कुमालोंना हळू हळू
ह्या अजस्त्र शहरातल्या रस्त्यांची सवय होऊ लागली होती. दुसऱ्या दिवशी, त्यांच्या मुलापासून
गरोदर असलेल्या त्या मुलीला भेटायला ते पिमव्हीलला ट्रेन घेऊन गेले. सिमांगु त्यांच्यासोबत
येऊ शकणार नाही अशी वेळ बघूनच ते गेले. त्याचा राग आला होता असं नव्हे, पण त्यांना
एकट्याने जाणं जास्त प्रशस्त वाटलं म्हणून. गावाकडच्या संथ राहणीचा परिणाम म्हणून की
काय, त्यांच बोलणं आणि हालचाल संथ आणि शांत असे. त्यांना जाणवलं होतं, की हा संथपणा
बरोबर वावरणाऱ्या लोकांना त्रासदायक वाटतो. असही वाटलं, की त्यांचं उद्दिष्ट एकट्याने
जाऊनच जास्त चांगलं साधेल.
थोडी यातायात केल्यावर
त्यांना ते घर सापडलं. दारावर टकटक करताच, त्या मुलीनी दार उघडलं. ती त्यांच्याकडे
बघून अनिश्चितपणे हसली - त्या हास्यात थोडी भिती होती, आणि थोडी लहान मुलासारखी प्रसन्नता
होती.
-
कशी आहेस
बाळ तू?
-
मी ठीक
आहे, उम्फुन्डीस.
त्या खोलीतल्या एकुलत्या
एका खुर्चीवर ते बसले, कपाळावरचा घाम पुसत.
-
तुझ्या
मर्दाबद्दल काही समजलं का? त्यांनी मुद्दाम नवरा हा शब्द टाळून, त्याच अर्थाचा शब्द
वापरला.
तिच्या चेहऱ्यावरचं
हास्य अदृश्य झालं.
-
नाही,
मला नाही काही माहिती.
-
मोठी कठीण
बातमी मी सांगणार आहे, ते म्हणाले. तो तुरुंगात आहे.
-
तुरुंगात?
-
तुरुंगात.
माणसाच्या हातून घडू शकणाऱ्या सर्वात भयानक कृत्यासाठी.
पण त्या मुलीला काही
कळलं नाही. बिचारी शांतपणे ते पुढे बोलायची वाट बघत राहिली. छोटीशी पोरगीच तर होती
ना ती!
-
त्याने
एका गोऱ्या माणसाचा खून केला आहे.
- अयाई ग! तिच्या
तोंडून आवेगानी चीत्कार उमटला. तिने स्वतःच्या तोंडावर हात ठेवला. कुमालोंना स्वतःला
पुढे बोलणं अशक्य झालं. अगदी ताज्या ओल्या जखमेमध्ये पुन्हा कोणीतरी धारदार सुरा खुपसावा,
तसं झालं त्यांना. ती मुलगी एका खोक्यावर बसली, जमिनीकडे टक लावून बघत. तिच्या दोन्ही
गालांवरून झराझरा अश्रू ओघळत होते.
-
बाळ, मला
त्याबद्दल जास्त बोलणं नकोय. तुला गोऱ्यांच वर्तमानपत्र वाचायला जमेल का?
-
थोडस.
-
ठीक आहे,
मग मी इथे ठेवून देतो तुझ्यासाठी. पण कोणाला दाखवू नकोस.
-
उम्फुन्डीस,
मी कोणाला नाही दाखवणार.
-
मला त्याबद्दल
आणखी काही बोलायला नको आहे. मी तुझ्याशी दुसऱ्याच विषयावर बोलायला आलो होतो. माझ्या
मुलाशी लग्न करायची तुझी इच्छा आहे का?
-
उम्फुन्डीसना
जे योग्य वाटेल ते.
-
मी तुला
विचारतो आहे बाळ.
-
माझी तयारी
आहे.
-
आणि का
आहे तुझी तयारी?
तिने त्यांच्याकडे
बघितलं. असले प्रश्न तिच्या आवाक्याबाहेरचे होते.
-
तुला का
लग्न करायचं आहे त्याच्याबरोबर? त्यांनी पुन्हा चिकाटीनी विचारलं.
गोंधळून हसत ती नुसती
त्या खोक्याच्या लाकडाची कुसं काढत राहिली. मर्द आहे ना तो माझा, ती म्हणाली. अगदी
सरळ नवरा असं नाही, पण त्या अर्थाचा शब्द.
-
पण तुला
आधी त्याच्याशी लग्न करावसं वाटलं नव्हत.
त्या प्रश्नाने ती
शरमली, उठून उभी राहिली. पण करण्यासारखं काहीच नाही, म्हणून पुन्हा बसली आणि लाकडाची
कुसं काढू लागली.
-
बोल, बाळ.
-
मला माहिती
नाही काय बोलू मी उम्फुन्डीस.
-
तुझी त्याच्याशी
लग्न करायची खरच इच्छा आहे?
-
माझी खरच
इच्छा आहे.
-
बघ, मला
खात्री असायला हवी. तुझ्या इच्छेविरुद्ध तुला आमच्या घरात आणायची नाहीय मला.
हे ऐकताक्षणी ती एकदम
उत्साहानी म्हणाली, मला करायचंय हे लग्न.
-
आम्ही
खूप दूर रहातो. तिथे अश्या गल्ल्या, रस्ते, दिवे आणि बसेस नाहीत. फक्त मी आणि माझी
बायको. आणि सगळ खूप शांत असणार आहे. तू झुलू आहेस का?
-
होय, उम्फुन्डीस.
-
जन्म कुठचा
तुझा?
-
अलेक्झांड्रामधला.
-
आणि आई
बाबा?
-
उम्फुन्डीस,
माझे बाबा आईला सोडून गेले. आणि दुसऱ्या बाबांबरोबर माझ पटेना.
-
का सोडून
गेले बाबा?
-
त्यांची
सारखी भांडणं व्हायची. कारण माझी आई सारखी पिऊन पडलेली असे.
-
म्हणून
बाबा तिला सोडून गेले? आणि तुलाही?
-
ते आम्हाला
सगळ्यांनाच सोडून गेले - माझे दोन धाकटे भाऊ आणि मी.
-
आणि तुझे
भाऊ - ते कुठे असतात?
-
एक शाळेत
आहे उम्फुन्डीस, अब्सलम होता ना, त्याच शाळेत. आणि दुसरा अलेक्झांड्रामध्येच आहे; पण
तो उडाणटप्पू आहे, आणि मी ऐकलय की त्यालाही बहुतेक त्या शाळेतच जावं लागणार आहे.
-
पण तुझ्या
बाबांनी तुम्हाला असं सोडून कसं दिलं?
तिनी त्यांच्याकडे
एका अनोख्या निर्व्याजपणे बघितलं. मला नाही माहिती, ती म्हणाली.
-
आणि तुझं
दुसऱ्या बाबांशी पटलं नाही, म्हणून काय केलंस?
-
मी निघून
गेले.
-
आणि राहिलीस
कुठे?
-
सोफियाटाऊनमध्ये.
-
एकटी?
-
नाही,
एकटी नाही.
-
तुझ्या
पहिल्या नवऱ्याबरोबर? त्यांनी थंडपणे विचारलं.
-
हो, पहिल्याबरोबर.
ती म्हणाली, त्यांचा थंडपणा तिच्या डोक्यावरून गेला होता.
-
किती झाले
आत्तापर्यंत?
ती गोंधळून हसली, आणि
नुसतीच कुसं उपटणाऱ्या बोटांकडे बघत राहिली. मान वर करून बघितलं तेव्हा तिला त्यांची
नजर तिच्यावर खिळलेली दिसली आणि ती आणखीच गोंधळली. तीनच, ती म्हणाली.
-
पहिल्याचं
काय झालं?
-
पोलिसांनी
पकडलं त्याला.
-
आणि दुसरा?
-
त्यालाही
पकडला.
-
आणि आता
तिसऱ्यालाही पकडलंय.
ते उभे राहिले आणि
एकदम त्यांच्या मनात तिला जबरदस्त दुखवायची इच्छा निर्माण झाली. त्यांना कळत होतं हे
योग्य नाही, पण तरीही ते बळी पडले आणि म्हणाले, वा: आता तिसराही पकडला गेलाय; पण ह्यावेळी
खुनासाठी. ह्या आधीचा होता का कोणी खुनी?
ते तिच्या दिशेनी एक
पाऊल पुढे गेले, आणि त्या खोक्यावरतीच अंग चोरून मागे सरकत ती ओरडली नाही, नव्हता.
बाहेर ऐकू जाईल ह्या भितीनी ते खालच्या आवाजात तिला म्हणाले घाबरू नको. त्यांनी एक
पाऊल मागेही घेतलं. पण पुन्हा तिला दुखावायची उर्मी उसळून आली. आणि ते म्हणाले, आता
चौथा करशील का दादला? ती बेभान होऊन म्हणाली, नाही, नाही मला आता कोणीही नवरा नको.
त्यांच्या रानटी आणि
क्रूर मन:स्थितीत एक भयानक विचार त्यांच्या मनात आला.
-
अगदी...
मला तू हवी असलीस तरीही?
-
तुम्हाला...
ती घाबरून आणखी अंग चोरून मागे सरकली.
-
हो, मला
- ते म्हणाले.
-
तिने कोंडीत
सापडलेल्या जनावरासारखं चारी बाजूला बघितलं, आणि म्हणाली, नाही नाही. ते बरोबर नाही
ना.
-
आधी होतं
का बरोबर?
-
नाही तेही
नव्हतं बरोबर.
-
मग, येशील
का माझ्या संगतीला?
-
ती बावळटासारखं
हसली, इकडे तिकडे बघत, खोक्याची कुसं काढत राहिली. पण त्यांची तिच्यावरची स्थिर नजर
जाणवून खोल हलक्या आवाजात म्हणाली, हो चालेल.
ते चेहरा हातानी झाकून
मटकन खाली बसले. ती त्यांच्याकडे बघून हमसाहमशी रडायला लागली - हाल आणि छळ करून लाज
वेशीवर टांगली गेल्यासारखी. त्यांनी तिच्या हडकुळ्या छोट्याशा देहाकडे बघितलं आणि त्यांनाही
शरम वाटली - त्यांच्या क्रूरपणाची, तिच्या होकाराची नव्हे.
ते तिच्याजवळ गेले
आणि म्हणाले, वय काय तुझं, बाळ?
मला माहिती नाही, हुंदके
देत ती म्हणाली, मला वाटतं सोळा असेल बहुतेक. त्यांच्या मनातून खोलवरून करूणा उचंबळून
आली. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या त्या प्रिस्टच्या स्पर्शाने, का
मनातली ती करूणा त्यांच्या बोटांमधून ओसंडून वहात होती म्हणून, का आणखी काही कारणाने
- पण तिचे हुंदके शांत झाले. तिचं थरथरणारं डोक त्यांच्या हाताखाली शांत झाल्याच त्यांना
जाणवलं.
त्यांनी तिचे हात उचलून
स्वतःच्या हातात घेतले. त्या हातांना घरातली कामं उपसतांना पडलेले घट्टे कुमालोंना
जाणवले.
-
मला माफ
कर, ते म्हणाले. मला शरम वाटते मी तुला असला प्रश्न विचारला.
-
मला काय
बोलावं तेच कळेना, ती म्हणाली.
-
मला समजतं
तुला कळणार नाही, म्हणून तर मला वाईट वाटतंय. पण सांग, तुला माझ्या मुलाशी लग्न करायचंय?
तिने त्यांचा हात घट्ट
धरून ठेवला. हो, हो, मला करायचंय.
-
आणि ह्या
गजबजाटापासून दूर कुठे, शांत ठिकाणी, आमची मुलगी बनून रहायची तयारी आहे तुझी?
तिच्या आवाजातला आनंद
ओसंडून वहात होता - हो, मला आवडेल.
-
खूप?
-
खूप खूप!
-
बाळ?
-
उम्फुन्डीस?
-
मला तुला
आणखी एक कठीण गोष्ट सांगायची आहे.
-
सांगा
ना उम्फुन्डीस.
-
त्या तशा
शांत जागी तू काय करशील? तुझ्या… इच्छा… जाग्या झाल्या तर? मी साधा-सुधा पाद्री आहे,
माझ्या चर्चला वाहिलेला. आमची रहाणी सुद्धा अगदी साधी आणि नेमस्त आहे. तुला जमणार नाही
अशी काही गोष्ट मला तुला करायला लावायची नाही.
-
मला समजतं
उम्फुन्डीस, मला पूर्णपणे समजतं. वाहत्या अश्रुंमधून तिने त्यांच्याकडे पाहिलं. मी
तुम्हाला कधीही लाज आणणार नाही. तुम्हाला माझी भिती नको. तुम्हाला शांत आहे तिथे म्हणून
भिती नको. शांतीची मला मनापासून गरज आहे. ती
एकमेव 'इच्छा' माझ्या आयुष्यात असेल. त्यांच्या इच्छा शब्दाशी तिने केलेला सुंदर खेळ
बघून त्यांना गम्मत वाटली.
-
आलं लक्षात
माझ्या, खूप हुशार आहेस ग तू!
-
मग, शाळेत
हुशारच होते मी! ती अधीरतेनी उद्गारली.
त्यांना एकदम हसू फुटलं.
त्या हास्याच्या अनोळखी आवाजानी ते स्वतःच चकित झाले.
-
तुझ चर्च
कुठलं आहे?
-
इंग्लंडचं...
हे सुद्धा ती अगदी अधीरपणे म्हणाली.
तिच्या ह्या बालिश
उत्तरावर ते पुन्हा हसले. आणि मग एकदम गंभीर झाले.
-
तुला एक
शपथ आहे, मोठी शपथ!
ती पण गंभीर झाली,
कसली शपथ, उम्फुन्डीस?
-
तुला जर
कधी ह्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला, इथे असतांना किंवा आमच्या घरी गेल्यावर, तर ते
मनातल्या मनात नाही ठेवायचं, नाहीतर घरून पळून गेलीस तसं पळून नाही जायचं - मला सांगायचं,
की तुझा बेत बदलला आहे.
-
नक्की,
शप्पथ, ती गंभीरपणे म्हणाली. मग खेळकरपणे, मला पश्चात्ताप होणारच नाही मुळी.
त्यांना पुन्हा हसायला
आलं. त्यांनी तिचे हात सोडले आणि हॅट घेतली.
-
लग्नाची
सगळी तयारी झाली, की मी परत येईन तुला न्यायला. चांगले कपडे आहेत का काही तुझ्याकडे?
-
थोडे आहेत
कपडे माझ्याकडे, मी ते नीट तयार करून ठेवीन.
-
आणि तू
इथे राहणं योग्य नाही. मी शोधू का तुझ्यासाठी जवळपास एखादी जागा?
-
मला आवडेल
ते, तिनी अगदी लहान मुलासारख्या टाळ्या वाजवल्या. अगदी पटकन शोधा हं. मग मी ही खोली
सोडून देईन.
-
जपून रहा,
बाळ.
-
जपून जा,
उम्फुन्डीस.
ते घराबाहेर पडले,
ती त्यांच्या मागोमाग फाटकापर्यंत आली. त्यांनी वळून बघितलं, ती त्यांच्याकडे बघून
गोड हसत होती. ते चालायला लागले - दुखणं थोड कमी झालेल्या माणसासारखे. अगदी गेलं नसलं
तरी कमी नक्कीच झालं होत दुखणं. त्यांना हेही आठवलं, ते चक्क हसले होते - आणि त्यांच्या
काळजात कळ आली. एखाद्या आजारी माणसाला, हसण्याची मनाई केलेल्या माणसाला यावी तशी. त्यांना
आत्ता एकदम आठवलं फादर व्हिन्सेन्ट म्हणाले होते, मी रात्रंदिवस तुमच्यासाठी प्रार्थना
करेन. वळून मागे बघितलं, तर ती मुलगी अजून तिथेच त्यांच्याकडे बघत उभी होती.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...