बिझिनेस ट्रीप - १

एका ग्लोबल अमेरिकन कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विभागात बरीच वर्षे काम करतांना, कामाच्या संदर्भात इतर देशातील काही ऑफिसेसना भेटी देण्याचे अनेक योग आले. माझ्यासारख्या मूलतः भटक्या वृत्तीच्या माणसाला, त्या निमित्ताने जगातली काही ठळक शहरं थोडीफार बघायची 'अगं अगं म्हशी' छाप संधी मिळाली. ह्या ऑफिसांमधले लोक माझ्याकडे 'कॉर्पोरेट हेडक्वार्टर्सकडून आलेला अमेरिकन' ह्या नजरेने बघत ते सुरुवातीला थोडं गंमतीशीर वाटे, थोडं खटकेही ('नाही, नाही; मी भारतीय आहे हो!'). माझ्या दृष्टीने मोस्ट एंजॉयेबल बिझीनेस ट्रिप्स अर्थात भारतामधल्याच! ८२ मध्ये भारत सोडलेल्या एका मध्यमवर्गीय मुलाला, ह्यापूर्वी तिथे पंचतारांकित हॉटेलांमध्ये रहाण्याचा, फक्त गाड्यांमधूनच फिरण्याचा, किंवा एसीकडून एसीकडे एवढाच पायी प्रवास असण्याचा अनुभव नव्हता - ते एक नावीन्य होतं. सुदैवाने तीन-चार वेळा वेगवेगळ्या रोल्स मध्ये, भारतातील आमच्या, किंवा व्हेंडर लोकांच्या ऑफीसना भेट देण्याची संधी मिळाली.
ह्या बिझीनेस ट्रिप्स मधल्या लक्षात राहिलेल्या ह्या मजेदार आठवणी!

* * * * *

ऑलमोस्ट आठ वर्षांपूर्वी मी चेन्नईला चौथ्यांदा गेलो होतो; साऊथ ईस्ट एशियाच्या एका बिझीनेस ट्रीपचा भाग म्हणून. दोन आठवड्यात क्वालालंपुर, सिंगापूर, मनिला, चेन्नई आणि बंगलोर - म्हणजे 'इफ इट इज ट्यूसडे, धिस मस्ट बी बेल्जीयम' ह्या सिनेमासारखाच प्रकार होता. माझी अमेरिकन बॉस आणि मी पहिल्या तीन आमच्या आणि शेवटच्या दोन व्हेंडरच्या ऑफिसांना भेटी देणार होतो. आधीच्या प्रवासात सिंगापूरहून चेन्नईला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाईटसाठी आम्ही दोघेच होतो. विमानातून बाहेर पडताक्षणी, सिंगापूर एअरलाईनच्या कर्मचाऱ्याने मला एकट्याला बाजूला घेऊन आमची फ्लाईट कॅन्सल झाली आहे, त्याऐवजी दुसरी फ्लाईट अमुकअमुक वगैरे सविस्तर माहिती सांगितली - ह्याचा माझ्या फेमिनिस्ट बॉसला राग आला होता. इस्त्री म्हणून तिला इग्नोअर केलं अशी तिची समजूत झाली होती. माझ्याशी बोलत असतांना, त्याने तिच्या दिशेने टाकलेले चोरटे कटाक्ष माझ्या नजरेतून निसटले नसल्यामुळे तो आम्हाला 'आंतरराष्ट्रीय जोडपं' धरून चालला असण्याची शक्यता मला जास्त वाटत होती. पन आपुन काय बॉसशी निष्फळ भांडान करनाऱ्यातलं नाय (त्यात पुन्हा, कुठची शक्यता जास्त वाईट हे सांगणं कठीण!), म्हणून तिच्या जोडीने मीही 'ह्या भागातील' पुरुषप्रधान संस्कृतीला फुकटात दोनचार हाणल्या!

चेन्नई एअरपोर्टला आम्ही रात्री उशिरा पोचल्यामुळे व्हेंडरच्या स्वागत पथकातले एकदोघेच सदस्य शिल्लक होते. हॉटेलमध्ये न्यायला त्यांची एअरकंडिशन्ड गाडी होती, स्वागतपथकापेक्षा ही एक गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची होती; कारण विमानतळाबाहेर पडल्याबरोबर, तीन शिट्या झाल्यानंतरच्या प्रेशरकुकरमधल्या बटाट्याला कसं वाटत असेल ह्याचा एक्झॅक्ट अनुभव मला क्षणार्धात आलेला होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच व्हेंडरचा, माझ्या बॉसच्या पदाला शोभेल इतपत योग्य पायरीवरचा, मॅनेजर आम्हाला ऑफिसात घेऊन जाण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये तिष्ठत बसला होता. गाडीमध्ये, तो फावल्या वेळात चेन्नाईदर्शन टूर गाईडचेही काम करू शकतो हे जाणवलं; दर पाचसात मिनिटांनी 'त्यांची कंपनी आमच्या एका प्रॉजेक्टसाठी केवढं जीव तोडून काम करते आहे' हे तीस सेकंदाचे प्रोमोज बेमालूमपणे मिसळण्याचं त्याचं कौशल्य कौतुकास्पद होतं. बॉसच्या ताज हॉटेल्स वरील प्रेमामुळे निवडलेल्या आमच्या कोनेमारापासून ऑफिस पुरेसं लांब होतं; आणि चेन्नई माझ्या आठवणीतलं छोटंसं ब्लँड गांव (!) राहिलं नसून ट्रॅफिक जॅमचा गोडवा त्यात आता पुरेपूर भरला आहे ह्याची जाणीव झाली.
गाडी ऑफिस बिल्डिंगच्या प्रवेशद्वारापाशी थांबताच, एक स्वागतपथक घाईघाईने गोळा झालं. आधी मला ती, शाळेच्या वेशभूषा स्पर्धेसाठी किंवा गॅदरिंग मधल्या नाटकासाठी छानछान कॉस्च्युम्स घालून, भांग पाडून, वेण्या (केसांच्या आणि केसात) घालून सजवलेली मुलंमुली वाटली होती. प्रत्यक्षात ते आमचे टीम मेम्बर्स होते. मग, त्यांच्यातल्या हायरार्की नुसार, मुलांमुलींनी माझ्या बॉसच्या आणि माझ्या शेजारी जागा पटकावल्या. प्रवेशद्वारापाशीच प्रथम एक ग्रूप फोटो; नंतर लॉबीमध्ये एक. लॉबीमध्ये एक भली मोठी 'नर्तन करितो बालगजानन' थाटाची (नर्तन?!? आय टी ऑफिसात?!) पितळेची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्याच्या बाजूला तेवढीच उंच एक समई आणि समोरची जागा चक्क रांगोळी आणि झेंडूच्या फुलांनी सजवलेली! टेक्नॉलॉजी ऑफिसात एवढी श्रद्धाळू मंडळी पाहून मन भरून आलं! बाजूच्या एका बोर्डावर मॅग्नेटिक अक्षरात 'xxx कंपनी वेलकम्स हॉनरेबल मिस xxx आणि ...' पुढे चक्क माझं नांव! आपलं नांव असं लोहचुंबकाक्षरामध्ये कुठे झळकेल अशी स्वप्नंसुद्धा मी पाहिली नव्हती! माझी बॉस गणपतीच्या गळ्यातला खोट्या सोन्याचांदीचा, कलाबतू आणि मखमाली फुलं लावलेला हार डोळ्यात आणि कॅमेरात भरून घेत होती (कुकातकुका)! मग 'एलेफंट गॉड', 'लाsर्ड आफ क्नॉलेज; इल्लला डाs, वीsजडमॅक्चुअली' वगैरे यथासांग ज्ञानप्रसारण झालं. बॉसनेही डोळे विस्फारून, तोंडाचा चंबू करून आपला अज्ञानी अमेरिकनचा रोल अचूक पार पाडला. वर 'वी नीड बोथ ऑफ दॅट इन आय टी, राईट?' इतपत पाचकळ ज्योकही मारला. त्यावरील उपस्थितांच्या हास्याच्या गडगडाटामुळे हवामान खात्याने गोंधळून अकाली पर्जन्यवृष्टीचे भविष्य वर्तवले, तर हास्याच्या कारंजातील काही तुषार राजस्थानच्या मरुभूमीत पोचून कित्येक उंटांची तृष्णा शांत झाली!

मग एका ज्युनिअर डेव्हलपरने (द्विरुक्ती झाली का? ह्या व्हेंडरकडे डेव्हलपर सिनिअर झाला तर त्याला मॅनेजर म्हणतात) खिशातून एक लायटर काढून त्याच्या लीडकडे दिला. ऑलिम्पिक टॉर्चसारखा तो लायटर हस्तांतर करत हेड हॉंचो कडे येऊन पोचला. एव्हाना मला भविष्याचा अंदाज आला होता; पण असला प्रकार कधी पाहिला नसल्यामुळे खरं वाटेना. तो लायटर त्याने माझ्या बॉससमोर धरल्यावर ती गोंधळून म्हणाली, 'नो थँक्स. आय गेव्ह अप अ फ्यू यर्स ऍगो!' मग त्या लायटरचा तिला माहिती नसलेला उपयोग (विथ मोअर ज्ञानप्रसारण... इंडिअन समस्क्रुथी) समजावून देण्यात आला. बॉसच्या डोक्यात, सॉरी हस्ते, दीपप्रज्वलन! पुन्हा फोटो.

शेवटी एकदा कुठे आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये स्थानापन्न झालो. त्या रूममधील व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल्स च्या सोयी मात्र कुठल्याही इतर देशातील ऑफिसांच्या तुल्यबळ होत्या. उच्चाधिशांची स्वागतपर भाषणे; माझा परिचय ऐकून माझे ठायी मानीजर सुलभ लज्जा उत्पन्न झाली. गेली पाच वर्षे आमच्या प्रॉजेक्ट वर ऑफशोअर व्हेंडर म्हणून काम करत असलेल्या ह्या कंपनीची 'ओळख', कंपनी इतर किती फॉर्च्युन वन हंड्रेड कंपन्यांबरोबर काम करते, वार्षिक उलाढाल, ग्रोथ इत्यादी देमार भरताड असंबद्ध माहितीने भरलेले एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. ते संपेपर्यंत टी ब्रेक आलाच! फाईन चायना मध्ये चहा, कॉफी आणि बिस्किटं (गुल्को नव्हे; दिसायला तरी ही बरी होती)... आम्ही ह्या ऑफिसात दोनच दिवस असणार होतो; म्हणून माझी आमचे मुद्दे चर्चेला घेण्यासाठी चुळबुळ चालू होती. शेवटी, पाहुणे म्हणून आलेल्या शिरी लोकांच्या आगाऊ कार्ट्याला एकदा त्याचं बडबडगीत म्हणायला द्यावं त्या थाटात मला आमचा प्रॉजेक्ट, माईलस्टोन्स, डेडलाईन्स, ऑफशोअर टीमकडून असलेल्या अपेक्षा ह्याविषयी बोलायची संधी मिळाली. संपूर्ण टीमसमोर एवढं तपशीलवार वर्णन प्रथमच होत असल्यामुळे काही डोळे ताटाएवढे होताना मी पाहिले. त्यांच्या बॉसच्या.. च्या बॉसनी हे सगळं ह्या ट्रिपच्याही आधी अमेरिकेत कबूल केलेलं असल्यामुळे मी 'कुत्ता जाने चमडा जाने' ह्या निर्विकारपणे बोलत होतो. माझी बॉस आणि मी ह्या भेटींमध्ये नेहमी गुड कॉप (ती) / बॅड कॉप (मी) ह्या भूमिका वठवत असू; त्यामुळे ह्याची सवय होती. उरलेला दिवस वेगवेगळ्या लहानलहान वर्तुळांमध्ये ह्या आणि अशाच चर्चा करण्यात गेला.

इतर शहरात एकटा असतांना संध्याकाळी मी नेहमीच आपलाआपण फिरतो; पण इथे मी एकटा नव्हतो. बॉसने लंचचा वेळ, आणखी ज्ञानप्रसारण टाळून, टीममधील काही बायकामुलींच्या गळ्यातल्या, कानातल्या, नाकातल्या, बोटातल्या आभूषणांचा अभ्यास करण्यात घालवला होता आणि ती कुठे मिळतील ह्याच्या चौकशाही करून ठेवल्या होत्या. तिने कुठेही हवं तिथे आनंदाने जावं आणि मला तशाच आनंदाने भटकू द्यावं, एवढीच माझी माफक अपेक्षा होती; ऑफिसची गाडी होतीच. पण, तिने इथे येण्यापूर्वी भारतातील स्त्रियांवरील अत्याचाराच्या बऱ्याच कहाण्या ऐकल्या-वाचल्या होत्या. त्यामुळे, कुठल्याही स्थानिक पुरुषावर, अगदी कंपनीच्या किंवा हॉटेलच्या ड्रायव्हर वरही तिचा विश्वास नव्हता. मग साड्या (नेसायची कशी माहिती नसलं तरी, 'ओ व्हॉट गॉर्जिअस कलर्स, अँड अमेझिंग फॅब्रिक टू!') आणि दागिने खरेदीच्या वरातीमध्ये मलाही बॉडीगार्ड म्हणून जावं लागलं. तिथे, दुकानदारांचं इंग्रजी आणि बाईचं इंग्रजी ह्यांचा ताळमेळ जमवून देणे, फिरंगी म्हणून तिला लुबाडायला बघत असताना किंमतीची घासाघीस करणे इत्यादी जोडकामं मी केवळ माझा विरंगुळा म्हणून पार पाडली.

रात्रीच्या डिनरला आम्हाला आय टी उपनगरातील ताज फिशरमन कोव्ह रिझॉर्टच्या रेस्टोरंटमध्ये आमंत्रण होतं. थेट समुद्रकिनाऱ्यावरच टेबलं मांडलेलं हे रेस्टोरंट खरोखरच अतिशय सुंदर होतं. शांत रात्री, लाटांच्या आवाजात, प्रायव्हसीसाठी बऱ्यापैकी अंतरावर मांडलेल्या टेबलांवर, चांगल्या जमलेल्या कॉकटेल्ससह, अतिशय चविष्ट ग्रिलड जेवणासह, आणि ऑफिस पॉलिटिक्सचे नेहमीचे काबुकी मुखवटे दूर सारून, माणसासारख्या गप्पा मारणाऱ्या दोन सिनिअर मॅनेजर्स सह वेळ फार छान गेला. दोघेही पूर्वी काही काळ अमेरिकेत राहून परत गेलेले होते; त्यांच्या कंपनीत वरच्या पोझिशनला होते. त्यांचा परत जाण्यामागचा, करिअरबद्दलचा दृष्टिकोन समजून घेण्यात मला, आणि बॉसला सुद्धा, रस होता. आमच्या कंपन्या, त्यांच्या स्ट्रेन्ग्थस आणि वीकनेसेस, ह्याबद्दलची खुली देवाणघेवाण, कुठल्याही पॉवरपॉईंटशिवाय ऐकणं खरंच इंटरेस्टिंग होतं.
आम्हाला हॉटेलात पोचायला मध्यरात्र झाली होती; ते दोघे कधी घरी पोचले असतील कोणास ठाऊक!

Comments