भाषांतर - ३५

डोत्शेनीमध्ये, आणि त्याच्या आजूबाजूच्या शेतांमध्येही नांगरणी सुरु झाली आहे. पण आता ती बऱ्याच धिम्या गतीनी चालली आहे. कारण त्या तरुण शेतकी शिक्षकाने आणि मागोमाग मुखीयाने आदेश दिला आहे, टेकडीच्या चढ-उतारावर भरमसाट नांगरणी करायची नाही. त्यांनी मातीच्या भिंती उभारल्या आहेत. आता टेकड्यांच्या बाजूबाजूनी गोलगोल नांगरणी चालली आहे. त्यामुळे शेतंही आता पूर्वीपेक्षा वेगळी दिसतात. बायका आणि मुलं शेण गोळा करतात, पण जमिनीच्या हिशेबात ते एवढं थोडंसं आहे, की मुखीयाने एक गोठा बांधायचा हुकुम सोडला आहे. गाई-गुरं गोठ्यात राहिली की शेण गोळा करणं सोपं जाईल. पण त्यात अडचण अशी आहे की गोठ्यात खायला काहीच नसणार आहे. ह्या सगळ्या कहाण्या ऐकून तो शिक्षक खेदाने मान हलवतो, पण म्हणतो पुढच्या वर्षी परिस्थिती सुधारेल. त्याने लोकांना सांगितलंय, गेल्या वर्षीचा जुना मका रोपणीसाठी वापरायचा नाही, फेकून द्या, ते बी कुचकामी आहे. तो जार्विस साहेबांकडून नवीन जास्त चांगलं बी आणेल. अर्थात लोकांनी काही जुना मका फेकून नाही दिला, रोपणीला नाही तर खायला तरी येईलच ना वापरता.
पण ही काही जादूची कांडी फिरली नाहीय. अनेक बैठकी, आणि सभा, आणि रुसवे आणि अबोले झाले. मुखियाच्या भितीने ह्यातून काही निष्पन्न तरी झालं. ज्यांना त्यांची शेतं सोडून द्यावी लागली, ते सगळ्यात असंतुष्ट होते. त्याच्या जमिनीचा हिस्सा हे धरण खाणार होतं, म्हणून कुलुसेचा भाऊ किती दिवस कोणाशी बोलत नसे. त्याला बदल्यात मिळालेल्या छोट्याशा फालतू जमिनीवरही तो नाखूष होता. शेवटी उम्फुन्डीसना त्याचं मन वळवावं लागलं. त्याच्या भावाचं बाळ उम्फुन्डीसनी मिळवून आणलेल्या दुधामुळे वाचलं असल्यामुळे, त्याला त्यांना नकार देणं शक्य नव्हतं.
मुखीयाने कल्पना दिली होती, की तो याहीपेक्षा कठोर नियम जारी करणार आहे. शिक्षक तर हे नियम आत्ताच केले नाहीत म्हणून नाखूष होता. पण ह्या सगळ्या गोष्टी लोकांवर एकदम लादणं शक्य झालं नसतं. शिक्षक म्हणे, त्याला आशा आहे की ह्या वर्षी सुद्धा लोकांना कित्येक सुधारणांचं फळ बघायला मिळेल. पण जमिनीचा अत्यंत निकृष्ट कस बघून मात्र तो खेदाने मान हलवत असे.
सरकार मुखीयाला एक बैल देणार आहे अशी अफवा होती. शिक्षकाने कुमालोंना सांगितलंही होतं, की फारच तुटपुंज दूध देणाऱ्या काही भाकड गायींची विल्हेवाट लावायला हवी. पण ह्याचा कधी सभांमध्ये उल्लेख झाला नव्हता. गायी-गुरांना सम्पत्ती मानणाऱ्या लोकांना हे समजावणं, अगदी भाकड आणि म्हाताऱ्या गायींबद्दल सुद्धा, कठीण जाणार होतं.
सगळ्यात मोठा चमत्कार होता, एक भलंमोठं अवजार. हे म्हणे युद्धात सुद्धा वापरलं जात होतं. ते कुलुसेच्या भावाची जमीन खणून, माती त्या काठ्यांपर्यंत ढकलू शकत असे. उंच उंच ढिगारे रचत. कुलुसेचा भाऊ सुद्धा रडक्या चेहऱ्याने हे बघताबघता, मध्येच हसू लागतो; पण पटकन भानावर येउन चेहरा पुन्हा रडका करतो. त्याला एकच समाधान आहे. पुढच्या वर्षी, झुमा आणि त्याचा भाऊ, दोघांनाही धरणाच्या खाली येणारी त्यांची जमीन सोडून द्यावी लागणार आहे. तिथे गोऱ्या माणसाने दिलेलं गवत लावायचंय. त्याला धरणामधून पाणी मिळेल. आणि ते कापून गायींच्या गोठ्यात ठेवायचं आहे. धरणासाठी त्याची जमीन गेली म्हणून त्याला दुःख झालं, तेव्हा झुमा आणि त्याचा भाऊ दात काढून हसले होते ना!
खरोखरच ह्या खोऱ्यात काहीतरी नवीन घडतंय. एक नवं जीवन, एक नवीन प्राण. घराघरातून त्याचीच चर्चा चाललीय. अजून प्रत्यक्ष काही दिसत नसलं, तरी काहीतरी घडतंय नक्कीच.
* * *
-    दुसरा एक नेपोलिअन होता. त्यानेही बऱ्याच गोष्टी केल्या. एवढ्या गोष्टी केल्या, की त्याच्याबद्दल पुस्तकं लिहिली आहेत लोकांनी.
तो शिक्षक हसला, आणि त्याने नजर जमिनीवर खिळवली. एक बूट दुसऱ्यावर घासत राहिला.
-    तुला अभिमान वाटायला हवा. ह्या खोऱ्यामध्ये नवजीवन घडतंय. मी इथे एवढी वर्षं आहे, पण एवढ्या उत्साहाने नांगरणी मी प्रथमच बघतो आहे. काहीतरी नवीन घडतंय. नुसता पाऊस नव्हे; अर्थात त्यानेही उत्साहात भर पडतेच आहे. पण भविष्याबद्दल एक प्रकारची आशा आहे, जी मी पूर्वी कधी बघितली नव्हती.
-    तुम्ही अपेक्षा फार उंचावून ठेवता कामा नये. ह्या वर्षात फार घडेल अशी माझी स्वतःची अपेक्षा नाही. हं, मका थोडा जास्त उंच वाढेल, पीक थोडं जास्त चांगलं येईल. पण जमीन अजूनही फारच निकस आहे.
-    पण पुढच्या वर्षी गोठा असेल.
-    होय, तो तरुण उत्साहाने म्हणाला. बरंच शेण त्या गोठ्यात साठवून ठेवता येईल. उम्फुन्डीस, लोकांनी मला कबुल केलंय की थंडी जरी जास्त पडली तरीही ते गोवऱ्या करून जाळणार नाहीत.
-    आणि झाडं मोठी व्हायला किती काळ जाईल, तुला वाटतं?
-    बरीच वर्षं. तो खेदाने म्हणाला. उम्फुन्डीस, मला सांगा; हे लोकं सात वर्ष हिवाळा सहन करतील?
-    धीर धर, बाबा. मी आणि मुखिया दोघंही तुझ्या पाठीशी आहोत ना?
-    मला ते धरण कधी पुरं होईल असं झालंय. एकदा का ते झालं, की कुरणाला पाणी पुरवठा होईल. तुम्हाला सांगतो, उम्फुन्डीस, तो अधीरपणे म्हणाला, ह्या खोऱ्यामध्ये दुधाची चंगळ होईल. गोऱ्या माणसाकडून दूध घेण्याची वेळ येणार नाही.
कुमालोंनी त्याच्याकडे बघितलं.
-    काय होईल गोऱ्या माणसाकडच्या दुधाशिवाय आपलं? गोऱ्या माणसाने हे जे सगळं आपल्यासाठी केलं, त्याशिवाय काय होईल आपलं? तुझं काय होईल? तू त्याच्याकडे तर नोकरी करतोस ना?
-    माझा पगार ते देतात हे खरं. तरुण हट्टीपणे म्हणाला. मी काही कृतघ्न नाही.
-    मग तू असं बोलणं बरोबर नाही, कुमालो रागावून म्हणाले.
त्यांच्यात एक दुरावा झाल्यासारख झालं. शेवटी तरुण हळूच म्हणाला, उम्फुन्डीस, मी इथे पूर्ण मन लावून काम करतो, आहे का नाही?
-    ते खरंच आहे.
-    मी असं मन लावून काम करतो, कारण मी ते माझ्या देशासाठी, माझ्या माणसांसाठी करतो आहे. वाटेल त्या मालकाकडे मी नोकरी नाही करणार.
-    मालकच नसता, तर तुला नोकरीही मिळाली नसती ना?
-    मला समजतंय तुमचं म्हणणं. आणि हा माणूस सज्जन आहे. मला कौतुक आहे त्यांच्याबद्दल. पण हे असं असता कामा नये.
-    मग कसं असायला हवं?
-    असं नाही, तरुण आपला हेका न सोडता म्हणाला.
-    मग कसं?
-    उम्फुन्डीस, गोऱ्या माणसाने आपल्याला एवढीशीच जमीन दिली. आणि गोऱ्या माणसाने आपल्याला त्याची कामं करण्यासाठी त्या जमिनीपासून लांब नेलं. आपणही अडाणी होतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे खोरं उजाड झालंय. म्हणून मी म्हणतो, गोरे लोक जे करतात, ती नुसती परतफेड आहे.
-    मला ही असली भाषा आवडत नाही.
-    मला समजतं उम्फुन्डीस, अगदी पूर्णपणे समजतं मला. पण एका प्रश्नाचं उत्तर द्या मला.
-    कसला प्रश्न?
-    तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये नेहमी म्हणता, तसं हे खोरं पूर्ववत झालं, तर इथे परत येणाऱ्या सगळ्या लोकांना ते पुरेसं होईल?
-    मला खरंच माहिती नाही.
-    पण मला माहिती आहे उम्फुन्डीस. हे खोरं आत्ता इथे आहेत त्यांच्यासाठी चांगलं करू शकू आपण. पण मुलं मोठी झाली की, पुन्हा हे कमी पडेल. काही लोकांना बाहेर जावंच लागेल.
कुमालो गप्प झाले, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. एक सुस्कारा सोडून ते म्हणाले, माझ्या तुलनेत तू फारच हुशार आहेस.
-    सॉरी, उम्फुन्डीस.
-    नाही, सॉरी कशाबद्दल? हे तर उघडच आहे, की तुला सत्याबद्दल आस्था आहे.
-    मला असं शिकवलं होतं, उम्फुन्डीस. एका गोऱ्या माणसाने. साधी शेती नीट करायची तर ती सत्याशिवाय होऊ शकत नाही.
-    फार सुज्ञ होता तो माणूस.
-    त्यानेच मला शिकवलं होता, की आपण कोणा एका माणसासाठी काम नसतं करायचं, आपण देशासाठी आणि लोकांसाठी करायचं असतं काम, पैशासाठी सुद्धा नव्हे.
कुमालो भारावून गेले. म्हणाले, असे तुझ्यासारखा विचार करणारे बरेच लोक असतील?
-    मला माहिती नाही उम्फुन्डीस, बरेच आहेत का नाही. पण थोडे नक्कीच आहेत. तो जोशात म्हणाला, आपण आफ्रिकेसाठी काम करायचं, ह्या नाहीतर त्या, गोऱ्या नाहीतर काळ्या माणसासाठी नाही, आफ्रिकेसाठी.
-    तू दक्षिण आफ्रिका का म्हणत नाहीस?
-    शक्य असतं तर म्हटलं असतं. तो तरुण खालच्या आवाजात म्हणाला. एक सेकंद विचार करून म्हणाला, आपलं राष्ट्रगीत आहे ना 'परमेश्वर आफ्रिकेच रक्षण करो'. मग जे गीत गातो, तसच आम्ही बोलतो.
-    काळोख पडत चाललाय. आपल्याला जेवणासाठी तयार व्हायला हवं.
-    गैरसमज करून घेऊ नका, उम्फुन्डीस. तरुण आर्जवाने म्हणाला. मी राजकारणी नाहीय. मला तुमच्या ह्या खोऱ्यामध्ये कारस्थानं करायची नाहीत. मला त्याचं फक्त पुनरुज्जीवन घडवायचय.
-    देव तुझी इच्छा पुरी करो, कुमालो तेवढ्याच गंभीरपणे म्हणाले. एक गोष्ट सांगतो.
-    काय, उम्फुन्डीस?
-    मी काही तुझे विचार बदलू शकणार नाही. एवढा खोल विचार तुझ्यासारख्या तरुणाने करावा हे चांगलंच आहे. पण कोणाचाही दु:स्वास करू नको, आणि कोणावरही सत्ता गाजवायची इर्षा बाळगू नको. माझ्या एका मित्राने मला शिकवलं, सत्ता नेहमीच भ्रष्ट करते.
-    उम्फुन्डीस, मला कोणाचाही दुःस्वास नाही, आणि मला कोणावरही सत्ता गाजवायची नाही.
-    चांगलंच आहे ते. आपल्या देशात पुरेसे हेवेदावे आणि दुःस्वास आधीच आहे.
तरुण घरामध्ये हात धुवायला गेला. कुमालो थोडा वेळ काळोखातच उभे राहिले. त्यांच्या खोऱ्यावर चांदण्या चमकत होत्या. हे खोरं पूर्ववत होणार होतं. त्यांच्या दृष्टीनी तेवढंच पुरेसं होतं. त्यांचं आयुष्य संपतच आलं होतं. हे असले नवीन खळबळजनक विचार समजायला ते फार म्हातारे झाले होते. त्यांना त्याचा त्रास होत होता. कारण हे विचार बऱ्याच गोष्टींवर आघात करत होते. त्या उत्तुंग-विहारमधल्या गंभीर गप्प माणसावर आघात करत होते. ह्या माणसाने एवढ्या खोल दुःखानंतर एवढी खोल अनुकंपा दाखवली होती. होय, ते फार म्हातारे झाले होते असल्या नवीन आणि वेगळ्या विचारांसाठी. गोऱ्यांचा कुत्ता म्हणतात, त्यांच्यासारख्या लोकांना. काय करणार, त्यांचं आयुष्य तसं गेलं होतं, आणि तसेच ते मरणार होते.
ते वळले, आणि त्या तरुणामागे घरात गेले. 

Comments