भाषांतर - ३०

ती आगगाडी इंजिनाचा धूर सोडत आणि शिट्ट्या फुंकत ट्रान्सव्हालच्या माळरानातून धावते आहे. खाणींच्या पांढऱ्या सपाट टेकड्या आता मागे पडल्या. आता नजर ठरेल तिथपर्यंत हा प्रदेश नुसता उलगडतो आहे. ते सगळे एकत्र बसले आहेत. कुमालो, त्यांच्या मांडीवर तो लहान मुलगा आणि बाजूला ती मुलगी. तिची सगळी मालमत्ता एका मोठ्या कागदाच्या - दुकानांत मिळतात ना, तसल्या - पिशवीमध्ये भरलेली आहे. त्या लहान मुलाने एकदा त्याच्या आईची आठवण काढली. कुमालोंनी त्याला सांगितलं ती लांब गेल्येय आणि त्याने परत विचारलं नाही.
वोल्क्सरस्टला ते वाफेचं इंजिन सोडून ते पिंजऱ्यासारखं दिसणारं, डोईवरच्या तारांमधून गती मिळवणारं इंजिन घेतात पुढच्या प्रवासासाठी. मग ते कपारींवरून वळणं घेत, खाली उतरत नाताळच्या टेकडयांकडे येतात. कुमालो मुलीला सांगतात हे बघ, नाताळ आलं. ती एकदम खुश आणि उत्सुक आहे - हे सगळं कधी बघितलंच नाहीय तिनी.
काळोख पडतो, आणि ते रात्रीच्या अंधारातून, प्राचीन काळच्या समरभूमी मधून रोरावत जातात. अंधारात मुई नदी, रोझेटा, बल्गोवान सगळं अदृश्यपणेच निघून जातं. सूर्योदय व्हायला लागतो तसे ते पीटरमरीत्झबर्गजवळच्या सगळ्यात मोठ्या टेकडयांकडे येउन पोचतात. इथे ते दुसरी ट्रेन घेतात. ही ट्रेन सबंध उम्सिंडूसीच्या खोऱ्यातून जाणार आहे. काळ्या लोकांच्या झोपडपट्ट्या ओलांडून, एडेन्डेल आणि एलांद्स्कोप ओलांडून, उम्कोमासच्या खोऱ्यामध्ये. इथल्या जमिनीची रया पार गेलेली आहे, आता त्यात काही तग धरेल असं वाटत नाही. तिथले लोक कुमालोंना सांगतात आता काही पाऊस पडणार नाहीय, आता काही पेरणी करणं किंवा नांगरण शक्य नाही... ह्या गावांमध्ये भूकेमार होणार.
डॉनीब्रुकला ते आणखी एकदा आगगाडी बदलतात. ही लहानशी, खेळण्यातल्यासारखी आगगाडी ईस्टवॉल्ड्स आणि लुफाफाच्या हिरव्यागार टेकड्यांमधून इकोपोला जाईल. इकोपोला ते उतरतात आणि तिथे लोक म्हणतात 'बाप रे, किती दिवसांनी दिसताय तुम्ही!'.
इथे ते शेवटच्या आगगाडीत बसतात. ही टेकडीतून उतरणाऱ्या सुंदर रस्त्याच्या बाजू-बाजूनी जाते. इथे बरेच लोक त्यांना ओळखतात, आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची भिती आहे. लहान मुलासारखे बडबडत राहतात, हे लोक. त्यांना सगळ्या चौकशा करायला काहीच वाटत नाही... हा कोण आहे, ती कोण आहे, ते मुल कोणाचं, कुठून आलेत, कुठे निघालेत. ते विचारणार, तुमची बहीण कशी आहे, तुमचा मुलगा कसा आहे... म्हणून ते बायबल काढून त्यात डोकं खुपसुन बसतात. मग हे लोक गप्पा मारायला दुसरं कोणी तरी शोधतात.
इस्ट ग्रीकालँन्डच्या मागे, उम्झीम्कुलूच्या विस्तीर्ण खोऱ्यामध्ये सूर्य मावळतो आहे. त्यांची बायको, आणि सामानासाठी मदत करायला एक मित्र, आले आहेत. ते उतरून पटकन त्यांच्या बायकोला युरोपिअन पद्धतीप्रमाणे आलिंगन देतात. घरी येणं हा काय आनंद आहे!
ती नुसत्या नजरेनी तिच्या मनातला प्रश्न विचारते. आणि ते उत्तर देतात, आपल्या मुलाला फाशीची शिक्षा झाली आहे, कदाचित ते दया दाखवतील; पण आत्ता त्याची चर्चा नको.
-    ठीक आहे, समजलं. ती म्हणते.
-    आणि गर्ट्रूड! तिच्या येण्याची सगळी तयारी झाली होती. आम्ही एकाच घरात रहात होतो. पण मी तिला उठवायला गेलो, तर ती गायब. त्याबद्दलही आत्ता बोलणं नको.
ती नुसतीच मान झुकवते.
-    हा तिचा लहान मुलगा, आणि ही आपली नवीन मुलगी.
कुमालोंची बायको त्या लहान मुलाला उचलून घेते आणि युरोपिअन पद्धतीनुसार त्याचे गालगुच्चे घेते. ‘माझं शानं बाळ ते’! ती म्हणते. मग त्याला खाली ठेवून ती बाजूला कागदाची पिशवी हातात धरून गरीबपणे उभ्या असलेल्या मुलीकडे जाते. तिला मिठी मारते आणि म्हणते 'माझी छकुली बाय ती'. त्या मुलीला एकाएकी जोरात रडू फुटतं, म्हणून कुमालोंची बायको तिला म्हणते, उगी उगी, रडायचं नाही हं बाळ. पुढे म्हणते, हे बघ, आपलं घर साधंसुधं आहे हं, फार मोठ्या गोष्टी काही नाहीत आपल्याकडे. ती मुलगी तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याआडून म्हणते, आई, फक्त तेवढंच हवंय मला.
कुठेतरी फार खोलवर स्पर्शून गेलय हे दोघींना, खोल आणि सुखद. जरी आसवांतून व्यक्त झाली असली, तरी ह्या कातरवेळी ही भावना फार उबदार आहे.
कुमालोंनी त्यांच्या मित्राबरोबर हस्तांदोलन केलं, आणि ते सगळे मावळतीच्या दिशेनी जाणाऱ्या चिंचोळ्या वाटेने, डोत्शेनीकडे जायला निघाले. इथे रस्त्यात त्यांना बघून एक माणूस ओरडतो, अरेच्या, उम्फुन्डीस तुम्ही परत आलात? वा, किती बरं झालं तुम्ही आलात आता. मग एक बाई दुसरीला म्हणते, अग ते बघ, उम्फुन्डीस परत आले. युरोपिअन कपडे घातलेली एक बाई तर चक्क तिचा एप्रन डोक्यावरून घेते आणि लहान मुलासारखी रडत ओरडत झोपडीकडे धावते - उम्फुन्डीस आलेत बघा, उम्फुन्डीस आलेत. ती मुलांना दारापाशी आणते, आणि मुलंही तिच्या कपड्यांच्या आडून डोकावून बघतात हे कोण उम्फुन्डीस आले आहेत.
एक मुलगी धावत येते आणि त्यांची वाट अडवूनच उभी रहाते, त्यामुळे कुमालोंना थांबायलाच लागतं. ती म्हणते, एवढा आनंद झालाय आम्हाला, उम्फुन्डीस परत आलेत ह्याचा.
-    पण दुसरे उम्फुन्डीस होते ना इथे, बिशपनी त्यांच्या बदली पाठवलेल्या एका तरुणाला उद्देशून ते म्हणतात.
-    आम्हाला त्याचं काही समजायचं नाही, आम्हाला आमचेच उम्फुन्डीस आवडतात. ते परत आले हे एवढं बरं झालंय.
हिरव्यागार टेकड्या आणि दवांनी भिजलेले गवत सोडून आता रस्ता उतरणीला लागला आहे. दगडा-धोंड्यांच्या मधून ही वाट घसरत खाली उतरते, त्यामुळे पाऊल जपून टाकायला हवं. गरोदर बाईनी तर फारच जपून चालायला हवं, म्हणून कुमालोंची बायको त्या मुलीच्या पुढे चालते आणि तिला सांगते, हा बघ हं दगड आहे पुढे, अडखळू नको. रात्र पडायला लागली आहे आणि इस्ट ग्रीकालँन्डचे डोंगर आकाशात आता नुसते गडद निळे किंवा काळेच दिसताहेत
आता रस्ता उतरून डोत्शेनीच्या लाल मातीमध्ये येतो आहे. निर्जीव, वाया गेलेली जमीन, म्हाताऱ्या-कोताऱ्यांची, लहान मुलांची. पण शेवटी ही आपली माती आहे. धान्य जेमतेम पुरुषभर उंचीला पोचत असेल इथे. पण शेवटी ही आपली माती आहे.
-    फार कोरड आहे इथे, उम्फुन्डीस. पावसाच्या नावानी कंठशोष करतो आहोत आम्ही.
-    ऐकलय मी.
-    आमच्याकडचं अन्न-धान्य जवळ जवळ संपलंय. ईश्वरालाच ठाऊक काय पोटात भरणार आहोत आम्ही.
आता रस्ता थोडा सपाट होतो आहे. चर्चच्या बाजूनी वाहणाऱ्या झऱ्याजवळून जातो आहे. कुमालो त्याचा आवाज ऐकायला थांबतात; पण तिथे काहीच आवाज नाहीय.
-    दोस्त, इथे झऱ्याचा आवाज येत नाही.
-    उम्फुन्डीस, तो आटल्याला महिना होऊन गेला आता.
-    मग पाणी कुठे मिळतं तुम्हाला?
-    उम्फुन्डीस, आमच्या बायकांना जार्विस साहेबाच्या इथून नदी येते ना, तिथवर जावं लागतं पाण्यासाठी.
जार्विस नांव ऐकल्याबरोबर, कुमालोंच्या मनात पुन्हा भिती आणि दुःख उचंबळून येतं. पण ते प्रयत्नपूर्वक विचारतात, कसे आहेत जार्विस साहेब?
-    काल परत आले ते, उम्फुन्डीस. ते कसे आहेत मला माहिती नाही; पण बाईसाहेब काही आठवड्यापूर्वी परतल्या. असं म्हणतात, त्या फार थकलेल्या आणि बारीक झाल्येत. मी आज-काल तिथेच काम करतो ना.
कुमालो गप्प आहेत, काही बोलूच शकत नाहीत. पण त्यांचा मित्र म्हणतो, इथे सगळ्यांना माहिती आहे.
-    ओह, माहीत आहे?
-    हो, सगळ्यांना माहिती आहे.
पुढे ते दोघं काहीच बोलत नाहीत. आता रस्ता सपाट आहे, झोपड्यांना आणि भुऱ्या-करड्या ओसाड शेतांना मागे टाकत जातो आहे. संध्याकाळच्या धुसर प्रकाशात, एखादा मनुष्य लांबवर असलेल्या दुसऱ्या एखाद्याला आवाज देतांना ऐकू येतो. तुम्ही झुलू असाल, तर तुम्हाला कळेल ते काय म्हणताहेत. तुम्ही झुलू नसाल, तर मग मात्र भाषा येत असली तरीही, ते काय म्हणताहेत समजणं कठीण आहे. गोरे लोक ह्याला जादूटोणा म्हणतात. पण ही जादू नाही, नुसती ह्या लोकांनी लक्षपूर्वक साधलेली आणि परिपूर्ण केलेली एक कला आहे. ह्या त्यांच्या लाडक्या आफ्रिका देशातली.
-    उम्फुन्डीस, तुम्ही परतलाय ह्याच्या हाळ्या देताहेत ते.
-    हो. ऐकलं मी.
-    खुश झालेत ते.
खरंच खुश झालेत ते. रस्त्याकडेच्या झोपड्यांमधून ते धावत येताहेत. टेकड्यांवरच्या अंधारातून ते धावत येताहेत. मुलं ओरडताहेत, एक विचित्र कापणाऱ्या आवाजात. इथे ते सगळ्यांना समजतं.
-    उम्फुन्डीस, तुम्ही परत आलात.
-    उम्फुन्डीस, एवढे आभारी आहोत आम्ही तुमचे.
-    उम्फुन्डीस, बरेचच दिवस लांब राहिलात तुम्ही.
एक मुलगी धावत त्यांच्याकडे येते आणि म्हणते, शाळेत नवीन मास्तर आलाय माहित्ये? दुसरी मुलगी तिला म्हणते, वेडाबाई, त्याला येउन आता कितीतरी दिवस झाले! एक मुलगा 'उम्फुन्डीस' म्हणून जोरात हाक मारतो आणि त्याला शाळेत शिकवलंय तसा सलाम ठोकतो. कोणाच्याही प्रतिक्रियेची वाट बघत, तो वळतो आणि तोंडाने तो विचित्र थरथरणारा आवाज काढतो; कोणाला उद्देशून नव्हे, असाच हवेतच. मग थोडा मागे जातो आणि नाचाची पहिली पावलं टाकतो, कोणासाठी नव्हे, स्वतःसाठीच.
चर्चच्या बाहेर एक दिवा आहे. प्रार्थना असेल तेव्हा तो लावला जातो. चर्चच्या बायका त्या दिव्याखाली तांबड्याशार मातीवर बसल्या आहेत. शुभ्र कपडे घालून, गळ्याभोवती एक हिरव्या रंगाची ओढणी घेऊन. हा लोकांचा जथा जवळ आल्यावर त्या उठून उभ्या राहतात. त्यातली एक प्रार्थनागीत गायला सुरुवात करते. तिचा आवाज फार वर चढू शकत नाही, पण वरच्या पट्टीत फाटायला आल्यावर इतर बायका तिला मदत करतात आणि सूर उचलून धरतात; काही पुरुष सुद्धा त्यांचे खर्ज स्वर त्यात मिसळतात. कुमालो त्यांची हॅट काढून हातात घेतात. ते, त्यांची बायको आणि त्यांचा मित्रही प्रार्थनेत भाग घेतात. ती मुलगी नुसतीच कुतूहलाने बघत उभी रहाते. ही प्रार्थना देवाला स्मरून, त्याचे आभार मानण्याबद्दल आहे, देवासमोर नतमस्तक होऊन त्याच्या अपरंपार करुणेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. ती आजूबाजूच्या उजाड लाल टेकड्यांमध्ये, आणि भुऱ्या-करड्या शेतांमध्ये घुमते. हे साधेसुधे गरीब लोक, अगदी जीव ओतून, मोठ्या प्रेमाने, विनम्रपणे आणि कृतज्ञतेने ती गातात.
आता कुमालोंची पाळी, प्रार्थना करण्याची. ते म्हणतात,
-    हे परमेश्वरा, तुझ्या अथांग करुणेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. माझ्या सुखरूप परतण्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आमच्या सगळ्या मित्रांच्या आणि कुटुंबांच्या प्रेमासाठी आम्ही तुझे आभारी आहोत. तुध्या सर्वव्यापी दयेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत.

परमेश्वरा, आम्हाला पाऊस दे, आम्ही तुझी विनवणी करतो...
इथे सगळे जमलेले लोक त्यांना दुजोरा देतात; एवढे की त्यांचं होईपर्यंत कुमालोंना थांबावं लागतं.
-    परमेश्वरा, आम्हाला पाऊस दे. आम्हाला पेरणी आणि नांगरणी करण्याएवढा पाऊस दे, तुझी विनवणी करतो. आणि पाऊस पडला नाही, तर भूकेमारी पासून आमचं रक्षण कर, आम्ही तुला साकडं घालतो.
इथे पुन्हा सगळेजण दुजोरा देतात, आणि कुमालो त्यांच्यासाठी थांबतात. ह्या सगळ्यांनी ज्या प्रेमाने त्यांचं स्वागत केलं, त्याने त्यांचं हृदय उचंबळून येतं, आणि मनात खूप खोलवर दडलेल्या त्या भावनेनी ते प्रार्थना करतात.
-    परमेश्वरा, ह्या छोट्याशा मुलाचं डोत्शेनीमध्ये स्वागत कर. त्याला इथल्या मातीत मोठा होऊ दे. त्याच्या आईला...
इथे त्यांचा आवाज अडखळतो, जणू तोंडातून शब्द बाहेर पडणार नाहीत. पण ते सगळी नम्रता एकवटतात, आणि खोल आवाजात म्हणतात
-    त्याच्या आईला, तिच्या अपराधांची क्षमा कर.
एका बाईच्या कण्हण्याचा आवाज येतो. कुमालो आवाज ओळखतात, सदोदित चहाड्या करणारी  ही बाई! म्हणून ते पटकन पुढे म्हणतात,
-    आम्हाला सर्वांनाच क्षमा कर, आमच्या अपराधांची. परमेश्वरा, ह्या मुलीचं डोत्शेनीमध्ये स्वागत कर. तिचं बाळंतपण आणि मुल सुखरूप होऊ दे.
ते क्षणभर थांबतात, मग हलकेच म्हणतात
-    ती जे शोधते आहे ते तिला मिळू दे, तिच्या इच्छा पूर्ण होऊ दे.
आणि आता हा सर्वात कठीण भाग; पण ते पुन्हा लीनतेची पराकाष्ठा करून म्हणतात,
-    परमेश्वरा, माझा मुलगा
आता कोणी कण्हत नाही, आता ते सगळे शांत आहेत; ती चहाडखोर भवानी सुद्धा आता गप्प आहे. त्यांचा आवाज कुजबुजल्यासारखा खाली पोचतो
-    माझ्या मुलाला त्याच्या अपराधांची क्षमा कर.
झालं, संपलं, ज्याची सर्वात जास्त भीती होती ते आता बाहेर उघड्यावर आलंय. त्यांना कळतंय, हे त्यांना शक्य नव्हतं, पण ह्या लोकांनी घडवून आणलं. नतमस्तक व्हा, ते म्हणतात. आणि लोक त्या तांबड्या मातीवर गुडघे टेकून खाली वाकतात. कुमालोंचा हात वर उचलतो, आणि आवाजही वर चढतो. ह्या मोडून पडलेल्या म्हाताऱ्या जीवात एक शक्ती येते, प्रिस्ट आहेत ना ते काही झालं तरी.
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो आणि सुखात ठेवो. त्याच्या मायेचा कृपाप्रसाद तुमच्यावर असाच अखंड वर्षावत राहो. आपल्या तारणहार येशु ख्रिस्ताची कृपा, देवाची माया आणि जगन्नियंत्याची साथ अखंड तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या सोबत राहो. तथास्तु.
ते सगळे उठतात. नवीन मास्तर म्हणतो आपण आपलं राष्ट्रगीत 'परमेश्वरा, आफ्रिकेचं रक्षण कर' म्हणू या का? जुनी मास्तरीण म्हणते, इथे सगळ्यांना ते माहिती नाही, अजून इथे पोचलं नाहीय ते. नवीन मास्तर म्हणतो, पीटरमरीत्झबर्गमध्ये आम्ही म्हणायचो, तिथे सगळ्यांना येतं ते. जुनी मास्तरीण म्हणते, हे पीटरमरीत्झबर्ग नाहीय, आपल्याला शाळेत अजून बरंच काम करायचं आहे. तिला मुळात हा नवीन मास्तर फार आवडत नाही, आणि तिला थोडी लाजही वाटते आहे, तिला ह्या राष्ट्रगीताचे शब्द नीट ठाऊक नाहीत.
* * *
होय, परमेश्वर आफ्रिकेचं - आपल्या ह्या लाडक्या मातृभूमीचं - रक्षण करो. आपल्या पापांच्या नरकापासून आपलं रक्षण करो. न्यायाची जी भिती वाटते, तिच्यापासून रक्षण करो. लोकांची जी भिती वाटते तिच्यापासून रक्षण करो. देवच आपल्या सगळ्यांचं रक्षण करो.
अरे लहानग्या, पुन्हा दे ती टेकड्यांमध्ये गुंजणारी, थरथरत्या आवाजातली हाळी. अरे लहानग्या, परत टाक ती स्वानंदी, स्वच्छंद नाचाची सुरुवातीची हलकी पावलं. ओरड, गा, नाच निरागसपणे; गा, नाच -  चालतंय तोपर्यंत. कारण ही नुसती नांदी आहे, ही नुसती सुरुवात आहे. विचित्र गोष्टींच्या गुंत्यात तू अडकशील, अडकवला जाशील. अनोळखी माणसांकडून. अनोळखी ठिकाणी. मोठा व्हायला लागलास की. ज्याची तुला आत्ता कल्पनाही नाहीय, आणि म्हणून काळजीही नाहीय. गा आणि नाच, गा आणि नाच. जोपर्यंत करू शकतो आहेस, तोपर्यंत तरी.
* * *
आता सगळे लोक गेले आहेत. कुमालो त्यांच्या मित्राकडे वळतात. काही गोष्टी मला तुला सांगायला हव्या. इतर काही मी नंतर कधीतरी सांगेन, पण ह्या आत्ताच सांगायला हव्या. माझी बहीण, गर्ट्रूड, आमच्या बरोबर येणार होती. आम्ही सगळे एकत्र, एका घरात तयार होतो. पण मी तिला सकाळी उठवायला गेलो, तर ती गेलेली होती.
-    ओह, उम्फुन्डीस!
-    आणि माझा मुलगा. त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे. त्याला कदाचित माफी मिळू शकेल. नक्की समजलं, की ते मला कळवणार आहेत.
-    ओह, उम्फुन्डीस!
-    तुझ्या मित्रांना सांग तू; ते त्यांच्या मित्रांना सांगतील. ही काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून तू सांगितलीस तरी हरकत नाही.
-    मी सांगेन, उम्फुन्डीस.
-    मी इथे राहावं का नाही मला माहिती नाही.
-    का, उम्फुन्डीस?
-    म्हणजे! मुलाला सोडून गेलेल्या बहिणीचा भाऊ, एका माणसाचा खून केलेल्या मुलाचा बाप. काय हक्क आहे मला इथे रहायचा?
-    उम्फुन्डीस, जशी तुमची इच्छा! पण मी तुम्हाला सांगतो, इथे एकाही माणसाची अशी इच्छा नाही. एकही माणूस असा नाही, जो तुमच्या दुःखात सहभागी नाही; ज्याला तुमच्या येण्यानी आनंद झाला नाही. तुम्हाला दिसलं नाही का ते? तुम्हाला जाणवलं नाही का ते?
-    मला ते दिसलंय, आणि जाणवलय. माझ्या एवढ्या मोठ्या दुःखामध्ये तो एकच तर दिलासा आहे. दोस्त, माझी जायची इच्छा नाहीय. हे घर माझं आहे, एवढी वर्ष मी इथे राहिलो आहे; ते सोडून जायची माझी इच्छा नाहीय.
-    वा, छानच तर उम्फुन्डीस. माझ्यापुरतं बोलायचं तर तुम्हाला सोडून जगायची माझी इच्छा नाही. मला तुम्ही अंधारातून...
-    अगदी काळजाला हात घालतो आहेस, दोस्त.
-    उम्फुन्डीस, तुम्हाला सिबेकोच्या मुलीचा काही शोध लागला का? आठवतं, आपण बोललो होतो?
-    हो हो, आठवतं. तीही गेली. कुठे गेली, कोणालाच ठाऊक नाही. त्यांना माहिती नाही, ते म्हणाले.
अचानक एका कडवटपणाने त्यांचा कबजा घेतला, आणि ते पुढे म्हणाले, कोणाला किंमतही नाहीय, ती कुठे गेली.
-    ओह, उम्फुन्डीस!
-    सॉरी, माफ कर मला.
-    जगात फार ताप आहेत, नाही उम्फुन्डीस!
-    हे तू मला सांगतोस, वेड्या!
-    आणि तरीही तुमचा देवावर विश्वास आहे?
कुमालोंनी त्याच्याकडे त्या दिव्याच्या अंधुक प्रकाशात बघितलं. माझा आहे विश्वास, ते म्हणाले. पण मला कळलंय, हे एक गूढ आहे - दुःख आणि वेदना. तसंच, प्रेम आणि माया - एक गूढ आहे हे. मला समजलंय, प्रेम आणि माया, दुःख आणि वेदनेवर मात करू शकतं. माझी बायको काय, तू, माझा मित्र काय, हे सगळे माझ्या येण्याने खुश झालेले लोक काय, तो लहानसा मुलगा, इथे डोत्शेनीमध्ये राहायला एवढा उत्सुक असलेला मुलगा काय! तर हो, माझ्या दुःखात सुद्धा माझा देवावरचा विश्वास अचल रहातो.
-    उम्फुन्डीस, मला वाटतं की एक सच्चा ख्रिश्चन दुःख आणि वेदनांपासून कधीच मुक्त होऊ शकत नाही. आपल्या देवाने सुद्धा दुःखं सोसली. माझी तर अशी श्रद्धा आहे, की त्याने दुःखं सोसली ती आपल्याला दुःखमुक्त करण्यासाठी नव्हे, तर दुःखं कशी धीरानी सहन करायची ह्याचा पाठ म्हणून. कारण त्याला माहिती होतं, दुःखाशिवाय आयुष्यच नाही.
कुमालोंनी त्याच्याकडे अतीव आनंदानी बघितलं, तू तर गुरु आहेस!
त्यांच्या मित्राने त्याचे खरबरीत, घट्टे पडलेले हात त्यांच्यापुढे धरले. दिसतो तुम्हाला मी गुरुसारखा? तो म्हणाला.
कुमालो हसले; म्हणाले, मी तुझ्या मनात बघतो आहे, तुझ्या हातांकडे नाही. तुझ्या मदतीबद्दल खरच अनेक आभार.
-    तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणाल ते; उम्फुन्डीस. जपून रहा.
-    जपून जा दोस्त. कसा जाणार आहेस?
त्या माणसाने सुस्कारा सोडला. मला सिबेकोच्या घरावरूनच जायला हवं. मी कबुल केलय त्याला, मला कळताक्षणी त्याला सांगेन म्हणून.
कुमालो खेदाने त्यांच्या घराकडे चालू लागले. मग अचानक ते मागे वळले, आणि मित्राला हाक मारली.
-    मला तुला सांगायलाच हवं, स्मिथसाहेबांची मुलगी म्हणाली, तिला माहिती नाही आणि तिला पर्वा नाही. हे ती इंग्लिशमध्ये बोलली. पण जार्विससाहेबांनी जेव्हा मला ते झुलुमध्ये सांगितलं, तेव्हा ते म्हणाले तिला माहिती नाही. तिला पर्वा नाही हा भाग त्यांनी स्वतःकडेच ठेवला, मला सांगितला नाही.
-    आलं लक्षात, उम्फुन्डीस.
-    जपून जा, दोस्त.
-    जपून रहा, उम्फुन्डीस.
कुमालो पुन्हा वळले आणि घरात शिरले. त्यांची बायको आणि ती मुलगी जेवत होते.
-    मुलगा कुठे गेला? त्यांनी विचारलं.
-    स्टीफन, तो झोपला आहे. तुम्ही बराच वेळ बोलत होतात.
-    हो, बऱ्याच गोष्टी होत्या बोलायला.
-    दिवा घालवलात?
-    असू दे तसाच थोडा वेळ.
-    चर्चकडे एवढे पैसे आहेत वाटतं?
ते हसले; म्हणाले आजची रात्र खास आहे.
तिच्या भुवया दुःखानी आकुंचल्या. त्यांच्या लक्षात आलं, तिच्या डोक्यात काय चाललंय.
-    घालवतो मी, ते म्हणाले.
-    राहू दे थोडा वेळ. तुमचं जेवण झालं की मग घालवा.
-    तेही ठीक आहे, ते म्हणाले. इथे जे अनुभवलं, त्याच्या आनंदात उजळत राहू दे. बाहेर असतांना जे सगळ घडलं, त्याच्या आठवणींनी तो विझून अंधार झाला तर बरं.
त्यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवला. झालं जेवण, बाळ?
तिनी प्रसन्नपणे त्यांच्याकडे बघितलं, माझ पोट भरलं.
-    मग आता झोप, बाळ.
-    हो, बाबा. ती खुर्चीवरून उठली. गुड नाईट, बाबा. गुड नाईट, आई.
-    मी तुला तुझी खोली दाखवते.
ती परत आली तेव्हा कुमालो पोस्ट ऑफिस बुकाकडे बघत बसले होते. त्यांनी ते तिला दिलं आणि म्हणाले आपण आयुष्यात बघितले नव्हते एवढे पैसे आहेत ह्याच्यात.
तिने ते उघडलं, आणि आत किती पैसे आहेत बघितल्यावर किंचाळीच फोडली.
-    हे सगळे आपले आहेत? तिने विचारलं.
-    हे सगळे आपले आहेत, ते म्हणाले. बक्षीस! माझ्या आयुष्यात मी बघितलेल्या सर्वात मोठ्या सज्जन माणसाकडून.
-    तुम्ही नवीन कपडे घ्या, ती म्हणाली. नवे काळे कपडे, नवीन कॉलरी, नवीन हॅट.
-    तूही नवे कपडे घ्यायचे, ते म्हणाले, आणि एक स्टोव्ह. बस खाली, मी तुला सिमांगु बद्दल सांगतो, आणि इतर सगळ्याबद्दल.

ती थरथरत खाली बसली. मी ऐकते आहे, जीवाचा कान करून. ती म्हणाली.

Comments