आज चर्चमध्ये खास समारंभ
होता. थोड्या वयात आलेल्या मुलांनी ख्रिस्तावरची श्रद्धा आणि चर्चचं सदस्यत्व स्वीकारण्यासाठी.
चर्चसाठी काम करणाऱ्या बायका त्यांचे पांढरे झगे घालून, गळ्याभोवती हिरव्या ओढण्या
गुंडाळून घेऊन आलेल्या होत्या. चर्चचे सदस्य असलेले, गावातच राहणारे पुरुषही त्यांचे
त्यातल्या त्यात चांगले - म्हणजे नेहमीचेच, पण ठिगळं लावून, धुवून, थोड्या सुरकुत्या
काढलेले - कपडे घालून आले होते. ज्या मुलांसाठी हा समारंभ होता, ती मुलंही आली होती.
मुली त्यांचे पांढरे कपडे आणि हिरव्या ओढण्या घेऊन, मुलं त्यांचे शाळेचेच - पण ठिगळं
लावलेले आणि धुतलेले - कपडे घालून. बायका घरामध्ये उम्फुन्डीसच्या बायकोला कामात मदत
करत होत्या. समारंभानंतर सगळ्यांना जेवण होतं, त्याची तयारी करत. जेवण म्हणजे साधंसच
होतं, उकळून उकळून, पानांचा अर्क काढून केलेला चहा आणि मक्याचे जड-भरड घरगुती केक.
साधंसच जेवण, पण सगळ्यांनी एकत्र खायचं.
बाहेर विस्तीर्ण खोऱ्यामध्ये
वादळी ढग गोळा होत होते, पण अतोनात घाम काढणारा उन्हाळाही होता. त्यामुळे ह्याचं सुख
मानायचं का दुःख हे ठरवणं कठीण होतं. ढगांच्या प्रचंड मोठाल्या काळ्या सावल्या तांबड्याशार
मातीवरून संथपणे सरकत होत्या; वैराण टेकड्यांवरून माथ्यापर्यंत. लोक आकाशाकडे बघत होते,
आणि बिशपच्या यायच्या रस्त्याकडे बघत होते. इथेही आनंद मानायचा का दुःख हे सांगणं कठीण
होतं. कारण आज मावळतीच्या आत, डोंगरांमध्ये कुठेतरी वीज कोसळणार आहे आणि ढगांचे गडगडाट
होणार आहेत हे नक्की होतं.
कुमालोसुद्धा काळजीनी
आलटून पालटून आकाशाकडे आणि बिशपच्या यायच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. त्यांना
त्यांचा मित्र दुधाची गाडी घेऊन येताना बघून आश्चर्य वाटलं. एवढ्या लवकर कधीच दूध येत
नसे.
-
दोस्त,
आज एवढ्या लवकर?
-
उम्फुन्डीस,
मी लवकर आलोय खरा. त्यांचा मित्र अतिशय गंभीर चेहऱ्याने म्हणाला. आज आम्हाला कामावरून
सुट्टी मिळाली. बाईसाहेब गेल्या.
-
अरे देवा!
काय सांगतोस? कुमालो म्हणाले.
-
खरं तेच
सांगतोय, उम्फुन्डीस. सूर्य जेव्हा असा इथे - त्याने डोक्यावर बोट दाखवलं - होता ना,
तेव्हा त्या गेल्या.
-
अरेरेरे!
फार वाईट झालं रे.
-
वाईट झालं,
उम्फुन्डीस.
-
साहेब
कसे आहेत?
-
ते गप्प
गप्प आहेत. तुम्हाला माहितीच आहे, त्यांचा स्वभाव. पण आता हे गप्पपण फार कठीण वाटतंय.
उम्फुन्डीस, मी जाऊन आंघोळ करून घेतो, म्हणजे समारंभाला येऊ शकेन.
-
ठीक आहे,
जा.
कुमालो घरात गेले आणि
बायकोला म्हणाले, बाईसाहेब गेल्या. मग ती म्हणाली, अरेरेरे; आणि इतर बायका सुद्धा.
त्यातल्या काही रडल्या सुद्धा. सगळ्या जणी त्या किती चांगल्या होत्या त्याच्या गोष्टी
सांगायला लागल्या. कुमालो त्यांच्या टेबलाशी बसून, काय करावं ह्याचा विचार करू लागले.
हा समारंभ संपला, की उत्तुंग-विहारमधल्या जार्विस साहेबांच्या घरी जाऊन त्यांना सांगावं,
खाली गावामध्ये लोकांना किती दुःख झालंय बाईसाहेबांच्या निधनाने. पण मग त्यांच्या डोळ्यासमोर
त्या शोकग्रस्त घरातलं दृश्य उभं राहिलं. सगळ्या गोऱ्या लोकांच्या गाड्या दारात रांगेनी
उभ्या. काळ्या पोशाखातले ते शेतकरी घोळक्या-घोळक्यानी गंभीर चेहऱ्यांनी हळूहळू कुजबुज
करत असणार. त्यांनी असलं दृश्य आधी बघितलं होतं. त्यांच्या लक्षात आलं, की ते जाऊ शकणार
नाहीत, कारण ते रिवाजाला धरून होणार नाही. ते तिथे जाऊन एकटे उभे राहतील. जार्विस साहेबांनी
स्वतः बाहेर येउन चौकशी केली नाही, तर दुसरं कोणी ते का आलेत हे बघणारही नाही. त्यांनी
काही संदेश आणला आहे ह्याची कोणी दखलही घेणार नाही. त्यांनी एक सुस्कारा सोडला, आणि
खणामधून काही कागद बाहेर काढले. त्यांनी ठरवलं हा संदेश इंग्लिशमध्येच असायला हवा.
कारण ह्या परिसरातल्या बऱ्याच गोऱ्या लोकांना झुलू समजत असली, तरी फारच थोड्यांना ती
लिहिता-वाचता येत असे. म्हणून ते लिहायला बसले. बऱ्याच वेळा लिहिलं आणि फाडून फेकून
दिलं. पण शेवटी एकदा मनासारखं लिहून झालं.
सरकार,
बाईसाहेबांच्या निधनाची
वार्ता समजली. आम्ही डोत्शेनीच्या चर्चचे सर्व सदस्य अतिशय शोकाकुल आहोत. आपण आमच्यासाठी
करत असलेल्या गोष्टींची त्यांना जाणीव असेल, किंबहुना त्यात त्यांचाही वाटा असेल, ह्याची
आम्हाला खात्री आहे. आम्ही, ह्या चर्चचे सदस्य त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून
प्रार्थना करतो. तसेच, आपल्या दुःखातही आम्ही सहभागी आहोत.
आपला नम्र,
रेव्ह. स्टीफन कुमालो.
ते लिहून संपल्यावर,
ते विचार करत राहिले हे पाठवावं का नाही. कारण समजा, ह्या बाई त्यांच्या मुलाच्या खुनाचं
दुःख हृदयात बाळगून गेल्या असल्या. तर या परिस्थितीत, त्या खुन्याच्या वडिलांनी असं
पत्र लिहिणं उचित आहे का? त्यांनी ऐकलं नव्हतं का, त्या खूप आजारी आणि बारीक झाल्या
होत्या? ह्या कठीण समस्येचा विचार करतांना ते पार थकून गेले. पण मग त्यांना जार्विसनी
दिलेली दुधाची देणगी आठवली, गावाला शेतकी शिकवायला पाठवलेल्या मास्तराची आठवण झाली,
आणि सगळ्यात जास्तकरून, जार्विसचा आवाज, आत्ता ह्या खोलीत ऐकावा तसा आठवला 'दयेच्या
अर्जाचं काय झालं?' विचारणारा. आणि त्यांना जाणवलं, ह्या माणसाने एकदा एक पाऊल उचललं,
की कोणीही त्याला त्या दिशेपासून परावृत्त करू शकत नाही. म्हणून त्यांनी ते पत्र बंद
केलं, आणि बाहेर जाऊन एका मुलाला दिलं.
-
बाळ, हे
पत्र घेऊन जा. कुलुसेकडे जा आणि त्याचा घोडा मागून घे. मग हे पत्र जार्विस साहेबांच्या
घरी जाऊन त्यांना दे. साहेबांना त्रास नको देऊ, तिथे जो कोणी माणूस दिसेल त्याच्याकडे
दे हे. बाळ, शांतपणे नीट वाग हं तिथे. उगाच आरडे-ओरडे, आणि खिदळणं आणि हाक मारणं नको
तिथे. बाईसाहेब गेल्या, माहिती आहे ना? समजलं?
-
हो उम्फुन्डीस,
अगदी व्यवस्थित.
-
जा तर
मग बाळ. इथे समारंभाला तुला थांबता येणार नाही, मला खरंच वाईट वाटतंय.
-
ते ठीक
आहे, उम्फुन्डीस.
मग कुमालोंनी जाऊन
जमलेल्या लोकांना सांगितलं, बाईसाहेब गेल्या. सगळे गप्प झाले. आधी जी बडबड आणि हसणं-खिदळणं
चाललं होतं, ते आता एकदम शांत झालं. बिशप येईपर्यंत ते खालमानेनी हळूहळू बोलत राहिले.
समारंभाच्या वेळेपर्यंत
चर्चमध्ये काळोख झाला होता, म्हणून दिवे लावायला लागले. मोठाले काळे ढग खोऱ्यावरच्या
आकाशात गोळा झाले होते. मधूनच त्या लाल एकाकी टेकड्यांवर एखादी वीज चमकत होती. जमिनीची
ओरबाडलेली उघडी त्वचा झळाळून टाकत होती. म्हाताऱ्या-कोतारयांच्या खोऱ्यावरून ढग गडगडत
जात होते. हट्टे-कट्टे पुरुष आणि तरुण पोरं-पोरी दूर निघून गेलेले होते. ही जमीन त्यांना
ठेऊन घेऊ शकत नव्हती. ह्या चर्चमध्ये समारंभासाठी गोळा झालेली लहान मुलं... काही काळानी
ती सुद्धा दूर जाणारेत. ही जमीन त्यांनासुद्धा इथे बांधून ठेऊ शकणार नाहीय.
चर्च मध्ये काळोखी
होती, आणि जोरदार पाऊस छपरामधून कोसळत आला. जमिनीवर तळी झाली आणि पावसापासून बचाव करण्यासाठी
लोक थोडे इकडे तिकडे फिरू लागले. काही बायकांचे पांढरे पोशाख ओले झाले. एक मुलगी तिथे
भिजत आणि थंडीनी काकडत तशीच उभी राहिली, कारण हा समारंभ तिच्या दृष्टीनी महत्वाचा होता
आणि तो सोडून जाण तिला शक्य नव्हतं. बिशपचा आवाज प्रवचन देत होता. परमेश्वरा, रक्षण
कर. तुझ्या ह्या लेकरावर, तुझ्या स्वर्गीय मायेची पाखर घाल. म्हणजे ते तुझ्याच मार्गावर
चालत राहील. रोज तुझी कीर्ती पसरवत राहील. आणि अखेर तुझ्या अजरामर साम्राज्यामध्ये
येउन पोचेल. हा संदेश ते प्रत्येक मुलाला देत होते.
समारंभानंतर कुमालोंच्या
घरामध्ये त्या साध्यासुध्या जेवणासाठी एकच गर्दी झाली. ज्या मुलांनी त्या दिवशी समारंभात
भाग घेतला नव्हता, त्यांना आणि त्यांच्या आई-वडिलांना 'चर्चमध्येच थांबा' असं कुमालोंना
सांगावं लागलं. विजा आणि गडगडाट थांबला असला, तरी पाऊस अजूनही मुसळधार पडतच होता. घर
भरून आधीच ओसंडून वहात होतं. लोकं स्वैपाकघरात होते, कुमालोंच्या कामाच्या खोलीत होते,
त्यांच्या जेवायच्या खोलीत होते, झोपायच्या खोलीत होते. एवढंच काय, त्या नवीन शिक्षकाच्या
खोलीत सुद्धा लोक होते.
शेवटी एकदाचा पाऊस
थांबला. कुमालोंचा कामाच्या खोलीत आता फक्त ते आणि बिशप दोघेच होते. बिशपनी त्यांचा
पाईप पेटवला, आणि म्हणाले मिस्टर कुमालो, मला तुमच्याशी बोलायचं आहे.
कुमालो भितीनी खाली
बसले, हे आता काय बोलतील ह्या विवंचनेमध्ये.
-
तुमच्या
सध्याच्या सगळ्या त्रासांबद्दल आणि अडचणींबद्दल मला फार वाईट वाटतंय.
-
ही वेळ
खरंच फार कठीण आहे, साहेब.
-
तुमच्या
सगळ्या त्रासांमध्ये आणखी भर घालणं मला टाळायचं होतं. म्हणून, मी हा समारंभ उरकेपर्यंत
थांबायचं ठरवलं.
-
बरोबर
आहे, साहेब.
-
खात्री
बाळगा, तुमच्याबद्दलच्या आदरानेच मी हे बोलतो आहे.
-
होय, साहेब.
-
तर, मला
वाटतं, तुम्ही डोत्शेनी सोडून दूर जायला हवं.
बरोबर आहे, हेच ते
बोलणार होते, हेच ते बोलले आहेत. हे बोलतील ह्याचीच मला भिती होती. आणि तरीही, मला
इथून जाण म्हणजे मृत्यूसारखंच आहे. आता कुठेही नव्यानी सुरुवात करणं मला शक्य नाही.
मी फार म्हातारा आहे, मी फार थकलोय. तरीही, हे लोक मला त्यांच्या पित्यासमान मानतात.
अहो बिशपमहाशय, मी डोत्शेनीमध्ये परत आलो त्या दिवशी तुम्ही इथे यायला हवं होतं. तुम्हाला
दिसलं असतं, म्हातारा झालो असलो तरीही हे लोक अजून माझ्यावर प्रेम करतात. तुम्ही त्या
मुलाला ओरडतांना ऐकलं असतं, उम्फुन्डीस तुमच्या परत येण्याचा आम्हाला अतिशय आनंद झालाय,
हा दुसरा प्रिस्ट... काय बोलायचा तेही आम्हाला समजत नसे. आता नवीन गोष्टी घडायला सुरुवात
होते आहे, तोच तुम्ही मला इथून दुसरीकडे पाठवणार? मुलांना दुध मिळायला लागलंय, नवीन
शेतकी शिक्षक आलाय, धरणासाठी काठ्या रोवून ठेवल्या आहेत, आणि आता तुम्ही मला इथून दुसरीकडे
पाठवणार? डोळे पाण्यानी भरून येतात. मिटलेल्या डोळ्यातून सुटून अश्रू बाहेर येतात,
खास ह्या समारंभासाठी, सन्मित्र सिमांगुच्या देणगीमधून नवीन घेतलेल्या काळ्या कोटावर
टपटपा पडतात. ते म्हातारं मस्तक झुकलय. म्हातारा एखाद्या लहान मुलासारखा बसून राहिलाय,
एकही शब्द न उच्चारता.
-
मिस्टर
कुमालो, बिशप हळुवारपणे म्हणतात. मग पुन्हा एकदा, थोड्या मोठ्याने, मिस्टर कुमालो?
-
ओह, साहेब!
-
तुम्हाला
त्रास झाल्याचं मला खरच दुःख होतंय, फार दुःख होतंय. पण, तुम्ही इथून जाणच जास्त बरं
नाही का होणार?
बिशप त्यांच्या खुर्चीमध्ये
थोडे पुढे सरकतात. गुडघ्यावर कोपरं रोवून बसतात. मिस्टर कुमालो, हे खरं आहे का नाही,
की खून झालेल्या माणसाचे वडील इथे तुमच्यापासून जवळच राहतात.
-
खरं आहे,
साहेब.
-
मग त्या
एका कारणासाठी सुद्धा, मला वाटतं तुम्हाला जायला हवं.
ते जवळच राहतात म्हणून
मला जायला हवं? पण ते मला भेटायला घोड्यावरून येतात, त्यांचा नातू माझ्या घरी येतो.
त्यांनी गावातल्या मुलांसाठी दुध पाठवलं, लोकांना शेती करायचे योग्य मार्ग शिकवण्यासाठी
एक शिक्षक पाठवला, त्याचं काय? त्यांची बायको, बाईसाहेब, गेल्यावर त्यांच्या दुःखात
मी नाही का सहभागी? पण हे सगळं एका बिशपला, देशातल्या एवढ्या थोर माणसाला, कसं सांगायचं?
ह्या गोष्टी सांगता येत नाहीत.
-
समजतंय
ना, मिस्टर कुमालो?
-
समजल,
साहेब.
-
मी तुम्हाला
पीटरमरीत्झबर्गला, तुमच्या जुन्या दोस्ताकडे, टोम्बेलाकडे पाठवतो. तुम्ही त्याला मदत
करू शकाल, तुमच्याही खांद्यावरचा भार हलका होईल. तो बिल्डींग, आणि शाळा, आणि पैशाच्या
कटकटी बघेल; तुम्ही प्रिस्टच्या कामाकडे लक्ष देऊ शकाल. अशी माझ्या डोक्यात योजना आहे.
-
आलं लक्षात
साहेब.
-
तुम्ही
इथे राहिलात मिस्टर कुमालो, तर अनेक ताप असतील तुमच्या डोक्याला. नुसतं जार्विस तुमच्या
शेजारी आहेत एवढंच नव्हे. आज ना उद्या, तुम्हाला हे चर्च नव्यानी उभारायला लागणार आहे,
आणि त्यासाठी प्रचंड पैसा लागेल आणि कटकटी सहन कराव्या लागतील. चर्चची काय दशा झाल्येय,
तुम्ही बघितलतच आज!
-
होय साहेब.
-
मी ऐकलं,
तुम्ही तुमच्याबरोबर सुनेलाही घेऊन आलाहात. त्यात पुन्हा ती गरोदर आहे. त्यांना इथे
राहायला देणं योग्य आहे का? जिथे ह्या गोष्टी कोणाला माहिती नसतील अशा ठिकाणी जाण बरं
नाही का?
-
आलं लक्षात
साहेब.
दारावर टकटक झाली.
कुमालोंची चिठ्ठी घेऊन गेलेला तो मुलगा आला होता. कुमालोंनी त्याच्या हातातलं पत्र
घेतलं. वरती, रेव्ह. स्टीफन कुमालो, डोत्शेनी अस लिहिलं होतं. त्यांनी मुलाचे आभार
मानले, आणि दार बंद केलं. ते पुन्हा खुर्चीत येउन बसले, बिशपसाहेबांचं बोलणं ऐकायला.
-
तुमचं
पत्र वाचून घ्या, मिस्टर कुमालो.
म्हणून कुमालोंनी ते
पत्र उघडलं, आणि वाचलं.
उम्फुन्डीस,
तुमच्या शोकसंदेशाबद्दल प्रथम तुमचे आभार मानतो.
तुम्ही चर्चमध्ये आमच्यासाठी प्रार्थना कराल हे वाचूनही बरं वाटलं. तुम्ही अचूक ओळखलत,
की मी गावासाठी करत असलेल्या बऱ्याच गोष्टींची माझ्या पत्नीला कल्पना तर होतीच, पण
तिचा त्यात मोठा सहभागही होता. आमच्या लाडक्या मुलाच्या स्मृतीप्रीत्यर्थ ह्या गोष्टी
आम्ही करू इच्छितो. तिची शेवटची इच्छा होती, की डोत्शेनीमध्ये एक नवीन चर्च उभारावं.
त्यासंबंधी बोलण्यासाठी मी तुम्हाला येउन भेटेनच.
तुमचा,
जेम्स जार्विस.
तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं, की आम्ही
जोहानसबर्गला जाण्याच्या आधीपासूनच माझी पत्नी आजारी होती.
कुमालो उठून उभे राहिले,
आणि म्हणाले, देवानेच पाठवलंय हे पत्र! त्यांचा तो आवाज ऐकून बिशप थक्क झाले. त्या
आवाजात एक सुटकेचा निश्वास होता, एक निरागस हसू होतं आणि कृतज्ञतेनी वाहणारे अश्रू
होते. मग ते खोलीच्या चार भितींकडे बघत पुन्हा म्हणाले, देवानेच पाठवलंय हे पत्र.
बिशप कोरड्या सुरात
म्हणाले, मी बघू का हे देवाने पाठवलेलं पत्र? कुमालोंनी ते पत्र आनंदाने त्यांच्या
हातात दिलं, आणि अधीरपणे ते वाचून पुरं व्हायची वाट बघत थांबले. वाचून संपल्यावर, बिशप
गंभीरपणे म्हणाले, पोरकट विनोद आहे हा!
त्यांनी पुन्हा ते
वाचलं, जोरात नाक शिंकरलं, आणि म्हणाले, काय ह्या एवढ्या मोठ्या गोष्टी घडताहेत इथे?
मग कुमालोंनी त्यांना
दुधाबद्दल, आणि धरणाबद्द्ल आणि शेतकी शिक्षकाबद्दल माहिती दिली. बिशप पुन्हा पुन्हा
नाक शिंकरत ऐकत होते. शेवटी कुमालोंना म्हणाले, अद्भुत! फारच अद्भुत आहे हे सगळं; मी
असलं कधी ऐकलं नव्हतं.
मग कुमालोंनी त्यांना
ते शब्द समजावून सांगितले – ‘माझी पत्नी जोहानसबर्गला जाण्याआधीपासूनच आजारी होती’.
कुठच्या समजुतीच्या आणि सहानुभूतीच्या भावनेतून ते लिहिले गेले आहेत, हे बिशपना समजावून
सांगितलं. त्यांना, 'दयेच्या अर्जाचं काय झालं' हा प्रश्न सांगितला, तो उरातच हास्य
भरलेला छोट्या कसा इथे येत असे ते सांगितलं.
मग बिशप म्हणाले, चला,
तुमच्या चर्चमध्ये जाऊन कुठे कोरडी, उभं राहण्यासारखी जागा असली, तर प्रार्थना करू.
मग मात्र मला लगेच निघायला हवं, बराच पल्ला गाठायचा आहे. त्यापूर्वी, मी तुमच्या पत्नीचा
आणि सुनेचा निरोप घेतो. आणि एक सांगा, तुमची ही सून, आणि तिचं होणारं मुल, त्यांचं
काय?
-
आम्ही
सर्वांसमक्ष, गावातल्या लोकांबरोबर प्रार्थना केली आहे, साहेब. आणखी काय करायला हवं?
-
ही जुन्या
काळची, जेव्हा लोकांच्यात श्रद्धा होती, तेव्हाची पद्धत झाली. पण, जुन्या काळची अस
नको म्हणायला, आत्ता मी इथे जे काही ऐकलं त्यानंतर.
बिशपनी घरातल्या लोकांचा
निरोप घेतला, आणि कुमालोंच्या बरोबर ते चर्चमध्ये गेले. चर्चच्या दारात ते गंभीरपणे
कुमालोंना म्हणाले, मला दिसतंय, की तुम्ही डोत्शेनी सोडून जावं अशी देवाची इच्छा नसावी.
* * *
बिशप गेल्यानंतर, कुमालो
वाढत्या अंधारामध्ये चर्चच्या बाहेरच उभे राहिले. पाऊस आता थांबला होता, पण आकाश अजूनही
भरून आलेलंच होतं. हवेत गारवा होता. नदीवरून वाऱ्याच्या मंद झुळका येत होत्या, मनाला
उभारी देत होत्या. ते तसे त्या विस्तीर्ण खोऱ्याकडे बघत उभे राहिले असतांना त्यांना
आकाशातून एक आवाज ऐकू आला - धीर धरा, धीर धरा, माझ्या लेकरांनो. मी तुमच्यासाठी सगळं
करेन, तुम्हाला एकटं कधीच टाकून देणार नाही. फरक एवढाच, की लोकांना ह्या गोष्टी ज्या
रीतीनी घडणं अपेक्षित असतं, तसा नाही आला हा आवाज. लोक ज्याला भ्रम किंवा अति थकलेल्या
माणसाचं स्वप्नरंजन म्हणतात, किंवा दैवी संकेत म्हणतात, तसा आला.
* * *
ते घरात गेले, तेव्हा
त्यांना त्यांची बायको, मुलगी, इतर सगळ्या बायका आणि त्यांचं मित्र एकत्र बसून शवपेटीकेवर
ठेवायला पुष्परचना करतांना दिसले. गावातल्या एकुलत्या एका सायप्रस वृक्षाची एक फांदी
त्यांनी गोल वळवली होती. ती सुटून जाऊ नये म्हणून गच्च बांधली होती. त्यात, त्यांनी
गावातल्या जमिनीवर जी काही थोडी फार फुलं उमलायची ती गोळा करून लावली होती.
-
उम्फुन्डीस,
मला खरं तर हे नाही आवडलं. काहीतरी चुकतंय. गोरे लोक असलं नाही वापरत.
-
ते पांढरी
फुलं वापरतात, नवीन शिक्षक म्हणाला. मी पीटरमरीत्झबर्ग मध्ये बऱ्याचदा बघितलंय, ते
पांढरी फुलं वापरतात.
-
उम्फुन्डीस,
त्यांचा मित्र एकदम उत्साहानी म्हणाला, मला पांढरी फुलं माहित आहेत, लिलीची असतात.
-
हो, ते
लिलीचीच फुलं वापरतात, नवीन शिक्षकही उत्साहानी म्हणाला.
-
पण ती
लांब, तिकडे रेल्वेलाईनच्या बाजूला, करिसब्रुकच्या एकदम दुसऱ्या टोकाला आहेत.
-
ते खरच
लांब आहे.
-
मी जातो
ना. ह्या अशा गोष्टीसाठी फार लांब नाही ते. तुमचा कंदील घेऊन जाऊ का मी, उम्फुन्डीस?
-
हो, हो.
-
आणि एक
पांढरी रिबीन पाहिजे, शिक्षक म्हणाला.
-
माझ्या
घरी आहे, एक बाई म्हणाली. मी आणतेच जाऊन.
-
आणि स्टीफन,
तुम्ही एक कार्ड लिहायला हवं. आहे का तुमच्याकडे असलं कार्ड?
-
त्याच्या
कडा काळ्या हव्या.
-
हो, कार्ड
आहे माझ्याकडे. कुमालो म्हणाले. पेनानी मी भोवती कडा काळ्या रंगवेन.
ते त्यांच्या खोलीत
गेले. एक कार्ड शोधून त्यांनी त्याच्यावर सुवाच्य अक्षरात लिहिलं,
सेंट मार्क चर्च, डोत्शेनीच्या सदस्यांकडून,
सहानुभूतीसह.
त्यांच्या बायकोनी
त्यांना जेवायला हाक मारली तेव्हा ते कडा काळ्या रंगवण्यामध्ये गर्क होते.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...