आपल्या घरातल्या खोल्या भाड्यानी
न देणाऱ्या थोड्याशाच
लोकांपैकी मिसेस लिथबी एक
होत्या. त्यांचा नवरा बिल्डर
होता, आणि जरी
दुर्दैवानी त्यांना मूल-बाळ
काही नव्हतं, तरीही
त्यांनी एक मोठं
घर बांधलेलं होतं.
जेवणाची खोली वेगळी,
एक उठा-बसायची
खोली आणि तीन
झोपायच्या खोल्या. एक त्यांनी
स्वतःसाठी ठेवली होती, एक
आनंदानी त्या प्रिस्टला
दिली होती, कारण
घरामध्ये प्रिस्ट असण्याने, प्रार्थना
होत असण्याने बरं वाटतं मनाला. आणि
एक खोली गर्ट्रूड
आणि तिच्या मुलाला
- ती तशी प्रिस्टचीच
लोक होती ना. पण
अनोळखी माणसांना, छे: मुळीच
खोली देणार नाहीत
त्या - एवढ काही
अडलं नाहीय पैशावाचून
त्यांचं.
त्या प्रिस्टकडे बघून, गर्ट्रूड
आणि तिच्या मुलाकडे
बघून वाईट वाटतं;
त्यांच्या मुलाबद्दल ऐकून तर
खूपच वाईट वाटतं.
पण त्या प्रिस्टच्या
चांगुलपणाबद्दल तिळमात्र शंका नाहीय
त्यांना. फार दयाळू
आणि सौम्य स्वभावाचे
आहेत ते, त्याचं
बोलण-चालण खूप
नम्र आणि आदरपूर्वक
असतं. हे घर
सुद्धा अगदी स्वतःच
असल्यासारखं त्याची काळजी घेतात ते. त्यांना फार कौतुक
आहे, ह्या प्रिस्टनी
स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या
मुलाला त्या घाणीमधून
बाहेर काढण्यासाठी काय
केलंय त्याबद्दल. तिला
आणि तिच्या मुलाला
स्वच्छ नवीन कपडे
घेऊन देणं काय!
त्यांनी रितीप्रमाणे त्या प्रिस्टचे
धन्यवादही व्यक्त केले आहेत.
गर्ट्रूड आणि तिचा
मुलगा घरात असण्यानी
बरं वाटतं. मुलगी
आहे चांगली स्वच्छ
आणि कामसू - पण
थोडी बेपर्वा वाटते.
आणि परक्यांच्या बरोबर,
विशेषतः ते पुरुष
असले तर, ती
ज्या मोकळेपणी बोलत
बसते ते थोड
खटकत - कारण मिसेस
लिथबींना माहिती आहे की
तिचं लग्न झालेलं
आहे. तिलाही माहिती
आहे की म्हातारबाईंची
शिस्त कडक आहे;
ती ही ते
निमूटपणे समजून वागते.
पण त्या मुलाचं
खरच फार वाईट!
त्यांच्या रितीप्रमाणे त्या दोघी
अगदी आक्रोश करून
रडल्या आहेत त्याबद्दल.
गर्ट्रूड आणि त्या,
ह्याबद्दल बरंच बोलल्या
आहेत, किंबहुना आजकाल
त्या फक्त ह्या
एकाच विषयावर बोलतात.
म्हातारा गप्प असतो,
त्याचा चेहरा अखंड दु:खाच्या साच्यात जखडलेला
असतो. पण त्यांना
त्याच्या प्रार्थनांमधून त्याच दु:ख
ऐकायला येत, आणि
फार वाईट वाटतं.
तासंतास ते त्यांच्या
खुर्चीत गप्प बसलेले
असतात, विषण्ण नजरेनी शून्यात
बघत. त्या कधी
त्यांच्याशी बोलल्या तर ते
एकदम भानावर येतात,
आणि त्या दुखाच्या साच्याला तडा जाऊन एखादी स्मितरेषा झळकते त्या चेहऱ्यावर.
मात्र काहीही असलं तरी त्यांचं बोलणं नेहमीप्रमाणेच मृदू आणि सौम्य. त्या मुलाशी खेळतांना
क्वचित त्यांच्यात थोडा बदल होतो, आणि त्यांच्यातलं चैतन्य थोडं जाणवतं. पण ते सुद्धा
कधीकधी थंड होतं, मिसेस लिथबींना ऐकू येतं, मुलगा प्रश्न विचारत जातोय, आणि उत्तरं
मात्र यायची थांबली आहेत. त्या दारातून डोकावून बघतात, म्हातारा गप्प स्वतःच्याच विचारांत
गढून बसलाय... चेहरा त्या दु:खाच्या साच्यात अडकवून.
-
मिसेस
लिथबी.
-
उम्फुन्डीस?
-
मिसेस
लिथबी, तुम्ही आधीच एवढी मेहेरबानी केली आहे माझ्यावर; पण आणखी एक मदत हवी होती.
-
कशाबद्दल?
बघू या, जमतंय का.
-
मिसेस
लिथबी, माझ्या मुलापासून गरोदर असलेल्या त्या मुलीबद्दल तुम्हाला माहिती आहेच.
-
हो, मी
ऐकलय तिच्याबद्दल.
-
ती पिमव्हीलमध्ये
रहाते आहे, कोणाच्या तरी घरात एका खोलीत. तिला माझ्या मुलाबरोबर लग्न करायची इच्छा
आहे. मला वाटत ते जमू शकेल. पुढे... काही झालं तरी... ती माझ्याबरोबर डोत्शेनीमध्ये
येईल, म्हणजे त्या बाळाला चांगल्या घरात वाढवता येईल. पण आत्ता तिला ह्या पिमव्हीलमधून
लौकरात लवकर बाहेर काढायची माझी इच्छा आहे. आणि... म्हणजे... मला वाटलं की… तुम्हाला
आणखी त्रास द्यायची इच्छा नाही माझी, पण...
-
उम्फुन्डीस,
तुम्हाला ती इथे येउन रहायला हवी आहे, ना?
-
खरच, तसं
झाल तर फार मोठी मेहेरबानी होईल ती.
-
चालेल
मला, मिसेस लिथबी म्हणाल्या. आपण जेवतो त्या खोलीत ती झोपेल, तिच्यासाठी पलंग मात्र
नाही माझ्याकडे.
-
त्याची
काळजी नको, एखाद्या सभ्य घरातल्या जमिनीवर झोपणं सुद्धा तिच्या दृष्टीनी...
-
खरय, खरय
ते.
-
मी तुमचा
फार आभारी आहे. तुम्ही खरच माझ्या आईसारख्या प्रेमळ आहात.
-
एवढ केलं
नाही, तर एरवी जगायचं कशाला? त्या म्हणाल्या.
ह्यानंतर ते थोडे प्रसन्न
होते. त्यांनी त्या मुलाला बोलावलं आणि त्याला गुडघ्यावर घेऊन ते घोडा-घोडा खेळू लागले.
पण ह्या खेळात फार गंमत नव्हती, कारण म्हातारा पटकन थकून जातो, आणि मुलाला मात्र आणखी
खेळायचं असतं. मग त्यांनी ठोकळे बाहेर काढले खेळायला. जोहानसबर्गसारख्या उंच बिल्डिंगी
रचल्या आणि ढकलून मोडून टाकल्या - गडगडाट आणि गंमत करून खिदळत.
-
आता मला
जायला हवं. तुझ्यासाठी एक छान ताई घेऊन येतो. कुमालो म्हणाले.
त्यांनी जवळचे पैसे
मोजले. एखाद-दोन नोटाच शिल्लक होत्या. लवकरच पोस्टबुकातल्या पैशांना हात लावायला लागणार.
त्यांनी एक सुस्कारा सोडला आणि कोट आणि हॅट चढवली, चालायची काठी घेतली. त्यांच्या बायकोला
तिच्या स्टोव्हसाठी थोड जास्त थांबायला लागणार, आणि त्यांना त्यांच्या पाद्रीबाबांच्या
कपड्यांसाठी.
* * *
ही मुलगी अजिबात गर्ट्रूडसारखी
नाही. ह्या घरात आल्याबद्दलची तिची दिलखुलास ख़ुशी अगदी जाणवते. तिचे कपडे थोडेसेच आहेत,
पण स्वच्छ आहेत, तिनी नीट काळजीपूर्वक जपलेले आहेत ते. बाकी सामान तिच्याकडे जवळ जवळ
नाहीच. ती दारं उघडून सगळ्या खोल्या बघते. एवढ्या मोठ्या घरात कधीच न राहिल्यामुळे
ती एकदम खुश आहे हे बघून. ती मिसेस लिथबींना आई म्हणते, त्यामुळे त्या एकदम खुश आहेत.
ती थोड मोडकं-तोडक का होईना सेसुटो बोलू शकते, ह्याचाही त्यांना आनंद आहे. गर्ट्रूडलाही
ती आवडते, कारण खर तर तिला ह्या घरात कंटाळा येऊ लागला होता. हिच्याशी छान गप्पा मारता
येतील.
आणि खरच, मिसेस लिथबी
नेमक्या तिथे येतात - ह्या दोघी खिदळत असतांना. मग दोघी गप्प होतात - गर्ट्रूडच्या
डोळ्यात मिश्किल गंमतीशीर भाव असतो, आणि ती मुलगी गोंधळलेली असते. मिसेस लिथबींना हे
असलं हसणं - हे खिदळणं - आवडत नाही. त्या त्या मुलीला स्वैपाकघरात मदतीला म्हणून बोलावतात,
आणि तिला सांगतात त्यांना हे मुळीच आवडलं नाहीय.
-
तू आता
एका सभ्य घरात आहेस, बाळ.
-
हो, आई.
मुलगी खाली मान घालून म्हणते.
-
तुला इथे
एका अतिशय चांगल्या आणि प्रेमळ माणसाने आणलंय. एवढा चांगला मनुष्य, की माझ्याकडे शब्दच
नाहीत.
मुलगी त्यांच्याकडे
अगदी उत्साहाने बघते. मला माहिती आहे. ती म्हणते.
-
तुला जर
त्यांनी इथे आणल्याच बरं वाटत असेल, तर तू अशी बेफिकीरपणे हसणार नाहीस.
-
हो, आई.
-
तू अगदी
लहान मुलासारखीच आहेस. आणि मुलांचं हसणं ऐकायला नेहमी छान वाटत. पण हसण्यामध्ये सुद्धा
प्रकार असतात.
-
हो, आई.
-
तुला समजतंय
ना, मी काय म्हणते ते?
-
मला पूर्णपणे
समजतंय.
-
तो म्हातारा
फार दुखावला गेला आहे, समजतं तुला?
-
हो, पूर्णपणे.
-
त्याला
आता आणखी कोणीही दुखावायचं नाही - ह्या घरात तरी.
-
मला समजलं.
-
जा बाळ.
पण आपण काय बोललो ह्याची कुठे वाच्यता नको.
-
मला समजलं.
-
बाळ, तू
खुशीत आहेस इथे आलीस त्याबद्दल?
ती मुलगी त्यांच्या
नजरेला नजर भिडवते. ती दोन्ही हात पसरते - जणू तिच्या भावनांची सचोटी दाखवायला. मी
खूप खुश आहे. मला इथल्यापेक्षा दुसरीकडे कुठेही रहायची इच्छा नाही. उम्फुन्डीस सोडून
कुठल्याही वडिलांची मला गरज नाही. इथे जे नाही, असं काहीच मला नको आहे.
-
मला जाणवलं
तू सुखी आहेस. आणखी एक गोष्ट बाळ, त्या छोट्या मुलाबरोबर खेळतांना, त्याला फार जवळ
धडपडू देऊ नको. तुला आता जपायला हवं.
-
मला समजतं.
-
जा तर
मग, बाळ. हे घर तुझंच आहे.
ह्यानंतर पुन्हा कधी
खिदळण्याचे आवाज ऐकू नाही आले. ती मुलगी शांत आणि आज्ञाधारी होती. गर्ट्रूडनी बघितलं,
ही मुलगी फार लहान आहे आणि तिला सोडून दिलं. ती एकटी एकटी आपल्यामध्येच मजेत असे -
तिच्या स्वभावानुसार.
* * *
त्या तुरुंगाच्या कठोर
भिंतीमधील उंच दरवाजामधून ते पुन्हा आत शिरले. त्यांच्या मुलाला त्यांच्याकडे आणण्यात
आलं. पुन्हा त्याचा निर्जीव हात त्यांनी हातात धरला. पुन्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू
दाटून आले, ह्यावेळी त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावरची निराशा बघून.
-
बाळा,
तब्बेत ठीक आहे ना तुझी?
मुलगा नुसता उभा राहिला,
मान इकडून तिकडे हलवत. थोडा वेळ ह्या खिडकीतून बाहेर बघत, नंतर थोडा वेळ त्या खिडकीतून
- पण बापाची नजर टाळत.
-
मी ठीक
आहे, बाबा.
-
माझ तुझ्याकडे
थोडं काम होतं. तुला खरच त्या मुलीशी लग्न करायचं आहे?
-
करू शकेन
मी तिच्याशी लग्न?
-
माझे एक
मित्र आहेत, गोरे प्रिस्ट आहेत; ते बघणार आहेत तुझ्या लग्नाची व्यवस्था करता येईल का.
बिशपला सुद्धा भेटणार आहेत, हे काम चटकन करता येईल का बघायला. आणि तुझ्यासाठी एक वकीलही
बघणार आहेत.
त्याच्या डोळ्यात एकदम
चमक दिसते, कसलीतरी आशा.
-
तुला वकील
हवा आहे, ना?
-
लोक म्हणतात
वकिलाची मदत होते म्हणून.
-
तू पोलिसांना
सांगितलस, तुझ्याबरोबर दुसरे दोघं होते?
-
मी आधीच
सांगितलं होतं, आता परत सांगितलं.
-
मग?
-
मग, पोलिसांनी
त्यांना त्यांच्या कोठडीतून इथे आणलं.
-
मग?
-
मग, ते
चिडले होते माझ्यावर. पोलिसांच्या समोर त्यांनी मला शिव्या दिल्या. म्हणाले मी त्यांना
ह्या लफड्यात गुंतवायचा प्रयत्न करतो आहे.
-
मग?
-
मग, ते
म्हणाले काय पुरावा आहे माझ्याकडे. आणि पुरावा… म्हणजे, एवढाच, की ते खरं आहे. हेच
दोघं, दुसरं कोणी नव्हे, माझ्याबरोबर त्या घरात होते. मी हा असा इथे, आणि ते तिथे पलीकडे.
त्याने
बापाला हाताने दाखवलं. डोळ्यात पाणी आलं त्याच्या. तो म्हणाला, पुन्हा त्यांनी मला
शिवीगाळ केली आणि भडकून माझ्याकडे बघत उभे राहिले. एक दुसऱ्याला म्हणतो, एवढ्या कशा
थापा मारू शकतो रे हा?
-
आणि हे
तुझे मित्र होते?
-
हो, ते
माझे मित्र होते.
-
आणि ते
तुला तुझ्या दु:खाच्या प्रसंगात एकट सोडून जायला तयार आहेत?
-
आता दिसतंय
मला ते.
-
पण आत्तापर्यंत,
अगदी विश्वासू मित्र होते हे तुझे?
-
माझा विश्वास
होता त्यांच्यावर.
-
आलं लक्षात.
म्हणजे एखादा चांगला मनुष्य निवडेल तसे मित्र होते ते. सभ्य, कामसू, सगळे नियम कायदेकानू
पाळणारे...
म्हातारबुवा, सोडा
त्याला! तुम्ही त्याला आंजारून-गोंजारून जवळ आणता, आणि मग अशी झडप घालता. तो आताच तुमच्याकडे
मूकपणे, दुखावून बघतो आहे; लवकरच तो बोलेनासा होईल.
-
सांग ना,
असे होते का ते मित्र?
मुलगा काहीच उत्तर
देत नाही.
-
आणि आता
तुला त्यांनी सोडून दिलंय.
शांतता... मग... आता समजतं मला ते.
-
आधी नव्हतं
समजलं?
नाइलाजानी मुलगा म्हणतो,
हो, आलं होतं लक्षात. म्हाताऱ्याला विचारायचा मोह आवरत नाहीय, मग का, का तू त्यांच्या
संगतीत राहिलास? पण मुलाचे डोळे पाण्यानी भरून आलेत, आणि बापाची माया त्याच्या मोहाला
मागे ढकलते. तो मुलाचे हात हातात घेतो. आता ते अगदी निष्प्राण नाहीत, त्यांच्यामध्ये
काही भावना आहे. बाप मुलाचे हात गच्च पकडून ठेवतो, ते कुरवाळत रहातो.
-
धीर बाळग.
लक्षात ठेव, आपला वकील असेल, पण त्याला तू फक्त घडलेली खरी हकीकतच सांगायची.
-
बाबा,
मी त्याला फक्त खरं तेच सांगेन.
त्याने बोलायला म्हणून
तोंड उघडलं, पण काहीच बोलला नाही.
-
घाबरू
नको बाळा, सांग काय सांगायचं ते.
-
तो लवकर
येऊ दे, बाबा.
त्याने खिडकीकडे बघितलं.
पुन्हा त्याचे डोळे भरून आले होते. बेफिकीर सुरात बोलायचा त्याने प्रयत्न केला, नाहीतर
खूपच उशीर झालेला असेल.
-
त्याची
नको काळजी करू. येईल तो लवकरच. निघू मी आता? बघतो कधी येऊ शकेल तो.
-
जा, अगदी
आत्ताच्या आत्ता जा, बाबा.
-
फादर व्हिन्सेन्ट
येतील. त्यांच्याजवळ तुझ्या पापाची कबुली दे, म्हणजे तुला मुक्ती मिळू शकेल, तुझं आयुष्य
सुधारू शकेल.
-
ठीक आहे,
बाबा.
-
आणि लग्न.
आम्ही ते जमवू शकलो तर प्रयत्न करतोच आहोत. आणि ती मुलगी... बोललो नाही मी तुला...
ती सोफियाटाऊन मध्ये माझ्या बरोबर रहाते आहे. तिला डोत्शेनीला घेऊन जाणारे मी. बाळाचा
जन्म तिथेच होईल.
-
छान, बाबा.
-
आता तू
आईला पत्र लिहायला हरकत नाही.
-
मी लिहीन.
-
आणि डोळे
पूस बघू.
मुलगा उभा राहिला आणि
त्याने बाबांनी दिलेल्या फडक्याला डोळे पुसले. दोघांनी हात मिळवले. आता त्याच्या हातात
चांगलाच जीव आला होता. वॉर्डन मुलाला म्हणाला, तू थांब इथेच, तुला भेटायला एक वकील
आलाय बाहेर. म्हातारबाबा, तुम्हाला जायला हवं.
कुमालो जायला निघाले.
दारातच एक उंच, भारदस्त गोरा मनुष्य उभा होता, आत यायची वाट बघत. वॉर्डन त्याला ओळखत
असावा, खूप आदराने वागवत होता. ह्या वकिलाला खूप गंभीर गोष्टींची, एखाद्या काळ्या पोराच्या
खुनाच्या केसपेक्षा खूप मोठ्या गोष्टींची, सवय असावी असं दिसत होतं. एखादा मुखिया रुबाबात
जावा, तशा गंभीरपणे तो खोलीत शिरला.
* * *
कुमालो मिशन हाउस मध्ये
गेले, आणि त्यांनी फादर व्हिन्सेन्ट बरोबर चहा घेतला. चहा संपता-संपताच दारावर टकटक
झाली, आणि तोच उंच गंभीर मनुष्य दारात उभा होता. फादर व्हिन्सेन्टनी सुद्धा त्याचं
फार कौतुकानी स्वागत केलं. ते त्याला सर म्हणत होते, आणि मिस्टर कारमायकेल पण. त्यांनी
कुमालोंची ओळख करून दिली. मिस्टर कारमायकेलनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि ते त्यांना
मिस्टर कुमालो म्हणाले - खरं तर असं म्हणायची प्रथा नाहीय. सगळ्यांनी पुन्हा चहा घेतला
आणि ते केसबद्दल बोलू लागले.
-
मिस्टर
कुमालो, मी ही केस तुमच्यासाठी घेणार आहे. आमच्या भाषेत सांगायचं तर मी ही केस 'प्रो
दिओ' घेणार आहे. तशी अगदी साधी केस आहे ही, कारण मुलगा म्हणतो आहे, तो घाबरला होता,
म्हणून त्याने गोळी झाडली - खुनाच्या हेतूनी नव्हे. ह्यावर किती विश्वास ठेवायचा हे
पूर्णपणे न्यायाधीशावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर अवलंबून आहे. आपण ज्युरीऐवजी न्यायाधीशाचीच
मागणी करू. त्या दुसऱ्या दोन मुलांबद्दल मात्र मला काय बोलावं तेच कळत नाही. मिस्टर
कुमालो, मी ऐकलय की तुमच्या भावाने त्यांच्यासाठी दुसराच एक वकील शोधला आहे. एवीतेवी
मी त्यांचा बचाव करूच शकलो नसतो. कारण, त्यांचा दावा आहे की ते मुळी तिथे नव्हतेच आणि
तुमचा मुलगा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना ह्या प्रकरणामध्ये गोवू इच्छितो आहे. हे
खरं का खोटं त्याचा निकाल कोर्टच देऊ शकेल. माझ स्वतःच मत आहे की तुमचा मुलगा खरं बोलतो
आहे, कारण त्या दोघांना ह्यात ओढायचं त्याला काहीच कारण नाही. तो हे खरं बोलतो आहे,
आणि तो जेव्हा म्हणतो की त्याने केवळ भीतीच्या पोटी गोळी झाडली तेही तो खरच सांगतो
आहे - हे कोर्टाला पटवून देणं हे माझ काम आहे. त्यामुळे अर्थातच तो खोटं सांगतो आहे
असं म्हणणाऱ्यांचा मी बचाव करू शकत नाही. आलं का लक्षात, मिस्टर कुमालो?
-
हो, अगदी
व्यवस्थित.
- आता मी तुम्हाला तुमच्या मुलाची सगळी माहिती विचारणार आहे. त्याचा जन्म कधी आणि कुठे झाला होता, त्याचं लहानपण कसं गेलं, तो खरं बोलत असे का, सांगितलेलं ऐकत असे का, घर कधी सोडून गेला आणि का, जोहानसबर्गला आल्यापासून काय करत होता... समजलं?
- आता मी तुम्हाला तुमच्या मुलाची सगळी माहिती विचारणार आहे. त्याचा जन्म कधी आणि कुठे झाला होता, त्याचं लहानपण कसं गेलं, तो खरं बोलत असे का, सांगितलेलं ऐकत असे का, घर कधी सोडून गेला आणि का, जोहानसबर्गला आल्यापासून काय करत होता... समजलं?
-
समजलं,
साहेब.
-
मला ही
सर्व माहिती लवकरात लवकर मिळायला हवी, कारण केस बहुतेक पुढच्या सत्रामध्ये न्यायालयासमोर
येईल. तुम्ही ही सगळी माहिती गोळा करा. नुसती त्याच्याकडून नव्हे, इतरांकडूनही. तुम्ही
सगळे तपशील एकमेकांशी जुळवून बघायला हवेत, आणि जुळत नसतील तर त्यातले फरकही स्पष्ट
मांडायला हवेत. मी ही हे सर्व माझ्या बाजूनी करणार आहे. आलं लक्षात?
-
होय, साहेब.
-
बरं तर,
फादर व्हिन्सेन्ट आपण त्या शाळेच्या कामाबद्दल बोलायचं का आता?
-
हो, बोलू
की! मिस्टर कुमालो, माफ करा हं आम्हाला.
ते कुमालोंना बाहेर
घेऊन गेले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला.
-
तुमच फार
मोठ नशीब समजा की आपल्याला हे वकील म्हणून मिळाले. फार मोठा मनुष्य आहे हा. दक्षिण
आफ्रिकेमधल्या सगळ्यात महान वकिलांपैकी एक. आणि तुम्हा लोकांचा सच्चा मित्र.
-
नशिबाचे
तर आभार मानतोच मी, आणि तुमचेही फादर. पण मला एक मोठी चिंता आहे, ह्यांची फी केवढी
असेल? माझ्याकडची तुटपुंजी रक्कम जवळ जवळ संपलीच आहे.
-
ओह, तुम्ही
ऐकलं नाहीत का ते म्हणाले ते ही केस 'प्रो दिओ' म्हणून घेणार आहेत. हं, तुम्हाला कदाचित
हा वाक्प्रचार माहिती नसेल, तो मूळ लॅटीनमधला आहे, आणि त्याचा अर्थ 'देवाच्या नांवानी'
असा होतो. म्हणून तुम्हाला खर्च काही होणार नाही; किंवा अतिशय नाममात्र.
-
ते हे
काम देवाच्या नावानी करतात?
-
पूर्वीच्या
काळी श्रद्धाळू लोक असं म्हणायचे; पण अजूनही त्याचा अर्थ असा होतो की ते हे काम फुकट
करतील.
कुमालो चाचरत म्हणाले,
मी एवढा चांगुलपणा कधीच पाहिला नाहीय. आणि त्यांनी मान वळवली, आजकाल सहजासहजी त्यांच्या
डोळ्यात पाणी येत असे. फादर व्हिन्सेन्ट त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले, जपून
जा. एवढं बोलून ते पुन्हा त्या 'देवाच्या नावानी' काम करणाऱ्या वकिलाकडे परत गेले.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...