दिलीपचा फोन ठेवता ठेवता आनंदने त्या माणसाला रस्ता क्रॉस करतांना बघितलं होतं. एरवी लक्ष वेधून घेण्यासारखं त्याच्यात काहीच नव्हतं, दहा माणसात सुद्धा सहज विसरता यावा असा चेहरा, डोक्यावरच्या कॅप मधून केस आहेत का नाही तेही कळत नव्हतं. साठ पासष्ट वर्षाचा असावा. लक्षणीय गोष्ट एवढीच, की ह्या भागात, असा रस्त्यावर पायी चालणारा मनुष्य आनंदने प्रथमच पाहिला होता. पबच्या मागे तर नुसती झाडी आणि जंगल होतं, पुढे हा काऊंटी रोड, त्याच्यापलीकडे पुन्हा जंगल, आणि दृष्टीच्या टप्प्यात कुठे घरं किंवा ऑफिसं वगैरे काहीच नव्हतं - कुठून आकाशातून अवतरला हा गडी! गाडी मोडून पडली म्हणून मदत मागण्यासाठी फिरतो आहे म्हणावं तर जवळपास कुठे गाडीही उभी दिसत नव्हती, आणि हा पठ्ठ्याही आरामात संथपणे चालला होता. 'हूं: एकेक चक्रम नमुने!' असं म्हणून आनंदने 'बॉटम्स अप' च्या लॉटमध्ये शिरता शिरता ब्रेक मारला, त्याला जायला दिलं आणि मग पार्किंग स्पॉट शोधायला लागला - ह्यावेळेला पब अगदी भरभरून वहात असतो, त्यामुळे त्याला दोन चकरा माराव्या लागल्या स्पॉट मिळायला.
समर असल्याने आता पबच्या बॅकयार्डमध्येही बाकडी आणि टेबलं ठेवली होती - बिअर-गार्टन म्हणे! पबच्या पुढच्या दाराशी चालत जात असतांना त्याला कित्येक ओळखीचे चेहरे दिसले; काळे, गोरे, बायका, पुरुष... ऑफिसातले, रीनाच्या मित्र-मैत्रिणींचे आई-वडील, सविताचा आधीचा बॉस... सगळ्यांना हाय-हॅलो करत, हाय-फाय, टी जी आय एफ करत एकदाचा तो पबच्या दाराशी पोचला. दाराशी पोचण्याआधीच उघड्या खिडकीतून त्याला दिलीप आणि समीर दिसले, पहिल्याच टेबलावर बसले होते. त्यांना हात करून त्याने आल्याची वर्दी दिली; आणि तो पुढच्या दाराने आत शिरला.
संदीप: हॅल्लो स्कॉलर! या, या, या! तुमचीच प्रतीक्षा करत होतो. शेवटी सोडलं तर एकदाचं बॉसनं? आनंदरावांशिवाय पान हलत नाही म्हणे एवढया मोठ्या जगद्विख्यात शिपींग कंपनीचं. बस, तुझी बिअर आधीच मागवून ठेवली आहे - घे!
आनंद: बस कर यार! एवढ्या वर्षांनी भेटतो आहेस, पण त्या शाळेच्या गॅदरिंगमधला नाटकीपणा अजून गेलेला दिसत नाही तुझा. कसलं पान आणि कसली शिपींग कंपनी रे! साला, त्या नव्या इंडियन व्हेंडरच्या लोकांनी गोंधळ घातला आयत्या वेळी - आज रात्री आमचं नवीन सॉफवेअर रिलीज व्हायला पाहिजे त्यातच गोची! म्हणजे आलं ना रात्रीचं जागरण, आणि वीकेंडची बरबादी वेगळीच! इथे बॉसला चुचकारून, सगळं थोडंसं आत्तापुरतं मिटवून आलो आहे. चल, पुढचे दोन चार तास तरी मजेत घालवू. चीअर्स!
संदीप: चिअर्स! आणि चेह-यावर हे जंगल कधीपासून? तुझ्यासारख्या शादीशुदा माणसाला हा असला देवदास लुक शोभत नाही रे!
आनंद: गेला आठवडा जरा जास्तच बिझी होता रे, त्यामुळे दाढीवर धाड! आमचं बोअर रूटीन जाऊ दे रे. न्यूयॉर्कच्या मायानगरीच्या गंमतीजंमती सांग. काय नवीन?
दिलीप: मॅन्डी! नवीन गर्लफ्रेंड!
संदीप: ह्याच्या डोचक्यात तेवढीच माहिती अडकून राहिली आहे. वो तो चलता रहता है, यार. आपल्याला है ना, ते लग्न आणि सेटल-बिटल होणं नही जमनेका. कंटाळा येतो रे. मी तर है ना, कार पण लीज करतो - दर दोन-तीन वर्षांनी नवं मॉडेल!
आनंद: वा:! मज्जाय! शाळेत असतांना मला आठवतंय तुला त्या थोड्याफार पॅकार्ड नाहीतर इंपाला दिसायच्या त्यांच्यात भयंकर रस असायचा. मुंबईतल्या चिंचोळ्या रस्त्यामधून मोझेसने समुद्र दुभंगावा, तशी ती अजस्त्र इंपाला फेरीवाले, भाजीवाले आणि रस्त्यातून चालणारे ह्या सगळ्यांना दोन्ही बाजूला ढकलत संथपणे जातेय, आणि हे ध्यान तिच्याकडे ध्यान लावून बसलंय हे दृष्य अजून आठवतं मला. तेव्हापासून इंपाला घ्यायची तुझी अँबिशन! जणू खूण केल्यासारखीच जेनी त्यांच्या टेबलाकडे येते.
जेनी: हेय अनान! हाऊ यू गाईज डुईन? यु आर लेट अनान; आय हॅड टू एन्टरटेन युअर बडी ऑल धिस टाइम.
दिलीप: यु एन्टरटेन्ड हिम ऑलराईट! एनीवे, कॅन यु गेट अस ऑल ए रिफील? अँड द मेनू... च्यायला भूक लागली आता... नो, नथिंग, जस्ट द मेनू. थँक्स!
जेनी जवळच्या कोपऱ्यातल्या बारटेंडरला विचारते काय झालं. तो म्हणतो, काही खास नाही गं. येडचाप होता एक. काहीतरी टेकआउट ऑर्डर मोठी दिली आणि आयत्यावेळी पैसेच नव्हते आणि क्रेडिट कार्ड पण डिक्लाईन झालं. कॅश मशीनवर केलिऍन आहे ना, तिच्याच अंगावर ओरडायला लागला. 'एन' वर्ड वापरला बहुतेक. ती भडकली, मग पब्लिकपण भडकलं. हुसकून लावला त्याला.
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...