लहानपणी ही कविता शिकल्यापासून आपल्या राज्याबद्दल थोडी 'आपलाच दाम खोटा' अशी भावना झालेली होती. म्हणजे थोडक्यात काय, माहितेय तुमची राज्यं सगळी छान छान आहेत, पण तरी आमचा तोच बाब्या! भारतातली इतर काही राज्यं अनुभवल्यावर महाराष्ट्र बऱ्यापैकी सुंदर, आणि नक्कीच जास्त संपन्न राज्य आहे ह्याची जाणीव झाली होती.
पण शेवटी आपण कुठल्या राज्यात जन्म घेतो ते काय आपल्या हातात का असतं; तसंच थोडंसं आपण अमेरिकेत कुठल्या राज्यात येऊन थडकू त्याचंही! इथे आल्यावर सुरुवातीपासून वाट्याला आलं ते न्यू जर्सी राज्य. त्यात पुन्हा लेथार्जी नामक एक व्याधी असली, की आहे ते काय वाईट आहे, कशाला जायचं दुसरीकडे असं म्हणून 'तैसेची रहावे' धारणा होते. मात्र ह्याचा अर्थ पायाची भिंगरी गरगरायची थांबते असा नाही. अमेरिकेतल्या इतर बऱ्याच राज्यांमध्ये फिरल्यावर पुन्हा एकदा ती ' बहु असोत ... ' ची जाणीव डोकं वर काढून आली.
कुठेही गेलं, की तिथल्या लोकांशी बोलतांना 'तुम्ही कुठले, आम्ही कुठले' हा नेहमीचा पहिला प्रश्न! ह्यावर मला हळूहळू जाणवायला लागलं, न्यू जर्सी हे राज्य इथल्या इतर राज्यांच्या खिजगणतीतच नसतं. मेल्या ओहायोची निदान 'सगळ्यात बोअरिंग राज्य' म्हणून टिंगल करण्यापुरती तरी दखल घेतली जाते. न्यू जर्सीच्या नशिबात तेवढंही नाही. एकतर आकारमानाने, अमेरिकेच्या अनेक महाकाय राज्यांमध्ये त्याचा नंबर तळापासून चौथा लागतो. ऱ्होड आयलंड आणि डेलावेअर ही अनुक्रमे अंबानी आणि बिल गेट्सच्या घरांपेक्षा थोड्या जास्त क्ष्रेत्रफळाची राज्यं सोडली, की नंतर आम्हीच. येतं तसं कनेटिकट (कनेक्टिकट नव्हे!) मध्ये; पण ओळखीच्या बाबतीत ते आमचंच जुळं भावंड! त्यामुळे, अमेरिकेत बाहेर कुठेही 'आम्ही न्यू जर्सीहून' असं सांगितलं, की फक्त पाचकळ जोक्स ऐकायची, किंवा डोळ्यातील अपार कणव बघायची तयारी ठेवावी लागते.
कुण्णी म्हणता कुण्णी विचारत नाही आमच्या बाब्याला! अध्यक्षीय निवडणुकांमध्ये 'हे राज्य काय आपल्याला मिळणार नाहीच आहे!' असं म्हणून रिपब्लिकन उमेदवार पूर्ण इग्नोअर मारतात; तर डेमोक्रॅट्स 'घरकी मुर्गी' म्हणून गृहीत धरतात. फार फार पूर्वी उमेदवार गॅरी हार्टने तर आमच्या सबंध राज्याला न्यू यॉर्क शहराचे उपनगर म्हणून हिणवले होते. त्या कुठल्या डॉना राईसबरोबर त्याचं लफडं बाहेर येऊन त्याला निवडणुकीतून काढता पाय घ्यावा लागला तेव्हा अस्सा आनंद झाला होता मला; पेढे वाटायचे फक्त बाकी ठेवले होते. पण त्याला एकट्याला का दोष द्यायचा. आमची किर्तीच मुळी 'स्वाम्प अक्रॉस हडसन', 'स्टेट दॅट लिव्ज इन द शॅडो ऑफ न्यू यॉर्क सिटी' किंवा 'आल कपोन ला जिवंत गाडलंय ते राज्य' असली आहे. आता तो हजारो वर्षांपूर्वीच्या हिमनगांच्या वितळण्यामधून निर्माण झालेला जेमतेम ५५ चौरस मैलाचा स्वाम्प म्हणजे काय सबंध राज्य नव्हे; किंवा आल कपोन ला इथे गाडल्याची ही केवळ एक दंतकथा आहे असल्या स्पष्टीकरणाची कोणालाच पर्वा नसते.
ह्यातले कोणी कधी जर न्यू जर्सीला भेट देऊन गेले असलेच, तर फक्त ताशेरेच ऐकू येतात. 'केवढी ती गर्दी', 'लहानसे रस्ते!' 'तीन तास ड्राइव्हिंग केल्यावर राज्यच संपून गेलं!' वगैरे. न्यू जर्सीमधील 'जग-हॅण्डलर टर्न' ची दहशत मात्र बहुतेकांच्या मनात घर करून असते. खरं तर साधीशी गोष्ट आहे! इतर बहुतेक राज्यांमध्ये, ट्रॅफिक लाईटजवळ किमान तीन लेन्स असतात. सरळ जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून, डावी-उजवीकडे वळणाऱ्या गाडयांना स्वतंत्र लेन्स, आणि सरळ जाणारी वेगळी लेन असते. जागेच्या टंचाईमुळे, आम्हाला असले तीनतीन लेन्सचे लाड नाही परवडत! त्यावर आम्ही शोधून काढलेली 'जग हॅन्डलर टर्न' ही जगातील एकमेवाद्वितीय, अस्सल न्यू जर्सीकर, नामी युक्ती! म्हणजे, डावीकडे वळायचे असल्यास, प्रथम आडवा रस्ता क्रॉस करून, उजवीकडे गोल वळून, नंतर उभ्या रस्त्यावरून इच्छित दिशेला जाणे (डोळ्यासमोर सुरईचे हॅन्डल आणा). पण बऱ्याच लोकांना येवडी शिंपल गोष्ट समजायला वेळ लागतो. अलाबामा, अर्कान्सा वगैरे थोडी कमी बुध्यांकाची जनता तर म्हणे न्यू जर्सीमध्ये लेफ्ट ओन्ली लेन शोधत मैलोनमैल सरळ जात राहून लवकरच शेजारच्या न्यू यॉर्क राज्यात शिरते.
एकंदरीत आमच्या राज्यामध्ये लक्षणीय असं काहीच नाही, अशी आणखी एक तक्रार आहे. बाहेरून (म्हणजे भारतातून!) पाहुणे आले, तर त्यांनी डोळे विस्फारावे किंवा परत गेल्यावर इतरांना जळवावं असलं एकही विश्वविख्यात कौतुक नाही इथे. बऱ्याचदा, न्यू जर्सीत राहिलो होतो असं सांगितल्यावर 'पण अमेरिकेला जाणार होतात ना!' असले उद्गार ऐकायचीही तयारी ठेवावी लागते. हे खरंच अमेरिकेतलं एक राज्य आहे हे नकाशात दाखवून पटवून द्यावं लागतं. स्मार्टफोनवर दाखवत असाल, तर सूक्ष्मदर्शक भिंग तयार ठेवणेही जरुरीचे; चिमटीने रुंदावून दिसेलच असे नाही. 'अमेरिका' म्हटल्याक्षणी डोळ्यासमोर येणारा भपका, झगझगाट, गगनचुंबी इमारती, थीम पार्क्स, महागडं शॉपिंग ह्यातलं काहीच नाही आमच्या राज्यात! इतर अनेक राज्यांचं अवाक करणारं सृष्टीसौन्दर्य नाही तर नाहीच, पण साध्या आगी, वणवे, भूकंप, अतिवृष्टी, चक्रीवादळं, पूर ह्यासारख्या अमेरिकेत इतर अनेक ठिकाणी येणाऱ्या नैसर्गिक, किंवा मास शूटिंग सारख्या मानवनिर्मित आपत्ती सुद्धा फारच क्वचित फिरकतात इथे... त्यामुळे बातम्या सांगण्यासारखंही काही घडत नाही. अगदीच मिळमिळीत राज्य!
तर मग 'प्रिय अमुचा...' म्हणायचं तरी का ह्याला?
वो किस्सा और कभी!
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...