अधांतरी - ३

मार्टी श्मिड्ट त्या मोटेल रूम मधल्या तकलादू डेस्कवर तंगड्या टाकून विचार करत होता. ऍश ट्रे मध्ये सिगारेटचं थोटूक अजून धुगधुगत होतं. पलीकडे अर्धवट उरलेल्या चायनीज टेकआउट जेवणाचे खोके उघडेच पडले होते. बाजूच्या गार्बेज बिन मध्ये बिअरच्या तीन रिकाम्या बाटल्या, आणि सिगारेटची अनेक थोटकं. बेडवरती विस्कटलेली चादर आणि एकत्र गोळा झालेलं ब्लॅंकेट. एकुलत्या एका दिव्याचा मिणमिणता पिवळट उजेड आणि अनेक दर्पमिश्रित कुबट वास सारख्याच दुबळेपणे आसमंतात पसरले होते.
मार्टीला शुक्रवार संध्याकाळचं डिप्रेशन आलं होतं. आठवडा उलटला ह्या टोपीकामध्ये येऊन. मिझुरीमध्ये त्याने बरोबरीच्या काही कामगारांकडून ऐकलं होतं, इथे बर्लिंग्टन नॉर्दर्न च्या रेल्वे यार्डात मेकॅनिक्ससाठी जॉब्स आहेत म्हणून. महिनाभर मिझुरीमध्येच काम शोधण्यात घालवल्यावर त्याने टोपीकामध्ये येऊन बघायचं ठरवलं. आठवडाभर रेल्वे यार्डात खेटे घातल्यावर अजूनही काही हाती लागलं नव्हतं. आता वीकेंड म्हणजे आणखी दोन दिवस फुकट जाणार! हे मोटेल सस्त्यातलं असलं तरी फुकट तर नक्कीच नव्हतं. त्यात आणखी मूर्खपणा करून मार्टीने थोडे पैसे वाचले म्हणून, दोन आठवड्याचं भाडं रोख देऊन टाकलं होतं. त्याने खिशातून वॉलेट काढलं आता किती पैसे उरलेत बघायला - चुरगळलेल्या थोड्या नोटा काढतांना कचकड्यासारखं कुरकुरीत झालेलं जीर्ण प्लॅस्टिक फाटून आतला तेवढाच जीर्ण रंग उडालेला एक फोटो बाहेर पडला - डॉन आणि जेनी! केवढी लहान होती दोघं! मिशिगनमध्ये असतानाचा हा फोटो. जुने दिवस आठवले आणि दचकायलाच झालं - एवढी वर्ष उलटून गेली त्याला - मिशिगनपासून ह्या खुराड्यापर्यंतच्या प्रवासाला?
कधी झालं हे आयुष्य एवढं बेताल? कधी गेलं सगळं हाताबाहेर? तेव्हा फोर्डमध्ये चांगली नोकरी होती, सिंडी आणि तो एकत्र होते, मुलं लहान होती - जेनी जेमतेम चार-पाच वर्षाची असेल. सगळं छान चाललं होतं. खरं म्हणजे घडी विस्कटायला तेव्हा नुकती सुरुवात होत होती, अर्थातच तेव्हा नाही समजलं ते. 'एरॅब्स' हा शब्द त्याने तेव्हा पहिल्यांदा ऐकला होता - असले कोणी लोक असतात हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं त्या काळी. पण ह्या पाखंडी लोकांनी त्याच्या सुखाच्या आयुष्याचं वाटोळं केलं. आधी गॅसच्या किंमती काय चढल्या. त्यातून मग जपानी गाड्यांचं खूळ जन्माला आलं - दोन बॉम्ब टाकून उध्वस्त केलेले हे पिवळे लोक - गाड्या बनवून उलट्या इथे पाठवण्यापर्यंत मजल गेली ह्यांची. गाड्या कसल्या - एक लाथ मारली तर पेकाट मोडेल असले नाजूक खोके! तगड्या भरदार अमेरिकन गाड्यांपुढे काय टिकणार ह्या. पण ह्याच गाड्यांनी त्याच्या कारखान्यात केवढी उलथापालथ घडवून आणली. नवीन डिझाईनच्या, लहानशा नाजुकनार गाड्या बनवायला सुरुवात झाली. युनियनची काँट्रॅक्टस बदलली, कामाचे तास वाढले, बोनस कमी झाला, पगारवाढ बंदच झाली.
असेम्ब्ली लाईनवर आता माणसं कमी होऊन मशीनं वाढली होती; गाडीचे पार्ट्स जोडण्याऐवजी आता त्याला ही मशिनं कशी ऑपरेट करायची समजणं महत्वाचं होतं. कंपनीने पाठवलं होतं त्याला ट्रेनिंगला, पण शाळा आणि शिक्षण ह्याचं मार्टीला मुळातच वावडं होतं. नवीन असेम्ब्ली लाईनबरोबर मार्टीचं तंत्र काही जुळेना. रेंच, पॉवर ड्रिल आणि स्क्रूड्राईवर कशी मर्दानी हत्यारं वाटत, हे बायकापोरींसारखं नुसती बटणं दाबणं आणि टाईप करणं त्याला जमेना. 'प्रॉडक्टिव्हिटीमध्ये सुधारणा हवी' असे शेरे सर्रास मिळू लागले, आणि एक दिवस अटळ ते घडलं - एका लेऑफच्या लाटेत मार्टीही बाहेर फेकला गेला - पिंक स्लिप! मग काय, आज इथे तर उद्या तिथे अशा नोकऱ्या सुरु झाल्या - मार्टीचं बूड कुठेच स्थिरावेना. फोर्डच काय, त्यांच्या सप्लायर्सकडे सुद्धा जमाना बदलत होता, मार्टीच्या अनुभवाला कोणीच विचारत नव्हतं.
नोकरीच्या शोधात आधी डेट्रॉईट सोडावं लागलं, मग मिशिगनमधूनही बाहेर पडावं लागलं. चौघांच्या संसाराला पैसे पुरत नव्हतेच, त्यातनं रोजची भांडणं. सिंडीकडून तिसऱ्यांदा शेजारणीच्या नवऱ्याने कशी चटकन ट्रेनींग पूर्ण करून दुसरी नोकरी मिळवली हे ऐकल्यावर रागाच्या भरात त्याने तिच्या थोबाडीत मारलं होतं - तेवढं निमित्त झालं, आणि मोडकळीला आलेला तो संसार पारच कोसळला. 'बॅटरी अँड असॉल्ट' म्हटल्यावर काय, फटकन घटस्फोट मिळाला सुद्धा. वर त्या हरामखोर जखीणीने मुलांचा पूर्ण ताबा घेतला - त्याला मोठ्या मिनातवारीने महिन्यातून एकदा मुलांना दोन तास भेटायची परवानगी मिळाली. मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांनाच त्याला भेटण्यात फार रस नव्हता - मुळातले कच्चे धागे पारच तुटून गेले.
इथे वर्ष, तिथे दोन वर्ष असं गावागावातून फिरत असतांना त्याच्या लिव्ह-इन रिलेशनशिप्स होत्या; पण सिंडीच्या अनुभवानंतर तो कुठच्याच बाईवर विश्वास ठेवू शकत नव्हता - सगळ्या नुसत्या पैशाला हपापलेल्या! आणि तेवढ्यापुरता लग्न आणि संसार असला देखावा हवाय कोणाला! मुळातल्या थोड्या एकलकोंड्या आणि तुसड्या मार्टीला सगळ्याचाच संशय येत असे. बरोबरीच्या कामगारांमध्ये सुद्धा त्याचे ‘मित्र’ फारसे नव्हतेच, आठवड्यातून एकदा बोलिंगसाठी जायचा तो त्यांच्याबरोबर, पण ते तेवढ्यापुरतंच. बऱ्याच वेळा संध्याकाळी फक्त तो, त्याची बर्बन आणि त्याचा टीव्ही! टीव्हीवर कुठचाही गेम असला तरी मार्टी त्यात पूर्णपणे बुडालेला असे! वेल, ऑलमोस्ट कुठचाही गेम - एक बास्केटबॉलचा त्याला तिटकारा होता; बहुतांशी काळतोंडे लोकंच तो खेळतात म्हणून. मार्टीला आपल्या गोऱ्या युरोपिअन वंशाचा रास्त अभिमान होता - जगातून वाट्टेल त्या दळिद्री देशातल्या घाणेरड्या लोकांना इथे यायला देऊन ह्या देशाची माती होते आहे हे त्याचं ठाम मत होतं. यायला देणं सुद्धा एक गोष्ट झाली, पण वरती आपण सगळे सारखे, बरोबरीचे - हा म्हणजे मूर्खपणाचा कळस होता. मार्टीच्या डोक्यात तिडीक जात असे असल्या ढोंगी राजकारण्यांची वक्तव्यं ऐकतांना. पुन्हा असली भाषणं देणारे बरेच स्वतः गोरेच असत - थूत साल्यानो! अरे, काहीच स्वाभिमान नाही तुम्हाला आपल्या वंशाचा, संस्कृतीचा? ह्या असल्या बुळ्या नेभळ्या नेत्यांमुळेच देश नुसता जगभरच्या बाजारबुणग्यांनी भरून जातो आहे. ना वंशाचे, ना भाषेचे, ना धर्माचे - वाट्टेल ते लोक इथे येऊन राहतात आणि वरती आमच्या नोकऱ्या बळकावतात. ज्या युरोपिअन लोकांनी हा देश वसवला, त्यांचीच सगळीकडे खच्ची होते आहे.
नुसत्या विचारांनीच मार्टीचा भडका उडायला लागला. शांत व्हायचा एकच उपाय! त्याने टेबलावरच्या वाईल्ड टर्कीच्या बाटलीकडे नजर टाकली - तिने तळ गाठला होता, एक ड्रिंक सुद्धा पूर्ण नाही भरणार. जेवणही आणायला हवंच आहे. म्हणजे बाहेर जाणं आलं, गावात जायचं तर गाडी घेऊन, म्हणजे गॅस ... आणखी खर्च! जाऊ दे! दुपारी येतांना त्याने मैल-दोन-मैलावर एक बार बघितला होता. चालत गेलं तर डोकंही थोडं शांत होईल आणि पैसेही वाचतील.
मार्टीने खुर्चीवर पडलेला फ्लॅनेलचा शर्ट घातला, बेसबॉल कॅप डोक्यावर चढवली आणि एकदा आरशात डोकावून बघितलं. दाढी करायला हवी होती खरं तर, पण जाऊ दे, कोण बघणारे! बघितलं तरी लक्षात राहावा असा त्याचा चेहरा नव्हताच मुळात. बूट घालून खोलीचं दार धाडकन ओढून घेण्यापूर्वी त्याने सवयीने खिसे चाचपून वॉलेट आणि पिस्तूल आहे ना, खात्री करून घेतली. त्या दोन गोष्टींशिवाय तो कधीच बाहेर पडत नसे.

Comments