सविता: अरे, मी अत्ता तुलाच फोन करणार होते! रीनाला स्केटींगरिंक मधून पिकप करून घरी सोडणार होतास, बॉटम्स अप मध्ये जाण्यापूर्वी. पत्ताच नाही तुझा. ओह, आलं लक्षात! आत्ता निघतोयस ऑफिसातून, म्हणजे रीनाला मी पिकप करायचं हे आलंच ओघानी. जाऊदेरे, हो, हो; माहितीये शाळेतला मित्र एवढ्या वर्षांनी भेटणार आहे. पण ऐक, म्हणून बिअरला उधाण नको, जरा जपून! लव्ह यू!
झालं? हातातलं काम टाकून आधी जाऊन रीनाला घेऊन यायला हवं. ह्याचं काम आणि ह्याची करियर नेहमी महत्वाची. पण किती झालं तरी चिडताच येत नाही ह्याच्यावर.
बारा वर्ष उलटली लग्नाला, पण अजूनही प्रेमातच आहे मी त्याच्या. कालपरवा घडल्यासारखं आठवतं, त्यांच्या घरी आई-बाबांबरोबर 'दाखवायला' घेऊन गेले होते - हो, आमचा काही प्रेमविवाह वगैरे नाही, बरं का! ह्यानेच दार उघडलं होतं, बघितल्याक्षणी आमची विकेट गूल! आमची म्हणजे, आमच्या तिघांचीही. विशेषतः बोलायला लागल्यावर. थोडा वाटला होता शिष्ट. अमेरिकेच्या फार प्रेमात होता - पण कुठेही उथळ दिखाऊपणा किंवा ढोंग नव्हतं. त्याने स्पष्ट करून टाकलं होतं, 'माझी काही भारतात परत येण्याची इच्छा नाही. अमेरिकाच माझा देश वाटतो मला. जन्मभर तिथे राहायची तयारी असली, तरच हो म्हण लग्नाला.' आमच्या घरी नातेवाईकांमध्ये झाला थोडा उहापोह - हे असलं काय फटकून वागणं? कधीच परत येणार नाही, आणि एवढ्या लांब राहणार? कसला देश तो, आणि कसली संस्कृती! जवळची माणसं नकोत का सोबत? वगैरे वगैरे. पण शेवटी 'जाऊ दे; मुलगा तरी चांगला आहे' ह्यावरच मिटलं - आणि मी सुटकेचा निश्वास टाकला होता. मग काय, दोन आठवड्यात लग्न! आणि महिन्याभरात साता समुद्रापारहून आलेल्या माझ्या राजकुमाराबरोबर उडत उडत मी त्याच्या गावात जाऊन पोचले सुद्धा.
अमेरिकेचं मला प्रेम किंवा मोह असण्याचा तेव्हा प्रश्नच नव्हता! माहितीच काय होती ह्या देशाबद्दल? प्रेम होतं ते फक्त त्याच्याबद्दल. लग्नापूर्वीच्या दोन-चार चुटपुटत्या भेटींच्या गप्पांमधून खूप कौतुक होतं, एवढ्या तरुण वयात एवढा मोठा निर्णय घेणं, परक्या देशात जाऊन एकट्याने स्वतःच्या पायावर उभं राहाणं. शिकलेली मीही होते, चांगली इंजिनिअर होते - पण भविष्याचा सुसंबद्ध असा विचारच केला नव्हता कधी. नंदूने मला तो विचार करायला शिकवलं. इथे एवढ्या संधी मिळाल्या, स्वतःची करिअर करण्याच्या. खूप नवीन शिकायला मिळालं. आता माझीही नोकरी झाली की सहा सात वर्षं; चांगला जम बसला आता. सुरुवातीच्या नवशिक्या काळात, रीना अगदी बेबी आणि आमचे आम्ही दोघंच, अशा परिस्थितीत नंदूने किती वेळा मदत केली, केवढं समजूतदारपणे सांभाळून घेतलं - प्रेम जडायला आणि टिकायला काय लहानपणापासूनचं अफेअर असायला लागत नाही. ती जेनी मोठी दहा वेळा ऐकवायची - वी वेअर हायस्कुल स्वीटहार्ट्स - झालाच ना घटस्फोट आता एवढ्या वर्षानंतर. आता त्याला शोध लागला, जेनीपेक्षा त्याला माईक जास्त आवडतो - काय बोलणार कप्पाळ!
जाऊ दे! जुन्या आठवणी डोक्यात आल्या, की वेळेचं भान सोडून रमते मी त्याच्यातच. तिकडे रीना वाट बघत असेल. इतरांचे मम्मी डॅडी यायला लागले, की ही पटकन हिरमुसली होते. निघायलाच हवं मला.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...