माझ्या भारतीय मित्रमैत्रिणींनो - तुम्हाला तुमच्या नोकरीचा, आठ-दहा-आणि-वाढीव तास खर्डेघाशीचा, बॉसची मनमानी सहन करण्याचा कंटाळा आला आहे? स्वतःच्या पायावर उभे राहून, काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे? स्वतःचा व्यवसाय सुरु करून खोऱ्याने पैसे ओढण्याचे स्वप्न उरी आहे? तर मग लक्षपूर्वक पुढे वाचा...
मी एक बाणेदार, हाडाचा मराठी माणूस असल्यामुळे सध्या कुठचा धंदा किफायतशीर आहे, तो कोणी, कधी सुरु करावा, कसा चालवावा, इत्यादींबद्दल तपशीलवार सल्ले देऊ शकतो. मी सुचवत असलेली कल्पना संपूर्णपणे नवीन, अजूनपर्यंत आश्चर्यकारकरित्या कोणाच्याच डोक्यात आलेली नाही. ही काही थिल्लर, 'ह्याची टोपी त्याला घालण्याची' पिरॅमिड स्कीम, किंवा 'टाकाऊ वस्तू ओळखीच्यांच्या गळ्यात मारून' त्यांच्या शिव्याशापांसोबत आपली मलाई खाण्याची योजना नाही; किंवा एखादे 'कोणाच्याही काहीही कामास न येणारे फतरूड स्मार्टफोन ऍप (मराठीमध्ये अँम्प!) निर्माण करून विकण्या' एवढी क्लिष्ट क्लृप्ती सुद्धा नाही!
ही आहे, (ढँटढँ!) मुंबई किंवा कदाचित पुण्यामधून 'पांव' अमेरिकेत एक्स्पोर्ट करण्याची आयडिया! पांव म्हणजे 'आपके पाँव बहुत हसीन हैं, ... ' वाले, किंवा 'आजकल पाँव ज़मींपर नहीं पड़ते' वगैरे सुद्धा नव्हेत - ते झाले पाँव, मी बोलतो आहे वडापाव, उसळपाव इत्यादीसाठी लागणाऱ्या पावांबद्दल! इथे ते पाव गुजराथी ओन्ड दुकानांमधून विकले जाणार असल्यामुळे, पावांना इथे पांव म्हटलं जातं हे लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.
कोणीही म्हणेल एवढी मोठी अमेरिका, आणि साधा पाव नाही मिळत तिथे? तर, गैरसमज नको! आमचे येथे पाव मिळतात. अगदी हर प्रकारचे पाव मिळतात... फक्त मुंबईतला तो 'टूटे ना बै टूटे ना' छाप कडक हार्डटॉप असलेला, पण बाकी चारी बाजूनी अतिशय लुसलुशीत स्पॉंजी असणारा, किंचित मिठाच्या, आणि यीस्टच्या कणमात्र आंबूस चवीचा पाव सोडून! दुसरं म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे एकतर कॅन्सस ह्या अमेरिकेच्या गहू भांडाराच्या मातीलाच एक गोडवा असतो, किंवा कदाचित गव्हाच्या पिकाला खत म्हणून साखर घालत असतील; त्यामुळे त्यापासून नंतर बनलेल्या पावांचा जन्मजात स्वभावच भाsरी गोsड असतो. बटाटवडा किंवा उसळ वगैरे चटकदार चमचमीत चविष्ट जिनसांच्या सोबतीला एवढा गोडवा शोभत नाही (ह्याप्रसंगी, इथे एका गुजराथी दुकानातील बटाटेवड्यामधील बेदाण्याच्या आठवणीने आलेला हुंदका आवरला आहे)! विशेषतः गेल्या पंधरा वीस वर्षात वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडला प्रमाणे विस्तारत असलेल्या मराठी रयतेला ह्या पावाची उणीव फारच तीव्रपणे भासत आहे. हा वृध्दिमान मराठी समुदाय बहुतांशी न्यू जर्सीलाच आपले घर मानत असल्यामुळे आजकाल चारचौघांत, लोकांना समजणार नाही अशा भाषेत मुलांना दम भरण्याची, किंवा नवराबायकोमध्ये 'मनमोकळी' चर्चा करण्याची सोय राहिली नाहीय! जाऊदे, आजच सगळ्या दुःखांच्या पुड्या उलगडत बसत नाही. मुद्दा काय, की ह्यापैकी अनेक सुगृहिणी स्वतःच अगदी (छबिलदास फेम!) मंजू बटाटेवडेवाल्यासारखा वडा, किंवा कुठल्याही नाक्यावरच्या भेळवाल्याच्या तोडीसतोड भेळ बनवू शकतात (घरचंच उदाहरण आहे!). पण हार्डटॉप पाव, किंवा अ-सात्विक कुरमुरे, अ-पौष्टिक शेव आणि अ-साजूक पुऱ्या, ह्या अत्यावश्यक पॅराफ्रेनेलियाच्या अभावामुळे 'वो मजा नही आता!'. त्यामुळे, ह्या पावाच्या धंद्याला चिक्कार डिमांड, आणि म्हणून ह्यात अमाप पैसा आहे.
एकदा ही सुरुवातीची पावलं (म्हणजे छोटे पांव) यशस्वी झाली, की पुढची बीजनस वधारायची आयडियापन हाये ना आपल्याकडे. ती म्हणजे भेळ एक्स्पोर्ट करण्याची. इथे 'गणेश भेळ' नामक एक महाराष्ट्रातल्या कुठल्याशा शहरात जगप्रसिद्ध असलेला, इम्पोर्टेड जिन्नस नुकताच खाल्ला. दुर्दैवाने, त्यावरूनच ही आयडिया सुचली. हावरटपणे पाकीट उघडून ह्यातील नुसत्या कोरड्या भेळेचा बकाणा भरल्याबरोबर कुरमुऱ्याचा अचूक अगोड स्वाद, कुरकुरीत टेक्स्चर, पुऱ्यांच्या तेलाचा तोच ओळखीचा वास, शेवेची झिरो फिगर इत्यादींमुळे मोक्ष आणि निर्वाण आता फार दूर नाही अशी भावना झाली. पण हाय रे दैवा! नंतर बरोबरच्या चटण्यांची पाकिटं उघडून त्याही घालण्याचा मोह टाळता आला नाही. त्या अनुक्रमे गुळाचा थोडा पातळ पाक, आणि लाल भस्म्या मिरच्यांची त्वेषाने चिरडून केलेली आगजाळ पूड ह्या रेसिपीवरून बनवलेल्या होत्या. चटणी हा एक द्रव पदार्थ असल्याचे भान ठेऊन मिरच्यांच्या पुडीमध्ये थोडे पाणी होते, पण ते आग विझवायला संपूर्णपणे असमर्थ होते. जिभेच्या टोकापासून सुरुवात करून अन्ननलिका आणि पोटातील इतर अनेक अवयव होरपळून त्यांची राखरांगोळी होत असताना, ह्यावर गुळाच्या पाकातले चुरमुरे खाणे हा उपाय होऊ शकत नाही! ह्या लंकादहनाला टाळ्या पिटून उत्तेजन देण्यासाठी गुळपाकातली लवंग, दालचिनी ही पोरंटोरं आणि भेळीबरोबर अर्थातच हवं म्हणून आम्ही घातलेलं कांदा-लिंबू हा वृंद उपस्थित होता. हाताला लागतील त्या सर्व चवींची मनमुराद उधळपट्टी करून चटण्या चविष्ट होत नाहीत हे महाराष्ट्रातील भेळकऱ्यांना समजावून देण्याची वेळ आलेली आहे.
तर, त्वरा करा आणि ह्या ग्राउंड फ्लोअर सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या. नाहीतर काय, नेहमीप्रमाणे आपले सिंधी, पंजाबी आणि गुजराथी बांधव हा लेख वाचून व्यवसाय सुरु करतील आणि कोट्याधीश होतील.
माझं ठीक आहे हो, 'मराठी माणूस व्यापार उदीमात मागे का?' ह्यावर मी पुढची पोस्ट लिहीन!
तुमचं काय?

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...