भाषांतर - ३२

एका मुलाने दुकानातून चार पत्रं शाळेत आणून दिली. हेडमास्तरांनी ती उम्फुन्डीसच्या घरी पाठवून दिली. सगळी जोहानसबर्ग मधून आलेली होती. अब्सलमकडून त्याच्या बायकोला, आणि त्याच्या आई-वडिलांना - ह्या दोन्हीवर सरकारी शिक्का होता, दोन्ही प्रिटोरियाच्या मध्यवर्ती तुरुंगातून आली होती. तिसरं होतं सिमांगुचं; आणि चौथं मि. कारमायकेल ह्यांचं. हे शेवटचं पत्र कुमालोंनी घाबरतच उघडलं - कारण एकतर ते 'देवाच्या नावानी' काम करणाऱ्या वकिलांकडून आलं होतं, आणि दुसरं म्हणजे ते दयेच्या अर्जासंबंधी असणार. त्यामध्ये त्या वकिलानी अतिशय सौम्य आणि सहानुभूतीपूर्ण शब्दात कळवलं होतं, की दया नाकारली गेली आहे, आणि त्यांच्या मुलाला ह्या महिन्याच्या १५ तारखेला फाशी दिलं जाणार आहे. मग कुमालो आणखी काही न वाचता नुसतेच बसून राहिले - तास, दोन तास. खर तर, नि:शब्दपणे किती काळ गेला त्यांना कळलंही नाही, त्यांच्या बायकोचा आवाज येईपर्यंत. ती म्हणाली, अखेर तो निर्णय आलाय तर, स्टीफन.
त्यांनी मान हलवली.
ती म्हणाली, मला द्या ते पत्र.
थरथरत्या हातांनी त्यांनी ते दिलं, तिनीही वाचून काढलं. ती हरवलेल्या भकास डोळ्यांनी शून्यात बघत राहिली - तिच्या पोटातलं, तिच्या दुधावर वाढलेलं हे मुल होतं ना! तरीही, ती त्यांच्याएवढा काळ बसून नाही राहिली. थोड्या वेळानी उठली, आणि म्हणाली, हे अस नुसतं बसून राहणं चांगलं नाही. तुमची उरलेली पत्रं वाचून घ्या. कुलुसेचं बाळ आता कसं आहे बघायचय, एलिझाबेथला सुद्धा बरं नव्हतं, तिला बघून या. मलाही घरातली कामं आहेत.
-    आणखी एक पत्र आहे, ते म्हणाले.
-    त्याच्याकडून?
-    हो.
त्यांनी ते तिला दिलं. तिने पुन्हा खाली बसून ते उघडलं आणि वाचलं. तिच्या हातात आणि नजरेत आणि चेहऱ्यावर ज्या वेदना होत्या त्या त्यांना दिसल्या नाहीत. कारण ते नुसते जमिनीकडे बघत बसले होते. एवढंच, की त्यांना जमीन दिसत नव्हती; त्यांना काहीच दिसत नव्हतं. त्यांचा चेहरा पार खंगलेला होता, पुन्हा त्याच दुःखाच्या साच्यात अडकला होता. डोत्शेनीमध्ये परतल्यावर काही काळ त्यांना त्याचा विसर पडला होता.
-    स्टीफन, ती जोरात म्हणाली.
त्यांनी तिच्याकडे बघितलं.
-    हे वाचा, पुरं करा आणि आपल्या कामाला लागुया.
त्यांनी ते पत्र घेतलं, आणि वाचलं. लहानसं आणि साधं होतं ते. त्यांच्या रिवाजानुसार पहिली ओळ इंग्लिशमध्ये, आणि उरलेलं पत्र झुलुमध्ये होतं.
प्रिय बाबा आणि आई,
मला आशा आहे, की माझ्याप्रमाणेच तुमचीही तब्बेत चांगली असेल. आज सकाळी मला समजलं, की मी केलेल्या कृत्याबद्दल मला दया दाखवली जाणार नाहीय. त्यामुळे मला तुम्ही, किंवा डोत्शेनी पुन्हा कधी दिसणार नाही.
इथे सर्व ठीक आहे. मी माझ्या खोलीत बंदिस्त असतो. मला भेटायची किंवा माझ्याबरोबर बोलायची कोणालाही परवानगी नाही. पण मला सिगारेट ओढायची, वाचायची किंवा लिहायची परवानगी आहे. गोरी माणस मला वाईट वागवत नाहीत.
प्रिटोरियाहून एक काळा प्रिस्ट मला भेटायला येतो. तो मला उपदेश करतो. माझ्याशी चांगलं बोलतो. आणखी कळवण्यासारखं इथे काही नाही, म्हणून मी पत्र पुरं करतो. मला डोत्शेनीमधल्या तुम्हा सर्वांची खूप आठवण येते. मी जर परत तिथे येऊ शकलो असतो, तर मी ते सोडून कधीच जाणार नाही.
तुमचा, अब्सलम.
बाळ झालं का? मुलगा असला तर मला त्याचं नांव पीटर ठेवायचं आहे. तुम्हाला मॅथ्यू आणि जोहान्सच्या केसबद्दल काही कळलं का? मला साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावलं होतं, पण त्या केसचा शेवट कसा झाला ते मला समजलं नाही.
बाबा, तुम्हाला माझ्या पोस्ट ऑफिस बुकातले पैसे मिळाले का?
-    स्टीफन, आपण जाऊन कामाला लागुया का?
-    हो, ते म्हणाले, ते बरं होईल. पण मला हे सिमांगुचं पत्र अजून वाचायचंय. आणि हे एक पत्र त्या मुलीसाठी आलं आहे.
-    मी देते तिला ते. तुमचं पत्र घ्या वाचून, आणि सांगा मला कुलुसेच्या बाळाला बघायला जाणार आहात का?
-    जाणार आहे.
-    आणि दुकानापर्यंत चालायला जमेल का तुम्हाला?
त्यांनी खिडकीबाहेर बघितलं.  ते बघ, ते म्हणाले, ते बघ. ढग आलेत. ती त्यांच्या बाजूला येउन उभी राहिली. बाहेर उम्झीम्कुलूच्या खोऱ्याच्या पलीकडच्या बाजूला प्रचंड मोठाले ढग गोळा होत होते.
-    पाऊस येणारे. दुकानात कशाला जायला हवंय? तुला कसली तातडीनी गरज आहे का?
-    मला काहीच नकोय, स्टीफन. पण मला वाटलं, तुम्ही दुकानातल्या त्या गोऱ्या माणसाला सांगा. म्हणावं, ही अशी सरकारी शिक्क्याची, मध्यवर्ती तुरुंगातली पत्रं परत आली तर ती ठेवून घे. आपण जाऊ तेव्हा घेऊ ती. चार चौघात आणखी लाज नको जायला.
-    हो, हो. मी नक्की करेन ते.
-    मग वाचून घ्या तुमचं पत्र.
त्यांनी सिमांगुचं पत्र उघडून त्यातल्या जोहानसबर्गमधल्या सगळ्या घडामोडींच्या बातम्या वाचल्या. त्या चकरावून टाकणाऱ्या महानगराबद्दल त्यांना थोडीशी आपुलकी होती हे जाणवून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पत्र संपवून ते ढगांकडे बघायला बाहेर आले. आठवडेच्या आठवडे नुसता रणरणता सूर्य बघितल्यावर, हे ढग बघणं हा काय आनंद होता! एखाद दोन तर आत्ताच डोक्यावरून तरंगत जात होते, त्यांच्या विस्तीर्ण सावल्या खोऱ्यामध्ये पडल्या होत्या, संथपणे सरकत होत्या, पायथ्याकडून माथ्याकडे. आणि मग एकदम वेगानी त्या नाहीश्या होत होत्या. उकाडा अतिशय वाढला होता. आता लवकरच उम्झीम्कुलूच्या खोऱ्यापलीकडून गडगडाट ऐकू येणार होता. आजतरी हा दुष्काळ संपणार होता, अगदी नक्कीच!
ते तिथे उभे असतांनाच त्यांनी एक मोटरगाडी करिसब्रुककडून खालच्या दिशेनी येताना पाहिली. हे एक दुर्मिळ दृश्य होतं. हा कच्चा रस्ता बैलगाड्या, खटारे नाहीतर नुसत्या ओझ्याच्या बैलांच्या वापरासाठी होता. त्यावरून अशी मोटरगाडी येणं अपेक्षित नव्हतं. हे लक्षात घेऊन ती गाडीही सावकाश येत होती. मग त्यांनी बघितलं, चर्चपासून थोड्याच अंतरावर, एक गोरा मनुष्य घोड्यावर स्तब्ध बसलेला होता. तो त्या गाडीचीच वाट बघत असावा. आणि मग एकदम थोड्याशा धक्क्यानीच त्यांना जाणवलं, की तो मनुष्य जेम्स जार्विस होता. पुढचा धक्का म्हणजे, त्या गाडीतून उतरणारा गोरा मनुष्य म्हणजे मॅजिस्ट्रेट होता. त्यांना लगेच काल रात्रीचा तो फालतू विनोद आठवला. जार्विस त्यांच्या घोड्यावरून उतरले आणि त्यांनी मॅजिस्ट्रेट आणि त्यांच्या इतर गोऱ्या सहकाऱ्यांबरोबर हस्तांदोलन केलं. त्या इतर लोकांकडे कसल्या तरी काठ्या आणि छोटे झेंडे होते. आणि, अरे बापरे! दुसऱ्या दिशेनी मुखिया आणि त्याचे दोन सल्लागार सुद्धा तिथेच येउन दाखल झाले. मुखिया नेहमीप्रमाणे तंग तुमान आणि फरची हॅट घालून आला होता. मग मॅजिस्ट्रेट आणि मुखिया आणि इतर सगळे, ह्यांचे नमस्कार-चमत्कार घडले. नंतर ज्या रितीनी ते एकत्र उभे राहून बोलत होते, त्यावरून हे उघड होतं, की ते ही चर्चा करण्यासाठीच इथे आले होते. त्यांचे मोठमोठे हातवारे चालले होते, लांबच्या आणि जवळच्या गोष्टींकडे बोटं दाखवून. मग मुखियाच्या सल्लागारांपैकी एकाने तिथलं एक छोटंसं झाड तोडलं. त्याच्या सरळसोट फांद्या लांब कापल्या आणि त्यांची टोक घासून अणकुचीदार केली. कुमालो हे सगळं अचंबित होऊन बघत राहिले. गोऱ्या लोकांनी आणखी काठ्या आणि झेंडे बाहेर आणले. एकाने तीन काठ्यांच्या आधारावर एक खोकं उभारलं, जणू काही तो सगळ्याचा फोटो काढणार आहे. जार्विस आणि मॅजिस्ट्रेटनी आता त्यांचे कोट काढून टाकले आणि काही काठ्या आणि झेंडे घेतले. ते ढगांकडेही बोटं दाखवत होते. कुमालोंच्या कानावर जार्विसचे शब्द आले, ...शेवटी येणार असं दिसतंय.
एव्हाना मुखिया काही गोऱ्या माणसाच्या मागे रहाणार नव्हता. म्हणून तोही घोड्यावरून खाली उतरला होता. त्यानेही काही काठ्या घेतल्या होत्या. पण कुमालोंच्या लक्षात आलं, की मुखीयाला स्वतःला ह्यातलं फारसं काही कळत नव्हतं. जार्विस ह्या सगळ्या प्रकाराचं नेतृत्व करत होते. त्यांनी एक काठी जमिनीत एका ठिकाणी रोवली. मुखीयानीही एक काठी त्याच्या सल्लागाराला दिली आणि हळूच काहीतरी सांगितलं. सल्लागाराने ती काठी जमिनीत दुसऱ्या एका ठिकाणी रोवली. पण मग तो तीन पायांचा खोकावाला गोरा माणूस ओरडून म्हणाला, तिथे नाही, तिथे नाही. ती काठी काढून टाका. सल्लागार द्विधा मनस्थितीत होता, आणि त्याने गोंधळून मुखीयाकडे बघितलं. मुखिया रागावून ओरडला, तिथे नाही, तिथे नाही. ती काठी काढून टाक. मुखिया थोडा ओशाळला, आणि नक्की काय करायचं ते माहिती नसल्याने हे काठ्या ठोकायचं काम गोरयांवर सोडून, घोड्याच्या जवळ जाऊन उभा राहिला.
तासभर निघून गेला. बऱ्याच काठ्या आणि झेंडे रोवले गेले होते. कुमालोंना अजून काहीही अर्थबोध होत नव्हता. जार्विस आणि मॅजिस्ट्रेट एकत्र उभे होते. ते सारखे वर टेकडीच्या दिशेनी बोटं दाखवायचे, आणि मागे वळून खाली खोऱ्याकडे बोटं दाखवायचे. मग ते वळून मुखीयाशी बोलले. सल्लागार होतेच, संभाषण कानात गंभीरपणे साठवून घेत. कुमालोंना जार्विसनी मॅजिस्ट्रेटना सांगितलेलं ऐकू आलं, ती फार दूरवरची गोष्ट झाली. मॅजिस्ट्रेटनी खांदे उडवले आणि ते म्हणाले, ह्या गोष्टी अशाच चालतात. मग जार्विस म्हणाले, मी प्रिटोरियाला जाईन, तुमची काही हरकत आहे का? मॅजिस्ट्रेट म्हणाले, माझी काहीच हरकत नाही. हे घडवून आणण्याचा तो एक मार्ग आहे खरा. मग जार्विस म्हणाले, तुम्हाला लवकर परतायला हवं, नाहीतर पार भिजून जाणार आहात. आता येणारं हे वादळ साधसुधं नसणार आहे.
पण जार्विस स्वतः मात्र निघाले नाहीत. त्यांनी मॅजिस्ट्रेटचा निरोप घेतला, आणि ते त्या कोरड्याठाण शेतात फिरायला लागले, ढांगेगणिक अंतर मोजत. मॅजिस्ट्रेट सोबतच्या गोऱ्या माणसाला म्हणाल्याचं कुमालोंनी ऐकलं, लोक म्हणताहेत हा वेडा होत चाललाय. माझ्या माहितीप्रमाणे, लवकरच ह्याच्याकडे एक छदाम सुद्धा शिल्लक रहाणार नाहीय.
मग मॅजिस्ट्रेट मुखीयाला म्हणाले, ह्यातल्या एका काठीलाही कोणी हात लावायचा नाही का ती हलवायची नाही; समजलं ना, ही तुमची जबाबदारी. मग ते आणि त्यांची माणसं गाडीत बसली, आणि टेकडी चढून जायला लागली. मुखिया त्याच्या सल्लागारांकडे वळून त्यांना म्हणाला, हुकुम द्या गावात, ह्यातल्या एका काठीला देखील धक्का लागता कामा नये, काय! सल्लागार त्यांच्या घोड्यांवर बसून गावात निघून गेले. मुखिया घोड्यावरून, चर्चच्या बाजूनी निघून गेला. त्याने कुमालोंचा सलाम स्वीकारला, पण थांबून त्यांना ह्या काठ्यांची भानगड काय ती समजावून सांगितली नाही.
जार्विस जे म्हणाले ते अगदी खरंच होतं. हे येणारं वादळ सामान्य दिसत नव्हतं. सबंध खोऱ्यावर भेवडावणारा काळाकुट्ट अंधार पसरला होता. आता शेतांवर ढगांच्या सावल्या दिसत नव्हत्या, कारण सगळीकडे सावल्यांसारखाच काळोख होता. उम्झीम्कुलूच्या पलीकडच्या बाजूला ढगांचा निरंतर गडगडाट ऐकू येत होता आणि मधूनच एखादी वीज दूरच्या डोंगरांमध्ये कोसळतांना दिसत होती. ह्याचीच तर सगळे लोक वाट बघत होते, पाऊस! शेवटी एकदाचा! बायका रस्त्यातून लगबगीनी घरी निघाल्या होत्या. एकदम शाळेतून सुटून बाहेर पडलेल्या मुलांचा गलका कानावर आला. हेडमास्तर आणि दुसरे शिक्षक ओरडून सांगत होते, चला चला, पटकन घरी जा. रस्त्यात खेळत राहू नका.
काय दृश्य होतं हे! हे वादळ! उम्झीम्कुलूकडून एक काळ्या, पाण्याने ओथंबलेल्या ढगांची रांगच्या रांग सरकत होती. कुमालो बराच वेळ ती बघत उभे राहिले. त्या रांगेतून गडगडाट ऐकू येत होता. एक वीज खाली जमिनीच्या दिशेनी झेपावली. दोत्शेनीच्या खोऱ्यामधला वारा फोफावू लागला. धूळ खालच्या शेतांवर आणि रस्त्यांवर गिरक्या घेत फिरू लागली. त्यांनी जार्विसना त्यांच्या घोड्याकडे घाईघाईनी जातांना पाहिलं. तो घोडाही अस्वस्थपणे खुर आपटत कुंपणाजवळ उभा होता. जार्विसनी सफाईनी त्याचा लगाम आणि त्यावरची बैठक काढून घेतली आणि घोड्याच्या कानात काहीतरी कुजबुजून त्याला मोकळा सोडला. मग ते कुमालोंच्या दिशेनी आले, आणि त्यांनी हाक मारली, उम्फुन्डीस.
-    सरकार.
-    मी हे तुमच्या अंगणात ठेऊ का? आणि तुमच्या चर्च मध्ये थोडा वेळ थांबू का?
-    अवश्य, सरकार. मी येतो तुमच्याबरोबर.
ते दोघे चर्च मध्ये गेले. तिथे पोचतात ना पोचतात, तोच डोक्यावर ढगांचा प्रचंड गडगडाट झाला, आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतांमधून झपाट्याने कोसळत निघालेल्या पावसाचा आवाज त्यांना ऐकायला येत होता. क्षणार्धात, तो लोखंडी छपरावर ताशा वाजवत होता. एवढा कर्णकर्कश्य, की संभाषण अशक्य होतं. कुमालोंनी चर्चमधला एक दिवा लावला. जार्विस एका बाकावर निश्चल बसून राहिले.
पण लवकरच, पावसाला त्या जुन्या गंजक्या छपरामधली भोकं सापडली, आणि आत येणारं पाणी टाळण्यासाठी जार्विसना बाजूला सरकावं लागलं.
कुमालो अस्वस्थ झाले, आणि माफी मागण्याच्या उद्देशाने ओरडून म्हणाले, छप्पर गळतंय. उत्तरादाखल जार्विस ओरडून म्हणाले, हो आलं लक्षात.
पुन्हा एकदा पाऊस गळक्या छपरामधून, नेमके जार्विस बसले होते तिथेच परत ठिबकू लागला, म्हणून त्यांना तिथून हलावं लागलं. ते उठून उभे राहिले आणि अंधुक उजेडात हाताने बाकं चाचपडत फिरू लागले. बसायला जागा शोधणं कठीण होतं, कारण बाकावर थोडी कोरडी जागा दिसावी तर जमिनीवर तळं झालेलं असे, आणि कुठे जमीन थोडी कोरडी बघावी तर बाक चिंब भिजलेलं.
-    छप्पर बऱ्याच ठिकाणी गळतंय, कुमालो ओरडले. तेही आलंय ध्यानात, जार्विस ओरडून म्हणाले.
शेवटी एकदाची जार्विसना एक जागा सापडली, जिथे फार गळत नव्हतं, कुमालोंनाही एक जागा सापडली होती. दोघं गप्प बसून राहिले. बाहेर मात्र अजिबात शांतता नव्हती; ढगांचा गडगडाट आणि छपरावरचा ताशाचा अनाहत नाद.
बराच वेळ ते तिथे बसून होते. शेवटी जेव्हा झऱ्यांचा खळखळाट आणि मृतःप्राय नद्या पुन्हा एकदा भरभरून वहायला लागल्याचे आवाज येऊ लागले, तेव्हा त्यांना जाणवलं की वादळ ओसरत आहे. गडगडाटाचा आवाज दूरवर जाऊ लागला, चर्चमध्ये थोडासा थिजलेला प्रकाश पुन्हा दिसू लागला आणि छपरावरचा थाडथाड आवाजही कमी झाला.
ते आवाज जेव्हा जवळजवळ थांबले, तेव्हा जार्विस उठून कुमालोंच्या जवळ येउन उभे राहिले. त्यांच्याकडे न बघता ते म्हणाले, दयेच्या अर्जाचं काय झालं?
कुमालोंनी थरथरत्या हातांनी ते पत्र काढलं. त्यांचे हात एकतर दुःखाने थरथरत होते, पण ह्या माणसाच्या समोर ते एरवीसुद्धा थरथरत. जार्विसनी ते पत्र घेतलं आणि त्या अंधुक उजेडात धरून वाचलं. मग पुन्हा पाकिटात घालून कुमालोंना परत दिलं.
-    मला ह्या गोष्टी अजिबात समजत नाहीत, ते म्हणाले. पण बाकी सगळं मात्र मला अगदी पूर्णपणे समजतं.
-    मी समजलो, सरकार.
जार्विस काही वेळ गप्प होते, वेदीकडे आणि वेदीवरच्या क्रूसाकडे बघत.
-    ही पंधरा तारीख येईल, तेव्हा मी लक्षात ठेवेन, ते म्हणाले. जपून रहा, उम्फुन्डीस.
पण कुमालो नाही म्हणाले, जपून जा. त्यांनी मी लगाम आणि बैठक घेऊन येतो नाही म्हटलं. दुधाबद्दल जार्विसचे आभार नाही मानले. आणि त्या काठ्यांच्याबद्दल तर मुळीच नाही विचारलं. जेव्हा ते उठून बाहेर गेले, तेव्हा जार्विस गेलेले होते. पाऊस अजूनही पडत होता, पण खूपच हलका. सबंध खोरं आवाजांनी गजबजून गेलं होतं - खळखळणाऱ्या झऱ्यांच्या आणि वाहत्या नद्यांच्या आवाजांनी. मातीचं लाल रक्त पुन्हा वहात होतं.
* * *
त्या संध्याकाळी, मावळतीच्या सूर्याच्या फिकट लाल प्रकाशात, सगळेजण बाहेर आले. सगळ्यांनी त्या काठ्या निरखून पहिल्या, कोणालाच त्या कशासाठी आहेत बोध होत नव्हता. लहान मुलगे त्या ओढून बाहेर काढायचा खोटा-खोटा खेळ खेळायला लागले. जमिनीजवळ त्या धरून, डोळे खोल आत ओढून, पार आकाशाकडे नजर लावून, किती जोर लावतो आहोत ह्याची नाटकं करायला लागले. लहानग्या मुली नुसत्या बघत होत्या, अर्धवट गंमतीनी आणि अर्धवट काळजीनी. खेळ छान चालला होता, पण डाझुमाच्या मुलाने चुकून ती काठी खरंच बाहेर ओढून काढली, आणि काय करून बसलो ह्या धक्क्याने नुसता पुतळ्यासारखा उभा राहिला. सगळीकडे शांतता. लहान मुलगे मोठ्यांकडे आता काय होणार म्हणून भितीने बघत होते. लहानग्या मुली त्यांच्या आयांकडे गेल्या - काही रडत, काही काळजीत, पण खिदीखिदी हसत आणि काही 'तरी आम्ही सांगत होतो त्यांना' म्हणत. छोट्या गुन्हेगाराला त्याच्या आईनी उचलून घेतलं आणि गदागदा हलवलं, 'लाज नाही वाटत तुला' असं म्हणत. मग मोठ्या माणसांनी ती जागा नीट तपासली. त्यांना ती काठी कुठे होती ते भोक सापडलं. त्यांनी ती नीट परत खुपसुन ठेवली. एकाने जमिनीवर बसून बाजूची माती नीट थापटली, कोणाला कळू नये काठी कोणी बाहेर काढली होती म्हणून. पण दुसरा म्हणाला, तसं नको, ती विस्कटून टाक. पाऊस पडलाय आणि त्यांना संशय येईल इतकी नीट कशी बाजूची माती. मग त्यांनी ती पुन्हा विस्कटली, त्याच्यावर थोडं गवत आणि खडे टाकले. आता कोणी नसतं म्हटलं ही बाजूची माती थापटलेली आहे.
मग दुधाची गाडी आली. सगळ्या लहान मुलांच्या आया, नाहीतर त्यांचे निरोपे, आपापला वाटा घेण्यासाठी चर्चमध्ये आले.
-    ही काठ्यांची काय भानगड आहे? कुमालोंनी त्यांच्या मित्राला विचारलं.

-    काही कल्पना नाही उम्फुन्डीस. पण उद्या मी शोधून काढायचा प्रयत्न करेन.

Comments