भाषांतर - ३६

आज चौदावा दिवस. कुमालो त्यांच्या बायकोला म्हणाले, मी वर डोंगरमाथ्यावर चढून जाणार आहे. ती म्हणाली, समजतं मला. तिला माहिती होतं, त्यांनी पूर्वी असं दोन वेळा केलं होतं. एकदा अब्सलम अगदी जातो का राहतो एवढा आजारी होता. दुसऱ्या वेळी, ते धर्मप्रसार सोडून देऊन, डॉनीब्रुकमध्ये काळ्या लोकांसाठी दुकान चालवायचा विचार करत होते. बॅक्स्टर नांवाच्या गोऱ्याने त्यांना बरीच रक्कम देऊ केली होती, चर्च कधीच देऊ शकणार नाही एवढी. तिसरीही एक वेळ होती, पण ती तिला माहिती नव्हती; ती कुठे परगावी गेली होती. डोत्शेनीच्या शाळेमध्ये एक थोडी एकलकोंडी आणि गरीब शिक्षिका होती, तिच्याबरोबर संबंध ठेवायचा त्यांना जबरदस्त मोह झाला होता.
-    तुला माझ्याबरोबर यायचं आहे का? कारण, तुला एकटीला सोडायला मला नको वाटतंय.
तिला भरून आलं. ती म्हणाली, नको, आता त्या मुलीचे दिवस भरत आलेत, कोणास ठाऊक नक्की कधी काय होईल. तुम्ही मात्र अवश्य जा.
तिने त्यांच्यासाठी बाटलीत चहा भरून दिला, पानं उकळून अर्क करून. थोडे जड-भरड मक्याचे केकही दिले. त्यांनी त्यांचा कोट आणि काठी घेतली, आणि मुखीयाकडे जायच्या रस्त्यानेच ते निघाले. मात्र डोंगराकडे जायला, पहिल्या फाट्याशी जेवायच्या हाताच्या दिशेनी जायचं. एक टेकडी चढून पलीकडे जायचं. मग डोंगराच्या पायथ्यालगतच्या झोपड्या दिसतात. तिथे वळायचं, आणि डोंगराच्या पायथ्यावरूनच पूर्वेकडे जात राहायचं, जणू काही दूरच्या इम्पायेनी टेकडीकडे चालला आहात. ही आणखी एक तांबड्या बोडक्या शेतांची, म्हाताऱ्या-कोताऱ्यांची, आया आणि लहान मुलांची टेकडी. मात्र, सरळ रस्त्याच्या टोकापर्यंत आलात, की तिथे खाली खोऱ्याकडे जाणारा रस्ता सोडून उलट वर डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागायचं. ह्या डोंगराचं नांव आहे, इमोयेनी - म्हणजे वाऱ्यावरचा. तो कॅरीसब्रुकच्या, आणि इतर डोंगरमाथ्यांच्या, आणि डोत्शेनी आणि इम्पायेनीच्या खोऱ्यांच्या वरती दिमाखात उभा आहे. खरं तर, उम्झीम्कुलुच्या विस्तीर्ण खोऱ्याची तटबंदीच म्हणाना. ह्या माथ्यावरून आफ्रिकेतलं अत्यंत विहंगम निसर्गसौंदर्य दृष्टीस पडतं.
आता जवळजवळ काळोख पडलाच होता. त्या संधीप्रकाशात ते एकटेच चालले होते. बरंच ते. ह्या असल्या प्रकारची वाटचाल एकांतात करणंच बरं. पण ते जेमतेम ती दगडधोंड्यांची वाट चढायला सुरुवात करताहेत, तेवढ्यातच त्यांना तो घोड्यावरचा माणूस दिसला. आणि नुसता एक आवाज ऐकू आला, कोण, उम्फुन्डीस का?
-    होय, सरकार.
-    बरंच झालं उम्फुन्डीस, आपण भेटलो. हे माझ्या खिशात तुमच्या चर्चच्या लोकांसाठी एक पत्र आहे. क्षणभर थांबून ते म्हणाले, फुलं फार सुंदर होती, उम्फुन्डीस.
-    थँक्यू, सरकार.
-    आणि चर्च, उम्फुन्डीस. तुम्हाला नवीन चर्च बांधायची इच्छा आहे ना?
कुमालो फक्त हसून मान डोलावू शकले; त्यांच्याकडे शब्दच नव्हते उच्चारायला. आणि जरी त्यांची मान नकारार्थी हलली, तरी जार्विसच्या लक्षात आलं, त्यांना काय म्हणायचंय.
-    त्याचा आराखडा लवकरच तुमच्याकडे येईल. तुम्ही सांगा तुमच्या पसंतीप्रमाणे आहे का नाही.
-    सरकार, मी ते बिशपकडे पाठवेन.
-    पुढे काय करायचं, ते तुम्हाला जास्त माहिती. पण हे काम चटकन व्हावं ही माझी इच्छा आहे. मी ही जागा सोडून जाणार आहे.
कुमालोंना एकदम धक्का बसला. त्या शब्दांनी एकाएकी भितीची आणि एकटं पडल्याची भावना दाटून आली. काळोख होता, तरी जार्विसच्या ते लक्षात आलं; ते म्हणाले, तसा मी इथे येत राहीनच. तुम्हाला माहिती आहे, डोत्शेनीमध्ये माझं काम असतंच. मला सांगा, तो तरुण शिक्षक कसा आहे?
-    रात्रंदिवस काम करत असतो; त्याला उसंत म्हणून माहिती नाही.
गोरा माणूस आनंदानी हसला. चांगलं आहे, ते म्हणाले. मग गंभीर होऊन म्हणाले, मी एकटाच असतो घरात, म्हणून मी माझ्या सुनेच्या आणि नातवंडांच्याबरोबर जोहानसबर्गमध्ये राहीन म्हणतो. तुम्हाला तो छोट्या माहिती आहेच.
-    हो तर, सरकार. चांगलाच माहिती आहे.
-    तो त्याच्यासारखा आहे?
-    अगदी त्यांच्यासारखाच आहे, सरकार. मग कुमालो म्हणाले, खरंच, मी त्याच्यासारखा दुसरा मुलगा बघितला नाहीय.
जार्विस त्यांच्या घोड्यावर सावरून बसले. त्या काळोखात, त्या भारदस्त गंभीर माणसाने उत्सुकतेने कान टवकारले. म्हणजे कसा म्हणायचंय तुम्हाला?
-    सरकार, त्याच्या अन्तःकरणातच एक लकाकी झळाळत असते.
-    हो, हो, अगदी खरं. त्याचा बापही तसाच होता, आणखी जास्त. मग ते म्हणाले, एखाद्या आसुसलेल्या माणसासारखं, आठवतं तुम्हाला?
आणि ते आसुसलेले होते, म्हणून कुमालो त्यांना फारसं आठवत नसून सुद्धा म्हणाले, आठवतं तर!
दोघं तिथे गप्प उभे राहिले. थोड्या वेळानी जार्विस म्हणाले, उम्फुन्डीस मला जायला हवं आता. पण प्रत्यक्ष जाण्याऐवजी ते म्हणाले, तुम्ही कुठे निघालात ह्या वेळी?
कुमालोना अवघडल्यासारखं झालं, आणि शब्द सुचेनात. ते म्हणाले, मी इथे डोंगरावर जातो आहे. जार्विस काहीच बोलेनात, म्हणून कुमालो स्पष्टीकरण द्यायला शब्द जुळवायला लागले. पण ते काही बोलू शकण्याच्या आतच, जार्विस म्हणाले, समजतं मला. पूर्णपणे समजतं.
त्यांच्या आवाजातली सहानुभूती जाणवून, कुमालो चक्क रडू लागले. जार्विस अवघडल्या अवस्थेत घोड्यावर बसून राहिले. ते खाली उतरू शकले असते, पण ह्या गोष्टी इतक्या सहजासहजी नाही होत. पण त्यांनी त्यांचा हात काळोख्या खोऱ्याकडे पसरला, आणि म्हणाले, एक गोष्ट संपत येते आहे, पण इथे दुसरी गोष्ट नुकतीच सुरु होते आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत ती नक्की चालू राहील. जपून जा, उम्फुन्डीस.
-    सरकार!
-    काय?
-    मला जाण्यापूर्वी तुमचे आभार मानू द्या. तरुण शिक्षकाबद्दल, मुलांना दुध पुरवल्याबद्दल. आणि आता नवीन चर्चबद्दल.
-    मी असा एक माणूस बघितलाय, जार्विस एकाच वेळी गंभीर होत, पण आनंदात म्हणाले; जो तुम्ही भेटेपर्यंत अंधारात चाचपडत होता. एवढं मोठं कार्य जर तुम्ही करत असाल, तर मी आनंदानी दान करायला तयार आहे.
कदाचित ह्या वाक्याला एक गहन अर्थ होता म्हणून, किंवा केवळ अंधारात म्हणून त्यांना बोलायचं धाडस झालं कोणास ठाऊक; पण कुमालो म्हणाले, खरंच, मला आतापर्यंत माहिती असलेल्या सगळ्या गोऱ्या...
-    मी काही कोणी साधू संत नाहीय, जार्विस त्वेषाने म्हणाले.
-    त्यासंबंधी मी नाही बोलू शकणार, पण देवाने त्याचा हात तुमच्या डोक्यावर ठेवला आहे.
-    असेलही, असेलही. मग एकदम झटक्यासरशी वळून जार्विस म्हणाले, जपून जा, उम्फुन्डीस. ह्या आजच्या कठीण रात्री, जपून रहा.
कुमालो त्यांच्या पाठीमागे ओरडले, जपून जा, जपून जा. खरं तर त्यांच्या मनात इतर अनेक गोष्टी होत्या, महत्वाच्या गोष्टी, ज्या त्यांना सांगायचा होत्या; पण हे इतक्या सहजासहजी होत नाही. घोड्याच्या टापांचा आवाज विरून जाईपर्यंत ते थांबले. मग त्यांनी हळूहळू एक एक खडक धरून कष्टांनी वर चढायला सुरुवात केली, आता काही ते पूर्वीसारखे तरुण राहिले नव्हते. माथ्यावर पोचले, तेव्हा ते पार दमून धापा टाकत होते. विश्रांती घ्यायला म्हणून एका दगडावर बसले. सभोवार इंगेली आणि ईस्ट ग्रीकालॅडचे डोंगर आकाशाच्या पार्श्वभूमीवर काळेकुट्ट दिसत होते. काही वेळ विश्रांती घेतल्यावर, त्यांनी थोड्याच अंतरावर असलेली पूर्वीच्या भेटींची जागा शोधून काढली. खडक एका कोन्यात असा होता, की वाऱ्यापासून निवारा होता. एका माणसाला, पाय खाली लोंबकळत सोडून बसण्यापुरती जागा होती. इथे ते सर्वप्रथम आले होते ती भेट त्यांना आठवली. कदाचित ती पहिली वेळ होती म्हणून असेल, कदाचित ते त्या मुलासाठी प्रार्थना करायला आले होते, ज्याला आता कुठच्याच प्रार्थनेचा काही फायदा होणार नव्हता, म्हणून असेल. त्या वेळच्या त्या मुलाला लिहिता येत नव्हतं, पण ह्या मुलाची एव्हाना तीन पत्रं आली होती - मी जर डोत्शेनीला परत येऊ शकलो असतो, तर मी ते सोडून कधी गेलोच नसतो म्हणणारी. आणखी एखाददोन दिवसात त्यांना त्याचं शेवटचं पत्र मिळेल. आता मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या, जेव्हा दया दाखवायला कोणी तयार नव्हतं तेव्हा पुन्हा कधीही पाप न करण्याची शपथ घेणाऱ्या त्या मुलासाठी त्यांचं काळीज तीळतीळ तुटलं. ते जर त्याला आधीच जाऊन भेटले असते, तर.... त्या दोघांच्या भयानक आणि निरर्थक प्रश्नोत्तरांच्या आठवणींनी त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या. बाबा, तुम्ही म्हणाल तसं; बाबा, तुम्हाला हवं तसं. तो जर म्हणाला असता, बाबा मला माहिती नाही, तरी काय फरक पडणार होता?
ह्या असल्या निष्फळ आठवणींपासून त्यांनी स्वतःला मागे ओढलं. जे जागरण करण्यासाठी ते इथे आले होते, त्याच्या कामाला ते लागले. त्यांनी गेल्या वेळच्या इथल्या भेटीपासूनचा, जेवढा आठवेल तेवढा, त्यांच्या सगळ्या चुकांचा आणि पापांचा पाढा वाचला. काही त्यांना सहज आठवल्या, आगगाडीमध्ये मारलेली थाप, त्यांच्या भावाला सांगितलेलं असत्य, जोहानसबर्गमध्ये त्यांचा क्षणमात्र उडालेला देवावरचा विश्वास, त्या अजाण मुलीला दुखावण्यासाठी तिच्याबरोबर केलेलं वर्तन. सगळं अगदी जमेल तेवढ्या स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, आणि ह्या पापांपासून मुक्तीची याचना केली.
त्यानंतर त्यांनी कृतज्ञतेचे पाढे वाचले. अतिशय मनापासून त्यांनी स्वतःला बजावून सांगितलं, किती लोकांचे आणि किती गोष्टींचे त्यांच्यावर उपकार आहेत, केवढी कृतज्ञता त्यांना असायला हवी. त्यांनी प्रत्येकाची क्रमाने दाखल घेतली, प्रत्येकाचे आभार मानले आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली. सर्वप्रथम त्यांचा प्रेमळ मित्र सिमांगु, आणि त्याची भली मोठी देणगी. नंतर, सुधारणागृहामधला तरुण, भुवया आक्रसून 'उम्फुन्डीस, सॉरी मी रागाच्या भरात वाटेल ते बोललो' म्हणणारा. मिसेस लिथबी, नेहमी 'नाहीतर उपयोग काय आपल्या आयुष्याचा' म्हणणाऱ्या. फादर विन्सेंट, त्यांचे दोन्ही हात हातात घेऊन, 'काही, काहीही; तुम्ही नुसतं सांगा, मी करेन ते तुमच्यासाठी' म्हणणारे. आणि तो वकील, 'देवाच्या नावानी' केस घेणारा, दयेचा अर्ज नाकारला आहे हे इतक्या हळुवार आणि सहानुभूतीपूर्ण शब्दात सांगणारा.
मग, डोत्शेनीला परतणं, त्यांची बायको आणि मित्र. डोक्यावरून एप्रन घेऊन 'उम्फुन्डीस आले' ओरडत जाणारी बाई, चर्चमध्ये गोळा झालेल्या बायका. घरी परतण्याचा आनंद, सगळं दुःख थोडं तरी विसरायला लावणारा आनंद.
त्यांनी ह्यावर बराच वेळ विचार केला. दुसऱ्या एखाद्या खेड्यामध्ये, दुसऱ्या एखाद्या परतणाऱ्या माणसाला कदाचित हे सगळं प्रेम, एवढा आनंद मिळालाही नसता. ह्याच माणसाच्या दुःखाचं आनंदात का रुपांतर होऊ शकलं? ह्याच माणसाला देवाची एवढी जाणीव का आहे? दुसऱ्या एखाद्याला अशी जाणीव नसती, तर तो आयुष्यभर दुःखात तळमळत नसता राहिला? डोत्शेनीच्या सौख्यासाठी एवढी आवर्जून प्रार्थना करण्याची सक्ती कोणी केली होती ह्या माणसावर? आणि ह्याच खोऱ्याच्या डोंगरमाथ्यावरती, कोणीही केली नसती एवढी मदत करणारा, एवढा भला गोरा माणूस का? आणि सगळे सोडून, नेमका त्यांच्या मुलाने ज्याचा खून केला, त्याचाच बाप का? दुसरा एखादा माणूस, त्याच्या गावासाठी अशीच अहोरात्र प्रार्थना करूनही, त्याच्या गावाचं काहीच भलं होत नाही असाही असेलच ना? हे सगळं त्यांच्या विचाराच्या आवाक्याबाहेर जायला लागलं. हे माणसाच्या आकलनाबाहेर आहे, हे गूढ आहे. त्यांनी ते डोक्यातून काढून टाकलं.
आणि तो गोरा माणूस - जार्विस. त्यांचा बळी गेलेला तरुण मुलगा. दुसरा लहानसा, अंतःकरणातच एक झळाळी असलेला छोट्या. त्यांच्या मनाला त्याचा ही विचार झेपेना. पण एक मात्र खरं, ह्या सगळ्याचं ऋण माणसाने उरलेला जन्म फेडत राहावं एवढं मोठं. त्यांनी त्याबद्दल आभार व्यक्त करायला सुरुवात केली.
ते एकदम दचकुन उठले. फार नाही, पण थंडी होती. ह्यापूर्वीच्या जागरामध्ये ते कधी झोपले नव्हते. पण आता ते म्हातारे झाले होते. आयुष्य संपताच आलं होतं; अगदी पुरतं नाही, पण बरचसं. त्यांनी दुःखात असलेल्या सगळ्यांची आठवण काढली. गर्ट्रूड - दुबळी आणि अडाणी. शांतीनगर आणि अलेक्झांड्रा मधले लोक. ह्या क्षणी एकटी असलेली त्यांची बायको. आणि अर्थातच अब्सलम. तो जागा असेल? ह्या पहाटेपूर्वीच्या भयाण रात्री? त्यांच्या हृदयातून आक्रोश आला, माझा बाळ, माझा बाळ!
त्या आक्रोशाने ते पूर्ण जागे झाले, आणि त्यांनी घड्याळ बघितलं, एक वाजला होता. सूर्य पाचनंतर लवकरच उगवेल. हे काम म्हणे त्याच वेळी करतात. पोरगा झोपलेला असला, तर झोपू दे त्याला. पण जर तो जागा असला, तर हे अथांग दयासागरा येशू, माझ्या मुलाची सोबत कर. त्यांनी अत्यंत जीव तोडून प्रदीर्घ प्रार्थना केली.
त्यांची बायको जागी असेल? ह्याचा विचार करत असेल? ती मुलगी नसती तर ती त्यांच्याबरोबर आली असती. आणि ती मुलगी, अरे, ते तिला विसरलेच होते. पण ती नक्कीच झोपलेली असेल. ती होती प्रेमळ, पण ह्या नवऱ्याने तिला एवढं थोडंसं काही दिलं होतं, तिच्या इतर नवऱ्यांनी दिलेल्यापेक्षा फार काही नाही.
आणि जार्विस, त्यांच्या पत्नीला आणि मुलाला गमावून बसलेले. त्यांची सून, नवऱ्याला गमावून बसलेली. मुलं, विशेषतः तो छोट्या, बाप गमावून बसलेली. तो छोट्या आत्ता त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला - प्रसन्नपणे हसत. 'मी गेलो, की डोत्शेनीमधून एक झळाळी निघून जाईल' असं निस्संकोच आणि निर्व्याजपणे म्हणणारा. आनंदानी खदखदुन हसणारा.
आणि आता आफ्रिकेमधल्या, ह्या प्रिय मायदेशामधल्या लोकांसाठी. परमेश्वर अफ़्रिकेचं रक्षण करो. पण अशी ही सुरक्षित आफ्रिका बघायला ते नसतील, कारण तो दिवस अजून बराच पुढे, भविष्यकाळात आहे. कारण काही लोकांना त्याचीच भिती आहे. खरं सांगायचं, तर काही लोकांना त्यांची भिती आहे, त्यांच्या बायकोची, सिमांगुची आणि त्या तरुण शिक्षकाची. आणि एवढं काय भयानक आहे त्यांच्या आकांक्षांमध्ये, त्यांच्या तडफडीमध्ये? माणसांनी जिथे त्यांचा जन्म झाला, त्या भूमीमध्ये ताठ मानेनी चालावं, त्यांच्या श्रमांची, त्यांच्या मातीतून उगवलेली फळं चाखावीत, असं वाटण्यामध्ये काय एवढं अघोरी आहे? आणि तरीही माणसं त्याला घाबरतात. एक अशी भिती, जी खूप खोल आहे, हृदयाच्या तळाशी आहे; एवढी खोल, की ते त्यांचा चांगुलपणा लपवून ठेवतात. बाहेर येतो तो खुनशीपणा आणि संताप, आणि भेदक नजर. ते घाबरलेले आहेत, कारण ते संख्येनी एवढे कमी आहेत. ही भिती घालवायचा एकच मार्ग - प्रेमानी.
सिमांगु - ज्याने कधी कोणाचा द्वेष केला नव्हता - म्हणाला होता, माझ्या काळजात एकच भिती आहे; जेव्हा ते प्रेम करायला शिकतील, तेव्हा त्यांना जाणवेल की आपण द्वेषाकडे वळलो आहोत. केवढे गंभीर आणि क्लेशकारक शब्द!
* * *
त्यांना पुन्हा जाग आली, तेव्हा पूर्वेला अंधुकसा बदल झाला होता. त्यांनी घाबरून एकदम घड्याळाकडे पाहिलं. पण चारच वाजले होते; त्यांचा जीव भांड्यात पडला. आता उठायला हवं. त्यांच्या मुलाला कदाचित जाग केलेलं असेल. तयार व्हायला सांगितलं असेल. ते उठले, आणि धड उभेही राहू शकेनात, एवढे त्यांचे पाय थंड आणि बधिर झाले होते. त्यांनी पूर्व दिशा नीट दिसेल अशी जागा शोधली. सूर्योदयाबरोबर ते बहुतेक शिक्षा अंमलात आणणार असतील.
त्यांनी ऐकलं होता, की अशा दिवशी जे हवं ते खायला देतात. माणसाने अशा वेळेला खायला मागणंही विचित्रच ना? शरीराला भुकेची जाणीव कशी होत असेल? कुठच्या तरी आदिम शक्तीनी, जिला कल्पना नाहीय की मृत्यू एवढा जवळ आहे? तो मुलगा शांत असेल? गपचूप कपडे बदलत असेल? डोत्शेनीची आठवण येत असेल त्याला? डोळ्यात पाणी येत असेल त्याच्या; पुसून टाकून मर्दासारखा रहात असेल उभा तो? म्हणेल, मला खायला नको, मला प्रार्थना करायची आहे? सिमांगु तिथे गेला असेल, का फादर विन्सेंट? का आणखीच कोणीतरी, त्याला धीर द्यायचं आणि उपदेश करायचं काम सोपवलेला? त्याला होत असेल आता पश्चात्ताप? का फक्त भितीलाच जागा असेल त्याच्या मनात? काहीच नाही करता येणार आता? कोणी देवदूत नाही येऊ शकणार, ओरडून सांगायला, हे काम देवाचं आहे, माणसाचं नाही; बाळ, चल माझ्याबरोबर?
त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यांना पूर्वा हळूहळू उजळतांना दिसली. त्यांनी स्वतःला शांत केलं, तो भरड केक आणि चहा बाहेर काढून दगडावर ठेवला. देवाचे आभार मानले, केक खाल्ला आणि चहा प्यायला. मग त्यांनी प्रामाणिकपणे मनःपूर्वक एक प्रार्थना केली. प्रत्येक आळवणीनंतर, ते डोळे उघडून पूर्वेच्या दिशेला नजर टाकत. पूर्वा जास्त जास्त उजळत होती. शेवटी त्यांच्या लक्षात आलं आता काही फार वेळ नाही. त्यांनी अंदाजानी डोक्यावरची हॅट काढून जमिनीवर ठेवली, आणि हात एकमेकात गुंफून ते स्तब्ध उभे राहिले. ते असे उभे असतांनाच सूर्योदय झाला.
* * *
होय, ही पहाटच अवतरली आहे. टिटवी झोपेतून जागी झाली आहे. माळावर एकाकी साद घालण्याचं तिचं काम करायला लागली आहे. सूर्याने इंगेली आणि ईस्ट ग्रीकालॅंडची पर्वतशिखरं उजळून टाकायला सुरुवात केली आहे. उम्झीम्कुलूचं विस्तीर्ण खोरं अजून काळोखात आहे, पण उजेड तिथे पोचणार आहे. डोत्शेनी अजून काळोखात आहे, पण उजेड तिथेही पोचणार आहे. कारण आता पहाट झाली आहे. गेली हजारो शतकं, ज्या अचूकपणे ती होत आली आहे, तशीच, पुन्हा एकदा.

ती दुसरी पहाट...
आपल्या मुक्तीची
गुलामीच्या भितीपासून आणि भितीच्या गुलामीपासून सुटकेची
ती कधी येणार? 

ते मात्र एक कोडं आहे!


-     

Comments