भाषांतर १८

                 * * * भाग २ * * *

इकोपोहून करिसब्रूक कडे जाणारा रस्ता फार सुंदर डोंगराळ भागातून जातो, टेकड्याच म्हणाना. ह्या टेकड्या म्हणजे गवताचे गालीचेच जणू ... काय वर्णाव सौंदर्य त्यांचं...करिसब्रूक पर्यंतच मुळी सात मैल आहेत. तिथून पुढे, तुम्हाला आफ्रीकेमधली सगळ्यात सुंदर दऱ्या-खोरी बघायला मिळतात - मात्र धुकं नसेल तेव्हा. तुमच्या अवती भवती नुसतं रानोमाळ पसरलेलं उंच झुपकेदार गवत असतंमधूनच एखाद्या एकांड्या टिटवीचा  टाहो... माळावरचाच पक्षी तो... खालच्या अंगाला दिसत ते ड्राकेन्स्बर्गहून समुद्राला भेटायला निघालेल्या उमझीमकुलूचं  खोरं. आणि नदीच्या मागे आणि पलीकडे एकामागोमाग एक लहान आणि मोठे डोंगर... आणि त्यांच्याही मागे आणि पलीकडे, इंगेली आणि इस्ट ग्रीकालंडचे पर्वत.

इथल गवत अस दाट आणि गुंतागुंतीच, की खालची जमीन दिसूच नये. पाऊस आणि ओल गच्च धरून ठेवतं. मग ते पाणी जमिनीत झिरपत. कडे-कपारी मधल्या झऱ्यांना पुरवतं. ह्या गवताची छान निगा राखलेली आहे, फार गुरं चरत नाहीत त्यावर, फारसे वणवे पेटत नाहीत त्याच्यात - खालची जमीन उघडी पाडायला.

इथे उंचावर, एक छोटीशी सुंदर दरी आहे - दोन टेकड्यांच्या कुशीमध्ये. तिथे एक घर आहे, आणि सपाट नांगरलेलं शेत. लोक म्हणतात, ह्या ग्रामीण भागामधल्या उत्कृष्ट घरांपैकी एक. उत्तुंग विहार नांव त्याचं. श्रीमान जेम्स जार्विस ह्यांची जमीन आणि रहातं घर आहे. डोत्शेनीच्या आणि उम्झीम्कुलूच्या विस्तीर्ण खोऱ्याच्या वर, खूप उंचीवर ही जागा आहे.

* * *

जार्विस नांगरणीच्या कामाकडे निराश नजरेनी बघत होते. ऑक्टोबरचं मध्यान्हीचं उन्ह शेतावर तळपत होतं, आणि एकही ढग आकाशात दिसत नव्हता. पाऊस, पाऊस म्हणून आक्रोश करणाऱ्या जमिनीवर पाण्याचा एक टिपूसही पडत नव्हता. फार घट्ट आणि कठीण झालेली मोठमोठाली सलग ढेकळं इतस्ततः विखुरली होती. दगडासारख्या निर्जीव मातीवरून तो नांगर निरुद्देश फिरत होता. शेताच्या टोकाला जाऊन तो थांबला, तेव्हा घामानी निथळत असलेले बैल गरम हवेचे निश्वास टाकत उभे राहिले.
-    काय पन फायदा न्हाई, सरकार.
-    थॉमस, तुझं चालू राहू दे ते; मी वर उंचावर जाऊन बघतो काय दिसतंय ते.
-    सरकार, काय पन दिसनार न्हाई. माला म्हाइती हाय, कारन म्या आगुदरच बघितलया.

जार्विसनी हुं: म्हटलं, आपल्या कुत्र्याला हाकारलं आणि ते डोंगरमाथ्याच्या त्या रस्त्यावरून चालायला लागले. इथे दुष्काळाची खूणही नव्हती, कारण इथलं गवत धुक्यावर छान तृप्त होतं. गार हवेच्या झुळुका त्यांच्या घामानी डवरलेल्या चेहऱ्याला सुखावह वाटत होत्या. पण ह्या डोंगर माथ्याच्याखालचं गवत कोरडं पडत चाललं होतं. डोत्शेनीच्या टेकड्या तांबड्या उजाड दिसत होत्या. आणि उंचीवरच्या शेतकऱ्यांनाही काळजी होती की तेच भकास उजाडपण हळू हळू, थोड्या थोड्या अंतरानी येउन त्यांचीही शेतं ग्रासून टाकणार आहे.

खर म्हणजे ते ह्याबद्दल एकमेकाबरोबर बऱ्याच वेळा चर्चा करतात. त्यांच्या लांबलचक सुखद व्हरांड्यामध्ये बसून चहा पितांना त्यांना खाली पसरलेल्या बोडक्या टेकड्या आणि ओसाड खोरी दिसत असतात. त्यांच्याकडचे काही शेतमजूर डोत्शेनी मधून येतात, आणि त्यांनी ऐकलय दरवर्षी कसं कमी कमी धान्य तिथे उगवतंय. गाई-गुरं फार, आणि जमीन आकसलेली आणि ओसाड. प्रत्येक नवीन शेताबरोबर जास्त उध्वस्त होत जाणारी. ह्या लोकांना जर जमिनीचा कस वाढवायची, धूप कमी करायची काही माहिती असती, तर काही फरक पडला असता. माती वाहून जाऊ नये म्हणून त्यांना बांध घालायची माहिती असती, टेकडीच उंचसखल अंग ध्यानात घेऊन नांगर फिरवायची माहिती असती तर फरक पडला असता. पण टेकड्या फार सरळसोट उंच आहेत, त्यातल्या काहींवर शेती करणंच खरं चूक होतं. बैल म्हातारे आणि थकलेले आहेत, त्यामुळे नांगर नेहमी सोप्या उताराच्या दिशेनीच चालतो. लोकं अडाणी आणि अशिक्षित आहेत, त्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रांची काही माहिती नाही.

कदाचित ह्या प्रश्नाला काही उत्तरच नसेल. काही जण म्हणतात, शिक्षणाचा प्रसार व्हायला हवा. पण मुलगा शिकला, की त्याला शेतात काम करायचं नसत; तो जातो शहरात, चांगली आरामशीर नोकरी मिळवायला. शेतीचं काम बघतात म्हातारे-कोतारे. आणि ही तरणीताठी मुलं जेव्हा त्यांच्या खाणींमधून आणि शहरांमधून; ती नुसती उन्हं खात आणि त्यांची दारू ढोसत बसतात आणि अनंत गप्पा करतात. काहीजण म्हणतात, एवढीशी तर जमीन आहे - तिच्यावर काळ्यांचा गुजारा होणारच नव्हता एवीतेवी, अगदी शेतकीची अत्याधुनिक तंत्र वापरून सुद्धा. पण अशा प्रश्नांना अनेक बाजू असतात. कारण नुसतीच जास्त जमीन मिळत राहिली, पण तिची देखभाल आतासारखीच केली, तर सबंध देशाचं वाळवंट व्हायला वेळ नाही लागणार. शेवटी जमीन येणार तरी कुठून, आणि तिचे पैसे कोण देणार. पुन्हा आणखी एक मुद्दा आहे, समजा त्यांना त्यांच्या जमिनी मिळाल्या, आणि अगदी धरून चाला त्यातून पुरेसं उत्पन्नही मिळालं, तर मग गोऱ्यांच्या शेतांवर कामं कोण करणार? एक पद्धत अशी होती, की काळे लोक डोत्शेनीमध्ये रहात, आणि स्वेछेनी आजूबाजूच्या गोऱ्या लोकांच्या शेतांवर काम करत. दुसरी एक पद्धत अशी होती, की काळ्या लोकांना त्यांच्या झोपड्या उभारायला, कुटुंबांची रहायची व्यवस्था करायला थोडी जमीन मिळे; वरती थोडी जमीन त्यांची म्हणून कसायलाही मिळे - फक्त त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी मिळून वर्षभरात गोऱ्या मालकासाठी एक ठराविक मजुरी करायची. अर्थात तेही फार चांगल चालत नसे. कारण कित्येकदा तरुण मुलं-मुली गाव सोडून जात आणि त्यांच्या वाट्याची मजुरी कधी मिळतच नसे. काहीजणं जमिनीची नुसती वाट लावायचे, तर काही गुरं वासरं आणि मेंढ्या कसायांना विकून टाकायचे. काही नुसते आळशी आणि निरुद्योगी होते. त्यांना शेतावरून हाकलून लावावं लागे, आणि बदली येणारा फार चांगला असेल ह्याची काही खात्री नसे.

जार्विस डोंगरमाथ्याकडे चढत असतांना त्यांच्या मनात ह्या आठवणी घोळत होत्या. तिथे पोचल्यावर ते एका दगडावर जरा टेकले, आणि त्यांनी डोक्यावरची हॅट काढली. गार वाऱ्याच्या छान झुळुका येत होत्या. इथून दिसणारं उम्झीमकुलूचं भव्य खोरं बघण्यात माणूस अगदी आनंदानी जन्म घालवू शकेल. त्यांच्या सभोवार, वडिलोपार्जित मिळालेल्या हिरव्यागार टेकड्या पसरलेल्या, आणि खाली त्यांचं घर आणि शेती असलेलं हिरवं गार खोरं. त्यांची फार इच्छा होती की त्यांच्या मुलाने, एकुलत्या एका मुलाने, त्यांच्या सारखीच शेती करावी. पण त्या पोराच्या डोक्यात दुसरीच स्वप्न होती, त्याने इंजीनिअरिंग केलं - काही वाईट नाही. एका छानशा मुलीशी लग्न करून, त्यांना दोन छानशी नातवंडही दिली होती. त्याने जेव्हा उत्तुंग विहार सोडून जायचा निर्णय घेतला, तेव्हा फार मोठा धक्का होता तो जार्विसना. पण शेवटी आयुष्य त्याचं स्वतःचं होतं आणि ते कसं घालवायचं ठरवण्याचा हक्क त्याचाच होतं, दुसऱ्या कोणाचा नव्हे.

खाली खोऱ्यामधून एक गाडी वर चढत त्यांच्या घराकडे जातांना दिसत होती. त्यांनी ओळखलं ती इकोपो मधल्या पोलिसांची गाडी होती. बहुतेक बिनेंडिक त्याच्या रोजच्या गस्तीवर जात असावा. आफ्रिकानेरच्या मानाने बरा होता पोरगा. एकेकाळी इकोपोमध्ये कोणी आफ्रिकानेर नव्हते, आणि आजकाल त्या लोकांनी भरून गेलं होतं ते. सगळे पोलिस म्हणा, पोस्टऑफिसातले कारकून म्हणा, रेल्वे स्टेशनवरचे लोक म्हणा - सगळे आफ्रिकानेर. गावातल्या लोकांनीही हो-नाही करता करता त्यांच्याशी जमवून घेतलं होतं. त्यांच्यातल्या कित्येकांनी इंग्लिश मुलींशी लग्न सुद्धा केली होती, सगळ्या देशभरच चाललं होतं म्हणा ते. त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी धमकी दिली होती, घरातल्या कोणी असलं काही केलं तर त्याच्याशी संबंध तोडून टाकेन म्हणून, पण काळ बदलला होता. युद्धानी सगळं थोडं बदललं. काही आफ्रिकानेर फौजेत भरती झाले होते, इतर काही फौजेत नसले तरी युद्धाच्या बाजूनी होते. काही जण तटस्थ होते, आणि त्यांच्या ज्या काही भावना होत्या त्या दडवून ठेवत. इतर काही जर्मनीच्या बाजूनी होते, पण त्याबद्दल काही न बोलणं इष्ट एवढं त्यांना कळत होतं.  

त्यांची बायको कोण आलंय बघायला म्हणून बाहेर येत होती आणि गाडीतून दोन पोलिस उतरत होते. एक बहुतेक कॅप्टन व्हॅन जार्सव्हेल्ड स्वतः असावा असं वाटत होतं. गावात तो सगळ्यांचा आवडता होता, कारण एकेकाळचा मोठा रग्बी खेळाडू होता आणि पहिल्या महायुद्धामधला लढवैय्या सुद्धा. 'इकोपोसारख्या इंग्लिश भाषिक तालुक्यात थोडा विचार करून ऑफिसर निवडतात हे लोक सुद्धा', जार्विसच्या मनात आल्याशिवाय राहिलं नाही. पोलिस बहुतेक त्यांना भेटायला आले असावे, कारण त्यांची बायको डोंगरमाथ्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलत होती. ते खाली जायला निघाले, पण जाण्यापूर्वी त्यांनी एकदा खोऱ्याकडे दृष्टीक्षेप टाकला. पाऊस तर नव्हताच, येण्याचं काही लक्षणही दिसत नव्हतं. त्यांनी कुत्र्याला हाक मारली आणि ते त्या खडकाळ उतारावरून जायला निघाले. अर्ध अंतर उतरून थोड्याशा सपाट भागापर्यंत पोचतात, तोवर त्यांना बिनेंडिक आणि व्हॅन जार्सव्हेल्ड गाडी घेऊन चढावरून येतांना दिसले. नांगरलेल्या भागाच्या कडेनीच ते येत होते. त्या दोघांनीही ह्यांना पाहिलं आणि हात केला. मग जार्विस एका दगडावर त्यांची वाट बघत बसून राहिले. बिनेंडिक मागेच थांबला, पण व्हॅन जार्सव्हेल्ड वर चढून त्यांना भेटायला आला.

-    काय मग कॅप्टन, काही पाऊस बिउस घेऊन आलात का आमच्यासाठी?
कॅप्टन थांबला आणि त्याने खोऱ्याच्या आणि मागच्या डोंगरांच्याकडे नजर टाकली.
-    नाही, मिस्टर जार्विस, दिसत तरी नाही तसं काहीच.
-    मलाही नाही दिसत. मग, काय काम काढलंत आज?
दोघांनी हात मिळवले, आणि कॅप्टननी त्यांच्याकडे निरखून पाहिलं.
-    मिस्टर जार्विस?
-    बोला ना.
-    एक वाईट बातमी घेऊन आलो आहे.
-    वाईट बातमी?
जार्विस खाली बसले; त्यांच्या हृदयाचे ठोके थाडथाड ऐकू येत होते. माझ्या मुलाबद्दल? ते म्हणाले.
-    होय, मिस्टर जार्विस.
-    तो... गेला?
-    होय, मिस्टर जार्विस. कॅप्टन क्षणभर थांबला. आज दुपारी, दीड वाजता, गोळ्या घालून त्यांचा खून झाला.
जार्विस उभे राहिले. त्यांचा चेहरा थरथरा कापत होता. गोळ्या घालून, ते म्हणाले, कोणी?
-    एका काळ्या घरफोडयाने असावा असा संशय आहे. तुम्हाला माहिती आहे, त्यांची बायको घरी नव्हती?
-    हो माहिती होतं मला ते.
-    आणि ते स्वतः थोडं बरं वाटत नाही म्हणून घरी राहिले होते. मला वाटतं ह्या काळ्याचा अंदाज असेल घरी कोणी नाही. असं दिसतंय की काही आवाज ऐकून तुमचा मुलगा बाहेर आला आणि काळ्याने त्यांच्यावर गोळी झाडली. काही झगडा झाला असावा असं दिसत नाही.
-    अरे देवा!
-    सॉरी, मिस्टर जार्विस. ही असली बातमी तुमच्याकडे घेऊन येतांना फार वाईट वाटतंय मला.
त्याने हात पुढे केला, पण जार्विस खाली दगडावर बसले होते, त्यांनी तो बघितलाही नाही. अरे देवा, ते पुन्हा म्हणाले. ते स्वतःला आवर घालायचा प्रयत्न करत असतांना व्हॅन जार्सव्हेल्ड गप्प उभा राहिला.
-    कॅप्टन, माझ्या बायकोला सांगितलं नाही ना?
-    नाही, मिस्टर जार्विस.
त्यांच्यापुढे वाढून ठेवलेल्या कामाच्या विचारांनी जार्विसच्या भुवया आक्रसल्या.
-    ती फार खंबीर नाही, मला समजत नाही ती हे कसं सहन करेल.
-    मिस्टर जार्विस, तुम्हाला जी लागेल ती मदत करायचा आदेश मला मिळालेला आहे. तुम्हाला हवं तर बिनेंडिक तुम्हाला पीटरमरीत्झबर्गला गाडीनी सोडू शकेल. तिथून तुम्हाला ९ वाजताची फास्ट मेल ट्रेन मिळेल, तुम्ही उद्या सकाळी ११ वाजता जोहानसबर्गला पोचू शकाल. तुमच्यासाठी एक डबा राखून ठेवलेला आहे.
-    तुम्ही फार मोठी मदत करताहात.
-    तुम्हाला जे लागेल ते करायची माझी तयारी आहे, मिस्टर जार्विस.
-    किती वाजले?
-    साडे-तीन, मिस्टर जार्विस.
-    फक्त दोन तासांपूर्वी!
-    हो, मिस्टर जार्विस.
-    तीन तासांपूर्वी तो होता.
-    हो, मिस्टर जार्विस.
-    देवा!
-    तुम्हाला ही ट्रेन मिळवायची असेल तर तुम्हाला सहा वाजता निघायला हव. किंवा, तुम्हाला हव तर तुम्ही विमानांनी जाऊ शकाल. पीटरमरीत्झबर्गला एक तयार ठेवलंय. पण त्यांना चारपर्यंत सांगायला हवं. तुम्ही मध्यरात्रीपर्यंत जोहानसबर्गला पोचाल.
-    हो, हो. काय आहे, मला काही विचारच करता येत नाहीय.
-    साहजिक आहे, मला समजतं ते.
-    कसं जाण बरं पडेल?
-    मला वाटतं विमानानी, मिस्टर जार्विस.
-    ठीक आहे, तसं जाऊ आम्ही. त्यांना सांगायला हवं म्हणालात नाही का तुम्ही.
-    तुमच्या घरात पोचल्याबरोबर मी ते करेन. मिसेस जार्विसना ऐकू जाणार नाही अशा ठिकाणी फोन आहे का? मला त्या लोकांना घाईघाईनी कळवायला हवं ना.
-    हो, हो, बरोबर आहे. करता येईल तुम्हाला तसा फोन.
-    मला वाटतं आपल्याला निघायला हवं.
पण जार्विस न हलता बसूनच राहिलेले.
-    मिस्टर जार्विस, तुम्ही उठून उभे राहू शकाल का? तुमची बायको आपल्याकडे बघते आहे, म्हणून मला तुम्हाला आधार द्यायला नको आहे.
-    कॅप्टन, ती बुचकळ्यात पडली आहे. एवढ्या अंतरावरूनही तिला काहीतरी चुटपूट लागली आहे.
-    अगदी शक्य आहे. मी खूप शांत चेहरा ठेवायचा प्रयत्न केला होता; पण शेवटी त्यांना माझ्या चेहऱ्यावर काही जाणवलं की काय कोण जाणे.

जार्विस उठून उभे राहिले. देवा रे, अजून ते एक काम बाकी आहे. त्या सरळसोट उतारावरून ते खाली जायला निघाले, बिनेंडिक त्यांच्या पुढे गेला. जार्विस गुंगीत असल्यासारखे चालत होते. निरभ्र आकाशातून एकाएकी काय एकेक टपकतं ना?

-    गोळी घालून? ते म्हणाले.
-    होय, मिस्टर जार्विस.
-    त्या काळ्याला पकडला का?
-    अजून तरी नाही, मिस्टर जार्विस.

त्यांचे डोळे भरून आले, ओठ दातांनी चावला होता. काय फरक पडतो, ते म्हणाले. ते टेकडी उतरून खाली शेताजवळ आले. धुसरलेल्या डोळ्यांमधून त्यांना नांगर एक मोठं ढेकूळ उलटवून त्या पोलादी जमिनीवर जायला लागलेला दिसला. थॉमस, सोडून दे ते, ते म्हणाले. कॅप्टन , आमचा एकुलता एक मुलगा होता तो.
-    मला ठाऊक आहे ते, मिस्टर जार्विस.

ते गाडीत बसले, आणि काही मिनिटातच घरी पोचले.
-    जेम्स, काय झालं?
-    अग, थोडी कटकट. ये, माझ्याबरोबर ऑफिसमध्ये ये. कॅप्टन, तुम्हाला फोन वापरायचा आहे ना? माहिती आहे कुठे आहे तो?
-    होय, मिस्टर जार्विस.

कॅप्टन टेलीफोनपाशी गेला. लाईन आधीच वापरात होती, दोन शेजारी बोलत होते. तुमचे फोन कृपया बंद करा, कॅप्टन म्हणाला. हा पोलिसचा महत्वाचा कॉल आहे, ताबडतोब तुमचे फोन बंद करा. त्याने जोरजोरात घंटी वाजवली. खास पोलिसांसाठी म्हणून ना एक वेगळी लाईन ठेवायलाच हवी. त्यासाठी प्रयत्न करायचा त्याने मनाशी निश्चय केला. पुन्हा जास्त जोरात घंटी वाजवली. पोलिस पीटरमरीत्झबर्ग, महत्वाचा कॉल आहे हा.

-    देतो हं लगेच जोडून तुम्हाला, एक्स्चेंजवरचा मनुष्य म्हणाला.

तो उतावीळपणे ते फोनचे विचित्र खटारखुटूर आवाज ऐकत थांबला. थोड्या वेळानी एक्स्चेंज वरून आदेश आला, बोला, पीटरमरीत्झबर्ग पोलिसांशी.


तो त्यांच्याशी विमानासंबंधी बोलू लागला. त्याने दुसराही कर्णा कानाला लावला, नीट ऐकायला यावं म्हणून. घरातल्या त्या बाईच्या आक्रंदनात त्याचं सबंध संभाषण बुडून जात होतं.

Comments