मोटेल जवळ आल्यावर मार्टी पुन्हा दोन
मिनिटं थांबला. कोणीही
मागावर असल्याचं काही
चिन्ह नव्हतं. तो
मात्र घामाने चिंब
भिजला होता. त्याने
टोपी काढली, कमरेला
गुंडाळलेला शर्ट
काढला आणि त्याला
डोकं आणि तोंड
खसाखसा पुसलं. घामाने
चप्प बसलेले केस
पुसून जरा नीट
केले. झाडांमध्येच आत
आत जाऊन एका
छोट्याशा खड्ड्यात टोपी टाकली, खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ती टोपी बुचकळली, आणि त्याच्यावर बाजूची
माती बुटांनीच उकरून
ढकलली. पिस्तुलही दूर
भिरकावून द्यावं
असा त्याने एक
क्षण विचार केला...
पण एकच क्षण!
आता त्यात उरलेल्या दोन गोळ्या एवढंच
संरक्षण होतं
त्या परक्या रानटी
लोकांपासून, तेही
घालवून बसायचं? छे!
धाप कमी
होऊन पुन्हा नेहमीसारखा श्वास घेऊ लागल्यावर त्याने रस्त्याकडे डोकावून बघितलं. अजूनही बारच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम
होताच, एवढ्या लांब
अडकलेल्या गाड्यांना माहिती सुद्धा नव्हतं
अचानक असा जॅम
का झालाय. मोटेलच्या पार्किंग लॉटच्या मागच्या दिशेने
तो त्याच्या गाडीकडे आला. इथून लवकरात
लवकर दूर जायची
घाई असली, तरी
कोणाला संशय नको
म्हणून त्याने गाडी
सहजपणे बाहेर काढली.
बारच्या विरुद्ध दिशेला जाणारा रस्ता
पूर्ण मोकळा होता,
मार्टीला मोटेलच्या दाराशी थांबलेल्या गाड्यांमधून लेफ्ट टर्न घेऊन
रस्त्याला लागायला काहीच त्रास झाला
नाही.
*
* *
शुक्रवारी संध्याकाळी घरी पोचल्यानंतर जेनीने
स्वतःला घरामध्ये जवळजवळ कोंडूनच घेतलं.
पब काही दिवस
तरी बंद रहाणार
हे उघडच होतं.
अगदीच जवळच्या एखाद
दोन मित्रांचे फोन
तिने घेतले आणि
जुजबी बोलून त्यांना फुटवलं. एरवी ती
कोणाचा फोनही उचलत
नव्हती.
ती बेडवर नुसती
बसून होती. तिच्या
डोळ्यासमोरून पबमध्ये पाहिलेली दृश्य
जातच नव्हती. तिने
मेडिक्सना अनानला
पांढऱ्या कापडात
लपेटून गाडीत ठेवतांना बघितलं होतं, डिलप
काही दिसला नाही,
पण त्या सोफ्यावर प्रचंड रक्त दिसत
होतं. तिच्या छातीतली धडधड आणि हातांचं थरथरणं अजिबात थांबत
नव्हतं. त्यांचा तो
नवीन मित्र तिला
बघून तिच्याशी बोलायला येणार होता, पण
त्याला चक्क टाळून,
अर्धवट धावतच ती
तिच्या गाडीकडे गेली
होती.
आणि तो खुनशी
मारेकरी! पुन्हापुन्हा त्याचा ओझरता चेहरा
पाहिल्याची तीसेक
सेकंदं तिच्या डोळ्यासमोरून जात होती. डोक्यातली चक्र काही केल्या
थांबत नव्हती - जेवढा
जास्त विचार करावा,
तेवढी त्या चेहऱ्याची ओळख पक्की होत
होती. वयाची पहिली
अठरा-वीस वर्ष
बघितलेला चेहरा
का कोणी विसरतं?
कितीही विसरावा असं
वाटत असलं तरी!
ती थोडी मोठी
व्हायला लागल्यावर तिने मॉमकडून त्याच्याबद्दल बरंच ऐकलं
होतं. तिच्या मनात
फक्त तिरस्कारच दाटत
चालला होता त्याच्याबद्दल. हळूहळू तिने
त्यांच्या महिन्यातल्या एक वेळच्या भेटी
सुद्धा थांबवल्या होत्या
- शाळेचं नाहीतर इतर
ऍक्टिव्हिटीजचं निमित्त सांगून.
सबंध शनिवार
सुन्न विमनस्कपणे घालवल्यावर शेवटी तिने तिच्या
भावाला फोन केला,
तो अजून मिशिगनमध्येच होता. एवढी वर्ष
संबंध तोडलेल्या बापाबद्दल एकदम माहिती काढणंही कठीण, आणि काहीच
खात्री नसतांना भावाला
स्पष्टपणे काही
सांगणंही कठीण.
नशिबाने भाऊही
फारशा चौकशा न
करता तितपतच बेफिकीरपणे म्हणाला, 'चार-सहा
महिन्यापूर्वी आम्ही
बोललो तेव्हा तो
मिझुरी का कुठे
तरी होता. पण
काँट्रॅकट संपत
आल्याचंही बोलला;
त्यामुळे आता
कुठे असेल कोणास
ठाऊक!'
*
* *
टोपीका पुलिस
स्टेशनमध्ये ऑफिसर
ब्रॅडशॉ आणि
त्याचे सहकारी उद्विग्न मनःस्थितीमध्ये होते.
शुक्रवारच्या बॉटम्सअप मधील घटनेनंतर आठवडा
उलटत आला, पण
अजून मारेकऱ्याचा तलास
काढण्यात पोलिसांना काहीच यश मिळालं
नव्हतं. बारच्या मागील
भागात वर्णद्वेषी बडबड
करणारा आणि मारेकरी ह्या दोन्ही एकच
व्यक्ती होती
असं धरलं तरीही
दोघांपैकी कोणाहीबद्दल फारशी ठाशीव माहिती
मिळत नव्हती. बारमधून शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान नाकारल्या गेलेल्या क्रेडिट कार्डांचा पोलिसांनी माग काढला - त्या
चार जणांपैकी दोघे
गावातलेच होते
आणि दोघांकडेही ते
मारेकरी नसल्याचा सबळ पुरावा होता.
तिसरा नुसता टोपीकामधून ड्राइव्ह करत
होता आणि त्याचा
त्याच रात्री कोलोराडोमध्ये कार ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला
होता. त्याची बाकीची
माहिती आणि रेकॉर्ड्स मिळेपर्यंत त्याला
मारेकरी म्हणून
पूर्णपणे बाद
करता येत नव्हतं.
चौथा कॅन्सास सिटी,
मिझुरी मध्ये राहणारा होता; पण त्याने
ती भाड्याची जागा
आठवड्यापूर्वीच सोडली
होती, तो काम
करत असे तिथलं
काँट्रॅकटही महिन्या-दोन-महिन्यापूर्वीच संपलं
होतं. त्याचा थांगपत्ता कोणालाच माहिती
नव्हता. त्याचा पूर्वेतिहासही अनेक ठिकाणी
विखुरलेला असल्यामुळे त्याला शोधणं खूपच
कठीण होतं.
*
* *
दिलीपच्या परिस्थितीत चांगलीच सुधारणा होती. त्याच्या उजव्या
दंडातली गोळी
बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं होतं.
ती जखमही व्यवस्थित भरून येत होती.
त्याला बसलेला हादरा,
डोळ्यादेखत क्षणार्धात आडवा पडलेला आनंदचा
देह, एवढ्या वर्षांचा मित्र असा क्रूरपणे हिरावून घेतला
जावा आणि आपण
त्याला वाचवायला काहीच
करू शकलो नाही,
एक विचित्र अपराधी
भावना... ह्या सगळ्या
जखमा भरून यायला
मात्र बराच वेळ
लागणार होता.
दिलीपच्या प्रेग्नन्ट बायकोला जवळजवळ
सक्तीने घरी
थांबायला लावून,
त्याची हॉस्पिटलात देखभाल
करत होता, तो
संदीप. दिलीपला भेटायला येणाऱ्या लोकांशी बोलणं, दिलीप आणि
आनंदचं ह्या गावातलं आयुष्य समजून घेणं,
त्यांच्या मित्रांची, सहकाऱ्यांची, शेजाऱ्यांची मनोवृत्ती, त्यांच्या प्रतिक्रिया समजून
घेणं ह्या सगळ्यासाठी संदीपमधला चौकस
पत्रकार उत्सुकच होता. पत्रकाराच्या नैसर्गिक कुतूहलाने तो
त्यांना प्रश्न
विचारत होता. झालेल्या घटनेचा अर्थ लावायचा प्रयत्न करत
होता.
*
* *
संपलं, सगळं संपलं!
सविताने त्याचा
- निर्जीव निष्प्राण का होईना - चेहरा
एकदा शेवटचा पाहून
घेतला. आणि... मग
तो गेला ... त्याच्या शेवटच्या प्रवासाला... एकटाच. पुढचा प्रवास
काय आणि कसा
त्यालाही माहिती
नव्हतं... आणि तिलाही.
क्रिमॅटोरिअम मधून
बाहेर पडतांना सविताला एकीकडे संपूर्णपणे रिक्त
वाटत होतं, सगळ्या
भाव-भावनांचा ओलावा
मनातून कोणीतरी शोषून
घेतल्याप्रमाणे शुष्क
कोरडं वाटत होतं.
आणि दुसरीकडे गेल्या
आठवड्याभरातली असंख्य
क्षणचित्रं दाटीवाटीने डोळ्यासमोरून जात
होती.
बातमी समजल्याक्षणी बसलेल्या धक्क्यातून सावरायला तिला काही तास
लागले. थोड्याच वेळात
सगळ्या मित्र मैत्रिणींची, शेजाऱ्यांची, ओळखीच्यांची घरी रीघ लागली
होती. भेटायला तरी
किती लोकं यावे!
मराठी आणि भारतीयच नव्हे, गोरे, काळे,
चिनी, सगळेच! ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लीम - अगदी पाकिस्तानी सुद्धा!
टोपीकाचा मेयर
घरी आला होता,
कॅन्सासच्या गव्हर्नरचा फोन आला होता.
सगळ्यांचं पुन्हा
पुन्हा तिला सांगणं
एकच होतं - त्या
एका मूर्ख अतिरेकी गोऱ्या मारेकऱ्यावर जाऊ
नको, आम्ही त्याच्या नव्हे, तुझ्याच बाजूने
आहोत. आम्हालाही त्या
मारेकऱ्याचा तुझ्यासारखाच तिरस्कार आहे.
आम्हाला नाही
तू परकी वाटत.
रीनाच्या शाळेमध्ये रविवारी रात्री
'कँडल लाईट व्हिजिल' होता, बरेच पालक
आणि शिक्षक - विशेषतः गोरे - बोलले, त्या
मारेकऱ्याच्या धिक्काराबद्दल, गणपुले फॅमिली
आपल्यातलीच एक
आहे ह्याबद्दल.
आत्ता क्रिमॅटोरिअममध्ये जमलेली गर्दी,
आनंदबद्दलची भाषणं,
बाहेर रांग लावून
नुसतं तिच्याशी शेकहॅण्ड करायला उभे असलेले
असंख्य अनोळखी लोक,
तिच्यासाठी आणि
आनंदसाठी आणलेले
अगणित पुष्पगुच्छ हे
सगळं पाहून तिला
त्याही अवस्थेत भरून
आलं. सगळ्यांशी एक-दोन
शब्द बोलत गाडीपर्यंत पोचायलाच तिला
तासभर लागला. बसायच्या आधी गाडीलाच चिकटून
उभी असलेली जेनी
तिला दिसली, तेव्हा
कुठे जाणीव झाली
की एवढे सगळे
भेटायला आले,
पण जेनी मात्र
आली नव्हती, नुसता
एक फोन सुद्धा
नाही. थोड्याशा रागानेच तिच्याकडे बघतांना सविताला जाणवलं,
जेनीचे डोळे रडून
रडून सुजल्यासारखे दिसत
होते, नाक लालबुंद झालं होतं आणि
चेहऱ्यावरचा बराच
मेकअप ओघळला होता.
तिला पाहताच जेनी
धावत जवळ आली
आणि सविताला घट्ट
मिठी मारून परतपरत
फक्त 'आय एम
सो सॉरी' एवढंच
म्हणत राहिली. मिनिटभराने शांत झाल्यावर तिने
सविताच्या पाठीवरून हात फिरवला आणि
तिला गाडीत बसायला
मदत केली.
सविताची गाडी
दृष्टीआड झाल्यावर जेनी आपल्या गाडीत
जाऊन बसली. गाडी
सुरु करण्याऐवजी तिने
फोन उचलला आणि
डायल केला 'हॅलो,
टोपीका पुलिस स्टेशन?
आय वॉन्ट टू
शेअर सम इन्फर्मेशन अबाउट द बॉटम्सअप शूटिंग लास्ट फ्रायडे'.
*
* *
सविताचा भाऊ
आणि वहिनी नागपूरहून आले
होते. दोन आठवड्यानंतर भावाला परत जाणं
आवश्यक होतं, तिला
निदान मानसिक आधार
म्हणून वहिनी मात्र
काही आठवडे तरी
रहाणार होती.
विमान उडाल्यावर सविताच्या भावाने
निघतांना तिने
त्याच्या खिशात
घातलेलं पत्र
उघडलं.
'प्रिय
दादा,
तू आणि वहिनी
दोघांचाही गेल्या
काही दिवसात मला
केवढा मोठा आधार
मिळाला ह्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच
नाहीत. मला माहित्ये तू म्हणणार, हे
सांगायची काय
गरज आहे. गेल्या
काही दिवसात आपली
तिघांची, कधी
कधी आई-बाबांबरोबर सुद्धा, माझं पुढे
काय ह्याबद्दल बरीच
चर्चा झाली. मला
तुमचं प्रेम, आस्था,
माया आणि काळजी
सगळं सगळं समजतं,
पण मी अमेरिका सोडून भारतात येऊन
राहावं हे मात्र
पटत नाही. नंदूने
आणि मी, अमेरिकेत कायमचं रहाण्याचा निर्णय
विचारपूर्वक घेतला
होता, तो नुसता
पासपोर्टवरच्या शिक्क्याचा प्रश्न नव्हता. आम्हाला कापलेले का
होईना दोर आहेत,
रीनाला तेही नाहीत.
तिने एकच देश
बघितलाय, हाच
तिचा देश. ती
आमच्यासारखी अधांतरी नाही, ती इथलीच
आहे, तिला भारत
हा एक एक्सॉटिक देश वाटतो, परदेशप्रवासाला जाण्यापुरता. तिच्या
पंखात पुरेसं बळ
येऊन तिची ती
भरारी मारून कुठे
तरी स्थिर होईपर्यंत मला तिला अधांतरी ठेवणं योग्य वाटत
नाही. माझं पुढचं
सगळं आयुष्य इथेच
असणार आहे. सुदैवाने मी माझ्या पायावर
उभीही आहे आणि
इथेही अनेक चांगले
मित्र-मैत्रिणी आहेत.
मी एकटी नसणार
आहे.
नंदूचं म्हणशील, तर
मृत्यू अटळ आहे,
आणि ह्या नाहीतर
त्या मार्गाने तो
आपल्याला गाठतोच.
एका माथेफिरूने गोळी
घातली म्हणून हा
सबंध देश काही
आततायी ठरत नाही,
आणि कुठचाही देश
प्रत्येकाच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत
नाही.
मला खात्री आहे
तू समजून घेशील,
आणि आई-बाबांना समजावून देशील.
घरी पोचल्यावर स्काईप नक्की कर.
सविता'
Comments
Post a Comment
I would love to hear from you. Please post your comments here...