१० जून ९१
प्रिय सौ. सुनीताबाईंस,
सप्रेम नमस्कार.
तुमचं 'आहे मनोहर तरी' हे पुस्तक नुकतंच वाचून काढलं. मला ते अतिशय आवडलं. ह्या एवढ्याशा वाक्यात सांगता येणार नाही, एवढं आवडलं. हे निव्वळ आत्मचरित्र असतं, नुसत्या आठवणी मांडलेल्या असत्या, तर कदाचित एवढं नसतं आवडलं. पण आयुष्यातल्या घटनांच्या अनुषंगाने तुम्ही त्या वेळी सुचलेले, महत्वाचे वाटलेले विचार स्पष्ट केलेत; वळून पुन्हा त्या अनुभवांकडे बघतांना आता कसं वाटतं हे स्पष्ट केलंत ह्या गोष्टींना माझ्या दृष्टीने जास्त महत्व होतं. विचारांना, कल्पनांना (मूल्य हा शब्द जुनाट वाटतो, आजकाल) महत्व देण्याच्या तुमच्या दृष्टिकोनाचं मला खूप कौतुक वाटलं. बरेचसे विचार पटले - काही समजले नाहीत कदाचित. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे, सुनीता देशपांडे ह्या विचारी, संवेदनाशील, सुंदर लेखिकेशी ओळख करून दिल्याबद्दल (केवळ पुलंची पत्नी म्हणून नव्हे), मराठीला एक सुरेख पुस्तक दिल्याबद्दल, वाचक म्हणून तुमचे आभार मानावेसे वाटले; म्हणून हे पत्र लिहायला घेत आहे.
मला वाचनाची आवड आहे; एके काळी अतिशय होती, अजून थोडीफार टिकून आहे. कित्येक पुस्तकं मला खूप आवडली, पण लेखक ह्या दहा फूट उंच आणि जमिनीपासून चार बोटं वर चालणाऱ्या महामानवाला पत्र लिहून आभार मानण्याचा, कौतुक करण्याचाही धीर झाला नव्हता. तुम्ही पुस्तकातून, तुम्हीही जणू चार चौघांसारख्या, accessible आहात अशी प्रतिमा निर्माण केली आहे, त्यामुळे असेल कदाचित, पण ह्या वेळी तो धीर करत आहे.
मुंबईला सुटीमध्ये दोन आठवडे दिलो असतांना ह्या पुस्तकाबद्दल बरंच ऐकलं. मग जे मिळेल ते शोधून वाचून काढलं (पुलंच्या लिखाणाविषयीचा माझा अपरिमित आदर हा जवळजवळ चेष्टेचा विषय होऊ शकेल! त्यामुळे सुरुवातीला ह्या पुस्तकातला माझा रस 'मिसेस पुलंनी' लिहिलेलं म्हणून, पुलांबद्दल काहीतरी मजकूर असेलच म्हणून - इतपतच होता). नंतर परत येतांना पुस्तक विकत घेऊनच आलो, वाचून काढलं - तीन चार वेळा - आणि ह्या पुस्तकाची, on its own terms ओळख पटली. पुलंविषयी ह्यात काहीही मजकूर नसता, तरीही ते एवढंच आवडलं असतं हे जाणवलं. तुमच्या विचारांच्या खेळात मी दंग होत होतो, मनातल्या मनात तुमच्याशी बोलत होतो, तुम्हाला प्रश्न विचारत होतो - आणि त्या वेळी जाणवलं की तुम्हाला पत्र लिहून हे कळवलंच पाहिजे. मी ऐकलेली / वाचलेली ह्या पुस्तकाविषयीची बरीच मतं प्रतिकूल होती. त्यात खूपदा 'पुलं' ह्या दैवताला धक्का लावल्याबद्दलची तक्रार होती. 'मनोहर तरी' मधला तरी खटकत होता. तुमची काही मतं / विचार क्रांतिकारकच वाटत होते इ. ह्यातल्या कुठच्याच आक्षेपाशी मी सहमत नव्हतो. 'मनोहर तरी' म्हणूनच तुम्ही स्वतःच्या स्वतंत्र आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाशी ओळख करून दिलीत की! 'आहे मनोहर कित्ती' म्हणणारी स्त्री बहुतेक stereotypical लेखकपत्नीच ठरली असती. तुमचं हे पुस्तक वाचतांना माझ्या मनात दोन परस्परविरोधी विचार सारखे येत होते. म्हणजे असं, की एकीकडे तुमचं सुजाण रसिक व्यक्तिमत्व दिसून येत असतांना असं वाटत होतं, की वा! पुलंसारख्या श्रेष्ठ कलावंताला आयुष्यात साथ मिळावी, तर अशी! पण दुसरीकडे जाणवत होतं, की एका कर्तृत्ववान, रसिक आणि स्वतः कलावंत असलेल्या व्यक्तित्वाची निव्वळ दुसऱ्याला साथ देण्यातच, त्याच्या छायेत - चार पावलं मागे रहाण्यातच, त्याच्या संदर्भातच ओळखलं जाण्यातच परिसीमा व्हावी का? तुम्ही स्वतःच अनेक ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, हा निर्णय अखेर तुमचा तुम्ही, प्रेमाने केलेला असल्यामुळे ह्यात तक्रारीला, दुःखाला जागाच नसेल. पण, पुस्तकाच्या नावामधला 'तरी' मला जाणवला तो असा!
कवितांची आवड मलाही आहे, पण बऱ्याचदा - विशेषतः नवीन मराठी कवींच्या कविता वाचतांना - 'सा मयि विरक्ता' हाच अनुभव जास्त येतो. 'कालचा पाऊस' ह्या कवितेवरचं तुमचं भाष्य वाचलं; मला बेहद्द आवडलं. त्या कवितेइतकंच, थोडं जास्तच सुंदर वाटलं. माझ्या स्वभावानुसार, प्रथम मला भिडले ते तुमचे विचार! पण लगेच हेही जाणवलं, की ह्या कवितेवर विचार मांडायचे तर तेही तितक्याच सुंदर भाषेत मांडता आले पाहिजेत. भाष्य कशाला म्हणायचं, त्या कवितेला, कवीला तुम्ही गद्य काव्यात विचारलेला तो सवालच वाटलं मला! आणि असं वाटलं (वेड्यासारखा, पोरकट आणि स्वार्थी विचार!) की शाळाकॉलेजात मराठी 'शिकत' असतांना (रावसाहेबांच्या 'त्यात शिकवायचं काय हो असतं' ची आठवण झाली) जर त्या शिकवणाऱ्या महाभागांपैकी एकजण तरी इतक्या तन्मयतेने, आत्मीयतेने, स्वतः त्या काव्याचा आस्वाद घेत शिकवणारा भेटला असता, तर कविता कदाचित एवढी विरक्ता राहिली नसती; आयुष्यभरात त्या सुंदर सोबतीचं धन गाठीला लागलं असतं.
तुमची कवितांची आवड जागोजाग दिसून येते; नव्हे, ती तुमच्या भाषेतच उतरली आहे. पुलंनी 'गगनी उगवला सायंतारा' पेटीवर वाजवण्याचा प्रसंग तुम्ही इतका अप्रतिम शब्दांकित केला आहेत, की ते एकच पान मी पुन्हापुन्हा वाचून काढलं. तुम्ही अनेक श्रीमंत क्षणांच्या धनी आहात निःसंशय! कुणाही रसिकाला हेवा वाटावा अशी ही श्रीमंती. तुम्ही लिहिलंय, आपली श्रीमंती, ऐश्वर्य दाखवण्याचा मोह कोणाला नसेल! पण मला आपली एक शंका आली, की हा विविक्षित प्रसंग बघा, किती वैयक्तिक, किती पूर्णपणे तुमचा स्वतःचा. पण हे वैभव शब्दात नटवून मांडून ठेवल्यावर, त्याकडे बघत बसायला, त्यावर मतप्रदर्शन करायला कोणीही मोकळा! कधीकधी हे खटकत नाही तुम्हाला?
आयुष्य, जगणं, मरण इ. गोष्टींबद्दलचे तुमचे आणि माझे विचार खूपच जुळतात. विशेषतः आपण एकटे - अगदी पूर्णपणे एकटे असतो - आपलं असं कुणीही नसतं - सर्वार्थाने ही माझीही बरीच जुनी भावना आहे. मित्र-मैत्रिणी हे शब्द तर फार सढळ हाताने वापरून पार गुळगुळीत केले गेले आहेत. इतके, की कधीकधी मला शंका येते की कदाचित त्या शब्दांमध्ये मी शोधत असलेला अर्थ कोणालाच, कधीच अभिप्रेत नसेल. जी ए कुळकर्णी हे माझेही आवडते लेखक; आवडते म्हणण्यापेक्षा आदरणीय म्हणणं जास्त योग्य. कारण दहा पंधरा वर्षांपूर्वी सत्यकथेच्या कृपेने त्यांच्या कित्येक कथा वाचल्या होत्या. त्यातल्या सगळ्याच, संपूर्णपणे समजल्या नव्हत्या. पण जे हाती आलं, त्यावरून जे निसटलं ते महत्वाचं, समजून घेण्यायोग्य होतं हे जाणवलं होतं. 'गुलाम' ही कथा अशीच आठवणीत राहिलेली आहे. तुमच्या पुस्तकातल्या त्यांच्या उल्लेखावरून हे सगळं पुन्हा आठवलं आणि त्यांचे कथासंग्रह मिळवून, वाचून, पुन्हा समजून घ्यायचा प्रयत्न करायचं ठरवलं आहे. सां एक्झुपेरीची पुस्तकंही वाचून पहिलीच पाहिजेत असं थोडं कुतूहलही आहे.
तुमच्या (म्हणजे तुमच्या दोघांच्याही) बद्दल मी जे ऐकलं / वाचलं होतं, किंवा पुलंच्या लिखाणातून मला नेहमी एक प्रश्न पडत असे. तो असा, की तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्याच्या सर्वोच्चतेचं, व्यक्ती सर्वात श्रेष्ठ असल्याचं महत्व मानता, असं अनेक ठिकाणी जाणवतं. पण मग, ह्याचा तुमच्या लिखाणातल्या / विचारातल्या 'सामाजिक बांधिलकी' शी मेळ कसा घालायचा? ह्याच प्रश्नाचं जणू उत्तर देत असल्याप्रमाणे तुम्ही ह्या पुस्तकात त्याची थोडी चर्चा केली आहे, पण तरीही माझं समाधान झालं नाही. 'शोषणविरहीत समाज' हे तत्व खरं तर कम्युनिझमची मक्तेदारी असू नये. तुम्हीच लिहिल्याप्रमाणे ते कुठल्याही सुशिक्षित (अती वापराने मूळ शब्दाच्या सुंदर अर्थापासून फारकत घेतलेला आणखी एक शब्द!) आणि सुसंस्कृत माणसांच्या समाजाचंच ते मूळ तत्व असायला हवं. तसं पाहिलं, तर शोषणविरहीत समाजासाठी (निदान तुम्ही चर्चिलेल्या आणि मलाही अभिप्रेत असलेल्या शोषणाच्या संदर्भात) आवश्यक आहे, ते केवळ 'न्यायाचं राज्य' किंवा न्यायावर चालणारी समाजव्यवस्था. आणि हे सगळे विचार कॅपिटॅलिझमकडे झुकत नाहीत का? इझम ह्या प्रकारावर धर्म ह्या प्रकाराप्रमाणेच माझा विश्वास नाही. पण केवळ भाषेच्या सोयीसाठी म्हणून शब्द वापरायचाच, तर कॅपिटॅलिझम हाच मला सर्वात जवळचा शब्द सुचतो. तुमच्या एवढ्या अफाट वाचनात तुम्ही आयन रँड चं लिखाण नक्कीच वाचलं असणार. तिच्या लिखाणाबद्दल तुमचं काय मत आहे ह्याबद्दल मला खूप कुतूहल आहे.
व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, तत्वांना महत्व देणं ह्या बाबतीत माझी मतं / विचार तुमच्याशी खूप जुळतात, असं मला वाटतं. नको तेवढा स्पष्टवक्तेपणा माझ्याकडेही आहे त्यामुळे असेल कदाचित, पण तुमच्याबद्दल जे सार्वत्रिक गैरसमज असल्याचं मला जाणवलंय (त्यातले बहुतेक सर्व पुलंच्याच संदर्भात आहेत, आणि बहुतेक सर्वांचा तुम्ही पुस्तकात परामर्श घेतलाच आहे) त्यापैकी कुठच्याच बाबतीत मला ते आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. पण पुस्तकातून, तुमची त्याबद्दलची भूमिका वाचून उलट तुमचं कौतुकच वाटलं.
पत्र बराच लांबत चाललं. त्याहीपेक्षा म्हणजे लिहायला घेतानाची धिटाई कमी होत चालली म्हणा, किंवा पुस्तक वाचतानाचा / वाचून संपवल्याक्षणीचा आपण लेखिकेला आपलं कौतुक, आपले आभार, मतं कळवलीच पाहिजेत, त्यांना त्याचं बरं वाटेल असला उद्धट विचार मागे पडत चालला म्हणा. तेव्हा इथेच थांबणं इष्ट. तुमची बरीच मतं पटली, तरी एक क्षुल्लक मत मात्र अजिबात पटलं नाही; ते म्हणजे 'कागदावर आपण विचारपूर्वक नेटके मत मांडू शकतो'. तुम्ही अर्थात हे तुम्हा उभयतांसारख्या लेखकांबद्दल म्हणत असणार, माझ्यासारख्याला वाचता येण्याइतपत बरं अक्षर काढण्यापासून प्रयत्न करावे लागतात. शिवाय, एखाद्या वाक्यातून चुकीचा (even वेगळा) अर्थ निघत असला, तर समोरासमोर बसलं असताना आपण ते ताबडतोब दुरुस्त करू शकतो. ह्या सर्वाचा हेतू एकच, की मी जे मनात आलं, जसं आलं तसं लिहिलंय. ह्या सर्व भारुडातून फक्त एकच परतपरत सांगायचंय की मला तुमचं पुस्तक आणि भाषाशैली दोन्ही अतिशय आवडलं. बऱ्याच काळानंतर एक सुंदर लिहिलेलं, सुंदर मराठी पुस्तक वाचायला मिळालं ह्याचा खूप आनंद झाला. तुम्हाला अशा धर्तीची हजारो पत्रं येतील, आणि त्यातल्या प्रत्येकाची दखल घेणं शक्य होणार नाही हे समजतं, तरीही... जर काहीही उत्तर पाठवू शकलात तर त्याने माझी श्रीमंती केवढीतरी वाढेल.
आपला
मिलिंद जोशी
ता. क. हे पत्र पुरं करताकरता इथे नुकतीच आलेली बटाट्याची चाळ ची कॅसेट पाहिली. त्यामुळे तुमचं दोघांचंही दर्शन झालं. मी तुम्हाला पूर्वीही* भेटलो असलो तरी आता बघतांना एवढ्या सुंदर पुस्तकाची लेखिका म्हणून वेगळ्याच नजरेने बघितलं.
* ७८ साली, मी आगंतुक अनाहूतपणे केवळ पुलंचा मी चाहता आहे, आणि त्यांना एकदा भेटायचंय ह्या विचाराने (विचाराला त्या वेळी मी हक्कच समजत होतो) तुमच्या घरी येऊन तुमचे दोघांचेही दोन-अडीच तास खाऊन गेलो आहे. माझ्या आयुष्यातले ते दोन-अडीच अनमोल तास! त्याबद्दल आभार मानणारं पत्र लिहायचं गेली १३ वर्ष डोक्यात होतं. ते आभार आता केवळ तळटीप म्हणून येत आहेत. तुम्ही दोघेही माझ्याशी इतक्या आपुलकीने आणि सहजपणे गप्पा मारत होतात, की तुम्ही प्रत्यक्षात किती सर्वार्थाने मोठे आहात ह्याची जाणीवच मला राहिली नव्हती. मला तुमच्याएवढं मोठं होता येणार नाही, पण त्या सहज सुंदर स्वागताला 'धन्यवाद' म्हणून झटकून टाकण्याएवढा मूर्खपणाही माझ्यात नाही. तुमच्या सारख्याना पत्र लिहिताना एक गोष्ट उपयोगी पडते, की तुम्ही ह्या भावना समजून घेऊ शकाल. तुम्हीच म्हटलंय ना, तसं स्वतःच्या आठवणीनेही आनंदच देणारं हे ऋण!
मिलिंद

Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...