भाषांतर - ३३

त्या काठ्या जशा ठेवल्या होत्या तशा कित्येक दिवस उभ्या होत्या, पण गावात कोणी परत आलं नाही. इथे एक धरण बांधलं जाणार आहे अशी एक अफवा होती, पण त्यात भरायला पाणी कुठून आणणार कोणालाच माहिती नव्हतं. चर्चच्या बाजूनी वाहणारा एक झरा मुळात छोटासाच होता, आणि बऱ्याच वेळा त्याला पाणी नसे. कुमालोंच्या मित्राने त्यांना सांगितलं होतं की जार्विस कामानिमित्त प्रिटोरियाला गेले आहेत. हे काम नक्कीच काठ्यांच्या संदर्भात असणार, म्हणजे धरणाच्या संदर्भात.
तर दिवस असे चालले होते. कुमालो रोज डोत्शेनीच्या सौख्यासाठी प्रार्थना करत होते. सूर्य नेमाने रोज उगवत आणि मावळत होता.
कुलुसेचं बाळ बरं झालं होतं. कुमालो त्यांचा दिनक्रम व्यवस्थित पाळत होते. शाळा नेहमीप्रमाणे चालली होती. मुलं नक्कीच बिया-बियाणं, झाडं-रोपं, कुरणासाठी कसं गवत पाहिजे, मातीला काय पोषण मिळायला पाहिजे आणि गुरांना कसला चारा मिळायला पाहिजे हे सगळं शिकत असणार. जार्विस साहेबांच्या परतून येण्याची ते आतुरतेनी वाट बघत होते, म्हणजे लोकांना एकदा कळेल भविष्यासाठी काय योजना आखल्या जाताहेत. त्यांना जास्तजास्त जाणवायला लागलं, की डोत्शेनीचं काही भलं व्हायचं, तर हा चमत्कार एकटे जार्विस साहेबच करू शकतील.
ती मुलगी तिच्या नवीन घरात सुखी होती. ती मुळात होती प्रेमळ, पण बरीच परावलंबी होती. तो छोटा मुलगा शेजारच्या छोट्या मुलांबरोबर खेळत असे. एखाद-दोनदा त्याने आईची आठवण काढली, पण तो तिला लौकरच विसरून जाणार होता. अब्सलमची कोणीच चौकशी करत नसे. आता जर ते त्यांच्या झोपड्यांमध्ये त्याच्यासंबंधी बोलत असले, तर निदान उम्फुन्डीसबद्दलच्या कौतुकात त्याने काहीच बदल घडला नव्हता.
एक दिवस तो लहान गोरा मुलगा घोड्यावर बसून आला. कुमालो त्याच्या स्वागताला जेव्हा बाहेर गेले, तेव्हा त्याने पूर्वीसारखीच टोपी उंचावली. कुमालोंना त्यांचा हा छोटा पाहुणा बघून आनंदानी खूप भरून आलं.
-    मी पुन्हा झुलू बोलायला आलोय, छोट्या म्हणाला. तो घोड्यावरून घसरत खाली उतरला. त्याचा लगाम त्याने खांबाला बांधला. मोठ्या माणसासारखा रुबाबात चालत तो घराकडे आला. पायपुसण्यावर बुटांची धूळ झटकली, आणि टोपी काढून घरात शिरला. टेबलापाशी बसला. त्याच्यात एक आंतरिक उत्साहच एवढा उचंबळत असे, की भोवतालच्या लोकांनाही एकदम लख्ख उन्ह पडल्यासारखा आनंद व्हावा.
-    गणितं संपली का उन्फुन्डीस?
-    हो संपली, छोटे साहेब.
-    बरोबर आली का?
कुमालो न राहवून हसले.
-    हो, बरोबर आली, ते म्हणाले. पण आवडली नाहीत मला.
-    आवडली नाहीत ना? मग, झुलू बोलायला तयार आहात का?
कुमालो पुन्हा हसले, आणि टेबलाच्या दुसऱ्या बाजूच्या त्यांच्या खुर्चीत बसले. हो तर, आहे ना मी तयार झुलूसाठी. आजोबा कधी येणारेत तुझे?
-    माहीत नाही मला. लौकर यायला हवेत ते. मला खूप आवडतात ते.
खरं तर कुमालोंना हसू आलं होतं, पण त्यांनी विचार केला ह्यावर हसणं बरं नाही दिसणार. पण छोट्या स्वतःच हसला, म्हणून मग कुमालो पण हसले. ह्या पोराबरोबर हसणं एवढं सहजसोपं होतं, आतूनच प्रफुल्लित होतं हे पोरगं.
-    छोटे साहेब, तुम्ही जोहानसबर्गला परत कधी जाणार?
-    माझे आजोबा आले की मग.
कुमालो त्याला झुलुमध्ये म्हणाले, तुम्ही जाल तेव्हा डोत्शेनीमधून एक झळाळी निघून जाईल.
-    उम्फुन्डीस, काय म्हणालात तुम्ही?
पण कुमालो जेव्हा भाषांतर करून सांगायला गेले, तेव्हा छोट्या एकदम ओरडला, नाही, नाही. सांगू नका मला. पुन्हा झुलूमध्येच बोला. म्हणून कुमालो परत एकदा तेच वाक्य म्हणाले.
-    म्हणजे, तुम्ही जाल तेव्हा, छोट्या म्हणाला. आणि उरलेलं परत म्हणा.
-    डोत्शेनीमधून एक झळाळी निघून जाईल, कुमालो झुलूमध्ये म्हणाले.
-    डोत्शेनीबद्दल काहीतरी... पण मला फार कठीण आहे. इंग्लिशमध्ये सांगा, उम्फुन्डीस.
कुमालो तेच वाक्य इंग्लिशमध्ये म्हणाले.
-    हुं, मी जाईन तेव्हा डोत्शेनीमधून एक झळाळी निघून जाईल.
छोट्या आनंदानी खदखदुन हसला. समजलं मला, तो झुलूमध्ये म्हणाला.
कुमालोंनी आश्चर्यानी टाळ्या वाजवल्या, आणि म्हणाले, वा, वा, तुम्हाला झुलू बोलता यायला लागलं. मग मुलगा आणखीच खुश होऊन जोरजोरात हसायला लागला. कुमालो टाळ्या पिटून आणखी कौतुक करायला लागले. दार उघडून त्यांची बायको आत आली. ते छोट्याला म्हणाले, ही माझी बायको. तिला झुलुमध्ये ते म्हणाले, हा त्या माणसाचा मुलगा. छोट्या उठून उभा राहिला, आणि कुमालोंच्या बायको पुढे झुकला. ती त्याच्याकडे भितीनी आणि दुःखानी बघत राहिली. पण तो मात्र तिला म्हणाला, तुमचं घर छान आहे. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, मला खूप भरून आलंय. समजतंच नाही काय बोलू ते. छोट्या झुलूमध्ये म्हणाला, मला कळतं. तिने धसकून एक पाऊल मागे घेतलं. कुमालो पटकन तिला म्हणाले, त्याला खरं म्हणजे नाही ग समजत, एवढेच शब्द त्याला माहिती आहेत. छोट्याला टाळ्या वाजवत ते म्हणाले, वा, वा; छान झुलू बोलता येतं तुम्हाला. पण त्यांची बायको मात्र दार बंद करून निघून गेली.
-    मग, बोलायचं का झुलूमध्ये, उम्फुन्डीस?
-    हो, मी तयार आहे.
-    झाडाला उमुटी म्हणायचं ना?
-    बरोबर, छोटे साहेब.
-    पण औषधाला सुद्धा उमुटीच म्हणायचं? छोट्या अगदी थाटात, कशी वेड्यासारखी भाषा आहे अशा खोट्याखोट्या आश्चर्याने म्हणाला. मग दोघं पुन्हा हसले.
-    असं बघा छोटे साहेब, कुमालो गंभीरपणे म्हणाले, आमची बरीचशी औषधं झाडा-पानांपासूनच बनतात. म्हणून त्यांना एकच शब्द आहे.
-    ओ, असं होय! छोट्या ह्या उत्तराने खुश झाला. आणि बॉक्सला इबोकीसी म्हणतात.
-    बरोबर, छोटे साहेब. बघा, आमच्याकडे बॉक्स नव्हती, म्हणून आम्ही तुमचाच शब्द वापरतो.
-    हुं, हुं, आणि मोटरसायकलला म्हणायचं इसिटूटूटू.
-    बरोबर. मोटरसायकल तसा आवाज करत जाते ना इसि-टू-टू-टू. पण छोटे साहेब आता आपण एक वाक्य तयार करूया. तुम्ही तुम्हाला माहिती असलेले सगळे शब्द मला सांगितले, तर नवीन काहीच शिकणार नाही ना? मला सांगा, 'मला घोडा दिसला' कसं म्हणाल?
अशा तऱ्हेनी शिकवणी सुरु झाली. थोड्या वेळानी कुमालो त्यांच्या विद्यार्थ्याला म्हणाले, आता बारा वाजत आले, तुम्हाला घरी जायला हवं असेल ना?
-    हो, मला जायला हवं. पण मी पुन्हा येईन झुलू शिकायला.
-    अवश्य या. लवकरच तुम्ही झुलू लोकांपेक्षा चांगलं झुलू बोलायला लागाल. अंधारात तर लोकांना कळणार सुद्धा नाही तुम्ही झुलू नाही आहात.
छोट्या खुश झाला, आणि बाहेर गेल्यावर त्यांना म्हणाला, मला घोड्यावर बसायला मदत करा ना, उम्फुन्डीस. त्यांनी त्याला वर चढवलं. त्याने टोपी उंचावून त्यांना अभिवादन केलं, आणि टेकडीच्या दिशेनी दौडायला लागला. पुढे एक गाडी टेकडीकडे जात होती. ती पाहून तो ओरडला, आजोबा परत आले. आणि त्यासरशी त्याने घोड्याला टाच मारली, भरधाव वेगाने त्या गाडीला गाठायला.
चर्चच्या बाहेर पंचवीसएक वर्षाचा, प्रसन्न चेहऱ्याचा तरुण उभा होता. त्याची बॅग जमिनीवरच होती. कुमालोंना बघून त्याने हॅट काढून हातात घेतली आणि तो इंग्लिशमध्ये म्हणाला, उम्फुन्डीस तुम्हीच का?
-    हो, मीच.
-    मी नवीन शेतकी शिक्षक आहे, ही माझी कागदपत्र.
-    कुमालो उत्साहाने म्हणाले, या या. घरात या.
ते घरात गेले. तरुणाने त्याचे कागद उलगडून कुमालोंना दाखवले. ते कागद म्हणजे इतर पाद्री लोकांनी, शाळामास्तरांनी आणि तत्सम लोकांनी ह्या तरुणाची, नेपोलिअन लेत्सित्सीची, ओळख आणि शिफारस करून देण्यासाठी लिहीलेली पत्रं होती. तो ट्रान्स्कीमधल्या शाळेतून शेतकीशिक्षणाची पदवी घेऊन आला होता.
-    वा, वा, छान. कुमालो म्हणाले. पण मला सांगा, तुम्ही कशासाठी इथे आला आहात? माझ्याकडे कोणी पाठवलं तुम्हाला?
-    त्या, आत्ता गेले त्या गोऱ्या गृहस्थांनी.
-    त्यांचं नांव जार्विस होतं का?
-    उम्फुन्डीस, नांव नाही माहिती मला. पण आत्ताच गेले ना ते गोरे गृहस्थ.
-    मग जार्विसच ते. बर, सांगा आता मला सविस्तर.
-    उम्फुन्डीस, मी इथे शेती शिकवायला आलो आहे.
-    आम्हाला? डोत्शेनीमध्ये?
-    होय, उम्फुन्डीस.
कुमालोंचा चेहरा उजळला, डोळे लकाकले. देवदूतच आहेस रे बाबा तू! ते म्हणाले. उठून उभे राहिले आणि खोलीभर येरझारा घालायला लागले, मुठ तळव्यावर आपटत. तरुण थक्क होऊन बघत होता. कुमालो त्याच्याकडे बघून हसले, आणि पुन्हा म्हणाले, देवदूतच आहेस रे बाबा तू. मग खाली बसले, आणि त्याला म्हणाले, कुठे भेटलास ह्या गोऱ्या माणसाला तू?
-    ते माझ्या घरी, क्रुगर्सडॉर्पला आले होते. तिथे मी एका शाळेत शिकवत होतो. त्यांनी मला ह्या डोत्शेनीबद्दल सांगितलं, विचारलं मला मोठं समाजकार्य करायची इच्छा आहे का? ऐकून मला वाटलं, इथे यायला हवं.
-    काय शिकवत होतास तू?
-    मी काही खरा शिक्षक नाही, त्यामुळे मला फार पैसे मिळत नव्हते. हे गोरे गृहस्थ म्हणाले, ते इथे मला महिन्याला दहा पौंड देतील; म्हणून मी आलो. म्हणजे, नुसता पैशासाठी नव्हे; त्या शाळेत फार काम नव्हतंच.
कुमालोंना क्षणभर असूया वाटली, त्यांना त्यांच्या साठ वर्षाच्या आयुष्यात कधीच दहा पौंड मिळाले नव्हते महिन्याला. पण ते त्यांनी बाजूला ढकललं.
-    त्यांनी मला विचारलं, मला झुलू बोलता येतं का. मी सागितलं, नाही, पण मला कोसा माझ्या मातृभाषेएवढीच चांगली बोलता येते. माझी आई कोसाच होती. ते म्हणाले, ठीक आहे कारण कोसा आणि झुलू साधारण सारख्याच आहेत.
त्यांची बायको पुन्हा दारात आली, आणि म्हणाली जेवायची वेळ झाली आहे. कुमालो झुलूमध्ये म्हणाले, अग, हे मि. लेत्सित्सी. इथे आपल्या लोकांना शेती कशी करायची शिकवायला आले आहेत. मग ते लेत्सिसीला म्हणाले, आमच्याबरोबरच जेवा तुम्ही.
ते जेवायला गेले. कुमालोंनी त्या मुलीची आणि मुलाची लेत्सिसिंशी ओळख करून दिली. कुमालोंनी जेवणापूर्वी प्रार्थना म्हटली आणि तरुणाला विचारलं, तुम्ही पीटरमरीत्झबर्ग मध्ये कधी आलात?
-    आज सकाळी, उम्फुन्डीस. तिथून आम्ही ह्या मोटरगाडीनी इथे आलो.
-    कसा काय वाटला हा गोरा गृहस्थ?
-    गप्प-गप्प आहेत. फार बोलत नाहीत ते, उम्फुन्डीस.
-    स्वभावच आहे तो त्यांचा.
-    आम्ही रस्त्यात थांबलो होतो. एका खोऱ्याकडे बघत ते म्हणाले, काय करशील तू अशा खोऱ्यासाठी? हे त्यांचे प्रवासामधले पहिले शब्द.
-    तू उत्तर दिलंस?
-    हो, मी सांगितलं त्यांना, उम्फुन्डीस.
-    मग काय म्हणाले ते?
-    काही नाही. घशातल्या घशात एक आवाज केला.
-    मग?
-    इथे येईपर्यंत आम्ही काहीही बोललो नाही. इथे ते म्हणाले, उम्फुन्डीसना भेट. त्यांना सांग, तुझ्यासाठी रहायची जागा शोधायला. म्हणावं, मी काही थांबू शकत नाही, मला घरी पोचायची घाई आहे.
कुमालोंनी आणि त्यांच्या बायकोनी परस्परांकडे बघितलं.
-    आमच्या खोल्या लहान आहेत. हे एका पाद्र्याचं घर आहे शेवटी. पण तुला चालणार असेल तर इथे राहू शकशील तू.
-    माझ्या घरचे लोकही चर्चमधलेच आहेत. मला आवडेल इथे रहायला.
-    आणि ह्या खोऱ्यात तू काय बदल करशील?
-    तो तरुण शिक्षक हसला. म्हणाला, मला आधी बघू दे तर खरं.
-    पण त्या दुसऱ्या खोऱ्यात तू काय केलं असतंस?
मग त्या तरुणाने त्यांना अनेक गोष्टींची माहिती सांगितली. गाई-गुरांचं शेण जाळून टाकण्यापेक्षा जमिनीचा कस वाढवण्यासाठी वापरता येईल. सगळे तण आणि काटक्या कसे गोळा करून, नुसत उन्हात वाळू देण्यापेक्षा, त्यांची नीट व्यवस्था लावायला हवी. टेकडीवर आणि खाली, सगळीकडे नुसती अमर्याद नांगरणी करण्याऐवजी काही ठिकाणी इंधनासाठी म्हणून, झपाट्यानी वाढणारी झाडं लावायला हवी. उदाहरणार्थ झऱ्यांच्या उतारावर, म्हणजे पाणी नुसतंच वाहून जाणार नाही. काही ठिकाणी शेती करणंच योग्य नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी लोकांना समजवायला कठीण होत्या. जमिनीचे लहान लहान तुकडे करून प्रत्येकाने त्याच्यात शेती करणं चांगलं नाही. काही ठिकाणी नुसतीच झाडं लावायला हवी, काही जमीन नुसतीच गुरांना चरण्यासाठी मोकळी ठेवायला हवी. आणि सगळ्या कठीण म्हणजे, लग्नामध्ये पुरुषांनी बायकोच्या बदल्यात काही गुरं बक्षीस देण्याची पद्धत! त्याकरता लोक अनेक गुरं बाळगायचे, संपत्ती गुरांमध्येच मोजायचे. गुरांनी चरून चरून त्या गवताला कधी वाढायची संधीच मिळत नसे.
-    आणि एक धरण पण बांधणार आहेत?
-    होय, धरण पण बांधायचं आहे. म्हणजे गुरांना प्यायला नेहमी पाणी असेल. आणि धरणामधलं पाणी मधून मधून सोडता येईल, थोडी थोडी जमीन भिजवण्यापुरतं, थोड्या कुरणांना ओल ठेवण्यापुरतं.
-    पण पाणी येणार कुठून?
-    नदीवरच्या पाईपामधून येईल, असं तो गोरा माणूस म्हणाला.
-    ते नक्कीच त्यांच्या नदीबद्दल बोलत असणार, कुमालो म्हणाले. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी तू सांगतो आहेस, त्या डोत्शेनीमध्ये होऊ शकतील?
-    मला आधी खोरं बघायला पाहिजे, शिक्षक हसत म्हणाला.
-    पण तू आत्ता तिथून तर खाली आलास, कुमालो अधीरपणे म्हणाले.
-    हो, मी बघितलं. पण मला सावकाश, नीट तपासून बघायला हवं. तरीही, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जमू शकतील.
ते सगळे उत्सुक आणि अधीर चेहऱ्यांनी टेबलाभोवती बसले होते. ह्या तरुण शिक्षकाला तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करायची कला अवगत होती. कुमालो सगळ्यांकडे बघून म्हणाले, मी ह्या तरुणाला सांगितलं, देवदूत आहेस रे बाबा तू! ते अधीरपणे उठले आणि खोलीभोवती चालायला लागले. म्हणाले, तुला नाही उत्सुकता काम सुरु करायची?
तरुण थोडासा लाजून हसला आणि म्हणाला, होय तर, मलाही आहे ना उत्सुकता.
-    पहिली गोष्ट काय करणारेस तू?
-    उम्फुन्डीस, मला मुखीयाला भेटायला हवं.
-    बरोबर, ते तुला पहिल्याप्रथम केलंच पाहिजे.
त्यांना बाहेर घोड्याचे आवाज आले. ते उठून बाहेर गेले, तो मुलगाच परत आलाय की काय, एवढ्या पटकन कसा आला असे विचार करत. आणि खरच तो मुलगा होता. पण ह्यावेळी तो घोड्यावरून खाली उतरला नाही, घोड्यावरूनच कुमालोंशी बोलला. तो अगदी जीव तोडून घाईघाईनी सांगत होता.
-    थोडक्यात बचावलो, तो म्हणाला.
-    बचावलात, छोटे साहेब? कुमालो म्हणाले, तुम्ही बचावलात?
-    अस बोलायची पद्धत आहे हो, तो म्हणाला. पण तो हसत नव्हता, फारच गंभीर होता. म्हणजे काय झालं, माझे आजोबा एवढे लवकर परत आले नसते ना, तर मी तुमचा निरोपही घेऊ शकलो नसतो.
-    छोटे साहेब, तम्ही जायला निघालाय का?
छोट्याने त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्याला समजलं कुमालो गोंधळले आहेत, आणि त्यांना समजावून सांगायची त्याला घाई होती.
-    म्हणजे काय माहित्येय का; माझे आजोबा जर उशिरा आले असते ना, तर मला पुन्हा इथे येउन तुम्हाला सांगायला वेळच राहिला नसता. पण ते लवकर आले म्हणून वेळ शिल्लक होता.
-    म्हणजे छोटे साहेब तुम्ही उद्या जाणार आहात?
-    हो, उद्या. नॅरो गेज ट्रेननी, म्हणजे छोटीशी आगगाडी असते ना, कळलं?
-    अरे वा, छोटे साहेब!
-    पण मी सुट्टीत परत येईन, तेव्हा आपण परत झुलूमध्ये बोलू.
-    खूप मजा येईल, कुमालो साधेपणे म्हणाले.
-    गुड बाय, उम्फुन्डीस.
-    गुड बाय, छोटे साहेब.
मग ते झुलूमध्ये म्हणाले, जपून जा, छोटे साहेब. छोट्याने क्षणभर कपाळाला आठ्या घालून विचार केला. मग तो झुलुमध्ये म्हणाला, जपून रहा, उम्फुन्डीस. ह्यावर कुमालो थक्क होऊन म्हणाले, वा! छोट्या खळाळून हसला आणि टोपी उंचावून एका टाचेमध्ये, धुळीचे लोट उडवत निघाला. टेकडीच्या चढावर घोडा थांबवला, आणि मागे वळून एक सलाम ठोकून निघून गेला.
कुमालो तिथेच उभे राहिले. तरुण शिक्षक येउन त्यांच्या बाजूला उभं होता, दोघं छोट्याकडे बघत.
-    आणि तो, कुमालो मनापासून उद्गारले, एक देवदूत आहे!
ते दोघे घरात जायला मागे वळले. कुमालो म्हणाले, तर, तुला वाटतंय की ह्या गोष्टी जमणार आहेत?
-    उम्फुन्डीस, करता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
-    खरंच?
-    उम्फुन्डीस, तो तरुण अधीर चेहऱ्याने म्हणाला, हे खोरं पूर्वीसारखं परत नक्कीच होऊ शकेल. पण ते पटकन, एका दिवसात, नाही होणार.

-    देवाची इच्छा असेल, कुमालो गरीबपणे म्हणाले, तर माझ्या डोळ्यादेखत तरी हे पुनरुज्जीवन घडेल. आतापर्यंत मी आयुष्यात फक्त सगळं उध्वस्त होतांनाच बघितलं आहे.

Comments