉटच लावतो; एरवी दोघांसाठीच कुठे पॉट करत बसायचं म्हणून, क्यूरेगचीच कॉफी असते. ब्रन्चला मन आनंद आनंद छायो अशी अवस्था असते. फ्रेंच पाककला विद्यालयात न जाताही आपल्याला एवढं जमलं एवढ्यावर खूष असतो मी.

तसा अगदीच अल्पसंतुष्ट आहे मी!

Comments