कुमालो मिसेस लिथबींच्या घरी
परतले ते थकलेले
आणि पार निस्तेज
होते. दोघी बायका
गप्प होत्या आणि
कुमालोंनाही त्यांच्याबरोबर काही बोलायची
इच्छा नव्हती. एवढंच
काय, त्यांच्या लहानशा
भाच्याबरोबर खेळायचीही त्यांना इच्छा
नव्हती. त्यांनी स्वतःला खोलीत
बंद करून घेतलं
आणि ते गप्प
बसून राहिले, मिशन
हाउस मध्ये जाण्यापुरती
शक्ती एकवटत. ते
असे बसलेले असतांना,
दारावर टकटक झाली.
मिसेस लिथबी त्या
गोऱ्या तरुणाला घेऊन
आल्या होत्या. नुकत्याच
घडलेल्या प्रसंगाची आठवण ताजी
असल्याने, कुमालो नकळत अंग
चोरून मागे सरकले.
ते बघून त्या तरुणाच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
तो मिसेस लिथबींशी
सेसुटोमध्ये काहीतरी पुटपुटला, त्यावर
त्या बाहेर निघून
गेल्या.
कुमालो उठून उभे
राहिले - म्हातारा, वाकलेला देह.
त्यांना नम्रपणे, आर्जवीपणे काही
बोलायचं होतं, पण एकही
शब्द सुचेना. त्या
तरुणाकडे बघण शक्य
नव्हतं, म्हणून ते जमिनीलाच
नजर खिळवून राहिले.
-
उम्फुन्डीस.
-
साहेब.
तो तरुण आणखीच
भडकलेला दिसला. उम्फुन्डीस, सॉरी
मी मगाशी एवढ्या
रागारागानी बडबडलो. मी त्या
वकिलाच्या संदर्भात तुमच्याशी बोलायला
आलो आहे.
-
साहेब?
ह्या अशा विचित्र
अवघडून उभ्या असलेल्या माणसाशी
संभाषण चालू ठेवण
खरच कठीण जातं.
-
उम्फुन्डीस,
मी तुमच्याशी बोलू, का नको?
कुमालोंची ओढाताण होत होती.
काळ्या माणसांची नेहमीच होते
- त्यांना नम्र तर
रहायचं असतं, पण एकीकडे
स्वतःच अस्तित्वही दाखवून द्यायचं
असतं. साहेब, ते
पुन्हा म्हणाले.
-
उम्फुन्डीस,
तो तरुण शांतपणे म्हणाला. मला समजतंय तुमच्या मनात काय चाललंय. तुम्ही बसा ना.
मग कुमालो खाली बसले.
त्या तरुणाच्या कपाळावर
अजूनही आठ्या होत्या, आणि
अजूनही रागावलेलाच दिसत होता.
तो तसाच उभा
राहून त्यांच्याशी बोलायला
लागला.
-
मी मगाशी
तसं बोललो, कारण मला खूप त्रास झाला होता. कारण मी स्वतःला माझ्या कामात पूर्ण झोकून
देतो. माझ्या कामात जेव्हा चुका होतात, तेव्हा मी स्वतःला दुखावून घेतो, आणि इतरांनाही
दुखावतो. मग मात्र मला स्वतःची लाज वाटते, आणि म्हणून मी इथे आलोय.
तरीही कुमालो गप्पच
होते, म्हणून तो म्हणाला समजतं तुम्हाला?
कुमालो म्हणाले, हो
कळतं ते मला. त्यांनी मान वळवली, तेव्हा तरुणाला त्यांच्या चेहऱ्यावरचे क्लेश निघून
गेल्याचं जाणवलं. अगदी पूर्णपणे
समजतं मला.
तरुणाच्या कपाळावरच्या
आठ्याही गेल्या. तर, हे वकिलाबद्दल... मला वाटतं तुम्ही वकील करावा. आपल्याला सत्य
लपवून ठेवायचं आहे म्हणून नव्हे, पण माझा तुमच्या भावावरती विश्वास नाही. तुमच्या लक्षात
आलंच असेल त्याच्या डोक्यात काय आहे. त्यांचा बेत आहे, की त्यांचा मुलगा आणि तो तिसरा
मुलगा तिथे नव्हतेच मुळी असा दावा करायचा. आता, तुम्हाला आणि मला माहिती नाही ह्यामुळे
काय फरक पडेल; पण वकील ते सांगू शकेल. आणखी एक, अब्सलम म्हणतो की तो घाबरला आणि त्या
भितीमध्ये त्याने गोळी झाडली. त्या माणसाला मारायचा त्याचा इरादा नव्हता. ही गोष्ट
कोर्टाला पटवून द्यायला वकिलाचीच गरज असते.
-
हो, आलं
लक्षात माझ्या.
-
तुम्हाला
कोणी वकील माहिती आहे का, तुमच्या चर्चचा वगैरे?
-
नाही साहेब,
मला नाही माहिती. पण मी थोडी विश्रांती घेऊन, मिशन हाउस मधल्या फादर व्हिन्सेन्टना
भेटणारच होतो.
-
झाली का
तुमची विश्रांती?
-
तुम्ही
आल्यानी मला बरंच बर वाटतंय, मला भिती होती...
-
हो, मला
माहिती आहे. तरुण कपाळाला आठ्या घालून, जणू स्वतःशीच, म्हणाला मोठा दोष आहे तो माझ्यात!
बरं, चला, निघायचं?
ते दोघं मिशन हाउस
मध्ये गेले, फादर व्हिन्सेन्टना भेटले आणि त्यांनी बरीच चर्चा केली.
-
मला वाटत,
मला एक अगदी योग्य मनुष्य माहिती आहे ह्या केससाठी. आपल तर एकमत आहेच, की आपल्याला
केवळ सत्यच मांडायचं आहे सर्वांसमोर. ती गोळी खुनाच्या हेतूनी नव्हे, तर केवळ भितीमुळे
झाडली गेली होती. आता, तुमचा पुतण्या आणि तो तिसरा मुलगा, ते मुळात तिथे होते हेच नाकारणार
आहेत. असं दिसतंय, की तुमचा मुलगा एकटाच म्हणतोय की ते तिथे होते. आपला वकील आपल्याला
त्याबद्दल काय करायचं ह्याचा जास्त चांगला सल्ला देऊ शकेल. आपण फक्त खरच बोलायचं हे
ठरवलेलं आहे, आणि हा वकीलसुद्धा एरवी ही केस घेणारच नाही. मी त्यांना ताबडतोब भेटेन.
-
आणि, त्या
लग्नाचं काय करायचं? तरुणाने विचारलं.
-
मी त्यांना
तेही विचारेन, मला माहिती नाही काही जमेल का. पण जमणार असेल, तर मी आनंदानी त्यांच
लग्न लावून देईन.
ते जायला निघाले. फादर
व्हिन्सेन्टनी म्हाताऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले. धीर बाळगा. कुठच्याही
परिस्थितीत तुमच्या मुलाला सक्त शिक्षा होणार. पण कोर्टांनी त्याचा बचाव जर मान्य केला,
तर कदाचित देहान्ताची शिक्षा होणार नाही. आणि जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत ते सुधारायची
आशा आहे, हे लक्षात ठेवा.
-
ते आजकाल
सारखंच माझ्या मनात असत; पण मला फार आशा मात्र नाही.
-
बसा इथे,
आणि बोला माझ्याशी. फादर व्हिन्सेन्ट म्हणाले.
-
मला आता
निघायला पाहिजे. तो गोरा तरुण म्हणाला. पण उम्फुन्डीस, तुम्हाला लागेल ती मदत करायची
तयारी आहे माझी.
तो तरुण निघून गेल्यावर,
कुमालो आणि फादर व्हिन्सेन्ट बसून बोलू लागले. तुम्हाला जाणवलं असेलच, हा प्रवास फार
दु:खकारक ठरला आहे माझ्या दृष्टीनी.
-
मला समजत,
दोस्त!
-
सुरुवातीला
हा नुसताच शोध होता. मला पहिल्यापासून काळजी होती. पण ह्या शोधाच्या मार्गात, पावलापावलाला,
काळजीची जागा भितीनी घेतली. आणि प्रत्येक पावलागणिक ती भिती फक्त वाढतच गेली. अलेक्झांड्रामध्ये
मला प्रथम भिती वाटली होती, पण इथे ह्या मिशन हाउसमध्ये आपण ह्या खुनाबद्दल ऐकल तेव्हा
ही भिती पार असह्य झाली होती.
म्हातारा थांबला, आणि
जमिनीकडे एकटक पाहू लागला, आठवू लागला, नव्हे आठवणींमध्ये बुडून गेला. बराच वेळ असं
बघत राहिल्यानंतर म्हणाला, सिमांगु मला म्हणाले होते, ह्या एवढ्या हजारो-लाखोंच्या
शहरात ह्या एका गोष्टीची का सारखी भिती बाळगायची?
-
त्यानी
मला थोडा दिलासा मिळाला.
ते ‘दिलासा मिळाला’
हे ज्या सुरात म्हणाले ते ऐकून फादर व्हिन्सेन्ट एवढे बेचैन झाले, की ते स्तब्ध, श्वास
रोधून ताठ बसून राहिले, ह्या यातना संपायची वाट बघत.
-
त्यानी
मला थोडा दिलासा मिळाला, पण खरं तर नाहीच. अजूनही माझा विश्वास बसत नाही, की हजारातल्या
एखाद्याच्या बाबतीत घडणारी ही गोष्ट नेमकी माझ्या बाबतीत घडली आहे. एवढं कशाला, अजूनही,
एखाद-दोन क्षण मला भास होतो की हे सगळं घडलंच नाहीय. मी झोपेतून जागा होईन आणि जाणवेल
की ह्यातलं काही घडलंच नव्हत. एखाद-दोन क्षणच मात्र.
-
कल्पना
करा, तिथे दूर डोत्शेनीमध्ये, मी आणि माझी बायको अज्ञानात, आनंदात होतो. ही घडणारी
आपत्ती पावला-पावलांनी जवळ येत असतांना. जर कोणी सांगितलं असत, की नशिबानी हे पाऊल
उचललंय, आणि आता हे उचलणार आहे. ओह, एखाद्याला हे आधी कळलं असतं तर काय पाहिजे होतं!
पण आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. आता समजतंय आम्हाला, पण तेव्हा आम्हाला माहिती नव्हत.
दुसऱ्यांना दिसत होतं, बर का; ज्यांना त्याची काही पर्वा नव्हती त्यांना ह्यातलं प्रत्येक
पाऊल दिसत होतं. त्यांनी बघितलं, आणि ते म्हणाले उं:! जोहानसबर्ग आहे हे. हा पोरगा
फुकट चाललाय. जोहानसबर्गमधली एवढी मुलं गेली फुकट, त्यात हा आणखी एक. पण आम्हाला, ज्यांना
तो जीव की प्राण होता, सर्वस्व होता, त्या दोघांना ह्याची काहीच कल्पना नव्हती.
फादर व्हिन्सेन्टनी
डोळ्यावर हात धरले. उजेडाची तिरीप टाळायला. ह्या बोलत असणाऱ्या माणसाकडे बघणंही टाळायला.
त्यांच्याभोवती गुरफटत जात असलेल्या ह्या वेदनेच्या जाळ्यातून बाहेर पडायला ते काही
बोलायलाही गेले, पण त्यांना जाणवलं गप्प बसणंच जास्त योग्य आहे. शिवाय, त्यांच्याकडे
बोलायला शब्दही नव्हते.
-
एखादा
मनुष्य गवतात झोपलेला असतो. आणि त्याच्या सभोवार, त्याच्या सबंध आयुष्यातलं सगळ्यात
मोठं वादळ आकारत असत. अशा विजा, आणि असा गडगडाट जो त्याने कधी अनुभवला नसेल. विल्हेवाट
आणि विध्वंस करणारं वादळ. आजुबाजुनी लोकं लगबगीनी घरी परतत असतात, ह्या वावटळी पासून
सुखरूप रहाण्याकरता. गवतामधला तो लोकांना दिसतच नाही, का त्यांना एक क्षणही थांबायची
भिती वाटते कोण जाणे. ते त्याला उठवत नाहीत. त्याला तिथेच सोडून जातात.
ह्यानंतर कुमालोंच
बोलणं थांबलं, आणि बराच वेळ दोघंही गप्प बसले. फादर व्हिन्सेन्टनी दहा वाक्य जुळवायचा
प्रयत्न केला, पण एकही योग्य वाटेना. शेवटी ते नुसतच म्हणाले, दोस्त. आणि जरी ते पुढे
काही बोलले नाहीत, तरी त्यांना आशा होती ते अजून काही बोलतील ह्या विचारांनी कुमालो
गप्प राहतील. थोड्या वेळानी ते पुन्हा म्हणाले, दोस्त.
-
फादर?
-
दोस्त,
तुमच्या काळजीच रुपांतर भितीमध्ये झाल, आणि भितीचं दु:खामध्ये. पण, भितीपेक्षा दु:ख
जास्त बरं. कारण भिती नुसतीच पोखरून टाकते, दु:ख समृद्ध करू शकतं.
कुमालोंनी त्यांच्याकडे
अतिशय तीक्ष्ण नजरेनी बघितलं. एवढ्या गरीब माणसाकडून ती तीक्ष्ण नजर अनपेक्षित होती,
आणि चुकवताही येत नव्हती.
-
मला नाही
जाणवलेय माझी समृद्धी, कुमालो म्हणाले.
-
भितीपेक्षा
दु:ख नक्कीच चांगलं, फादर व्हिन्सेन्ट हट्टानी पुन्हा म्हणाले. अस म्हणा, भिती हा नुसताच
एक प्रवास असतो - अगदी भयानक प्रवास. पण दु:ख म्हणजे एक निश्चित ठिकाण असत, तुम्ही
तिथे येउन पोचता.
-
आणि कुठे
येउन पोचलोय मी? कुमालो म्हणाले.
-
जेव्हा
सभोवती वादळ घोंघावत असतं, तेव्हा माणसाला त्याच्या घराची चिंता असते. फादर व्हिन्सेन्ट
मुद्दाम त्या झुलू बोलीसारख्या अलंकारिक भाषेत बोलू लागले. पण एकदा घर उध्वस्त झालं,
की करण्यासारख काही असतं. अस बघा, वादळाबद्दल माणूस काही करू शकत नाही, पण घर तो पुन्हा
उभारू शकतो, ना?
-
माझ्या
वयात? कुमालो म्हणाले. माझ्या भर जवानीत बांधलेल्या घराची काय अवस्था झाली बघा, आता
कसलं घर बांधू शकणारे मी?
-
देवाची
करणी कोणाला समजली आहे, फादर व्हिन्सेन्ट हताश होऊन म्हणाले.
कुमालोंनी त्यांच्याकडे
बघितलं; कटूतेनी, भांडणाच्या किंवा रागाच्या नजरेनी नव्हे.
-
मला वाटत
देवानी माझ्याकडे पाठ फिरवली आहे, ते म्हणाले.
-
अस वाटत
असेल तुम्हाला, फादर व्हिन्सेन्ट म्हणाले.
पण अस कधीच होणार नाही. कालत्रयी, कधीच, निश्चित अस होणार नाही.
-
तुमचं
हे बोलणं ऐकून बर वाटल, कुमालो म्हणाले.
-
आपण आयुष्य
सुधारण्याबद्दल बोललो, तुमच्या मुलाचं आयुष्य. तुम्ही तर प्रिस्ट आहात, तुम्हाला तर
ह्या गोष्टीच महत्व सगळ्यात जास्त असायला हव. तुमच्या, किंवा तुमच्या बायकोच्या दु:खापेक्षाही
जास्त.
-
खर आहे
ते. पण मला समजत नाही, एवढ वाया गेलेलं आयुष्य कस सुधारू शकेल?
-
तुम्ही
त्याबाबत शंका नाही घेऊ शकत. तुम्ही ख्रिश्चन आहात. क्रुसावरच्या त्या चोराची गोष्ट
आठवते तुम्हाला? (येशु ख्रिस्ताबरोबर दोन चोरांनाही क्रुसावर चढवलेलं होतं. त्यातल्या
एकानी, शेवटच्या क्षणी येशूला प्रेषित म्हणून मानलं, आणि त्याला स्वर्गात मुक्ती मिळाली
अशा आशयाची गोष्ट आहे ती.)
-
माझा मुलगा
नुसता चोर नव्हता, कुमालो कठोरपणे उद्गारले. एक गोरा मनुष्य होता, चांगला सद्गृहस्थ,
बायको-मुलांवर माया करणारा - सगळ्यात वाईट म्हणजे आमच्या काळ्या लोकांची काळजी करणारा.
त्याची बायको विधवा झाली, त्याची मुलं अनाथ झाली - माझ्या मुलामुळे. ह्यापलीकडे घोर
पातक मला तरी ठाऊक नाही.
-
माणूस
कुठच्याही पापाचा पश्चात्ताप करू शकतो.
-
होईलही
त्याला पश्चात्ताप, कुमालो कडवटपणे म्हणाले. मी त्याला म्हटलं, झालाय का तुला पश्चात्ताप,
तर तो म्हणेल बाबा तुम्ही म्हणाल तसं. मी म्हटलं, हे पाप नव्हत का; तर तो म्हणेल हे
पाप होतं. पण मी जर उलट म्हटलं, त्याच्या तोंडात शब्द भरवले नाहीत; मी विचारलं आता
तू काय करशील - तर तो म्हणेल मला माहिती नाही, किंवा बाबा तुम्ही म्हणाल तसं.
आतमध्ये दाटून आलेल्या
क्लेशानी कुमालोंचा आवाज आपोपाप चढला.
-
परका झालाय
तो मला. मी त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. मला त्याच्या
डोळ्यात काही लाज दिसत नाही, ज्यांना त्याने दुखावलं त्यांच्याबद्दल काहीही ममता दिसत
नाही. अश्रू आहेत त्याच्या डोळ्यात, पण ते फक्त स्वतःसाठी. त्याच्या दुष्टपणाबद्दल
नव्हेत, त्याच्या होणाऱ्या शिक्षेबद्दल.
ते आक्रोशानी म्हणाले,
कोणीही माणूस, विशेषतः ह्या मुलाला आम्ही जसं वाढवलं होतं, तस कोणी, सगळी सदसद्विवेकबुद्धी
कस गमावून बसत? दोन मुलांना अनाथ करणाऱ्या ह्या पोराच्या डोळ्यात मला फक्त स्वतःबद्दल
काळजी आणि दु:ख दिसतं. खरच सांगतो, त्या दोन मुलांना जर...
-
थांबा!
फादर व्हिन्सेन्ट जोरात ओरडले. तुम्ही अतिरेक करताहात. जा, जाऊन प्रार्थना करा, थोडी
विश्रांती घ्या. इतक्या फटकन तुमच्या मुलाला झिडकारून टाकू नका. तोही त्या धक्क्यानी
कदाचित गप्प झाला असेल. म्हणून तो कदाचित म्हणत असेल, बाबा तुम्ही म्हणाल तसं; किंवा
हो बरोबर आहे, किंवा, मला माहिती नाही.
कुमालो उठून उभे राहिले.
हो, मलाही वाटत, तसंच असेल. पण आता मला आशा उरली नाहीय. काय म्हणालात मी करायला पाहिजे?
हं, प्रार्थना आणि विश्रांती, नाही का?
ते अजिबात कुचेष्टेनी
बोलत नव्हते. फादर व्हिन्सेन्टना माहिती होतं, की कुचेष्टा ह्या माणसाच्या स्वभावातच
नाहीय. पण इतके उपरोधिक शब्द होते ते, की त्या गोऱ्या प्रिस्टने कुमालोंचा हात धरला,
आणि म्हणाले बसा, एक प्रिस्ट ह्या नात्यानी मला तुमच्याशी बोलायलाच हवं.
कुमालो खाली बसल्यावर,
फादर व्हिन्सेन्ट त्यांच्याशी बोलू लागले. हो, मी म्हटलं, जाऊन प्रार्थना करा आणि विश्रांती
घ्या. जरी प्रार्थनेचे नुसते शब्द तुमच्या तोंडून उमटणार असले, आणि जरी विश्रांती म्हणजे
तुम्ही नुसते आडवे पडून राहिलात - तरीही. तुमच्या स्वतःसाठी नका प्रार्थना करू, देवाची
करणी समजून घेण्यासाठी नका प्रार्थना करू - कारण ती अगाध आहे. कोणाला माहिती आयुष्याचं,
जगण्याचं प्रयोजन काय आहे, ते एक कोड आहे. जेव्हा तुमच्या स्वतःवर कोणी दया करत नाही,
तेव्हासुद्धा तुम्हाला त्या मुलीबद्दल अनुकंपा वाटावी - हे एक कोडंच आहे. आणि जेव्हा
ह्या सगळ्यापेक्षा मरण जास्त बर अस वाटतं, तेव्हाही आपण कसे जगत रहातो - हेही एक कोडंच
आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार आणि प्रार्थना करायची वेळ परत कधीतरी असेल, ते
आत्ता करू नका. गर्ट्रूडसाठी, तिच्या मुलासाठी, तुमच्या होणाऱ्या सुनेसाठी, तुमच्या
होणाऱ्या नातवंडासाठी प्रार्थना करा. तुमच्या पत्नीसाठी, डोत्शेनीसाठी प्रार्थना करा.
त्या अनाथ झालेल्या पत्नी आणि मुलांसाठी प्रार्थना करा. कुडी सोडून गेलेल्या त्या आत्म्यासाठी
प्रार्थना करा. ह्या मिशन हाउस साठी, एझेन्झेलेनीच्या अंधांसाठी - जे एक नवीन विश्व
उभारायला बघताहेत - त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या स्वतःच्या नवनिर्मितीसाठी
प्रार्थना करा. गोऱ्या लोकांसाठी प्रार्थना करा - जे न्यायासाठी झगडताहेत, आणि भितीचा
पगडा नसता तर जे माणूसकीनी वागले असते त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करा. आणि शेवटी,
तुमच्या मुलासाठी, त्याच्या सुधारणेसाठी प्रार्थना करायला विसरू नका.
-
मान्य
आहे मला, कुमालो नम्रपणे म्हणाले.
-
आणि आभार
माना. जिथे शक्य आहे तिथे आभार माना. तुमची पत्नी, मिसेस लिथबी, सिमांगु, तो सुधारणागृहामधला
गोरा तरुण - ह्या सगळ्यांचे आभार माना. तुमच्या मुलाची आणि त्याच्या सुधारणेची काळजी
सिमांगुवर आणि माझ्यावर सोडा; कारण तुमच चित्त अजिबात थाऱ्यावर नाहीय ह्या गोष्टींचा
विचार करायला. बाळ, जा आणि प्रार्थना करा, विश्रांती घ्या.
त्यांनी कुमालोंना
उठून उभ राहायला मदत केली आणि त्यांना त्यांची हॅट दिली. कुमालोंनी त्यांचे आभार मानल्यावर
ते म्हणाले, हे सगळं आपल्या आतमधून येत असतं, आता ते आतमध्ये कुठून येत, हे एक कोडंच
आहे. तो आपल्या आतला परमेश्वर असतो. आपल्याला बजावून सांगत असतो, भोवतालच्या माणसांना
मदत कर - ती माणसं स्वतः परमेश्वराला विसरली असली तरीही.
ते म्हाताऱ्याला मिशनच्या
दरवाजापर्यंत घेऊन गेले. म्हणाले, मी रात्रंदिवस तुमच्यासाठी प्रार्थना करेन. तेवढ
मी नक्की करेन, आणि तुम्ही सांगाल ते इतर काहीही.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...