कुमालो त्यांच्या चर्चमध्ये
डोत्शेनीच्या पुनरुज्जीवनासाठी रोज प्रार्थना करू लागले. पण त्यांना माहिती होतं, की
नुसतं तेवढं पुरेसं नाही. इथे, ह्या पृथ्वीवर, लोकांनी एकत्र यायला पाहिजे, विचार करायला
पाहिजे, काहीतरी काम करायला पाहिजे. त्यांच्या गावात बघायचं तर त्यांच्या डोळ्यापुढे
दोनच माणसं उभी राहिली - गावाचा मुखिया आणि शाळेचा हेडमास्तर. हा जो मुखिया होता, तो
चांगला गलेलठ्ठ धिप्पाड माणूस होता. घोडेस्वार घालतात तसल्या तंग तुमानी घालणारा, आणि
बर्फाळ प्रदेशातले लोक घालतात तसल्या फरच्या टोप्या घालणारा. नेहमी त्याच्या सल्लागार
साथीदारांबरोबर फिरत असे. ते कसला सल्ला त्याला देत असत, कोणास ठाऊक. हेडमास्तर बारक्याशा
चणीचा, हसतमुख चेहऱ्याचा, भलामोठा गोल चष्मा लावणारा माणूस होता. त्याचं ऑफिस नेहमी
लाल, निळ्या आणि हिरव्या रंगांच्या सुचनापत्रकांनी भरलेल असे. कुमालोंनी धोरणीपणाने,
आधी मुखीयाला भेटायचं ठरवलं.
सकाळी आधीच कमालीचा
असह्य उकाडा जाणवत होता, आकाशात एक ढग नव्हता आणि पावसाचं काही चिन्हही नव्हतं. असला
दुष्काळ कधी ह्या भागात पडला नव्हता. जमातीमधल्या सगळ्यात वयस्कर म्हाताऱ्यांना सुद्धा
एवढे वाईट दिवस कधी बघितल्याचं आठवत नव्हतं. हिवाळ्यात गळतात तशी झाडावरची पानं शुष्क
होऊन गळून पडत होती. जमीन एवढी तापलेली, की चांगली निबर पायाची मुलं सुद्धा एका सावलीतून
दुसऱ्या सावलीत धावत धावत चालायची. गवतावर चालावं, तर ते कोरडंठाण गवत काटक्यांसारखं
पायाखाली कडाकडा वाजे. सबंध खोऱ्यामध्ये एकही वाहता झरा शिल्लक राहिला नव्हता. वरच्या
भागातलं गवतसुद्धा पिवळं पडलं होतं. खाली काय आणि वरती काय, कुठेच नांगरणी होत नव्हती.
सगळीकडे निर्दय आकाशातून सूर्य नुसती आग ओकत होता. रोडावलेली गाई-गुरं निष्प्राणपणे
माळावरून कोरड्या पडलेल्या झऱ्यांच्या बाजूनी, काठावरच बारीकस गवत खात फिरायची.
कुमालो टेकडी चढून
मुखियाच्या घरी आले. तिथे त्यांना थोडी वाट बघायचा हुकूम झाला. त्यात काही नवीन नव्हतं.
मुखिया काय, केवळ तो मुखिया आहे म्हणून कोणालाही थांबवून ठेऊ शकत असे. त्याच्या मनात
आलं, तर तो नुसता दात कोरत बसला असला, किंवा बाहेर आकाशात नजर लावून दिवास्वप्नं बघत
असला तरी एखाद्याला बाहेर थांबवून ठेऊ शकत असे. पण कुमालोंना थोडं टेकायला मिळालं ह्याचं
बरंच वाटलं. त्यांनी त्यांचा कोट काढला, आणि झोपडीच्या सावलीत ते बसून राहिले, ह्या
मुखियाच्या आयुष्याचा विचार करत. ह्या असल्या ओसाडगावाचा मुखिया होण्यात काय गंमत असेल?
ही गोऱ्या माणसाची करामत होती. आधी त्याने ह्या मुखीयांना खाली खेचून काढलं, त्यांचा
सगळा मांडलेला डाव उधळला; मग त्यांना पुन्हा वर चढवलं, उरल्यासुरल्या तुकड्यांची देखभाल
करायला. पण गोरा माणूस बरेचसे चांगले तुकडे घेऊन गेला होता. आता हे मुखीये बसलेत उद्दामपणे.
तांबड्याजर्द डोळ्यांनी त्यांचं दयनीय, निरर्थक साम्राज्य न्याहाळत. सगळेच तसे नव्हते;
काहींनी त्यांच्या लोकांना मदत करायचा प्रयत्नही केला. काहीजण त्यांच्या मुलांना शाळेत
पाठवत होते. सरकार मदत करत होतं. पण हे सगळं म्हणजे म्हाताऱ्याला दुध पाजून, तो एक
दिवस जवानमर्द होण्याची स्वप्नं बघण्यासारखं होतं.
कुमालो दचकुन एकदम
भानावर आले. त्यांना जाणवलं जोहानसबर्गच्या प्रवासामध्ये त्यांची जगाची समज किती दूरवर
पोचली होती. त्या महानगराने त्यांना एक नवीन दृष्टीकोन बहाल केला होता, जो यापुढे आता
कायम वापरायला हवा. तिथे जोहानसबर्गमध्ये चाललेल्या घटनांना कुठल्याही मुखीयाशी काही
देणंघेणं नव्हतं. पण ते चटकन उठून उभे राहिले, कारण आता मुखियाच्या दरबारात दाखल व्हायचा
हुकुम झालेला होता.
त्यांनी मुखीयाला,
भाषेमध्ये गोळा करता येईल तेवढा सर्व आदर एकवटून नम्रपणे अभिवादन केलं. त्याचे तीक्ष्ण
कान त्यांचा प्रत्येक शब्द टिपत असतील ह्याची त्यांना कल्पना होती.
-
तर मग
उम्फुन्डीस, काय मागणं घेऊन आला आहात?
-
महाराज,
मी जोहानसबर्गला जाऊन आलो आहे.
-
मला माहिती
आहे ते.
-
महाराज,
आपले बरेच लोक तिथे आहेत.
-
हुं.
-
आणि महाराज,
माझ्या मनात आलं की आपण त्यांना इथे ह्या गावांमध्येच ठेऊन घ्यायचा प्रयत्न करायला
हवा.
-
वा! आणि
हे कसं करणार आपण?
-
फार उशीर
होण्यापूर्वी आपल्या जमिनीची आपणच काळजी घेऊन. जमिनीची निगा कशी राखायची हे त्यांना
शाळेतच शिकवून. मग कदाचित, त्यातले काहीजण तरी डोत्शेनीमध्येच राहतीलही.
यानंतर मुखिया त्याच्याच
विचारांमध्ये गप्प होता. आणि तो असा विचारमग्न असतांना काही बोलून त्याला त्यातून बाहेर
आणणं रीतीला धरून होणार नाही. पण कुमालोंना दिसत होतं, की मुखीयाला काय बोलायचं ते
समजत नव्हतं. कुमालो मध्ये बोलायला एक-दोनदा सरसावले, पण स्वतःच जीभ चावून थांबले,
का त्यांनाच वाक्य कसं जुळवायचं कळेना म्हणून थांबले सांगणं कठीण होतं. आणि हे खरच
आहे, कित्येकदा माणूस गप्प होऊन विचार करत रहातो, जेव्हा त्याने आधीच विचार करकरूनही
न सुटलेलीच गंभीर समस्या घेऊन दुसरं कोणीतरी त्याच्याकडे येत.
शेवटी त्याने तोंड
उघडलं, आणि तो म्हणाला ह्या गंभीर प्रश्नावर मी स्वतः बऱ्याच वेळा विचार केला आहे.
-
होय, महाराज.
-
आणि मी
ठरवलंय काय करायला हवं.
-
होय, महाराज.
-
म्हणूनच
मला समाधान झालं, की तुम्हीही ह्याच्यावर विचार केला आहे.
पुन्हा एकदा शांतता.
कुमालोंना दिसत होतं, की महाराज शब्द जुळवत आहेत.
-
उम्फुन्डीस,
तुम्हाला माहिती आहेच आपण ह्या गोष्टी शाळांमध्ये बरीच वर्ष शिकवत आहोत. गोरा शिक्षणाधिकारी
आणि मी बऱ्याच वेळा ह्याबद्दल बोललोही आहोत.
-
मला माहिती
आहे, महाराज.
-
तो अधिकारी
लवकरच परत येणार आहे. आणि आपण ह्या गोष्टीची त्याच्याबरोबर चर्चा करू.
महाराजांनी भाषण आशेच्या
आणि दिलाशाच्या सुरात संपवलं. त्या दोघांमध्ये ह्या प्रश्नाचा निकाल लागला आहे असा
त्याचा सूर होता. कुमालोंना समजत होतं, थोडक्यात, ही भेट आता संपली. असं करणं खरं म्हणजे
उचित नव्हतं, तरी सगळा धीर एकवटून ते आणखी बोलायची इच्छा आहे असं दर्शवित म्हणाले,
महाराज?
-
हुं.
-
महाराज,
हे खरं आहे की ह्या गोष्टी कित्येक वर्ष शिकवल्या जाताहेत. पण जिथे हे शिकवलं जातं
ती जागा अतिशय भयानक आहे. तिथे चारा नाही का पाणी नाही. कधीमधी जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा
शेत पुरुषभर उंचीचं सुद्धा नाही वाढत. गाई गुरं उपाशीपोटी मारताहेत, म्हणून दूध नाही.
मालुसीचा मुलगा गेला, आणि कलुसेचं बाळ मरणपंथावर आहे. आणखी किती तशीच जाणार आहेत, ईश्वरालाच
ठाऊक.
कुमालोंना जाणीव होती,
ते एक कटू आणि कठोर गोष्ट सांगताहेत. आधीच्या छान गोड संभाषणावर बोळा फिरवला गेलाय;
आता कुठच्या प्रश्नाचा निकाल लागत नाहीय. खरं तर मुखीयाला राग आला असेल, कुमालो बोलले
ते खोटं होतं म्हणून नव्हे, तर त्याला त्यांचं प्रश्न सहजपणे गुंडाळून टाकता आला नाही
म्हणून.
-
दुष्काळ
आहे, उम्फुन्डीस. विसरू नका, मोठा दुष्काळ पडलाय.
-
नाही,
मी ते नजरेआड नाही करत; कुमालो नम्रपणे म्हणाले. पण दुष्काळ असो वा नसो, गेली कित्येक
वर्ष हीच परिस्थिती आहे.
मुखिया पुन्हा गप्प
झाला. त्याच्याकडे काही शब्दच नव्हते. तोही बहुतेक मनात विचार करत होता, वेळीच चिडून
ओरडून हा विषय संपवायला हवा होता. पण प्रिस्टवर चिडणं पण सोपं नाही ना.
शेवटी तो नाईलाजानी
म्हणाला, मी बोलतो मॅजिस्ट्रेटशी. मग तो जड आवाजात म्हणाला, तुम्ही जे म्हणताय, ते
माझ्याही नजरेला जाणवलय.
तो आणखी काही काळ गप्प,
स्वतःच्याच विचारात गढून राहिला. मग पुन्हा जड स्वरात म्हणाला, कारण ही कबुली त्याला
कठीण जात होती, मी ह्यापूर्वीही मॅजिस्ट्रेटशी बोललो आहे.
तो कपाळाला आठ्या घालून
विचारमग्न बसून राहिला. कुमालोंच्या लक्षात आलं, की ह्यापुढे ह्या भेटीतून काही निष्पन्न
होणार नाही. त्यांनी हळूहळू उठायची हालचाल केली, म्हणजे महाराज त्यांचा निरोप घेतील.
ती आज्ञा व्हायची वाट बघत असतांना, त्यांनी महाराजांच्या मागे उभ्या असलेल्या दोन सल्लागारांकडे
बघितलं. तेही दोघे महाराजांसारखे कपाळाला आठ्या घालून विचारमग्न होते. देण्यासारखा
काही सल्ला त्यांच्याकडे नव्हता. कारण, मोडलेल्या जमातीचे सल्लागार इतर बरेच सल्ले
देऊ शकतात - पण मोडलेल्या जमातीबद्दल मात्र नाही. मुखिया थकून उठून उभे राहिला. त्याने
कुमालोंचा हात हातात घेतला. म्हणाला, मी जाऊन भेटेन मॅजिस्ट्रेटला. जपून जा, उम्फुन्डीस.
-
जपून रहा,
महाराज.
कुमालो टेकडी उतरून
खाली आले आणि तडक चर्चमध्ये गेले. त्यांनी तिथे मुखीयासाठी आणि डोत्शेनीच्या पुनरुज्जीवनासाठी
प्रार्थना केली. चर्चची लाकूड आणि लोखंड वापरून बनवलेली इमारत एखाद्या भट्टी सारखी
धगधगत होती. त्या जीवघेण्या उकाड्यामध्ये त्यांची निराशा आणखीच बळावली. त्यांनी छोटीशीच
प्रार्थना केली, परमेश्वरा, आता डोत्शेनीचं भलंवाईट तुझ्याच हातात रे बाबा! मग ते पुन्हा
त्या रणरणत्या उन्हात शाळेच्या हेडमास्तरला शोधायला निघाले.
इथेही त्यांच्या पदरी
आणखी निराशाच आली. तो ढबोळा चष्मा घातलेला मास्तर आस्थेनी बोलला. त्याने कुमालोंना
'कार्यप्रणाली' म्हणून काही भानगड दाखवली, फुलांची आणि बियांची चित्रं दाखवली, ट्यूबमध्ये
भरून ठेवलेली माती दाखवली. मुलांचं जीवन आणि भोवतालचं सामाजिक जीवन ह्यांची सांगड घालण्यासाठी
शाळा कशी कार्यरत आहे, पीटरमरीत्झबर्ग मधल्या शिक्षणखात्याकडून त्यासंबंधी आलेली पत्रकं
ह्या सगळ्याची त्याने बरीच माहिती दिली. त्या तळपत्या उन्हात कुमालोंना बाहेर नेउन
शाळेची बाग दाखवली - हे तसं बघितलं तर पुस्तकी ज्ञानंच होतं, कारण पाण्याच्या अभावापायी
संपूर्ण बाग मरूनच गेली होती. कदाचित पुस्तकी नाही म्हणता येणार, कारण सबंध खोऱ्यामधल्या
इतरही अनेक गोष्टींनाही मरणकळाच आली होती, मुलंसुद्धा मरून पडत होती.
कुमालोंनी हेडमास्तरना
विचारलं काय केल्यानी मुलांना गावामध्येच ठेऊन घेता येईल. मास्तरांनी नकारार्थी मान
हलवली. ते आर्थिक-सामाजिक कारणांबद्दल बरंच बोलले आणि म्हणाले मुलांना रोखून ठेवणं
शाळेच्या आवाक्यात नाही. कुमालो त्यांच्या चर्चमध्ये परत गेले आणि निराश विमनस्क होऊन
बसून राहिले. एझेन्झेलेनीला त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिलेली भव्य स्वप्नं, एवढ्या
दुःखातून बाहेर काढू शकणारी स्वप्नं - कुठे गेली ती? एक प्रिस्ट त्याचा गांव आदर्श
गांव करणार होता, तिथल्या मुलांना पुढच्या आयुष्यासाठी योग्य ते शिक्षण देऊन तयार करणार
होता. म्हणजे काय, ते झाले म्हातारे; संपलं सगळं? त्यांचं स्वप्न फक्त स्वप्नच रहाणार?
ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्यापलीकडे गेल्या आता? फक्त एखादी दैवी शक्तीच असा बदल घडवून
आणू शकेल? मग त्यांनी पुन्हा एकदा आळवणी केली, परमेश्वरा, आता डोत्शेनीचं भलं-वाईट
तुझ्याच हातात रे बाबा!
ते घरात गेले, आणि
त्या जबरदस्त उकाड्यामध्ये चर्चचे हिशेब तपासत बसले. थोड्या वेळानी त्यांना घोड्याच्या
टापांचा आवाज आला, मग तो चर्चच्या बाहेर येउन थांबला. ते खुर्चीवरून उठले आणि बाहेर
गेले; ह्या असल्या रणरणत्या उन्हात कोण घोड्यावर बसून निघालंय ते बघायला. एक सेकंद
आश्चर्याने त्यांचा श्वासच अडखळला एक लहान गोरा मुलगा, एका लाल घोड्यावर बसून आला होता...
अगदी तस्साच, एक लहान मुलगा पूर्वी येत असे त्याच्याचसारखा.
तो मुलगा कुमालोंकडे
बघून हसला आणि टोपी उंचावून म्हणाला गुड मॉर्निंग. त्याने असं करावं ह्याचं कुमालोंना
खूप कौतुक वाटलं, एक प्रकारे भरून आलं आणि आश्चर्यही वाटलं ह्या मुलाला इथली प्रथा
माहिती नसावी ह्याचं.
-
गुड मॉर्निंग,
छोटे साहेब! घोड्यावरून रपेट करायला आज फार गरम नाही?
-
मला नाही
वाटत एवढं गरम. हे तुमचं चर्च आहे?
-
होय, माझं
आहे.
-
मी चर्चच्या
शाळेत जातो, सेंट मार्क्सच्या. जोहानसबर्गमधली सगळ्यात छान शाळा. आमचंही एक प्रार्थनामंदिर
आहे तिथे. सेंट मार्क्स!
-
कुमालो
कौतुकाने उद्गारले, वा! तुमचं प्रार्थना मंदिर ह्याच्यापेक्षा कितीतरी छान असेल.
-
हो...
आहे खरं जास्त चांगलं.. पण ते शेवटी शहरात आहे ना? हे घर तुमचं आहे?
-
हो, माझं
आहे.
-
मी आत
येउन बघितलं तर चालेल? मी अजून कधी प्रिस्टचं - म्हणजे काळ्या प्रिस्टचं घर आतून बघितलं
नाहीय.
-
या ना,
छोटे साहेब. आत येउन बघा.
मुलगा घोड्यावरून उतरला
आणि धावतच घोड्यांना बांधायला केलेल्या खांबांजवळ गेला. मग घराबाहेरच्या जीर्णशीर्ण
पायपुसण्यावर बुटांची धूळ झटकून, टोपी हातात काढून घेऊन तो घरात आला.
-
छान आहे
तुमचं घर, मला वाटलं नव्हतं एवढं छान असेल. तो म्हणाला.
-
आमची सगळ्यांची
घरं अशी नसतात, कुमालो शांतपणे म्हणाले. प्रिस्टला घर चांगलं ठेवायलाच लागतं. तुम्ही
कदाचित आमच्यापैकी इतरांची घरं बघितली असतील.
-
होय तर!
बघितली आहेत, माझ्या आजोबांच्या शेतावरची. ती एवढी चांगली नव्हती. हे काय तुमचं काम
चाललंय का?
-
हो, छोटे
साहेब.
-
गणितासारखं
दिसतय.
-
गणितच
आहे ते. चर्चचे हिशोब आहेत ते.
-
हुं:,
मला नव्हतं माहिती चर्चचे सुद्धा हिशोब असतात, मला वाटलं दुकानं हिशोब ठेवतात.
कुमालो हसले, एकदा,
दोनदा, हसतच राहिले. मुलाने त्यांना विचारलं, हसताय का? तोही हसत होता, त्याला राग
नव्हता आला.
-
उगाच हसतोय,
छोटे साहेब!
-
छोटे,
आणि साहेब! आणि तुम्हाला काय म्हणतात? मी कशी हाक मारू तुम्हाला?
-
उम्फुन्डीस.
-
ओह, इम्फुन्डीस?
-
नाही,
उम्फुन्डीस.
-
हुं:,
उम्फुन्डीस! अर्थ काय त्याचा?
-
त्याचा
अर्थ प्रिस्ट.
-
मी खाली
बसू, उम्फुन्डीस? त्याने तो शब्द सावकाश काळजीपूर्वक उच्चारला आणि म्हणाला, बरोबर?
कुमालो हसू दाबून म्हणाले,
अगदी बरोबर!
-
तुम्हाला
उकडत असेल ना, पाणी हवंय का प्यायला?
-
मला दूध
आवडेल, फ्रीजमधलं, थंड गार दूध! मुलगा म्हणाला.
-
छोटे साहेब,
डोत्शेनीमध्ये फ्रीज नाहीय.
-
बरं, मग
नुसतंच दूध.
-
छोटे साहेब,
डोत्शेनीमध्ये दूधही नाहीय.
मुलगा एकदम लाजला,
आणि म्हणाला उन्फुन्डीस, मला पाणी प्यायला आवडेल.
कुमालोंनी त्याला पाणी
आणून दिलं. तो प्यायला लागल्यावर त्याला विचारलं, इथे किती दिवस रहाणार आहात, छोटे
साहेब?
-
आता खूप
दिवस नाही, उम्फुन्डीस. मुलगा पाणी पीत पीत म्हणाला, ही काही आमची खरी सुट्टी नाही,
आम्ही इथे वेगळ्याच कारणांनी आलोय.
कुमालो त्याच्याकडे
बघत उभे राहिले, मनात म्हणत, अरे पोरक्या मुला, मला माहिती आहे रे तुझं वेगळंच कारण.
-
पाण्याला
अमान्झी म्हणतात ना, उम्फुन्डीस?
त्यांनी उत्तर दिलं
नाही तेव्हा तो परत म्हणाला, उम्फुन्डीस? थोड्या वेळानी पुन्हा, उम्फुन्डीस?
-
बाळ?
-
पाण्याला
अमान्झी म्हणतात ना?
कुमालो त्यांच्या तंद्रीतून
बाहेर आले. त्या छोट्याशा निरागस चेहऱ्याकडे हसून बघत ते म्हणाले, बरोब्बर, छोटे साहेब!
-
आणि घोड्याला
इहाशी.
-
तेही बरोबर.
-
घराला
इकाया?
-
बरोबर!
-
पैशाला
इमाली?
-
बरोबर.
-
आणि मुलाला
उम्फाना, आणि गाईला इन्कोमो?
-
हो, हो,
थांबा जरा; मला श्वास घेऊ दे. मग ते आवंढे गिळत, धापा टाकत, दमल्याचं नाटक करत, खुर्चीत
बसले. लवकरच तुम्ही छान झुलू बोलायला लागाल, ते म्हणाले.
-
झुलू सोप्पी
आहे. किती वाजले, उम्फुन्डीस?
-
बारा वाजले,
छोटे साहेब.
-
अरे बापरे!
मला उशीर झाला. पाणी दिल्याबद्दल थँक्यू हं, उम्फुन्डीस.
मुलगा त्याच्या घोडयाकडे
गेला, मला वर बसायला मदत करा ना, तो ओरडला. कुमालोंनी त्याला मदत केली; मुलगा म्हणाला,
मी तुम्हाला भेटायला परत येईन हं. तुमच्याशी बरंच झुलू बोलायचय.
-
कुमालो
हसले, कधीही या, छोटे साहेब.
-
उम्फुन्डीस?
-
छोटे साहेब?
-
डोत्शेनीमध्ये
दूध का नाही? लोक गरीब आहेत म्हणून?
-
होय, छोटे
साहेब.
-
मग मुलं
राहतात कशी?
-
कुमालोंनी
त्याच्याकडे बघितलं. मुलं मरतात. आत्ता सुद्धा काही मुलं मरायच्या मार्गावर आहेत.
-
कोण?
-
कुलुसेचं
छोटं बाळ.
-
मग डॉक्टर
नाही आला?
-
आला ना.
-
आणि काय
म्हणाला?
-
तो म्हणाला,
बाळाला दूध द्यायला हवं.
-
मग बाळाचे
आई-बाबा काय म्हणाले?
-
ते म्हणाले,
डॉक्टर बरोबर आहे तुमचं.
मुलगा अस्फुट आवाजात
म्हणाला, हुं:! टोपी उंचावून गंभीरपणे म्हणाला, गुडबाय उम्फुन्डीस! घोड्याला टाचही
गंभीरपणेच मारली; पण मग मात्र रस्त्यात अनेक बघ्ये होते, त्यामुळे लौकरच तो जोशात घोडा
दौडवत, गरमागरम धुळीचे लोट उडवत निघून गेला.
* * *
रात्री थोडं गार झालं,
म्हणून थोडा सुसह्य झालं. कुमालो, त्यांची बायको, ती मुलगी आणि मुलगा हे जेवत असतांना
बाहेर चाकांचा आवाज झाला. त्याचा सामान घेऊन येणारा मित्र दारावर टकटक करून आत आला.
-
उम्फुन्डीस.
-
दोस्त!
जेवायला बसणार?
-
नाही खरच,
मी घरी निघालो आहे. तुमच्यासाठी निरोप आहे.
-
माझ्यासाठी?
-
हो, जार्विस
साहेबांकडून. तो लहान गोरा मुलगा इथे आला होता?
कुमालोंच्या छातीत
धडधडलं, आता त्यांना जाणवलं दुपारी काय झालं इथे.
-
हो, आला
होता.
-
आम्ही
तिथे झाडांमध्ये काम करत होतो, तो मुलगा घोड्यावरून परत आला तेव्हा. मला काही इंग्लिश
कळत नाही, पण ते कलुसेच्या बाळाबद्दल बोलत होते एवढं समजलं. आणि हे बघा मी तुमच्यासाठी
काय आणलंय.
दाराबाहेर, गाडीमध्ये
चकाकत्या बरण्यांमध्ये दूध होतं.
-
हे दूध
फक्त लहान मुलांसाठीच आहे, अजून शाळेत सुद्धा जात नसतील अशा मुलांसाठी - तो माणूस रुबाबात
म्हणाला. ते फक्त तुम्ही वाटायचं आहे. ह्या गोणपाटाच्या पिशव्या ओल्या करून त्या बरण्यांवर
घालायच्या. मुलांना सांगा पाणी आणून ह्या पिशव्यांवर घालायला. रोज सकाळी मी येउन ह्या
बरण्या घेऊन जाईन. गवत उगवून, आपल्याला पुरेसं दूध मिळायला लागेपर्यंत.
त्या माणसाने बरण्या
उचलून आत आणल्या, आणि म्हणाला उम्फुन्डीस, कुठे ठेऊ ह्या? कुमालो दिग्मूढ आणि अवाक
होऊन बघतच राहिले होते. म्हणून त्यांची बायको म्हणाली, उम्फुन्डीसची चर्च मधली खोली
आहे तिथे ठेऊया. त्यांनी मिळून त्या बरण्या खोलीत नेउन ठेवल्या. परत निघतांना त्या
माणसाने विचारलं, तुम्हाला जार्विस साहेबांसाठी काही निरोप द्यायचाच असेल ना? कुमालो
नुसतेच अडखळत, चाचरत राहिले आणि शेवटी त्यांनी नुसते आकाशाकडे हात दाखवले. तो माणूस
म्हणाला, परमेश्वर त्यांचं भलं करेल, ना? कुमालोंनी नुसतीच मान हलवली.
तो माणूस म्हणाला,
मी फक्त एक आठवडाच काम करतो आहे त्यांच्या इथे. पण त्यांच्या नुसत्या इशाऱ्यावर जीव
सुद्धा द्यायची तयारी आहे माझी.
तो गाडीत बसला आणि
लगाम हातात घेऊन म्हणाला, हे घेऊन मी घरी जाईन तर माझ्या बायकोला वाटेल मला काय मॅजिस्ट्रेट
केलं की काय! ते सगळेजण हसले. सगळेजण अतिशय खुशीत होते. कुमालो सुद्धा मौन सोडून हसायला
लागले - एकतर हा गावंढळ मनुष्य मॅजिस्ट्रेट होणार म्हणून आणि दुसरं, मॅजिस्ट्रेट अशी
गाडी चालवेल ह्या विचारांनी. एका मोठ्या माणसाने असले विनोद करावेत ह्यावर हसले.
कलुसेचं बाळ कदाचित
जगू शकेल, ह्या विचाराने हसले. उत्तुंगविहार मधल्या त्या गंभीर, शांत माणसाच्या आठवणीने
हसले. हसून हसून घसा कोरडा पडला त्यांचा. ते घरात शिरले, तेव्हा त्यांची बायको त्यांच्याकडे
कुतूहलाने बघत राहिली.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...