दर्शन - माझी प्रत! (मराठी)


ह्या पोस्टच्या शीर्षकाला संदर्भ आहे तो पुलंच्या 'जावे त्यांच्या देशा' मधील ‘दर्शन’ ह्या लेखाचा. माझ्या आयुष्यातल्या एका अनमोल आनंदाचा अनुभव व्यक्त करायला मला ह्यापेक्षा अचूक शब्द शोधूनही सापडणार नाहीत.

"एक दर्शन ध्यानीमनी नसताना घडले. 'दर्शन' ह्या कल्पनेचीच एक असाधारण प्रचीती आली. ती त्यातल्या अकल्पितपणामुळे तर मनाला जास्त बिलगून राहिली... दर्शन घ्यायला जावून दर्शन घडवून घेण्यात तो आनंद लाभलाही नसता..." - पुल
* * * * * * * * *


यंदा उन्हाळ्याच्या सुटीत कुठे जायचं ह्याविषयावर बरीच 'चर्चा' झाल्यानंतर मी बायकोचं मन वळवलं, की आपण लास व्हेगास, ग्रँड कॅनिअन आणि यूटा मध्ये जाऊ. ह्या सर्व ठिकाणांचे बरेच फोटो मी पाहिलेले होते, आणि कधीपासून तिथे जाण्याचं आकर्षण होतं, नॅशनल पार्कच्या लॉजमधल्या मोजक्याच जागा सहासहा महिने आधी भरून जातात; म्हणून बायकोचं मत बदलायच्या आत ताबडतोब हॉटेल, रेंटल कार आणि विमानाची रिझर्वेशन्स करून मी मोकळा झालो - मार्च उजाडताच, जूनअखेरच्या सुटीसाठी! ह्या सर्वानंतर तिने बातमी आणली, की त्या वर्षी, १९९७ मध्ये, बॉस्टनच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लता मंगेशकर येणार आहे. (कर्तृत्वाच्या बाबतीत, माझ्या मनातील तिच्या कौतुकाच्या आणि आदराच्या मोजपट्टीने, साध्या वयाच्या हिशेबात सुद्धा लता कितीही महान असली, तरी लिहीताबोलताना 'ती' लताच; 'त्या लतादीदी' नव्हे. दिदी म्हणण्याएवढी प्रत्यक्ष जवळीक तर नाहीच; आणि तसं मी आईलासुद्धा ए-जा च म्हणतो.) लताच्या आवाजाबद्दल मला काय वाटतं हे शब्दात सांगणं केवळ अशक्य आहे. ह्या गोष्टींची वजनं मापं करता आली असती, तर मी तिच्या आवाजाच्या सर्वात मोठ्या भक्तांमध्ये गणलो गेलो असतो ह्यात शंका नाही. लहानपणी, जेव्हा हिंदी सिनेसंगीत हे एकमेव विरंगुळ्याचं साधन होतं, तेव्हापासून तिचा आणि आशाचा हे दोन स्वर कानात गुंजत असल्यामुळे, त्यापेक्षा तसूभरही खालचे आवाज खटकतात. तेव्हा, त्या अधिवेशनाला जाण्याची, तिला प्रत्यक्ष पाहण्याची (कदाचित - अगदीच बालिश पोरकट स्वप्न - पण न जाणो, तिच्याशी एखादा शब्द बोलायला मिळण्याची!) संधी हुकणार ह्याचं अपार दुःख होतं; पण अधिवेशन नेमकं २-३-४ जुलैला होतं, आम्ही त्याच वेळी दूर यूटामध्ये असणार होतो, आणि आमची रिझर्वेशन कॅन्सल करणं शक्य नव्हतं. मग एक लहानशी फुंकरीची बातमी आली, की लता फक्त भाषण करणार आहे, गाणार नाही - दुःखात तेवढंच सुख, की प्रत्यक्ष गाणं तरी मिस होणार नाही.

ठरल्याप्रमाणे आम्ही प्रथम लास व्हेगास ला गेलो. जुगाराविषयी फार प्रेम नसलेल्या मला सुद्धा ह्या जादुई जुगारी मायानगरीने पार मोहून टाकलं. अमाप पैसा आणि अमर्याद कल्पनाशक्ती असली, तर आजही मयसभा रचता येतात ह्याची साक्ष आहे लास व्हेगास म्हणजे!

तिथल्या पहिल्याच दिवशी आम्ही वेगवेगळ्या कसिनोज च्या वाऱ्या सुरु केल्या. एम-जी-एम ग्रँड त्या काळी फार मोठं प्रस्थ होतं; त्यामुळे ते आमच्या यादीच्या सुरुवातीलाच होतं. एम-जी-एम ची आलिशान भव्य लॉबी, त्यांच्याच सिनेमांमधले सगळे झगमगते सितारे धरणीवर उतरल्याप्रमाणे डोळे दिपवून टाकत होती. त्या कॅसिनोचा आवाका बघितल्यावर मी निमूटपणे तिथे असलेला नकाशा उघडून, कुठे कसं फिरायचं, काय पहायचं ठरवायला त्यात डोकं घातलं. एवढ्या अवाढव्य अजस्त्र कॅसिनोमध्ये नकाशाशिवाय हरवून जाणं अगदी सहज शक्य होतं. बायकोच्या कोपरखळीने आणि 'ती बघ!' ह्या अतीसंक्षिप्त आश्चर्योद्गाराने दचकून डोकं नकाशातून बाहेर काढलं. दचकण्याचं कारण असं, की माझी बायको शब्दांच्या बाबतीत सहसा कंजुषी करत नाही. बहुतेकांना जे विधान तीन-चार शब्दात उरकता येईल, त्याला ती पंचवीसेक तरी शब्द वापरून फुलवते. एवढा छोटा उद्गार म्हणजे निश्चित काहीतरी महत्वाचं आहे, म्हणून मी वळून पाहू लागलो. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतांना, मला कानांत कायम 'टक लावून बघू नको हं! वाईट दिसतं !!' असे कुजबुजते फिस्कार ऐकू येत होते. वाईट दिसण्याची मला एवढी फिकीर नव्हती. त्या लॉबीमधल्या प्रचंड गर्दीला जबडे वासून लखलखती झुंबरं, ऐतिहासिक वाटणाऱ्या टेबल-खुर्च्या आणि खणखणणारी शेकडो स्लॉट मशीन्स टक लावून बघतांना माझ्या बावळटपणाकडे लक्ष द्यायला नक्कीच वेळ नव्हता. काहीच लक्षणीय न दिसल्यामुळे, मी चाणाक्षपणे इतरांना समजू नये म्हणून मराठीत विचारलं 'कोणाकडे टक लावून बघू नको'? ह्यावर 'हद्द झाली आता!' अशा अविर्भावात बायकोने हाताला खेचून शेजारच्या भिंतीपाशी नेलं आणि आणखी खालच्या आवाजात ती कुजबुजली 'आपल्या शेजारी बघितलंस का, लता मंगेशकर उभी होती!'

त्याक्षणी, बॉस्टनचं अधिवेशन चुकण्याचा तिच्या मनावर माझ्याहीपेक्षा जास्त खोल परिणाम झाला आहे. तिला दिवसाढवळ्या लता भेटल्याची स्वप्नं पडू लागली आहेत, ह्याबद्दल मला काळजी वाटली. तिचे हे मनाचे खेळ दूर करावेत, म्हणून मी आम्ही आधी उभे होतो त्या दिशेने पाहिलं. तिथे दोन साडी नेसलेल्या बायका इकडेतिकडे बघत उभ्या होत्या. त्यातली एक ... खरंच लता मंगेशकरसारखी दिसत होती. पण छे! काहीतरी काय; भासच असणार; कसं शक्य आहे! लता कशाला येणार? व्हेगासला? तिला तर बॉस्टनला जायचंय.. दोन-तीन दिवसातच! माझे विचार बहुधा शब्दांमधून व्यक्त झाले असावे. कारण मी एका अतिपरिचीत थंड स्वरातील प्रश्न ऐकला 'विमानं असतात माहित्येय ना? चारपाच तासात जाता येतं आजकाल बॉस्टनला!'. मी बचावाचा प्रयत्न केला 'नाही, ती आणखी उंच असेल असं वाटलं होतं... ' 'तुमच्या परवाच्या भेटीमध्ये फार मान वर करून बघावं लागलं होतं का?' मी शेवटचा प्रयत्न केला 'पण मग तिच्या बाजूला गर्दी-घोळके-लोंढे कसं काही नाही?' 'तुला जाणवलंय का, आपल्या नजरेच्या टप्प्यात सहा-सातच भारतीय लोक असतील. आणि त्यातले चार आपलेच कुटुंब आहे?' मी शरणागती पत्करली, आणि कबूल केलं की लताबद्दलचं अपार कौतुक आणि आदरच मला माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेऊ देत नव्हते. फारफार तर काय, आपल्याला कोणी वेडपट म्हणेल, एवढंच ना! ह्या विचाराने मी त्या बाईंजवळ जाऊन, माझ्या आवाजात आणणं शक्य आहे तेवढं मार्दव आणून विचारलं 'आप लताजी हैं?'. ती नाही म्हणणार ह्याची एवढी खात्री होती, की प्रश्न मराठीत विचारायचंही डोक्यात आलं नाही. तिने माझ्याकडे वळून नुसतीच हसून मान हलवली. माझ्या नजरेत संपूर्ण आसमंत त्या क्षणी गोठलेला होता. तो एक क्षण युगांसारखा होता. जिची शब्दशः शेकडो गाणी माझ्या मनात कायम वाजत असतात, आणि तरीही प्रत्येक वेळी ऐकतांना एखाद्या जागेचा, मुरकीचा, हरकतीचा आविष्कार नव्याने जाणवतो - ती आणि मी एकाच खोलीत, काही थोड्याच फुटांवर उभे आहोत... आणि मी जागा आहे... हे सगळं विश्वास ठेवण्यापलीकडचं होतं.

एव्हाना, माझ्या नजरेत 'सांगितलं नव्हतं तुला!' हा टोमणा दिसण्याऐवजी फक्त ब्रह्मानंद ओसंडून वाहताना दिसल्यामुळे सुरक्षित वाटून बायकोही बाजूला आली होती. लतानी आमच्या दोघांची, मुलांची चौकशी केली, कुठे राहता, किती वर्ष आहात, सुटीचा प्लॅन वगैरे! मी यांत्रिकपणे प्रश्नांची उत्तरं देत होतो, पण डोक्यात फक्त एकच विचार होता - साधं नेहमीचं बोलतानाही हा आवाज 'जा जा रे जा बालमवा', किंवा 'मुझसे मत पूछ' नाहीतर 'जुर्मे उल्फत पे हमे' ह्यातल्यासारखाच गोड वाटतो ना! मला खात्री आहे मी संपूर्णपणे चवळटबा सारखं बरंच ('तुमचा आवाज म्हणजे काय कमाल आहे हो!', 'तुमचं सपनेमे सजन से दो बातें माझं फार आवडतं, आणि सपना बन साजन आये तर काय ग्रेटच आहे'; आणि हे बोलताना आयत्या वेळी फैली हुई है सपनोंकी बाहें राहून गेलं ह्याचं दुःख!) काही बडबडलो असणार. पण माझ्या वटवटीचा एकमेव उद्देश होता तिचा आवाज ऐकत राहणं! तो सफल झाला. दहा-पंधरा मिनिटं आम्ही बोललो असू. आम्ही बॉस्टनला येऊ शकणार नसल्याचं तिला सांगितलं (त्या हजारोच्या महाराष्ट्रीयन जमावामध्ये आम्ही दिसणार नाही ह्याचं दुःख स्मितहास्यामागे लपवायचा तिने प्रयत्न केला, पण मला जाणवलं ते!); आणि मग त्या दोघी त्यांच्या दिशेने निघून गेल्या.

आम्ही त्या जागीच खिळून उभे होतो बराच वेळ. जे घडलं ते खरं होतं ह्याची एकमेकाला खात्री पटवून देत! हो, मधल्या काळात माझी बायको शिल्पस्वरूपातून पुन्हा एकदा मनुष्यस्वरूपात आली होती. लता समोर असताना तिच्या तोंडून चकार शब्द उमटला नव्हता ह्याची एक अव्यक्त जाणीव झाली होती मला. दहा-पंधरा मिनिटं अशी शांतता म्हणजे नक्कीच दैवी चमत्कार!

आसमंतात दर पाच दहा मिनिटांनी पी ए सिस्टिमवर कोणालातरी दहा हजार डॉलर्सचा जॅकपॉट, किंवा नवीन जी एमची कार किंवा असलीच काहीतरी बक्षिसं लागल्याच्या घोषणा होत होत्या. समस्त गर्दी ऊह आणि आह करत, विजेत्यांच्या नशिबाचा हेवा करत, तरसलेल्या नजरा विस्फारून चोहीकडे बघत होती. आमचे आकंठ तृप्त चेहरे बघण्यात कोणालाच रस नव्हता.

लास व्हेगासच्या कसिनोजमध्ये आयुष्यभराचा अनमोल ठेवा मिळाल्याच्या घोषणा करण्याची पद्धत नाही.

Comments