एअरपोर्टवर त्यांना
उतरून घ्यायला एक तरुण आला होता.
-
मिस्टर
आणि मिसेस जार्विस?
-
हो.
-
मी जॉन
हॅरीसन, मेरीचा भाऊ. मला नाही वाटत तुम्ही मला ओळखू शकाल. आपण ह्यापूर्वी भेटलो होतो
तेव्हा मी खूपच लहान होतो. मी घेतो तुमचं सामान. गाडी घेऊनच आलो आहे मी.
ते एअरपोर्टच्या बिल्डींगकडे
चालत असतांना तो म्हणाला, मिस्टर जार्विस, तुम्हाला सांगायची गरजच नाही, केवढा मोठा
धक्का आहे हा आम्हा सगळ्यांना. आर्थर माझ्या ओळखीतला सगळ्यात सज्जन मनुष्य!
गाडीमध्ये बसल्यावर
तो पुन्हा त्यांच्याशी बोलू लागला. मेरी आणि मुलं माझ्या आईकडे आहेत. आमची अपेक्षा
आहे की तुम्ही दोघंही आमच्याबरोबरच रहाल.
-
मेरी कशी
आहे आता?
-
ती अजून
त्या धक्क्यामधून बाहेर येते आहे, मिस्टर जार्विस. पण ती तशी खूप धीट आहे.
-
आणि मुलं?
-
त्यांना
समजावणं कठीण जातंय, मिस्टर जार्विस. आणि मेरीला लक्ष गुंतवायला ते एक चांगलं व्यवधान
आहे.
ते पुन्हा बोलले नाहीत.
जार्विसनी त्यांच्या बायकोचा हात धरून ठेवला होता, पण दोघंही आपापल्या विचारांत गप्प
होते. शेवटी एकदा ती गाडी उपनगरामधल्या एका बंगल्याच्या फाटकामधून आत शिरली आणि दिवे
लावलेल्या पोर्च बाहेर थांबली. गाडीच्या आवाजांनी एक तरुण स्त्री बाहेर आली, आणि तिनी
मिसेस जार्विसना मिठी मारली; दोघी हमसाहमशी रडल्या. नंतर जार्विसनी तिला जवळ घेऊन थोपटलं.
पहिल्या भेटीचा हा आवेग ओसरल्यावर मिस्टर आणि मिसेस हॅरीसनही बाहेर आले. स्वागतपर औपचारिक
थोडं बोलून ते सगळेजण घरात गेले.
हॅरीसन जार्विसकडे
वळून म्हणाले, तुम्हाला प्यायला काही देऊ का?
-
हो, आवडेल
मला.
-
चला, माझ्या
अभ्यासिकेत चला तर.
-
आणि आता,
हॅरीसन म्हणाले, तुम्ही अगदी अजिबात संकोच करू नका. आम्ही काहीही मदत करू शकतो असं
तुम्हाला वाटलं, तर नुसतं सांगा; आणि आम्ही ती ताबडतोब करू. तुम्हाला आता लगेच शवागारात
जायचं असेल, तर जॉन येईल तुमच्याबरोबर. उद्या सकाळी जायचं असेल, तर तसंही करू शकाल.
पोलिसांनाही तुमच्याशी बोलायचय, पण ते काही आज रात्री तुम्हाला त्रास देणार नाहीत.
-
मी माझ्या
बायकोला विचारतो. काय आहे, आम्ही ह्यासंबंधी अजून बोललोही नाही. मी एकटा बोलतो तिच्याशी,
तुम्हाला नको यायला.
-
जरूर,
मी इथेच थांबतो.
त्यांना त्यांची बायको
आणि सून, नातवंडांच्या खोलीतून हलकेच पाऊल न वाजवता बाहेर पडतांना दिसली. ते तिच्याशी
बोलले. ती पुन्हा त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून हुंदके देत रडली, आणि म्हणाली - आत्ताच!
ते पुन्हा अभ्यासिकेत गेले, आणि त्यांचं ड्रिंक त्यांनी एका घोटात संपवून टाकलं. मग
ते, त्यांची बायको आणि सून बाहेर गाडीकडे गेले; जॉन तिथे आधीच जाऊन थांबलेला होता.
ते पोलिस लॅबोरेटरीकडे
चालले असतांना जॉनने त्यांना खुनाबद्दल त्याच्याकडे असलेली सगळी माहिती पुरवली. पोलिस
कसे तो घरातला नोकर शुद्धीवर यायची वाट बघत होते, त्यांनी कसा पार्कवॉल्ड रिजचा भाग
पिंजून काढला होता. त्याने मृत्यूपूर्वी आर्थर जार्विस लिहित असलेल्या 'काळ्या गुन्हेगारीमागील
सत्यपरिस्थिती' ह्या लेखाबद्दल सांगितलं.
-
मला तो
वाचायला आवडेल, जार्विस म्हणाले.
-
उद्या
घेऊन येऊ ना आपण तुमच्यासाठी, मिस्टर जार्विस.
-
जॉन, ह्या
काळ्यांच्या प्रश्नाबाबत माझं आणि माझ्या मुलाचं एकमत नव्हतं. खरं तर, दोन-चार वेळा
आम्ही अगदी हिरीरीनी वाद घातला होता त्याबद्दल. पण, मला वाचायला आवडेल त्याने काय लिहिलं
होतं ते.
-
मिस्टर
जार्विस, माझं आणि माझ्या वडिलांचंही काळ्यांच्या प्रश्नाबाबत अजिबात एकमत नाही. पण
तुम्हाला माहिती आहे मिस्टर जार्विस, सबंध दक्षिण आफ्रिकेमध्ये ह्या प्रश्नाबाबत दुसऱ्या
कोणीही आर्थरइतका स्पष्ट आणि खोलवर विचार केलेला नसेल. नाहीतरी, दक्षिण आफ्रिकेमध्ये
दुसरं एवढं विचार करण्यासारखं महत्वाचं आहे काय, तो म्हणत असे.
मग ते लॅबोरेटरीमध्ये
पोचले. जॉन गाडीतच थांबला. इतर तिघे ते आवश्यक, पण भयानक कर्तव्य पार पाडायला गेले.
बाहेर आले तेव्हा, दोघी बायकांचं रडणं सोडलं तर ते अगदी गप्पच होते, अगदी घरापर्यंतच्या
प्रवासात सुद्धा. मेरीच्या वडिलांनी त्यांच्यासाठी दार उघडलं.
-
जार्विस,
आणखी एक ड्रिंक? का तुम्हाला झोपायचं आहे आता?
-
मार्गारेट,
मी तुझ्याबरोबर येऊ वरती?
-
नको, तुम्ही
थांबा आणि ड्रिंक घ्या तुम्हाला हवं तर.
गुड नाईट म्हणतांना
त्यांनी तिला जवळ घेतलं, ती त्यांना क्षणभर बिलगुनच राहिली. मग तिने स्वतःला सावरलं.
तिच्या डोळ्यात अश्रू होते, आणि खरं तर त्यांच्याही. त्यांनी तिला सुनेबरोबर जिना चढून
वर जातांना बघितलं; आणि दार बंद झाल्यावर ते आणि हॅरीसन परत अभ्यासिकेकडे वळले.
-
आयांना
नेहमी जास्त जड जातं, जार्विस.
-
हं. त्यांनी
त्यावर विचार थोडा केला आणि ते म्हणाले, मलाही माझा मुलगा खूप आवडत असे, मला काही त्याची
लाज नव्हती वाटली कधी.
ते दोघं आपापली ड्रिंक्स
घेऊन विसावले. हॅरीसननी त्यांना सांगितलं, पार्कवॉल्डमधल्या लोकांना ह्या खुनाच्या
बातमीनी कसा धक्का बसला होता, घरामध्ये शोकसंदेशांचा कसा खच पडला होता.
-
एवढ्या
वेगवेगळ्या ठिकाणांहून, एवढ्या वेगवेगळ्या लोकांकडून संदेश आलेत सांगतो तुम्हाला! बरं
का, जार्विस; आम्ही आत्ता तरी उद्या दुपारी तीन वाजता पार्कवॉल्ड चर्चमध्ये अंत्यविधी
ठेवला आहे आणि त्यानंतर मग दफन.
जार्विसनी मान हलवली,
थँक्यू - एवढंच म्हणाले ते.
-
आणि आम्ही
सगळे संदेश तुमच्यासाठी ठेऊन दिले आहेत. बिशपचा, सध्याच्या पंतप्रधानांचा, मेयरचा आणि
इतर डझनावारी अनेकांचे. काळ्या संस्थांचे सुद्धा आहेत, 'आफ्रिकन कन्या' म्हणून कोणीतरी
आहेत, आणि आणखी एकेक... मला नांवं सुद्धा आठवत नाहीत धड. काळ्या लोकांचे, भारतीयांचे
आणि ज्यू लोकांचे.
जार्विसना दुःख आणि
अभिमान एकदम उचंबळून आल्याचं जाणवलं. फार हुशार होता तो... त्याच्या आईकडून आलं होतं
ते.
-
हुशार
तर नक्कीच होता तो, जॉनला त्याच्याबद्दल बोलतांना ऐका एकदा. पण लोकांचा लाडका सुद्धा
होता, अगदी वेगवेगळ्या लोकांचा. तुम्हाला माहित्येय, तो आफ्रीकानेर अगदी आफ्रीकानेर
लोकांसारखा बोलत असे?
-
तो ती
भाषा शिकला होता माहिती होतं मला.
-
मी अगदी
नशीबच म्हणतो, मला ह्या असल्या भाषेची काही माहिती नाही. पण त्याचं म्हणणं होतं ही
भाषा यायला हवी, म्हणून मुद्दाम त्याने शिकून घेतली. आफ्रीकानेर शेतावर जाऊन राहिला
होता तो. त्याला झुलू येत असे तुम्हाला माहितीच आहे, पण सेसुटो शिकण्याचा त्याचा विचार
होता. तुम्हाला माहित्येय, हे काळे लोकसभा सदस्य... त्याला पुढच्या निवडणुकीत उभा करायच्या
गोष्टी चालल्या होत्या.
-
हे नव्हतं
मला माहित.
-
होय तर!
तो नेहमी भाषणं देत असे कुठे कुठे. काळी गुन्हेगारी, काळ्या लोकांसाठी शाळा, अ-युरोपीय
हॉस्पिटलमधल्या वाईट परिस्थितीबद्दल तर त्याने वर्तमानपत्रांमधून वादळच उठवलं होतं.
खाणींमध्ये एकेकट्या काळ्या मजुरांना ठेवण्याच्या विरुद्ध त्याने मोठा गहजब केला होता.
सरकारनी सुस्थिर मजुरांच्या - म्हणजे जिथे बायका, मुलं सबंध कुटुंब मजुराच्या बरोबर
राहू शकत अशा - पद्धतीला शंभर टक्के पाठींबा द्यावा म्हणून तो झगडत होता.
जार्विसनी त्यांचा
पाईप हळूहळू भरला - त्यांच्या ह्या मुलाची, ह्या अनोळखी माणसाची, गोष्ट ऐकत ऐकत.
-
खाणींच्या
संघटनेतला हॅथवे माझ्याशी थोडं बोलला ह्याबद्दल. म्हणाला मी ह्या पोराला थोडं सबुरीनी
घ्यायला सांगावं; त्याची कंपनी बऱ्याचशा खाणींबरोबर धंदा करायची ना. तर मी बोललो त्याच्याशी,
सांगितलं त्याला की बाबा मला समजतं तुला ह्या सगळ्याबद्दल किती मनापासून वाटतं ते,
पण थोडं जपून कर ना. शेवटी मेरीचा आणि मुलांचाही विचार करायला हवा ना. म्हणजे तसं मी
काही मेरीची बाजू घेऊन बोलत नव्हतो हां. आपण काय ह्या तरुण पोरांच्या गोष्टीत नाक खुपसत
नाही, काय समजलात?
-
हो, आलं
लक्षात.
-
तर म्हणे
मी मेरीशी बोललोय. आणि नुसता पैसा कमावण्यापेक्षा खरं बोलणं जास्त महत्वाच आहे असं
आमचं एकमत आहे म्हणे.
हॅरीसन ह्यावर फस्सकन
हसायला गेले, आणि एकदम प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन मध्येच थांबले. आणि त्यात आमचा
हा पोरगा जॉन, तिथे आर्थरकडे तो परमेश्वराचा अवतार असल्यासारख्या भक्तीभावानी बघत उभा!
काय बोलणार कप्पाळ!
दोघंजण थोडं वेळ शांततेत
धुम्रपान करत राहिले. हॅरीसन म्हणाले, मी त्याला विचारलं त्याच्या सहकाऱ्यांबद्दल.
शेवटी, खाणींना अवजारं विकायचाच तर धंदा ना त्यांचा. तर म्हणाला मी बोललोय त्यांच्याशी.
काही कटकट झाली, तर म्हणे मी त्यांना सांगितलंय की मी सोडून जाईन. म्हटलं मी, अरे सोडून
जाईन आणि करणार काय पुढे? तर म्हणे, काय करणार नाही मी! त्याचा चेहरा अगदी फुलला होता.
मग काय, बोलणंच खुंटलं ना?
जार्विस काहीच बोलले
नाहीत. कारण त्यांचा हा मुलगा वेगळ्याच नवीन प्रवाहांमध्ये पोहत होता, फार खोलवर जाऊन
पोचला होता. किती खोल, ह्याची त्याच्या आई-बापांना कल्पनाच नव्हती. कदाचित आईला असेल,
त्यांना आश्चर्य नसतं वाटलं, आईला माहिती असली तर. त्यांना स्वतःला हे सगळं नवीन आणि
अनोळखी होतं, आणि म्हणून बोलण्यासारखं काही नव्हतंच त्यांच्याकडे.
-
मी तुम्हाला
बोअर करतोय का, जार्विस? तुम्हाला बहुतेक दुसऱ्या विषयावर बोलायला आवडेल, किंवा झोपही
आली असेल, ना?
-
हॅरीसन,
तुमचं हे बोलणं ऐकतांना मला आनंदच होतो आहे.
-
तर, हे
सगळं असं होतं. तो आणि मी ह्या गोष्टींबद्दल फार बोलतच नसू. हा काही माझा प्रांत नव्हे.
हे बघा, मी काळ्यांना सरळपणी वागवतो, पण माझी तहान-भूक हरपत नाही त्यांच्या विचारांनी.
आणि खरं सांगायचं तर ह्या गुन्हेगारीचा अगदी उबग आलाय मला. तुम्हाला सांगतो जार्विस,
जोहानसबर्गमध्ये आम्ही सगळे सॉलिड टरकून असतो ह्या सगळ्यामुळे.
-
गुन्हेगारीमुळे?
-
काळ्यांच्या
गुन्हेगारीमुळे. हे खून, दरोडे आणि पाशवी हल्ले अती होत चाललेत. मी सांगतो, रात्री
घराभोवती तटबंदी केल्याशिवाय आम्ही झोपी जाऊ शकत नाही. इथे आमच्यापासून तीन घरं टाकून,
फिलीप्सनकडे ह्या असल्या गुंडांनी घर फोडलं. म्हाताऱ्या फिलीप्सनला मारून बेशुद्ध केला,
त्याच्या बायकोला बेदम मारलं. नशीब त्यांच्या मुली बाहेर पार्टीला गेल्या होत्या, नाहीतर
कोण जाणे आणखी काय घडलं असतं. मी आर्थरशी बोललो ह्याबद्दल. पण त्याच म्हणणं, कुठून
तरी आपलाच दोष आहे ह्या सगळ्यात. माझ्या तर डोक्यावरून गेलं त्याचं वक्तव्य, पण बिचारा
मनःपूर्वक बोलत होता. थोडं असं वाटलं, की वेळ काढून त्याचं बोलणं नीट ऐकलं, तर कदाचित
समजूही शकेल त्याला काय म्हणायचंय.
-
एक गोष्ट
मला समजू शकत नाही, जार्विस म्हणाले. हे का व्हावं...
-
म्हणजे...
तुम्हाला म्हणायचंय, त्याच्या बाबतीतच नेमकं का व्हावं? हुं. अगदी हीच गोष्ट पहिली
आमच्या डोक्यात आली होती. बघा, हा एवढा रात्रंदिवस जीवाला घोर लावून... आणि ह्याचाच
खून व्हावा!
-
एक लक्षात
घ्या, जार्विस मुद्द्यावर येत म्हणाले. लक्षात घ्या, मिशनरी लोकांचे सुद्धा खून झालेच
होते ह्यापूर्वी.
हॅरीसन काहीच बोलले
नाहीत. दोघंजण गप्पपणे आपले पाईप ओढत राहिले. मिशनरी, जार्विसना तो शब्दही विचित्र
वाटला. आपल्या मुलाला मिशनरी म्हणावं, त्यांच्या डोक्यातही आलं नसतं. हं, चर्च सारख्या
देणग्या मागायचं; आणि ते वेळोवेळी देतही असत. पण ह्याचा अर्थ त्यांना चर्चबद्दल किंवा
मिशनरयांच्याबद्दल फार आस्था होती असं नव्हे. त्यांच्या घराजवळच, डोत्शेनीमध्ये होती
की एक मिशन. अगदी बापुडवाणी बिल्डींग होती ती त्यांच्या आठवणीप्रमाणे. एक जुनाट, लाकडाच
आणि लोखंडाच अस्वछ चर्च, आणि तसाच एक म्हातारा अस्वछ काळा पाद्री. त्या ओसाड खोऱ्यात
होते ते. एक अशीच जुनाट शाळा देखील होती. एखाद दोनदा तिथून घोड्यावरून रपेट मारत असतांना,
त्यांनी तिथल्या मुलांना काहीही अर्थबोध होत नसलेली पोपटपंची घोकतांना ऐकलं होतं.
-
झोपायचय,
जार्विस? का घेणार आणखी एक?
-
नाही,
मी झोपणार आहे.
-
उद्या
पोलिस येणार आहेत म्हणाला होता का तुम्ही?
-
सकाळी
नऊ वाजता.
-
मला त्याचं
घर बघायलाही आवडेल.
-
मला वाटलंच
होतं. ते घेऊन जातीलच तुम्हाला तिथे.
-
ठीक आहे,
तर मग मी आता झोपायला जातो. तुमच्या बायकोला माझ्या वतीनी गुड नाईट सांगा.
-
नक्की
सांगेन. तुमची खोली माहिती आहे ना कुठे ते? सकाळी साडे-आठला ब्रेकफास्ट?
-
साडे-आठ.
गुड नाईट हॅरीसन; आणि तुमच्या एवढ्या आदरातिथ्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
-
एवढे आभार
वगैरे मानायची काही गरज नाही. आम्हाला काहीच त्रास नाहीय ह्याचा. गुड नाईट जार्विस.
तुम्हाला आणि मार्गारेटला थोडी तरी विश्रांती मिळू दे.
जार्विस जिना चढून
वर गेले आणि खोलीत शिरले. गुपचूप आत गेले, आणि हळूच दरवाजा ओढून घेतला. दिवा सुद्धा
लावला नाही. खिडकीमधून चंद्रप्रकाश येत होता, तिथेच ते उभे राहिले - बाहेरच्या जगाकडे
बघत. आत्ता ऐकलेलं सगळं त्यांच्या मनात घोळत होतं. त्यांची बायको कुशीवर वळली, आणि
म्हणाली
-
जेम्स?
-
काय ग?
-
कसला विचार
करता आहात?
ते गप्प राहिले - योग्य
उत्तर शोधत. ह्याच सगळ्याचा.
-
तुम्ही
काही येणारच नाही की काय वाटायला लागलं होतं मला.
ते पटकन तिच्याजवळ
गेले. तिने त्यांचे हात घट्ट हातात धरले. आम्ही आपल्या मुलाबद्दल बोलत होतो, ते म्हणाले.
त्याने काय काय करून दाखवलंय, काय काय करायचा प्रयत्न केलाय, किती लोक त्याच्या जाण्याचा
शोक करताहेत.
-
मला पण
सांगा ना.
त्यांनी तिला हलक्या
आवाजात, स्वतः नुकतंच ऐकलेलं सगळ सांगितलं. तिला खूप कुतूहल वाटत होतं, कारण तिचा नवरा
गप्प असे, खूप अबोल होता तो. पण आज रात्री हॅरीसनकडून ऐकलेलं सगळं त्यांनी तिला ऐकवलं
-
मला खूप
खूप अभिमान वाटतो त्याचा, ती अस्फुटपणे म्हणाली.
-
पण तुला
तर तो असा होता माहिती असणार.
-
होतं ना.
-
मलाही
माहिती होतं तो चांगला आहे, ते म्हणाले, पण तू त्याच्या जास्त जवळ होतीस.
-
आयांना
जास्त सहज जमतं ते, जेम्स.
-
खरं आहे,
पण आता मला वाटतं, मी त्याच्याशी जास्त ओळख करून घ्यायला हवी होती. काय आहे, त्याच्या
ह्या सगळ्या गोष्टींशी माझा फार काही संबंधच नव्हता.
-
माझाही
नव्हता, जेम्स. त्याचं आयुष्य आपल्यापेक्षा फार वेगळं होतं.
-
जे काही
ऐकतो आहोत त्यावरून, ते फार चांगलं आयुष्य होतं.
ते बसलेले, ती आडवी.
दोघं गप्प. त्यांच्या त्यांच्या विचारात, आठवणीत आणि दुःखात.
-
त्याचं
आयुष्य वेगळं असलं, तरी तू समजून घेऊ शकलीस त्याला.
-
हो, जेम्स.
-
मला वाईट
वाटत, मी नाही समजून घेतलं.
मग ते हलकेच म्हणाले,
समजून घेणं एक दिवस एवढं महत्वाचं वाटेल हे कधी जाणवलंच नाही.
तिनी मूकपणे त्यांच्या
भोवती हातांची मिठी घातली, आणि ती रडायला लागली. ते हळुवार बोलतच राहिले, एक गोष्ट
नाही समजत मला, त्याच्याच बाबतीती का व्हावं हे असं. ती गप्प आडवी पडून विचार करत राहिली.
अतिशय खोल, खूप खोलवरचं अनावर दुःख. तिनी मिठी घट्ट केली; जेम्स, थोडं तरी झोपायचा
प्रयत्न करूया.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...