बिझिनेस ट्रीप - २

माझी भारतातील सगळ्यात पहिली बिझिनेस ट्रीप होती २००० मध्ये; ती सुद्धा मुंबईला. ह्याआधीच्या अठरा वर्षात मी मोजून चार वेळा भारतात आलो होतो, आठदहा दिवसाच्या खाजगी सुट्यांमध्ये. लग्नकार्य, नातेवाईकांना भेटणं, गप्पा, थोडीफार मराठी नाटकं बघायला मिळाली तर पाहणं ह्या सगळ्या भरगच्च कार्यक्रमांमध्ये मुंबईची वेगळी बाजू वगैरे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. ह्यापूर्वी इतर काही देशांमध्ये मी कामानिमित्त फिरलेला होतो; त्यामुळे बिझीनेस क्लास, फाईव्हस्टार हॉटेल्स, फॅन्सी रेस्टोरंटस ह्या गोष्टींचं नावीन्य नव्हतं. पण, मुंबईच्या, आणि भारतातल्या, पहिल्या 'बिझीनेस' ट्रीप मध्ये माझ्याच देशातल्या बऱ्याच गोष्टींशी नव्याने ओळख झाली, आधी निसटलेल्या काही गोष्टी नजरेत भरल्या, माझा आणि इतरांचा त्याच गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन जाणवला - आणि हे सगळं माझ्या ओळखीच्या शहरात घडत असल्याचं कुतूहल वाटलं - त्याच्या ह्या नोंदी!
 
ह्या ट्रीप मध्ये आमची आठ-दहा वेगवेगळ्या आय टी ऍप्लिकेशन मॅनेजर्स आणि तंत्रज्ञांची टीम चार-पाच आठवडे मुंबईत ठाण मांडून बसली होती. टीममध्ये जास्तकरून गोरे अमेरिकन्स, आणि मी एकटाच मूळचा मुंबईचा. ही यात्रा बिझिनेस ट्रीपएवढीच, 'बदलता भारत', आणि इतरही वेगवेगळ्या विषयातील माझ्या ज्ञानात भर घालणारी एज्युकेशनल ट्रीप ठरली.

सर्वप्रथम, 'मूळचा मुंबईचा' असूनही आपल्याला मुंबईतल्याच किती गोष्टी माहिती नाहीत ह्याची जाणीव तिथे गेल्यागेल्या झाली. 'शांताराम' वाचल्यावरही असंच 'दोन मुंबया आहेत का जगात? ह्या पुस्तकातली मुंबई आहे तरी कुठे' असे प्रश्न पडले होते. घरी रहात असतांना, विद्यार्थीदशेत, आपलं विश्व केवढं मर्यादित, आपल्याआपल्या ऊबदार सुरक्षित कोशात गुरफटलेलं असतं ह्याची जाणीव होते अशा वेळी. ह्यावेळी आम्ही रहात होतो विहार लेकजवळील मॅरीयॉटच्या लेकसाईड शॅले मध्ये; आणि भाड्याने घेतलेलं तात्पुरतं आय टी ऑफिस होतं MIDC नांवाच्या अंधेरी (पूर्व) भागात. एकीकडे साकीनाका, बैल बाजार, चांदिवली भागातली बजबजपुरी, आणि दुसरीकडे शॅले चा सेक्लुडेड, एक्सक्लुझिव्ह परिसर! वन हाफ डझन्ट नो हाऊ द अदर हाफ लिव्हज!

ह्या वेळेपर्यंत इतर अनेक मॅरीयॉट्स मध्ये राहिलेलो होतो (ही चेन आमच्या कंपनीची क्लायंट होती). पण शॅले सारखी सर्व्हिस कुठेच पाहिली नव्हती. कदाचित त्या वेळी ते चकाचक नवं कोरं होतं म्हणून असेल. 'एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट्स' म्हणून प्रशस्त लिव्हिन्ग रूम, फुलली इक्विप्ड किचनेट आणि स्वतंत्र बेडरूम एवढा थाट असेल. फ्रीजमध्ये टॉबलरॉन सारख्या अनेक गुडीज बरोबर दोनतीन हेवर्ड्स च्या बाटल्या सुद्धा होत्या. महत्वाचा मुद्दा, इतर हॉटेल्समध्ये ह्यातलं काही वापरलं, तर त्याचे पैसे रूमच्या भाड्यात लगेच दुसऱ्या दिवशी जोडले जातात; पण इथे हे सर्व फ्री-फ्री-फ्री होतं. शिवाय रोज संध्याकाळी पाच ते सात हॅपी अवर वेगळा! त्यामुळे जास्तच हॅपी-हॅपी-हॅपी!
मुंबईतील आय टी क्लासबद्दलही बरंच नवीन ज्ञान प्राप्त झालं. ऑफिसात तीन वेगवेगळ्या लोकल व्हेंडर्स चा स्टाफ होता - बरीचशी विशीबाविशीची मुलंमुलीच! त्यांना मिळणारे पगार, किमान किंवा शून्य जबाबदाऱ्या असल्यामुळे अत्यंत माफक जीवनावश्यक खर्च, त्यामुळे शक्य झालेली त्यांची लाईफस्टाईल, त्यांचे वीकेंड्सचे प्लॅन्स, सगळंच उद्बोधक होतं. साधारण ह्या वयातच मीही आय टीच्याच नोकरीला सुरुवात केली होती; पण त्यांच्या आणि माझ्या त्याच वयोगटातल्या आयुष्याच्या दृष्टिकोनामध्ये जमीन-अस्मानाची तफावत होती. त्यावेळी मुंबईत, निदान त्या भागात तरी, बऱ्याचदा पॉवरकट्स होत होते (मला हे आणखी एक नवल!); तर अशा वेळी काम ठप्प झाल्यावर शेजारच्या 'मुलांशी' गप्पा मारण्याशिवाय काही काम नसे; त्यादरम्यान ह्या गोष्टींचे धडे मिळाले. आय टी मधले बिगिनर्सचे पगार, माझ्या आठवणीतल्या विरुद्ध आताच्या एकूण सगळ्याच्याच किंमती, लोकांना त्या सर्रास परवडणं - ह्या सगळ्यांनी चकरावून मी पैशाचा हिशोब करणंच सोडून दिलं! नेमकी, मी भारत सोडल्यावर तिथे श्रीमंतीची प्रचंड लाट आली असावी... आमचं मेलं हे अस्संच आहे!

ह्या एका ट्रीप मध्ये माझ्या बरोबर खूप अमेरिकन लोक होते. भारताबद्दलचे त्यांचे पूर्वग्रह, काही लोकांनी इथे यायलाच दिलेला नकार, नजरेला पडत असलेल्या गोष्टींबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया, जुळवून घेण्याची किंवा न घेण्याची त्यांची तयारी आणि क्षमता - हे सगळंच बघणं माझ्या दृष्टीने फार इंटरेस्टिंग होतं. हॉटेलपासून ऑफिसपर्यंतच्या सुमारे ६-७ किमीच्या प्रवासाला पंधरा मिनिटांपासून एक तासापर्यंत कितीही वेळ लागत असे. किती वेळ लागेल, आणि का, ह्याचं काही गणित नव्हतं. मधल्या एका लांबलचक रस्त्यावर दुतर्फा झोपडपट्टी होती - विथ ऑल इट्स रोडसाईड साईड इफेक्टस! काही सहकारी केवळ मी बसमध्ये आहे म्हणून तोंडावर लगाम ठेवत, पण त्यांच्या नजरा, बंद बसमध्ये मुठीत धरलेली नाकं, फिरवलेले डोळे बरंच बोलत असत. काही चेहऱ्यांवर 'इंडिया! आणखी काय अपेक्षा ठेवणार' असा भाव असे; कधी कधी, माझ्याविषयी 'अशा परिस्थितीशी झगडून वर आलेला बिच्चारा' गृहीत धरलेलं कौतुकसुद्धा दिसे. ह्या सगळ्याला रेसिस्ट वगैरे म्हणण्यापूर्वी, आपण हेइटी किंवा आफ्रिकेतल्या एखाद्या गरीब देशात गेलो, तर तिथल्या परिस्थितीकडे कसं पाहू, ह्याचं भान ठेवणं आवश्यक! बिल हा एकच गोरा मॅनेजर मला आठवतो आहे, जो अतिशय मॅटर ऑफ फॅक्टली, हाही एक अनुभव आहे ह्या गमतीशीर नजरेने ह्या सगळ्याकडे बघत असे. साधारण अर्ध्या अंतरावर, रस्त्याकडेच्या ओसाड मोकळया जागेत नवे वाटणारे सोफासेट्स, लिविंग रूम फर्निचर किंवा डायनिंग रूम सेट्स वगैरे विकायला ठेवलेले पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला होता. जस्ट द लॉजिस्टिक्स! हे सामान तिथे कुठून, कसं आणत असतील; रोज आणायचं आणि परत न्यायचं? कोण विकत घेत असेल, ह्या वस्तीत येऊन? किती विक्री होत असेल, वर्थ आहे का... मला फुकटचे हजार प्रश्न! एखाद दिवस बस फारच रेंगाळत असली, तर लांबून हे फर्निचरवाले दिसल्यावर बिल बस कंडक्टर सारखा जोरात ओरडे 'कमिंग अप, इथन ऍलन! नेक्स्ट स्टॉप, ओपन एअर टॉयलेट्स अँड इंडियन बाथस!' (इथन ऍलन ही न्यू जर्सी भागातली थोडी वरच्या दर्जाची फर्निचरच्या दुकानांची चेन होती.) एवढ्या खुल्लम खुलला थट्टेमुळे, रस्त्यावरील दृश्य बघतानाची बसमधली ऑकवर्ड शांतता आणि एक प्रकारचं टेन्शन पटकन वितळून जाई.

बरोबरच्या दोन अमेरिकन बायकांच्या दृष्टीने सगळ्यात भयानक होतं ते ऑफिसातील टॉयलेट! ते भारतीय पद्धतीचं होतं. प्रत्यक्ष बघणं सोडा, असा प्रकार असतो ह्याचीही त्यांना कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवसापासून रोज त्या लंचसाठी मॅरीयॉटमध्ये परत जायचंच हा हट्ट का धरू लागल्या मला समजायला थोडा वेळ लागला. लंच ही एकंदरीतच एक समस्या होती; कारण ऑफिसच्या भागात चालत जाण्यासारखी आणि तरीही अमेरिकन स्वच्छतेच्या कल्पनांत बसणारी, पुरेसं 'माईल्ड' जेवण देणारी रेस्टोरंटस तेव्हा तरी जवळजवळ नव्हतीच. इथे भारतीय जेवणच मिळणार इतपत सत्य सर्वानीच स्वीकारलेलं होतं; मसालेदार चायनीज तर सोडाच, पण सो कॉल्ड इटालियन पास्ता डिशेस मध्येही 'हळदीचा/स्पायसी वास येतो' म्हणून त्या त्यांना नको वाटत! मला हे समजू शकतं; फिलिपिन्समध्ये मला स्वतःला भाज्या ते चिकन ते पोर्क सगळ्यालाच एक उग्र फिशी वास येत असे. नाईलाज म्हणून, एक बाई रोज नुसता भात आणि रायता खायची, तर एक बाबा नुसताच गार्लिक नान खायचा! असे उपासतापास आठवडाभर घडल्यानंतर असंतोषाचा उद्रेक होऊन अखेर सन २००० चे सुप्रसिद्ध 'गोऱ्यांचे बंड' झाले! प्रोग्रॅम मॅनेजर, आणि सुरुवातीला फुकट 'माय होमटाऊन' गाजावाजा केला असल्यामुळे मी, ह्या दोघांवर गोऱ्यांना पुढचे चार आठवडे पळून जाण्यापासून परावृत्त करणे ही अतिरिक्त जबाबदारी पडली. सकाळ संध्याकाळ ने-आण करणाऱ्या बस ड्रायव्हरला जास्त पैसे देऊन, लंचच्या वेळीही ह्या कंपूला एअरपोर्टजवळील इतर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेण्या-आणण्याची सोय करून घेतली.

एका वीकेंडला, तुझ्या लाडक्या शहराचं दर्शन घडव म्हणून हट्टाने चारपाच सहकारी माझ्या मागे लागले होते. डोकं खाजवून खाजवून, ड्रायव्हरच्या, आणि हॉटेलने शिफारस केलेल्या एका गाईडच्या मदतीने एक इटिनेररी आखली. त्यात अर्थातच गेटवे, कुलाबा-फोर्ट परिसर, मरीन ड्राइव्ह, मलबार हिल, हँगिंग गार्डन ही माझ्या लहानपणची मेगा अट्रॅक्शन्स होतीच. अमेरिकन माणसांचा इंटरेस्ट पुरेसा बांधून ठेवायला ही ठिकाणं कल्पनेपलीकडे तुटपुंजी आहेत, हे आता जाणवलं. मलबार हिल ला एकदा वरून खालची गजबजून वाहती मुंबई बघितली (तब्बल ३ मिनिटे!); पुढे काय? हँगिंग गार्डन मध्ये पंधरा वीस मिनिटे चक्कर मारली. साईटसीइंगच्या भस्मासुराचा पुढचा प्रश्न: 'व्हेअर इज द रेस्ट ऑफ द गार्डन?'; त्यावर 'धिस इज इट!' म्हणताम्हणता आठवलं - मग म्हातारीचा बूट आणि राक्षसाची जीभ दाखवली. त्यावर तेच सगळे जीभ काढून राक्षसासारखे खदाखदा हसले. दुर्दैवाने, बुटाच्या आतील काही पायऱ्यांवर बसलेल्या प्रेमी युगुलांच्या प्रणयक्रीडांमध्ये आम्ही अप्रिय व्यत्यय आणला होता; आणि राक्षसाने कित्येक वर्षात तोंड न धुतल्यासारखी गलिच्छ असलेली त्याची जीभ माझ्याही नजरेला स्वच्छपणे दिसत होती. ह्यावरून मी लहानपणी घसरगुंडी खेळत असे हे ऐकून बाकीच्यांच्या डोळ्यातून माझ्या हलाखीच्या पूर्वायुष्याबद्दल पाणी घळाघळा वाहायचंच बाकी होतं! गाईड मध्येमध्ये थोडाफार इतिहास सांगत होता; पण फोर्टमधले पुतळे, राजाभाई टॉवर, म्युझिअम ह्या गोष्टी स्थानिक माणसांना जेवढ्या भारी वाटतात तेवढ्या परक्यांना, त्याही समृद्ध देशातून आलेल्याना नाही वाटत, हे केवळ सत्य आहे. त्यातल्या त्यात, हॅन्डलूम हाऊस वगैरे 'एक्झॉटिक' खरेदीमध्ये तरी थोडा वेळ बरा गेला. मग जुहू चौपाटी! समुद्र किनाऱ्यावर फुलपॅण्ट फुलशर्ट घातलेले पुरुष, आणि अंगभर साडी नेसलेल्या बायका बघून ह्या जमावाला हा बीच आहे ह्यावर विश्वासच बसेना. समुद्राच्या पाण्याची आणि वाळूची एकंदर स्वच्छता पाहता, बसायची किंवा पाण्यातून चालायची कोणाची तयारी नव्हती. गाईड दाखवत / सांगत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, हाताने फेरीस व्हील फिरवणाऱ्या माणसाचे फोटो काढण्यात त्यांना जास्त रस होता. शेवटी, ह्या मुंबई दर्शन यात्रेचा शेवट तरी गोड व्हावा म्हणून, आधी हिट झालेल्या 'शॉपिंग' सिनेमाचा सीक्वेल काढायचं मी ठरवलं, आणि गाडी लिंकिंग रोडला घ्यायला सांगितली. गाईड जुहू बीचवरुनच परत गेला होता (मुंबई-दर्शन व्यवसाय सोडून नंतर तो डोंबाऱ्याचे खेळ करू लागला असं ऐकलं). हा सीक्वेल मात्र, अगदी रस्त्यावरच्या दुकानांसकट, पुन्हा एकदा हिट झाला. बाकी काही नाही, तरी भारतातली 'स्वस्ताई' मंडळींना खूप आवडली.

मला जाणवलं, त्यांच्या नजरेला ज्या ज्या गोष्टी खटकत होत्या, त्या मला कधी तीव्रतेने जाणवल्याही नव्हत्या. मुंबईमध्ये परक्या नजरेने भारून जावं, असं भव्य, सुंदर, स्वच्छ फारसं काही नसेलही, पण माझ्या सगळ्या आठवणी, सगळे भावबंध तिथेच गुंतलेले आहेत. ह्यातलेच दोघे माझ्याबरोबर नंतर काही वर्षांनी कलकत्त्याच्या ट्रीपमध्ये असतांना त्यांना मुंबईपेक्षा कलकत्ता जास्त आवडलं, म्हणून माझी जबरदस्त जलन झाली! हा चक्क ऍपल्स अँड ऑरेंजेस प्रकार होता - कारण कलकत्त्यात आम्ही नव्याने उभारलेल्या सॉल्ट लेक सिटी मध्येच वावरत होतो; जुन्या कलकत्त्यात वावरण्याचा त्यांच्यावर कधी प्रसंगच आला नाही.

Comments