अधांतरी - ५


ह्या उन्हाळ्याच्या दिवसात दीड दोन मैल चालून मार्टी मुळात थकला होता; छा:, तो फ्लॅनेल शर्ट घालायला नकोच होता. ह्या बिअरगार्टन मध्ये लोकांना थंडगार बिअर पिताना बघून त्याची तहान आणखीच वाढली. बारमध्येच एक बिअर घेऊन त्याने सँडविच आणि त्यातल्या त्यात सस्त्यातली बर्बनची बाटली टेकआउट म्हणून ऑर्डर केली. आयत्या वेळी कार्ड नाकारलं जाईल त्याला कल्पनाच नव्हती; नंतर जाणवलं हो, हा आता पाचवा आठवडा विनानोकरीचा - शेवटचा पे चेक येऊन बरेच दिवस उलटून गेले. क्रेडिट कार्डचं बिल गेल्या दोन-तीन महिन्यात तरी भरायचं राहिलंय खरं. पण म्हणून लगेच एवढं करायची काही गरज नव्हती!
पण म्हणून त्या माकडतोंडीने लगेच हसून दाखवावं? मार्टीच्या अंगाचा तिळपापड झाला. त्याला पक्की खात्री होती त्याच्याकडे पैसे कमी निघाले म्हणून ही गधडी खिदळत होती - सगळा बार त्याला हसतोय त्याला जाणवलं होतं. भडकला तो साहजिकच! धड चार शब्द इंग्लिश सुद्धा बोलता येणाऱ्या पाचसहा मेक्सिकन लोकांचा घोळका त्याच्याकडे बघायला लागला तेव्हा मात्र मार्टीचा संताप अनावर झाला. अरे काय समजता काय तुम्ही मला! तो त्यांच्या जवळ जाऊन ओरडला त्यांच्या अंगावर 'जा, चालते व्हा तुमच्या स्वतःच्या दळिद्री देशामध्ये! इथे माझ्या देशात नकोय तुम्ही मला. भीक मागायची लायकी नाही आणि इथे येऊन आमचे जॉब्स बळकावताहेत!' ती माकडतोंडी घाबरली बहुतेक, मागे वळून काहीतरी बोलली त्या दुसऱ्या बारटेंडरला. मार्टी काही डरत नव्हता, तिच्या जवळ जाऊन तिला मोठ्याने म्हणाला 'हेय, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? टॉक टू मी, स्वीटहार्ट!'.
एव्हाना त्याच्या भोवती गर्दी जमायला लागली होती. लोक आपल्या गप्पा आणि टीव्हीवरचे गेम्स सोडून त्याच्याकडे बघायला लागले होते. शेजारचे दोन-चार लोक त्याला सांगू लागले 'टेक इट इझी डूड. कूल डाऊन.' बार फाईटस काही मार्टीला नवीन नव्हत्या - त्याने सरळ सगळ्यात जवळच्याच्या कॉलरला हात घालून सांगितलं 'स्टे अवे, बस्टर!'. आता बारमधला एक वेटर मध्ये पडला, शब्दाला शब्द वाढत गेला, आणि मार्टीच्या मनातला तिरस्कार उफाळून बाहेर आला 'सनी, यु ट्राईन्ग टू  शो ऑफ टू दॅट ब्लॅकफेस नि... ?'. झालं! मार्टीचा शब्द पुरा होता होता, त्याला पुढचं काही समजायच्या आतच बरेच लोक त्याला ढकलून मागच्या दाराकडे घेऊन गेले. बारच्या मालकाने त्याला बाहेर काढून सांगितलं 'गेट लॉस्ट अँड डोन्ट शो युअर फेस हिअर अगेन.'
मार्टी संतापाने थरथरत होता. मी! मला, माझ्याच देशात मला कोणी सांगतं 'डोन्ट शो युअर फेस' - आणि जगभरातली एकेक जनावरं इथे येतात ते चालतं? रागाच्या भरात स्वतःशीच मोठमोठ्याने बडबडत, हातवारे करत तो बारच्या पुढच्या बाजूला जाऊ लागला, मोटेलमध्ये परत जाण्यासाठी. सभोवताली सगळे लोक खुशीत होते, मजा करत होते, हसत खिदळत होते.
त्याला! त्याला हसत होते, कसा बाहेर फेकून दिला बारच्या! तेवढंच नव्हे, कसा बेघर केला! कसा स्वतःच्याच देशात निर्वासित केला! कसा आयुष्याच्या खेळातच हरवला त्याला! हे, हे सगळे परके क्षुद्र लोक... इथे येऊन त्याला हसताहेत!
नाही, तो एवढ्या सहजासहजी हरणार नाहीय. बारमध्ये पाऊल टाकू नको म्हणाला काय! दाखवतोच पुन्हा आत जाऊन. तिरमिरीत, संतापाच्या भरात मार्टी बारचे पुढचे दार धाडकन उघडून आत आला. आतल्या अंधाराची थोडी सवय झाल्याक्षणी त्याच्या नजरेला पडले पहिल्याच टेबलावरचे तिघंजण! आणखी परके लोक! मेक्सिकन? रंग तर तसा दिसतो, पण ह्यांचे उच्चार वेगळे आहेत, हिस्पॅनिक नाहीत. हे ते एरॅब्स - काळे केस, ब्राऊन रंग. ह्यांनी सगळी वाट लावली त्याच्या आयुष्याची. अमेरिकेवर नाईन इलेव्हनला हल्ला केला तो ह्यांनी! पाखंडी, रानटी लोक - 'आला'च्या नावाखाली जीव द्यायला तयार असतात म्हणे. तो दाढीवाला ह्यांचा लीडर असणार. ह्यांना घालवा ना बारच्या बाहेर! ह्यांना पाठवा ना परत त्यांच्या देशात! तेवढा दम नाही तुमच्या कोणाच्यात. पण मी नाही तुमच्यासारखा बुळचट - मी पाठवतो ना, बारच्याच आणि देशाच्याच बाहेर काय, स्ट्रेट आलाकडेच पाठवतो त्यांना.
पिस्तूल काढून त्या दाढीवाल्याला दोन फुटांवरून मारणं एका क्षणात जमलं. मानेजवळच मारलेल्या एका गोळीत एखाद्या ओंडक्यासारखा तो कोलमडला. त्याचे साथीदार अवाक झाले होते, त्यातला एक लगेच उठून बाहेर येऊ बघत होता, मार्टीने त्याला थांबवण्यासाठी घाईघाईत एक गोळी मारली, तिसरा बहुतेक टेबलाखाली जाऊन दडला, मार्टीला खरं तर त्यालाही उडवायचं होतं, पण तो कुठे दिसेना. एव्हाना बारमध्ये प्रचंड गोंधळ झाला. आरडाओरडा, हातातून पडून फुटणाऱ्या बाटल्यांचे आणि ग्लासांचे आवाज, बरेच लोक बारच्या मागच्या दिशेला सरकत, ढकलत होते, काही जमिनीवर आडवे, काही बारच्या पलीकडे... डोळ्याच्या कडेतून मार्टीला काही लोक त्याच्या मागे पळून दारातून बाहेर पडत असलेले जाणवले. ह्या सगळ्याच गाढवांना चांगला धडा शिकवायला हवा. मार्टीने आता कोणा एकावर नेम धरता बारमध्ये गोळीबार सुरु केला - रडण्याच्या, ओरडण्याच्या, किंकाळ्यांच्या आवाजांनी तर त्याला आणखीच जोश आला. सहावी गोळी गेल्यावर तो थोडा भानावर आला, पिस्तूल रिकामं व्हायच्या आत इथून बाहेर निसटायला हवं. पिस्तूल रोखून धरूनच तो मागे वळला, दाराबाहेर जमलेली गर्दी एकदम घाबरून पांगली, पिस्तूल चौफेर रोखत मार्टी तीराच्या वेगाने बाहेर पडला - मागे वळून जमावाला रोखून धरायला त्याने आणखी दोन गोळ्या झाडल्या आणि मग तो जीवावर उदार झाल्यासारखा त्या काऊंटी रोडवरच्या वाहत्या ट्रॅफिकमधून सुसाट वेगाने धावत पलीकडच्या झाडीत अदृश्य झाला. दुरून पोलिसच्या गाड्यांचे सायरन ऐकायला येत होते. पहिली गोळी झाडल्या क्षणापासून फक्त पाच मिनिटं लोटली होती.
पहिल्या गोळीचा ठाप असा आवाज आला, तेव्हा अनान आणि डिलपचे बिअर मग्स भरायला टॅपजवळ आलेल्या जेनीची दाराकडे पाठच होती. ती दचकून मागे बघणार तेवढ्यात दुसऱ्या गोळीचा आवाज आला. घाईघाईने बारच्या कठड्यामागे दडण्याआधी काही सेकंद जेनीने त्या माणसाचा चेहरा ओझरता पाहिला. सगळ्यात विचित्र जाणवली ती त्याची डेट्रॉईट टायगर्सची कॅप - इथे, कॅन्सासमध्ये! इथल्या कित्येक लोकांना माहिती सुद्धा नसेल असली काही टीम आहे. जेनीला स्वतःला फार थोडे लोक माहिती होते - टायगर्सची कॅप कौतुकाने घालणारे - जुन्या, लहानपणच्या आठवणी. छे! काहीतरीच काय, तो कशाला येणार इथे. आणि खून?

Comments