अधांतरी - १

टोपीका, कॅन्सास मधला एक लहानसा बार. शुक्रवार संध्याकाळ. बऱ्यापैकी गर्दी. एक मोठा घोळका एकुलत्या एका पूल टेबलाभोवती. खेळणारे चार-सहा जण, बघणारे अनेक. कोपऱ्यात एक लहानसा घोळका डार्टबोर्ड जवळ प्रॅक्टिस करतो आहे. गुडघ्याच्या वर पोचणारा आखूड स्कर्ट घातलेल्या तरुण पोरी एका वेळी सहा-सहा काठोकाठ भरलेले बिअर मग्स सांभाळत, नेहमीच्या ओळखीच्या गिऱ्हाईकांना हाय-हॅलो करत, डोळे मारत, खिदळत त्या गर्दीतून वाट काढत फिरताहेत. बारभोवतालची सगळीच स्टुलं भरलेली आहेत. बारमागे लावलेल्या तीन ५०-इंची टीव्ही वर, कुठच्या तरी बेसबॉल, बास्केट बॉल आणि फुटबॉलच्या मॅचेस एकाच वेळी चालू आहेत - सगळ्यांचेच आवाज बंद केले आहेत. कारण प्रेक्षकांच्या गोंगाटापुढे ते एनीवे कोणाला ऐकू जाणारच नाहीयेत. प्रत्येक होम रन, प्रत्येक डंक आणि प्रत्येक गोल बरोबर ओरडा थोडा जास्तच उंचावतो. प्रेक्षक बहुतांश पुरुषच आणि बहुतांश टी शर्ट आणि जीन्स मध्येच. आजूबाजूच्या गावांमधले, थोडे खेडवळ, गबाळे आणि मध्यमवयीन वाटणारे अनेकजण. थोडे चांगल्या मॉडर्न कपड्यातले तरुण, ते KUचे विद्यार्थी, जवळच्या लॉरेन्स कॅम्पस मधले.
शुक्रवार संध्याकाळचा आनंद सर्वत्र त्या बिअरच्या फेसापेक्षाही जास्त ओसंडतो आहे.
बारच्या आतमधल्या काळोख्या आणि गर्दीच्या वातावरणापासून दूर, बारच्या तोंडाशीच असलेल्या एका चौघांच्या बूथमध्ये दोन चाळिशीतले भारतीय.
संदीप: दिलप्या च्यायला, किती वर्षांनी भेटतोयस? भिती होती, अजून पूर्वीसारखाच असला तर इथल्या गावठी क्राऊडमध्ये शोधणार कसा ह्याला.
दिलीप: तुम्ही काय बाबा मोठे लोकं. मॅनहॅटन, न्यूयॉर्क मध्ये रहाणारे. द ग्रेट माईटी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये काम करणारे! तुम्ही कशाला येताय आमच्या असल्या मॅनहॅटन, कॅन्सास खेडेगावात.
संदीप: बस काय! कोणी भेटला नाही का सकाळपासून? त्या माईटी एनवायटी ने हाकललं माहित्येय ना? सगळीकडे सालं आउट सोअर्सिंग. अमेरिकेतल्या बातम्या लिहायला आता अमेरिकेत राहावं लागत नाही. बंगलोर आणि हैदराबाद मध्ये बसून सुद्धा ते करता येतं. त्यामुळे आता आमची भ्रमंती सुरु - थोडं ह्या देशात फिरून फ्रीलान्स टुरिस्ट एसे वगैरे लिहिता येतात का बघणारे. असल्या क्वेन्ट, रस्टिक आणि चार्मिंग गावांमध्ये फिरण्याला आजकाल भाव आहे माहित्ये का?
दिलीप: काय सांगतोस, आऊटसोर्सिंग आता तुमच्या फील्ड मध्ये सुद्धा? आम्ही आयटीवाले तर कधीपासून हे रडगाणं गातोय. नंद्याला येऊ दे, ऐकशीलच त्याच्याकडून.
संदीप: हो, पण आहे कुठे हा गधड़ा? दहा वेळा फोन करून सांगितलं की सहाच्या ठोक्याला मी त्या बारच्या दारात असेन. सव्वा सहा वाजायला आले आता. कधी नव्हे ते शाळेतले इन-मिन-तीन जण आपण एकत्र भेटणार एवढ्या वर्षांनी.
दिलीप: गप रे. सहा वाजून आठ मिनिटं झाली आहेत. तो येतोच आहे. शेवटच्या क्षणी काहीतरी काम निघालं आणि ऑफिसातून बाहेर पडायला उशीर झाला त्याला. फोन आला होता मला. तुला पण केला होता फोन, मेसेज ठेवलाय म्हणाला.
संदीप: ओह, शक्स! बॅटरी गेली असणार; चार्जर पण बॅगेतच आणि बॅग गाडीच्या ट्रंक मध्ये! दिवसभर ती मॅन्डी पीडत होती फोनवर...
दिलीप: मॅन्डी? ही कोण नवीन? अँजेलाचं नांव बदललं का?
संदीप: नाही रे, अँजेलालाच बदललं. आपण बोललो नाही बऱ्याच महिन्यात मला वाटतं. ती फार बॉसी वाटायला लागली होती मला, म्हणजे अगदी न्यूयॉर्क स्टॅंडर्डनी सुद्धा. मॅन्डी गोड आहे रे खूप, पण कधी कधी फार जवळ येते असं वाटतं. नाही खिदळू नको! तशी जवळ आली तर चांगलंच - पण हे म्हणजे मला काही स्पेसच ठेवत नाही.
दिलीपचा फोन वाजतो.
दिलीप: हां, आलाच बघ नंद्या. पार्किंग लॉटमध्ये शिरतोय म्हणाला. त्याची पण बिअर मागवून ठेवू. हे जेनी, याह रिफील फॉर अस अँड वन मोअर. यप, अनान इज कमिंग. ओ भाऊ, एवढं डोळे चष्म्यातून बाहेर काढून बघायला नको, त्या मॅन्डीची थोडी तरी आठवण ठेव. जेनीच्या फिगरवरून जाऊ नको, आपल्यापेक्षा थोडीशीच लहान असेल. तिची मुलगी नंद्याच्या मुलीच्याच शाळेत आहे. जेनी आम्हाला दोघांना चांगलंच ओळखते. दर शुक्रवारी संध्याकाळचा आमचा ठरलेला रुटीन आहे हा. इथे येऊन दोन-चार बिअर्स, काहीतरी इथेच खायचं आणि नऊ-दहापर्यंत गप्पा हाणत बसायचं. कामाच्या, संसाराच्या, गेम्सच्या, वीकेंड प्लॅन्सच्या ... सगळ्या आठवड्याचं टेन्शन उतरवायचं आणि शांतपणे घरी जायचं. आमच्या बायकांनाही सवय झालीये आता. कधीतरी त्या सुद्धा जॉईन होतात इथेच आम्हाला.

Comments